>> अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा औपचारिक नारळ फुटला नसला तरी काँग्रेस वगळता सर्व प्रमुख पक्षांच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महाजनादेश' यात्रा एक ऑगस्टपासून सुरु झाली असून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची 'जनआशीर्वाद' यात्राही सध्या सुरु आहे. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राला परिचित असलेल्या शिवसेनेच्या आदेश बांदेकर यांचीही 'माऊली संवाद' यात्रा सुरु झालीय. मंगळवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसची 'शिवस्वराज्य' यात्राही सुरु झाली आहे.
निवडणूक आयोगाने अद्याप विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नसला तरी घाऊक पक्षांतरं व या यात्रांमुळे राज्याचे राजकारण हळूहळू तापायला लागले आहे. राजकीय यात्रा महाराष्ट्राला तशा नव्या नाहीत. पण यावेळी त्यांचा वापर प्रचाराचे मुख्य माध्यम म्हणून होताना दिसतो आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात त्यांनी काढलेल्या 'प्रजा संकल्प' यात्रेचा मोठा वाटा होता.
तब्बल 3600 किमीची यात्रा काढून त्यांनी सुमारे एक कोटी लोकांशी संवाद साधला व तीच यात्रा त्यांना सत्तेपर्यंत घेऊन गेली. त्यामुळे राजकीय यात्रांचे महत्व अधिक अधोरेखित झाले आहे. अर्थात सर्वच यात्रा यशस्वी होतात असे नाही. सहा महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी काढलेली 'जनआशीर्वाद यात्रा' असो, किंवा राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची 'गौरव यात्रा' असो, या यात्रा त्यांची सत्ता कायम राखू शकल्या नाहीत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरु झालेल्या वेगवेगळ्या यात्रा कोणाला कुठे पोहोचवणार, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. कोणत्या यात्रेला कसा प्रतिसाद मिळणार? मिळालेल्या प्रतिसादाचे प्रत्यक्ष मतदानात प्रतिबिंब दिसणार का? आदी प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतीलच. पण त्यानिमित्ताने राजकीय रथयात्रा व त्याचा परिणाम याची चर्चा होणे स्वाभाविक आहे.
एन टी रामरावांची 'चैतन्य रथ यात्रा'!
जनमत संघटित करण्यासाठी किंवा संघटित जनमताची शक्ती दाखवून राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी राजकीय पक्ष किंवा संघटना 'लॉंग मार्च' काढत असतात. एक वाहन घेऊन व त्यावरच स्टेज उभारुन निवडणूक प्रचारासाठी राज्यात सलग प्रचार करण्याची सुरुवात केली ती तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन यांनी. चित्रपट क्षेत्रातून राजकारणात आलेले एमजीआर एक सुसज्ज व्हॅन घेऊन प्रचार दौऱ्यावर निघत असत. नंतरच्या काळात आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन टी रामाराव यांनी याचा प्रभावी वापर केला. एम जी रामचंद्रन यांच्याप्रमाणेच चित्रपट क्षेत्रातून राजकारणात आलेल्या एनटीआर यांनी 1982 साली सुसज्ज असा 'चैतन्य रथ' तयार करुन संपूर्ण राज्याचा दौरा केला.
एम जी रामचंद्रन यांनी सर्वप्रथम प्रचाररथाचा वापर सुरु केला
मोठमोठ्या सभा घेण्यापेक्षा आपल्या रथावरील स्टेजवरून छोट्याछोट्या सभा घेण्याचे त्यांचे तंत्र चांगलेच यशस्वी झाले. एनटीआर यांच्या तेलगू देसम पक्षाने आंध्रप्रदेशची सत्ता तर काबीज केलीच, पण आठव्या लोकसभेत 30 जागा जिंकून तेलगू देसम प्रमुख विरोधी पक्ष झाला होता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या 1984 च्या या निवडणुकीत काँग्रेसने 404 जागा जिंकताना विरोधी पक्षांचा पार सफाया केला. देशभरात भाजपाचे अवघे दोन खासदार निवडून आले होते. स्वाभाविकच 30 खासदार निवडून आलेल्या तेलगू देसमकडे लक्ष वेधले गेले.
एन टी रामराव यांनी 1982 साली प्रचारासाठी वापरलेला चैतन्य रथ
विविध पक्ष व नेत्यांनी अशा यात्रा काढायला सुरुवात केली. पण सर्वांच्या स्मरणात राहिली ती 1990 साली भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली राम रथयात्रा. या रथयात्रेनंतर देशाचे राजकारणच बदलत गेले. राजकीय प्रचारासाठी रथयात्रा काढण्याचे तंत्र सर्वच पक्षांनी स्वीकारले. महाराष्ट्रात 1995 साली सत्तांतर होऊन शिवसेना-भाजपचे सरकार आले. या सत्तांतरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्याबरोबरच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा मोठा वाटा होता. केंद्र असो वा राज्यात या यात्रा विरोधी पक्षांकडून सरकारविरुद्ध जनमत निर्माण करण्यासाठी काढल्या जात होत्या. मात्र आता सत्तेतील पक्षही प्रचारासाठी याचा अवलंब करायला लागला आहे.
लालकृष्ण अडवाणी यांची राम रथयात्रा
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेनेला दणदणीत यश मिळाले असले तरी या दोन्ही पक्षाचे नेते स्वस्थ बसलेले नाहीत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत फरक असल्याने गाफील राहून चालणार नाही, याची जाणीव त्यांना असावी. लोकसभेचे अनुकूल वातावरण विधानसभेपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी सर्वात आधी प्रचाराला सुरुवात केली आहे. विरोधक लोकसभेच्या प्रभावातून सावरुन तयारी करण्याच्या आत त्यांचा अर्ध्या महाराष्ट्राचा दौरा झालेला असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महाजनादेश' यात्रा
भाजपाचे सगळेच 'महा' असते. इतरांची अधिवेशनं होतात, भाजपचे 'महाअधिवेशन' होते. इतरांचा मेळावा होतो, यांचा 'महामेळावा' असतो. तसेच पुन्हा पाच वर्षांसाठी जनादेश मिळवण्यासाठी काढलेली यात्राही 'महाजनादेश' यात्रा आहे. 1 ऑगस्टला विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील संत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी गावापासून या यात्रेची सुरुवात झाली. राज्यातील 30 जिल्हे आणि 152 मतदारसंघातून ही यात्रा जाणार असून मुख्यमंत्र्यांच्या 104 जाहीर सभा, 228 स्वागत सभा आणि 20 पत्रकार परिषदा होणार आहेत. 25 दिवसात सुमारे 4 हजार 500 किमीहून अधिक प्रवास मुख्यमंत्री करणार आहेत.
आदित्य ठाकरेंना हवाय राज्याचा आशीर्वाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याआधी शिवसेनेचे युवा नेते व उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी 'जनआशीर्वाद' यात्रा सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्याची घोषणा झाली असली तरी यावेळी गाफील राहायचे नाही, असं बहुदा शिवसेनेने ठरवले आहे. दूध पोळलेली व्यक्ती ताकही फुंकून पिते. त्यामुळे ऐनवेळी भाजपने हात सोडला तर सर्व जागा लढवण्याची तयारी शिवसेनेने ठेवली आहे. त्याचवेळी पक्षाचा चेहरा म्हणून आदित्य ठाकरे यांना पुढे केले जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सारथ्य करणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मदत शिवसेनेने घेतली आहे. बिनचेहऱ्याच्या पक्षाला जनाधार मिळत नाही, अशी त्यांची ठाम धारणा असल्यामुळेच कदाचित आदित्य यांना पुढे केले जात असावे. अर्थात त्यांना जनतेचा आशीर्वाद व प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा
राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा ' !
सत्ताधारी मंडळी जोमाने कामाला लागली असली तरी विरोधी आघाडीवर मात्र अजूनही संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळलेला नाही. मनसेला आघाडीत घ्यावे की नाही याबाबत एकवाक्यता नाही. आणखी कोण आघाडीत येणार याबाबत गोंधळ आहे. मात्र राष्ट्रवादीने या गोंधळात अडकून न पडता सहा ऑगस्टपासून 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू करण्याचे नियोजन केले आहे. खासदार अमोल कोल्हे व खासदार उदयनराजे भोसले हे यात्रेत अग्रस्थानी असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजेंची भूमिका करणारे खासदार अमोल कोल्हे लोकप्रिय आहेत. खासदार उदयनराजे यांच्याबद्दलही मराठा तरुणांमध्ये आकर्षण आहे. त्यामुळे पक्षातील प्रस्थापित नेत्यांना मागे ठेवून यांचे नेतृत्व पुढे करण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली असावी. कोणत्या यात्रा कोणाला सत्तेपर्यंत नेतात हे लवकरच दिसेल.