खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कॅलेंडरवर चरखा चालवणाऱ्या नरेंद्र मोदींचा फोटो प्रसिद्ध झाला आणि माध्यमांमधून जोरदार शेरेबाजी सुरू झाली. गांधीवादी मंडळींपेक्षा मोदी विरोधकांनी या प्रकाराविषयी मोदींवर भयंकर टीका केली. अजूनही सुरूच आहे. मोदींनी चरखा चालविल्यामुळे खादीचा खप १४ टक्के वाढला असाही दावा केला जात आहे. मोदींच्या त्या फोटोचा खादी विक्रीला फायदा खरच किती झाला माहित नाही, पण जनतेसमोर चर्चेत राहण्याचा मोदींचा उद्देश सफल झाला. सोशल मीडियात मोदींवर जशी बोचरी टीका सुरु झाली तसे त्यांच्या बाजुनेही बचावाचे अनेक मुद्दे समोर आले.

मोदींनी चरखा चालवावा की नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. केंद्र सरकारची अमर्याद सत्ता मोदींच्या हाती असून खादी ग्रामोद्योग मंडळही सरकारच्या अधिनस्त आहे. त्यामुळे खादी ग्रामोद्योगच्या कॅलेण्डरवर मोदींनी स्वतःचा फोटो मॉडेल म्हणून वापरणे अवघड नव्हते. आपला फोटो वापरताना गांधीजींचा फोटो हटविला जातोय याविषयी त्यांनी जरुर विचार केला असेल. म्हणूनच कॅलेण्डरवरील फोटोवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी फारसे लक्ष दिलेले नाही. खुप उशिराने मोदींनी नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले गेले.

गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान या पदापर्यंतचा प्रवास करताना मोदींनी वादविवाद निर्माण करणारे लोकचर्चेचे अनेक फंडे वापरलेले आहेत. काही विषय मोदींवर उलटतील असे वाटत असताना मोदी समर्थकांनी त्याचे रुपांतर लोकप्रियतेच्या लाटेत केले आहे. सोशल मीडियात मोदीभक्त हा खास पंथ निर्माण झाला आहे. देशभरातील निवडणुकांचे कौल सुद्धा भाजपच्या बाजुने अनुकूल राहीले आहेत.

मोदी आणि चरखा प्रकरणाच्या मागील काही गोष्टी शांतपणे समजून घेण्याच्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचा खुबीने वापर केला. नंतर त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने सरदार पटेल यांचे स्मारकच उभारायला प्रारंभ केला. त्याचे काम रडत खडत सुरू असल्याच्या बातम्या अधुन मधून येतात.

पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी मॅरेथॉन परदेश दौरे करताना तेथील कार्यक्रमात महात्मा गांधींचे नाव जाणुन बुजून वापरायला सुरवात केली. त्याचे कारणही तसेच आहे. परदेशातील नागरिकांवर आजही इंडिया ईज गांधी हा समज कायम आहे. जवळपास ७० देशांमध्ये गांधींचे पुतळे आहेत. १०० वर देशात गांधींचा फोटो नोटांवर आहे. १२० देशांमध्ये गांधींच्या फोटोंचे टपाल तिकीट आहे. तामीळनाडूत गांधीजींचे मंदिरही आहे. गांधींच्या लोकप्रियतेचे हे एक ढोबळ मोजमाप जरी लक्षात घेतले तरी मोदी किती चलाखीने गांधीजींचे नाव परदेशात वापरतात हे काँग्रेसवाल्यांनी लक्षात घ्यायला हवे. मोदींनी उगाचच गांधींचे नाव घेत स्वच्छ भारत अभियान सुरू केलेले नाही.

काँग्रेसवाल्यांची सत्ता असताना त्यांनी नेहमी अनेक सरकारी योजनांना नेहरु, इंदिरा, राजीव यांचेच नाव दिले. महात्मा गांधींच्या नावे फारशी मोठी योजना सुरू केली नाही. डॉ. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात तर महात्मा गांधीचा काँग्रेसला विसरच पडला होता. गांधीच्या नावे पूर्वी ज्या योजना सुरू होत्या त्याकडेही फारसे लक्ष दिले गेले नाही. मोदी या बाबतीत मात्र नशिबवान ठरले. त्यांनी महात्मा गांधींचे नाव घेत संपूर्ण भारत स्वच्छ करायचा विडाच उचलला. त्यात समाजातील शेकडो सेलिब्रीटी जोडले. त्याचे फलित काय हा वेगळा मुद्दा आहे. पण, मोदींनी महात्मा गांधींना खुबीने वापरले आहे, याकडे लक्ष द्यावे लागेल. आता मुख्य मुद्दा हाच आहे की महात्मा गांधी कोण आणि कशा प्रकारे वापरत आहेत.

येथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती म्हणजे, आजकाल महात्मा गांधी हे विचारधारा किंवा आदर्श म्हणून कोणाला हवेत ? हा संशोधनाचा भाग आहे. जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन (गांधीतीर्थ) मार्फत गांधीजींच्या कार्यावर गांधी विचार संस्कार परीक्षा घेतली जाते. यातील विविध परिक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. गेल्या ९ वर्षांत ही संख्या १० लाखांच्यावर पोहचली आहे. महात्मा गांधी युवकांना आवडतोय याचे हे एक मोजमाप.

पण, महात्मा गांधी स्वीकरण्याचे इतरही पर्याय आहेत. ते म्हणजे, आजकालची मंडळी महात्मा गांधींची प्रतिके स्वीकारून गांधींच्या मार्गावर चालत असल्याचे भासवतात. याचे उदाहरण म्हणजे, गांधींची खादी, गांधींचा चष्मा, गांधींचा पंचा, गांधींचा चरखा, गांधींची दांडी. गांधींचे व्यक्तिमत्व दाखविण्यासाठी याच प्रतिकांचा वापर पोषाख स्पर्धा किंवा चित्रांमध्ये केला जातो.

गांधींचा चरखा आज मोदींनी पळवला असे सांगण्यात येते. संघ परिवाराकडे गांधींची दांडी अगोदर पासून दंड म्हणून आहेच. शिवाय, गांधी गुडघ्यापर्यंत धोती घालत. संघाची खाकी चड्डीही गुडघ्यापर्यंतच होती, ती आतापर्यंत. यावर कधी खडूस टीका टीपण्णी झाल्याचे आठवत नाही.

महात्मा गांधींच्या वारसदारांमध्ये गांधी कोणी, कसा वापरायचा, त्यासंदर्भातील हक्क कसे आहेत हा मुद्दाही येथे समजून घ्यावा लागेल. गांधीजींचे जवळपास ५४ वारसदार आज आहेत. वाटणी करावी अशी कोणताही संपत्ती किंवा मालमत्ता गांधीजींच्या नावे नव्हती. कारण १९१४ पासून गांधीजींनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात आयुष्य समर्पित केले होते. गांधीजींच्या विषयी एक संदर्भ असा आहे की, त्यांच्याकडे कोणी सही किंवा फोटो मागीतला तर गांधीजी त्यासाठी काही देणगी घेत. ही देणगी हरिजन फंडासाठी वापरत. या व्यतिरिक्त गांधीजींनी संपत्ती जमविल्याचे उदाहरण नाही. गांधी हत्येनंतर व भारत स्वतंत्र झाल्यानंतर गांधी हे एक आंतराष्ट्रीय ब्रॅण्ड बनले. त्यामुळे त्यांचे फोटो, चलचित्र, आवाज हेही संपत्ती निर्माण करण्याचे माध्यम झाले. राष्ट्रीय पुरूष व राष्ट्रीय चिन्ह यांच्या गैरवापराचा कायदा सन १९५० मध्ये अस्तित्वात आला. परंतु, या कायद्याच्या पलिकडे गांधीजींचे व्यक्तिमत्व होते व आहे. म्हणूनच गांधी ब्रॅण्ड कुठेही वापरला जात होता. त्यावर गांधीजींच्या वारसाचे फारसे नियंत्रण नव्हते व नाही. अगदी एका कंपनीने बियरला, एका कंपनीने चपलेला गांधीजींचे नाव दिल्याची उदाहरणे आहेत.

असे असले तरी गांधीजी वापरण्याची कागदोपत्री विभागणी पुढील प्रमाणे आहे. गांधीजींचे लिखीत साहित्य, त्यांच्या डायऱ्या वगैरे यावर मालकी हक्क नवजीवन ट्रस्टचा आहे. हा ट्रस्ट स्वतः गांधीजींनी स्थापन केला होता. गांधीजींचे चलचित्र (फिल्म) यावर मालकी हक्क गांधी फिल्म फाऊंडेशन आणि भारतीय फिल्म्स डिव्हीजन्सचा आहे. गांधीजींच्या फोटोंवर मालकी हक्क कनू गांधी यांच्या नेतृत्वातील विठ्ठलभाई जव्हेरी ट्रस्टचा आहे. गांधीजींच्या आवाजाच्या ध्वनीफितींवर भारतीय प्रसार भारतीचा मालकी हक्क आहे. कारण, गांधीजींच्या बहुतांश टेप या आकाशवाणीकडे सुरक्षित आहेत.

गांधीजींच्या ५४ वारसांपैकी १ वारस हे तुषार गांधी (पणतू) आहेत. ते स्वतः मुंबईतून गांधी फाउंडेशन चालवतात. तुषार गांधी हे इतर वारसांपेक्षा जास्त चर्चेत असतात. त्यांनी राजकारणातही प्रवेशाचा प्रयत्न केला. १९८८ मध्ये ते सोशालीस्ट पार्टीशी जुळले नंतर १९९५ मध्ये ते काँग्रेससोबत होते. राजकारणात गांधी वारस असण्याचा लाभ त्यांना काही मिळाला नाही. कारण, काँग्रेसमध्ये गांधी नावाने नेतृत्त्व करण्याचे पेटंट इतरांकडे आहे.



तुषार गांधी यांनीच मोदी वुईथ चरखा या फोटोवर सर्व प्रथम ट्विटर व फेसबुकवरुन टीका केली. बापू तेरा चरखा ले गए चोर असे म्हणत तुषार यांनी मोदांचा उल्लेख थेट चोर म्हणून केला. तुषार गांधींच्या या ट्विटनंतर मोदीविरोधात वातावरण तापले. येथे तुषार गांधी यांच्या हेतू आणि पूर्वीच्या हरकतींविषयी विचार करायला हवा.

महात्मा गांधी यांचे पणतू असल्याचा लाभ घेत तुषार गांधी हेही गांधीजींचा ब्रॅण्ड म्हणून खुबीने वापर करतात असे लक्षात आले आहे. गांधी फाऊंडेशनचे नाव आणि चर्चेतील वारसदार असण्याचा लाभ घेत तुषार गांधी यांनी दोन वेळा गांधीजींची प्रतिमा लाखो रुपयांत विक्रीचा प्रयत्न केला आहे. तो सुद्धा परस्पर. इतर वारसदारांची परवानगी न घेता.

जर्मनीतील पेन तयार करणाऱ्या मोन्ट ब्लान्क या कंपनीने सन २००७ मध्ये गांधी जयंतीच्या दिवशी विशेष पेन बाजारात आणले होते. गांधीजींच्या दांडी मार्चमधील अंतर २४१ मैल होते. हे लक्षात घेवून पेन तयार करणाऱ्या कंपनीने पांढरे व यलो मेटल म्हणजे प्लॅटीनम व सोने वापरून २४१ पेन तयार केले होते. त्या एका पेनची किंमत होती ११ लाख रुपये. याशिवाय कमी रकमेचेही पेन होते. पेन निर्मितीसाठी संबंधित कंपनीने गांधीजींचे नाव वापरायला तुषार गांधी यांच्या फाऊंडेशनला ७० लाख रुपये दिले होते. शिवाय, इतर पेन विक्रीतून प्रति नग रक्कम मिळणार होती. त्यांच्या या कृतीला इतर वारसांनी त्यावेळी हरकतही घेतली होती.

तुषार गांधी यांनी असाच एक व्यवहार अमेरिकेतील सीएमजी या क्रेडीटकार्ड तयार करणाऱ्या कंपनीसोबत केला होता. ही कंपनी कार्डची जाहिरात तयार करताना फिल्ममध्ये गांधीजींचे छायाचित्र वापरणार होती. त्या बदल्यात तुषार गांधी यांना २५ लाख रुपये मिळणार होते. मात्र, तेव्हाही इतर वारसांनी नाराजी व्यक्त केली होती. माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनीही तुषार गांधींना तसे करण्याच हक्क नाही असे म्हटले होते. टीका झाल्यानंतर तुषार गांधींनी हा सौदा रद्द केला.

येथे अजून एक मुद्दा आहे. सीएमजी कंपनी क्रेडीटकार्ड तयार करते. ही एक प्रकारे कार्ड आयडेंटी व आर्थिक पत असते. सन १९०६ मध्ये दक्षिण अफ्रिकेत असताना तेथील सरकाने केवळ भारतीयांसाठी सुरू केलेल्या युनिक आयडेन्टी कार्डला गांधीजींनी विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. डॉ. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारतीयांना युनिक आयडेन्टीसाठी आधारकार्ड दिले गेले. गांधीजींच्या विचारधारेला काँग्रेसने तेव्हा ती सोडचिठ्ठी दिली होती का ?

महात्मा गांधी यांचे पणतू असल्याचे सामाजिक मूल्य तुषार गांधी यांना चांगले समजते. त्यामुळे अधुन मधून ते जमेल तशी प्रसिद्धी करुन घेत असतात. सन २०१५ मध्ये त्यांनी शहीद भगतसिंग यांच्या विषयी वादगर्स्त वक्तव्य केले होते. भगतसिंग हे ब्रिटीशांच्या दप्तरी गुन्हेगार होते. त्यामुळे त्यांच्या फाशीला स्थगिती देण्याचा प्रयत्न महात्मा गांधी यांनी केला नाही, असे तुषार गांधी म्हणाले होते.  अर्थात, या प्रतिक्रियेवर पंजाबात आग्या मोहळ उठले. अखेर तुषार गांधींवर गुन्हा दाखल करावा लागला.

मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याकूब मेमनच्या फाशीला रद्द करण्यासाठीचे अंतिम अपिल सन २०१५ मध्ये फेटाळल्यानंतर तुषार गांधी म्हणाले होते, न्यायालयाने याकूबचा कायदेशीर खून केला आहे. या प्रतिक्रियेतून तुषार गांधी हे न्यायालयीन व्यवस्थेचा अवमान करीत होते. त्यावरही टीका झाली होती.

सन २०१५ मध्ये लंडन येथे पार्लमेंट स्क्वेअरच्या ठिकाणी महात्मा गांधी यांचा नवा पुतळा स्थापन करण्याचा कार्यक्रम तेथील पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन यांनी केला होता. या पुतळ्याविषयी तुषार गांधी म्हणाले होते, तो पुतळा गांधींचा नाही. तो पुतळा बेन किंग्लजे या अभिनेत्याचा आहे. हा अभिनेता म्हणजे गांधी चित्रपटात गांधीजींची भूमिका करणार कलावंत.



तुषार गांधी हे युक्तीवाद करण्यात माहीर आहेत. त्यांनी जेव्हा क्रेडीटकार्ड कंपनीला गांधींचे छायाचित्र वापरायला परवानगी दिली तेव्हा ते म्हणाले होते की, स्टार माध्यम गृपची निकी बेदी हिने एकदा टीव्हीवरील कार्यक्रमात गांधीजींचा उल्लेख अपमानास्पद पद्धतीने केला होता. तेव्हा स्टार वाहिनीला कोणीही विरोध केला नाही. कारण, ही कंपनी जगातील मीडिया टॅक्यून रुपर्ड मर्रडॉक यांची आहे. त्यांच्याशी विरोध पत्करण्याचे धाडस कोणीही केले नाही. अशा लोकांना उत्तर देण्यासाठी सीएमजी सारख्या ग्लोबल कंपनीसोबत आपण गांधी प्रतिमेचा करार केला. अशी मोठी कंपनी स्टार गृपला उत्तर देवू शकली असती.

वरील सर्व उदाहरणे लक्षात घेता, गांधी कोणाला, कसा वापरायचा ? याचे प्रत्येकाचे हेतू, उद्दिष्ट आणि गणित ठरलेले आहे. गांधी काँग्रेसने अनेक ठिकाणी वापरला पण त्यांना मार्केटींग जमले नाही. महाराष्ट्रीतील जेष्ठ नेत्यांनी राजकिय पक्षासाठी चिन्ह म्हणून गांधीचा चरखा वापरला, गरज होती तेव्हा चरखा चिन्ह मागीतले. मात्र, त्यांनी त्यांच्या सत्ताकाळात गांधीजींना जवळ केल्याचे काही दिसले नाही. मुंबईत समुद्री पुलाला नाव द्यायची वेळ आली तेव्हा राजा शिवाजी, महात्मा गांधी यांचे नाव न सुचविता त्यांनी राजीव गांधी यांचे नाव सूचविले. मात्र, याच नेत्यांनी बी-ग्रेडी विचारांची वारंवार पाठराखण केल्याचेही दिसून येते.

वरील सर्व उदाहरणे पाहता गांधींचा वापर कोणासाठी व कसा याचा विचार केला तर, साऱ्यांचेच पाय मातीचे दिसतात.

गांधींच्या वस्तूंचे लिलाव

महात्मा गांधी यांच्या नावावर कोणतीही मालमत्ता अथवा संपत्ती नव्हती. मात्र, गांधीजींनी वापरलेल्या काही वस्तू आजही अस्तित्वात आहेत. भेटणाऱ्या मोजक्या मान्यवरांना स्वतः गांधीजींनी आपल्या वापरातील अशा काही वस्तू भेट दिल्या होत्या. त्यापैकी काही वस्तुंचा जाहीरपणे लिलाव केला जात असतो. मोदींचा चरख्यासोबतचा फोटो खादी ग्रामोद्योगच्या कॅलेण्डरवर छापला म्हणून गदारोळ करणारी मंडळी गांधीजींच्या वस्तुंचा लिलाव होताना शांत असते. कारण, तेव्हा टीका करुनही उपयोग होत नाही.

आता गांधीजींच्या काही वस्तुंचा लिलाव कधी आणि कसा झाला आहे ते पाहू :

गांधींचा चष्मा सन २००९ मध्ये मॅनहटन येथे गांधीजींच्या एका चष्म्याचा लिलाव झाला होता. १८९० मध्ये जेव्हा गांधीजी कायदा शाखेचा अभ्यास करीत होते तेव्हा त्यांनी हा चष्मा वापरला होता. या चष्म्याला किंमत मिळाली होती ४१ लाख ८८ हजार ३६३ रुपये. गंमत म्हणजे हा चष्मा मद्यसम्राट विजय माल्या याने खरेदी केला होता.

महात्मा गांधींचा चरखा भारत छोडो आंदोलनात अटकेत असलेल्या गांधीजींना पुणे येथील येरवाडा कारागृहात ठेवले होते. तेव्हा तेथे सूत कताईसाठी गांधीजींनी वापरलेल्या चरख्याचा लिलाव १ लाख १० हजार पौंडात झाला होता.

गांधीच्या रक्त नमुन्याचा लिलाव सन १९२४ मध्ये गांधीजी मुंबईजवळ त्यांच्या नातेवाईकाकडे थांबले होते. तेव्हा त्यांना आजारपण होते. तपासणीसाठी गांधीजींच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील उर्वरित रक्त नमुन्याचा लिलाव करण्यात आला होता.

गांधींच्या अखेरच्या स्पर्शाची माती नथुरामने गोळ्या झाडल्यानंतर गांधी जमिनीवर कोसळले. त्यांच्या रक्ताने तेथील माती ओली झाली. ही माती बाटलीत भरुन ठेवलेली होती. तिचाही लिलाव १२ हजार पौंडाला झाला होता.

गांधीजींच्या सह्यांची दोन पत्रे गांधीजींनी सन १९३५ मध्ये नातेवाईकांना गुजरातीत स्वतः दोन पत्रे लिहीली होती. त्यांवर त्यांच्या सह्याही होत्या. या पत्रांचा लिलाव २० लाख ५ हजार रुपयात झाला होता.

गांधींजींच्या चपला सन १९१७ ते १९३४ दरम्यान वापरलेल्या चपलांचा लिलाव ब्रिटनमध्ये १९ हजार पौंडास झाला होता.

विजय माल्यांचे दातृत्व संपूर्ण जगभरात मद्य पुरवठा करणाऱ्या विजय माल्या यांनी गांधीजींच्या पाच खाजगी वस्तू लिलावात ९ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केल्या होत्या. त्या वस्तुंमध्ये चष्मा, घड्याळ, ताट, वाटी व पादत्राणे होती.

गांधीजींचे वारसपत्र लंडनमध्ये गांधीजींच्या यांची प्रार्थनेची माळ,  रक्ताचा नमूना, चमड्याची चप्पल, शेवटचे वारसापत्र तसेच शपथपत्रांसहीत त्यांच्या वैयक्तिक सामनाचा लिलाव झाला. यातून अडीच कोटी रुपये उभारण्यात आले.

तीन माकडांचा लिलाव - लंडनमध्ये

गांधीजीच्या तीन बुद्धीमान माकडांचा लंडनमध्ये लिलाव झाला. या लिलावात गांधीजींच्या तीन माकडांसोबत त्यांची प्रार्थनेची माळ, पाणी प्यायचा पेला, चप्पल, त्यांनी स्वतःच्या हाताने सुतापासून बनवलेली शाल, काटा चमचा, साधा चमचा आणि हत्तीचा दात याचाही समावेश होता.