तुम्हाला जर आता सांगितलं की निफ्टीही भाकरी फिरवतो तर तुम्हाला ते खरं वाटणार नाही. पण हे अगदी सत्य आहे. कसे ते अर्थात आज आपण पाहणारच आहोत.
आपल्याकडे एक म्हण फार रुजली आहे ती म्हणजे “भाकरी फिरवणे!” याचा अर्थ असा की, भाकरी करत असताना ती करपू नये म्हणून जसे त्याच्या बाजू बदलली जाते आणि फिरवली जाते तसेच आपण इतर संदर्भात ही म्हण वापरत असतो. निफ्टीच्या बाबतीत अर्थ आपण Rotation असा घेऊ शकतो. आता हे Rotation म्हणजे कसले Rotation.? तर ते म्हणजे Sector Rotation अथवा शेअर्सचे रोटेशन!
विस्तृतपणे सांगायचं झालं तर, कुठलाही शेअर अथवा सेक्टर कायमस्वरूपी वाढतच जातं किंवा कायमस्वरूपी पडतच जातं असं होत नाही. प्रत्येक सेक्टरचे fundamentals वेगळे आहेत त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विविध अवस्थेत त्यांच्यातील चढउतार वेगवेगळे असतात. त्यानुसारच मग शेअर्समध्ये तेजी आणि मंदी पाहायला मिळते. बऱ्याचदा काही सेक्टर अथवा शेअर्स बाजारातील अथवा निफ्टीतील ट्रेंड च्या विपरीत चालताना दिसतात. पण यातील लक्षणीय बाब म्हणजे निफ्टी हा सातत्याने वाढत राहतो. अर्थात त्यात correction होत नाहीत असे नाही, पण बऱ्याचदा निफ्टी वाढतो पण आपला Portfolio वाढत नाही आणि हीच तक्रार सामान्य गुंतवणूकदाराची असते की बाजार तर वाढत आहे पण माझा Portfolio वाढत नाहीय. आता याचं कारण काय ते समजून घेऊयात!
निफ्टीने कोविड नंतर जी सर्वोच्च पातळी गाठली ती साधारणपणे ऑक्टोबर 2021 मध्ये 18600 च्या आसपास! मार्च 2020 ते ऑक्टोबर 2021 दरम्यान निफ्टी 146% वाढला आणि त्याच काळात banknifty ही त्याच प्रमाणात म्हणजे जवळपास 155टक्के इतका वाढला. आणि तेव्हापासून आज जून 2023 पर्यंतचा काळ पकडला तर निफ्टी अजूनही जेमतेम त्याच पातळीवर आहे (दरम्यान correction येऊन गेले) तर baknifty आधीच्या पातळीपासून आठ टक्क्यांवर आहे. आता लक्षणीय बाब अशी आहे की मार्च 2020 ते ऑक्टोबर-डिसेंबर 2021 च्या या काळात Nifty IT सेक्टरमध्ये जवळपास 250% तेजी पाहायला मिळाली.
ही तुलना जर Nifty आणि Nifty Metal या सेक्टरमध्ये केली तर मार्च 2020 ते ऑक्टोबर 2021 दरम्यान Nifty Metal ने जवळपास 300% पेक्षा अधिक तेजी दाखवली आहे.पण ऑक्टोबर 2021 नंतर निफ्टी काही अंशी खाली जात असतानाही मेटल इंडेक्स वाढत होता. ज्यावेळी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं आणि मार्च-जून 2022 दरम्यान निफ्टी 15500 पर्यंत कोसळत गेला. तेव्हा निफ्टी मेटल इंडेक्सने नवा high बनवला होता. या सगळ्यांना फाटा देत, मार्च 2020 ते ऑक्टोबर 2021 दरम्यानच्या काळात Nifty FMCG ने मात्र मार्केटला आणि निफ्टीला Underperform करत त्या काळात जेमतेम 80% परतावा दिला. याच्यावरून हे तरी स्पष्ट होतं कू निफ्टी वाढला पण सर्वच सेक्टर्स काही एकसारखे वाढले नाहीत. काही सेक्टर्स जास्त वाढले तर काही सेक्टर्स कमी वाढले.
आता नाण्याची दुसरी बाजू बघुयात! निफ्टीने ऑक्टोबर 2021 मध्ये कोरोनानंतरचा पहिला High बनवला आणि त्यानंतर जून २०२२ मध्ये साधारणपणे 15400 च्या आसपास एक low बनवला. म्हणजे जवळपास 17% correction झालं. त्यानंतर काही काळाने परत तेजी सुरु झाली आणि डिसेंबर 2022 मध्ये 18600 च्या जवळच निफ्टीने दुसऱ्यांदा high बनवला. त्यानंतर बाजारात परत थोडं correction झालं आणि 16800 च्या आसपास एक सपोर्ट घेऊन निफ्टी आज जून 2023 मध्ये परत एकदा 18600 च्या आसपास स्थिरावतो आहे. आता तुम्ही म्हणाल “केहना क्या चाहते हो भाई!” तर खरं निरीक्षण ऑक्टोबर 2021 ते जून 2023 या काळातील Rotation वर दिलं पाहिजे. कोरोना आणि लॉकडाऊन नंतरची सरसकट तेजी संपुष्टात येत बाजार सामान्य होऊ लागले होते. ऑक्टोबर 2021 ते जून 2023 या दीड वर्षात निफ्टी दोनदा कोसळला. एकदा 15400 पर्यंत आणि दुसऱ्यांदा 16800 पर्यंत आणि दोनदा 18600 पर्यंत वाढला सुद्धा, पण या काळात Nifty IT डिसेंबर 2021 च्या स्वतःच्या high पासून अजूनही 28% खाली आहे. Banknifty त्या पातळीपासून 8% वर ट्रेड करत आहे.
Nifty Metal ऑक्टोबर 2021 ते जून 2023 दरम्यानच्या काळात अजून high बनवून आता 5% खाली ट्रेड करत आहे. Nifty FMCG तेंव्हाच्या पातळीपासून 28% वर ट्रेड करत आहे. Nifty Auto डिसेंबर 2021 च्या पातळीपासून 24% वर ट्रेड करत आहे. सांगायचा उद्देश हा की जर तुम्ही डिसेंबर 2021 ते जून 2023 दरम्यान IT किंवा Metal सेक्टरमध्ये गुंतवणूक करत असाल तर आज तुमचा portfolio नकारात्मक दिसत असणार आहे आणि जर तुम्ही दरम्यानच्या काळात Nifty Auto, Nifty FMCG क्षेत्रात आणि निवडक बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती तर तुम्ही नफ्यात राहिले असता.
मला वाटतं इथे आपल्या एका प्रश्नाचं उत्तर तर मिळालं असेल की, मार्केट वाढत असताना माझा Portfolio का वाढत नाही! याचं दुसरं उत्तर असेही आहे की आपल्याला नफ्यातील शेअर्स विकून नुकासानीतील शेअर्स ठेवण्याची सवय असल्याने आपण स्वतःला अधिक नफ्यात कधीच पाहत नाहीत. यावर स्वतंत्रपणे अजून खल करता येईल. पण निफ्टीने वेळीच भाकरी फिरवली आणि स्वतः जास्त नुकसानीत जाण्यापासून तो वाचला. सुरुवातीच्या तेजीत जे IT आणि Metal निफ्टीला वर नेत होते पण FMCG आणि Auto सामान्य परफोर्म करत होते त्यांच्यात दुसऱ्या तेजीच्या वेळेस अदलाबदल झालेली दिसून येईल. म्हणजे गाडी हाकणारे आधीचे दोन बैल थकले की त्यांना आराम देऊन इतर दोघांना जुंपलं गेलं आणि काम सुरु ठेवलं. यादरम्यान निफ्टीने फार काही परतावा दिलेला दिसून येत नाही पण पडझडही झालेली दिसत नाही.म्हणजे 18600 चा निफ्टी 55400 ला जाऊन परत 18600 पर्यंत आला पण इतर काही शेअर्स अजूनही खालीच अडकले आहेत.
जर तुम्ही योग्य वेळी योग्य सेक्टरमध्ये Entry-Exit केली असती तर आज तुम्हाला भरघोस नफा असता. जर तुमची Entry-Exit चुकीची असती तर तुम्ही नुकसानीत असता आणि मार्केटला शिव्या देत असता. आणि फायनली, जर तुम्ही थेट निफ्टी निर्देशांकात गुंतवणूक केली असती तर तुम्ही मध्यावर असता! इथे हे नमूद करावं लागेल कि निफ्टी हा एक स्वतः Diversified Portfolio प्रमाणे काम करतो. आणि हेच Entry-Exit चं काम जर एखादा Mutual Fund Manager उत्तम पद्धतीने करत असेल तर त्या Fund मध्येही मार्केटपेक्षा चांगला परतावा मिळताना दिसून आला असता. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्याला समजत असेल, वेळ असेल तरच थेट बाजारात गुंतवणूक करावी अन्यथा इतरहि Index Fund, ETF, Mutual Fund सारखे सोपे पर्याय उपलब्ध आहेत.
एक प्रश्न स्वतःला विचारा की 18600 चा निफ्टी जेव्हा खाली जाऊन परत 18600 कडे आला तेव्हा तुम्ही ITC, Icici Bank, Maruti Suzuki, L&T, Tata Motors, Titan, Sunpharma इत्यादीमध्ये गुंतवणूक केली होती का ज्यांनी चांगला परतावा देत निफ्टीला परत आधीचा high गाठण्यास मदत केली.? का तुम्ही दर्जेदार असलेल्या पण दरम्यानच्या काळात परफोर्म न करू शकलेल्या Bajaj Twins, HDFC Life, TCS, Wipro, Infosys, Kotak Bank, Tata Steel सारख्या शेअर्समध्ये अडकून होता.?
सांगायचे तात्पर्य हेच की चांगले-चांगले शेअर्ससुद्धा काही काळ correction आणि consolidation मध्ये घालवतात. सर्वकाळ तेजी ही फार कमी शेअर्सच्या नशिबात असते. बाकी sector rotation आणि शेअर्समध्ये तेजी-मंदी होतच राहते. कितीही चांगला शेअर महाग भेटला तर मिळणारा परतावा तुलनेने कमीच असतो. तोच जर दर्जेदार शेअर योग्य किमतीत मिळवता आला तर बाजारतुलनेत चांगलाच परतावा मिळतो.दुसरा महत्वाचा प्रश्न असा की, जर निफ्टी इथून 200000 च्या दिशेने जाणार असेल तर कोणते सेक्टर चांगली कामगिरी करतील आणि कोणते शेअर्स या तेजीचे नेतृत्व करतील.? इथेच महत्वाचा मुद्दा येतो ही भाकरी थापता आली म्हणजे पोटभर जेवण मिळेल असे नाही. त्या भाकरीला गरमागरम तव्यावर ठेवून, योग्य वेळी फिरवून छान तयार करता आले तरच पोटभर जेवण मिळणार आहे. निफ्टी ती भाकरी व्यवस्थित फिरवू शकतो, प्रश्न तुमचा आहे!
अभिषेक बुचके यांचे इतर लेख :