19 जानेवारी.. आपल्यासाठी कॅलेंडरवरची फक्त एक तारीख. पण काश्मिरी पंडितांसाठी ही केवळ तारीख नाही तर काळा दिवस दिवस आणि भयानं भरलेली काळी रात्र आहे. 19 जानेवारी 1990, आजपासून बरोबर तीस वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांना आपल्याच देशात निर्वासितांचं जीणं जगावं लागलं. काश्मिरी पंडितांसाठी 19 जानेवारी म्हणजे अशी जखम आहे जी 30 वर्षांनंतरही भरली जात नाही. आजही काश्मिरी पंडित न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

विभाजनानंतर काश्मिरी पंडित आणि काश्मीर खोऱ्यामधल्या मुस्लिमांमध्ये बंधुभाव होता. पण 1980 नंतर परिस्थिती बदलत गेली. रशियानं अफगाणिस्तानवर चढाई केली. त्यामुळे अफगाणी लोकांमध्ये असंतोष होता. अमेरिकेला रशियाचं वर्चस्व अफगाणिस्तानात नको होतं. रशियाविरूद्ध लढण्यासाठी अफगाणिस्तानच्या लोकांना मुजाहिद्दीन ज्याला धर्मरक्षक म्हटलं जातं ते बनवण्यासाठी पाकिस्ताननं मदत केली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे ट्रेनिंग कॅम्प सुरू झाले. इथूनच काश्मीर खोऱ्यातली अशांतता वाढत गेली. शस्त्रास्त्रांची खुलेआम तस्करी होऊ लागली. पाकिस्तानचे पंतप्रधान जनरल झिया यांना यामाध्यमातून काश्मीरमध्ये असंतोष पसरवायचा होता. फुटीरतावादी गट आपलं तोंड वर काढू लागले. अशा काही लोकांवर पोलिसांनी कारवाई केल्यावर वाद चिघळत गेला. मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचं रडगाणं गात याच फुटिरतावादी काश्मीर खोऱ्यामधल्या पंडितांना या काफिरांना इथे राहण्याचा हक्क नाही असं खुलेआम बोलू लागले.

खरंतर काश्मिरी पंडित त्यावेळी अल्पसंख्य होते. 5% लोकसंख्येचे काश्मिरी पंडित मोठ्या हुद्द्यावर काम करत. पोलीस, डॉक्टर, प्रोफेसर आणि इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये काश्मिरी पंडितांची संख्या जास्त होती. त्यामुळे त्याविषयीचा द्वेश तर होताच पण जोपर्यंत पंडितांना काश्मीरमधून पळवून लावलं जात नाही तोपर्यंत त्यांचा हेतू सफल होणार नव्हता. त्यामुळे या काफिरांना काश्मिरात राहण्याचा अधिकार नाही अशा वल्गना खुलेआम होऊ लागल्या.

1986 साली राजकीय घडामोडी बदलल्या, फारुख अब्दुल्लांची सत्ता त्यांचाच मेहुणा गुलाम मोहम्मद शाहनं उलथवून टाकली. गुलाम मोहम्मद शाह मुख्यमंत्री होताच त्यानं एक अशी घोषणा केली ज्यामुळे काश्मीरमध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण झाली. जम्मूच्या नवीन प्रशासकीय सचिवालयातल्या जुन्या मंदिराला पाडून त्याजागी भव्य मशिदीचं निर्माण केलं जाईल, अशी घोषणा गुलाम मोहम्मद शाहनं केली. त्यामुळे सहाजिकच हिंदूंनी याला विरोध केला आणि ठिकठिकाणी आंदोलनं केली. फुटिरतावाद्यांनी ही संधी साधून हिंदूंबद्दल आणि पंडितांबद्दलची द्वेशभावना काश्मीरच्या सर्वसामान्य मुस्लिमांच्या मनात निर्माण केली. फुटिरतावाद्यांनी ''इस्लाम खतरे में है'' चा नारा देत काश्मिरी पंडितांच्या घरावर हल्ले केले. संपत्ती लूटण्यावर जास्त भर होता. हत्या आणि बलात्कारही होत होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं 12 मार्च 1986 साली राज्यपाल जगमोहन यांनी शाह सरकारला बरखास्त केलं.

1987 साली पुन्हा निवडणुका झाल्या. फुटिरतावाद्यांचा मोठा पराभव झाला. याचा अर्थ असा होता की सर्वसामान्य मुस्लिमांना काश्मीरमध्ये शांतता हवी होती. हिंदू मुस्लिम हा वाद चुकीचा आहे हे स्वत: तिथल्या बहुसंख्य मुस्लिमांनी आपल्या मतदानातून दाखवून दिलं. परंतु फुटिरतावाद्यांनी थेट निवडणूक आयोगावर आरोप करत निवडणूक प्रक्रियेत गडबड झाल्याचा बाऊ करत पुन्हा ''इस्लाम खतरे में है'' चा नारा दिला. काश्मीरला भारतापासून वेगळं करण्यासाठी काश्मीर लिबरेशन फ्रंटनं आपल्या कारवाया वाढवल्या. पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो या दुसरीकडे आगीत तेल ओतायचं काम करतच होत्या. त्यामुळे फुटिरतावाद्यांना पाकिस्तान बळ देत असल्यानं काश्मिरी पंडितांवर दिवसाढवळ्या हल्ले होऊ लागले.

पंडित टिकालाल टपलू हे काश्मिरी पंडितांचे सर्वमान्य नेते होते. वकिली करत असताना त्यांना अनेक मुस्लिमांना न्याय मिळवून दिला होता. अनेक मुस्लिम मुलींची लग्न लावून दिली. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ते एक लोकप्रिय नेते होते. हेच फुटिरतावाद्यांना खूपत होतं. पंडित टिकालाल टपलू आणि जस्टिस निलकंठ गंजू यांची हत्या करण्याचा कट शिजत होता. पंडित टपलूंना याची भनक लागलीच होती. 8 सप्टेंबर 1989 रोजी आपल्या कुटुंबाला त्यांनी दिल्लीला पोहचवलं. त्यानंतर 14 सप्टेंबरला टिकालाल टपलू यांची श्रीनगरमध्ये भर रस्त्यात हत्या करण्यात आली. पंडितांनी काश्मीर सोडावं यासाठी केली गेलेली ही पहिली हत्या होती. फुटिरतावाद्यांचा हेतू स्पष्ट होता. काश्मिरी पंडितांनी भारताला समर्थन देणं बंद करावं, आणि जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला समर्थन द्यावं. अन्यथा काश्मीर सोडावं! टिकालाल टपलू यांच्यासारख्या मोठ्या नेत्याची अशी हत्या होत असेल तर आपलं काय? या भीतीनं पंडितांचा धीर खचला.

टिकालाल टपलूंच्या हत्येनंतर आठवड्याभरातच फुटिरतवादी नेता मकबूल भटला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जस्टिस निलकंठ गंजू तेव्हा हायकोर्टाचे जज होते. त्यामुळे 4 नोव्हेंबरला जस्टिस गंजू यांचीही श्रीनगरमध्ये गोळ्या घालून हत्या केली आणि मकबूल भटच्या फाशीचा बदला घेतला. जस्टिस गंजू यांच्या पत्नीचं अपहरण (किडनॅप) करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा थांगपत्ता लागलाच नाही. दुसरे एक शीर्षस्थ नेते प्रेमनाथ भट यांची अनंतनागमध्ये हत्या करण्यात आली.

19 जानेवारी 1990 या एका दिवशी लाखो काश्मिरी पंडितांनी काश्मीरमधून पलायन केलं.
सरकारी आकड्यांनुसार 300 काश्मीरी पंडितांची हत्या झाल्याचं सांगितलं जातं. पण यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. कारण मृतांचा आकडा हा हजारोंमध्ये होता. मुली, महिलांवर झालेल्या बलात्कराचा आणि अत्याचाराची तर गिणतीच नव्हती. पण या नरसंहाराची सुरूवात 15 दिलस आधी झाली. दिवस होता 4 जानेवारी 1990, या दिवशी उर्दु वृत्तपत्र आफताबमध्ये हिज्बुल मुजाहिदीनने छापून आणलं की पंडितांनी काश्मीर सोडावं. दुसरं वृत्तपत्र अल-सफामध्येही हाच मजकूर छापायला लावला. वर्तमानपत्रात थेट चिथावणीखोर मजकूर छापून आल्यावरही सरकार गप्प होतं.

19 जानेवारीला काश्मिरी पंडितांच्या घरावर चेतावणीचे संदेश चिकटवण्यात आले. "कश्मीर छोड़ो या अंजाम भुगतो या इस्लाम अपनाओ." त्यानंतर बरोबर 19 जानेवारीच्या रात्री लाऊड स्पीकरवरून घोषणा झाली कश्मिरी पंडितांनी इथून निघावं अन्यथा परिणाम वाईट होतील. हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. दिसेल त्या काश्मिरी पंडिताची जागेवरच हत्या केली जात होती. खुलेआम बंदुका ताणल्या जात होत्या. तणाव वाढू लागल्यानं तत्कालिन मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी राजीनामा दिला. आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली. राज्यपाल गिरीश चंद्र सक्सेना यांनी केंद्र सरकारकडे सैन्यदल पाठवण्याची विनंती केली. पण तोपर्यंत लाखो काश्मिरी मुस्लिम रस्त्यावर आले होते. लाऊडस्पीकरवर रात्रभर नारे लागत होते.

जागो जागो, सुबह हुई, रूस ने बाजी हारी है, हिंद पर लर्जन तारे हैं, अब कश्मीर की बारी है.

यामधली सर्वात भयानक घोषणा होती...

''हमें पाकिस्तान चाहिए. पंडितों के बगैर, पर उनकी औरतों के साथ''.

या घोषणांनी पंडितांच्या अंगातलं त्राणच गेलं. बंदिपुरा भागात गिरीजा टिक्कू यांचा गँगरेप झाला, त्यानंतर त्यांची हत्या झाली. असे अगणित बलात्कार आणि हत्या रात्रभरात सुरू होत्या. शेकडो महिला आणि मुलींवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. त्यांचे नग्न पार्थिव झाडांवर लटकवण्यात आले. काश्मिरी पंडितांनी या एका रात्री जमेल ते सोबत घेऊन काश्मीरला सोडलं. सरकारी आकड्यांनुसार 60 हजार परिवारांनी काश्मीर सोडलं. फक्त 19 जानेवारी 1990 रोजी 4 लाख काश्मीरी पंडितांनी पलायन केलं. दीड हजार मंदिरं नष्ट करण्यात आली. 5 हजार काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आली. 19 जानेवारीची दहशतीनं भरलेली रात्र संपता संपत नव्हती.

काश्मीरला भूतलावरचा स्वर्ग म्हणतात. या स्वर्गातलं आपलं हक्काचं घर, दुकान, व्यवसाय, शेती, बाग बगीचे आहे त्या अवस्थेत सोडून पलायन करणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या मनाची अवस्था काय असेल? याचा विचार करा. अशा कठीण प्रसंगात त्यांच्या सोबतीला ना राज्य़ सरकार होतं ना केंद्र सरकार. केंद्रात तेव्हा व्ही.पी. सिंह पंतप्रधान होते. तर गृहमंत्री होते काश्मीरमधले मोठे नेते मुफ्ती मोहम्मद सईद.

23 जानेवारी 1990 रोजी 235 पेक्षा अधिक कश्मिरी पंडितांचे अर्धवट अवस्थेत जळालेले मृतदेह खोऱ्यातल्या रस्त्यांवर पडले होते. लहान मुलांचे तारांनी गळे आवळण्यात आले तर काहींची अमानुषपणे कुऱ्हाडीनं हत्या करण्यात आली होती. ही तर फक्त प्रातिनिधीक उदाहरणं आहे. यापेक्षाही कैक पटीनं क्रौर्याची परिसीमा या माथेफिरू धर्मांधांनी गाठली होती.

26 जानेवारी 1990 रोजी भारत देश आपला 38 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आपल्याच काश्मीरचे मूलनिवासी पंडित आपलं घर-दार सोडून निर्वासीत झाले होते. 29 जानेवारी 1990 पर्यंत काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडित नावालाही उरले नाहीत.

काश्मीर खोऱ्यातून आलेल्या पंडितांची वस्ती जम्मूमधल्या निर्जनस्थळी वसवली गेली. टुमदार घरांमध्ये राहणाऱ्या पंडितांना 10 बाय 10 च्या टेन्टमध्ये अक्षरक्षः कोंबलं गेलं. जिथे पाणी, शौचलय अशा प्राथमिक सोईसुद्धा नव्हत्या. त्यामुळे हजारोंचा मृत्यू आजारपण आणि औषधोपचाराअभावी झाला. अनेकांचा मृत्यू तर साप आणि विंचू चावल्यामुळे झाला. काश्मिरी पंडितांना सरकारनं मरण्यासाठीच सोडून दिलं होतं. जगातल्या सर्वात मोठ्या संघराज्य लोकशाही देशात हे घडलं. याचे पीडित आजही निर्वासितांसारखे जगताहेत. हा एवढा मोठा नरसंहार होऊनही आजपर्यंत याप्रकरणात साधा एफआयआरही दाखल झालेला नाही. अटक दूरची गोष्ट साधं ताब्यात घेऊन चौकशीही केली गेली नाही.

(Getty Image)

काश्मीर सोडणाऱ्या पंडितांना सरकारच्या वतीनं आता पक्क्या खोल्या दिल्या खऱ्या पण या निर्वासित वसाहतीमध्ये आजही 10 बाय 10 च्या खोल्यांमध्ये 5 ते 10 जण राहतात. आज 30 वर्षांनंतरही काश्मिरी पंडित आपल्या घरी जाण्यासाठी आतूर आहेत. ते अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत...