संपूर्ण जगात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येच्या क्रमवारीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, ही बाब नक्कीच भूषणावह नाही. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता देशपातळीवर विविध उपाययोजना आखल्या जात असताना सरकार आता देशात या आजाराचा किती संसर्ग झाला आहे हे सिरो सर्वेक्षणाच्या माध्यमातून तपासणार आहे. या अहवालामुळे देशात या आजाराचा किती प्रादुर्भाव झाला आहे हे कळणार आहे, त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांना कोरोनासंदर्भातील उपचारांची पुढील दिशा ठरवण्यासाठी मदत होणार आहे. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. या साथीच्या आजारातील संसर्गाच्या अजूनही आपण दुसऱ्याच टप्प्यात आहोत. आपल्याला सामाजिक लागणीच्या तिसऱ्या टप्प्यातून वाचायचं असेल तर एकंदरच शासन, प्रशासन आणि नागरिकांना एकत्र येऊन (वैचारिक दृष्टिकोनातून) युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने आपली भूमिका चोख बजावणे ही आता काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिक नियमांचं पालन करतो की नाही हे पाहण्याकरिता पोलीस ठेवणं शक्य नाही.



ज्यावेळी संपूर्ण देशात आणि राज्यात मे महिन्यातील लॉकडाऊन होता, त्यावेळी या 'सिरो सर्व्हिलन्स'चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आय.सी.एम.आर) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्राकडून 21 राज्यातील 69 जिल्ह्यात स्वैर (रँडम) चाचणी करण्यात आली होती.


या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यातील 400 नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन आयजीजी (इम्युनोग्लोबीन) एलिसा चाचणी करण्यात आली. त्यामुळे या चाचण्या करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या शरीरात प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) निर्माण झाल्या आहेत का? त्याचे प्रमाण किती आहे? तसंच त्यांना यापूर्वी कोणत्या विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता का? हे कळण्यात मदत झाली होती. याकरिता राज्यातील बीड, नांदेड, परभणी, जळगाव, अहमदनगर, सांगली या जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. ही चाचणी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-19 साठी अँटीबॉडीज शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी किट द्वारे करण्यात आली होती.


कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक क्रियाशील होते. या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) चाचणी पॉझिटिव्ह येते, त्या व्यक्तीला संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. मनोज मुऱ्हेकर, संचालक, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, चेन्नई यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबवण्यात आला होता. मात्र नव्याने परत 'सिरो सर्व्हिलन्स' कधी करण्यात येणार आहे याची माहिती अजून त्यांच्याकडे आलेली नाही. त्यामुळे ही चाचणी कोणत्या जिल्ह्यात आणि कधी करणार हे जाहीर होणे अपेक्षित आहे.


भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आय.सी.एम.आर) गेल्या महिन्यात देशातील 83 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला होता. राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे, हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील या सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 1.13% एवढे आढळून आले होते. राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचा निष्कर्ष या सर्व्हेत आढळून आला होता.


कोविड-19 हा साथीचा आजार 215 देशांमध्ये पसरला असून एकूण 1,24,14,853 लोकांना याची लागण झाली आहे आणि 5,57,923 रुग्णांचा याच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला आहे.  जगभरातील देशांकडून विविध प्रकारच्या निदान चाचण्यांची वाढती मागणी आहे. ज्या चीन देशातून या कोरोना विषाणूची सुरुवात झाली त्या देशाची रुग्णसंख्या सध्याच्या घडीला 83 हजार 585 इतकी आहे आणि 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णसंख्येचा आकडा रोखण्यात यश प्राप्त झालं आहे, तर भारताची रुग्णसंख्या 7,97,399 इतकी असून 21,654 रुग्ण याच्या संसर्गामुळे मृत्यू पावले आहेत.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याच देशातील काही वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि संघटनांनी कोरोनाच्या सामाजिक प्रसाराच्या टप्प्यास सुरुवात झाली असल्याचं म्हटलं होतं.  मात्र यावर फारसं कुणी भाष्य केलं नव्हतं. वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या मांडणीनुसार साथीच्या प्रसाराचे चार टप्पे असतात, त्यात पहिल्या टप्प्यात बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना साथीच्या आजाराचा संसर्ग झालेला असला तर या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांना या आजाराची लागण होते आणि तिसरा टप्पा म्हणजे कुठलाही प्रवास न केलेले आणि या बाधितांच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होते. या टप्प्यात संसर्ग समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असतो. या तिसऱ्या टप्यात संसर्गाचा प्रसार कसा होतो, याबाबत छडा लावणे मुश्किल होत जातं. कारण एका विशिष्ट भागात, शहरात किंवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसायला लागतात, त्यावेळी समूह संसर्गाला सुरुवात होते असं म्हटलं जातं. मात्र याबाबत कोणतेही ठोस पुरावे अद्याप उपलब्ध होऊ शकले नाही.


वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, साथीच्या रोगात असा 'समाजात संसर्गाचा फैलाव झाला आहे की नाही याच्या चाचपणीचा अहवाल' अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळे एकदा सर्वेक्षण केल्यानंतर पुन्हा अशा स्वरूपाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या सर्वेक्षणानंतर या आजाराचं समाजातील वर्तन कसं आहे हे आरोग्य विभागास कळणार आहे. तसेच देशातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरात या विषाणूचा वावर कसा आहे, याचीही दखल यात घेतली जाणार आहे. काही वेळा अनेकांना याची बाधा होऊन गेली असेल मात्र त्यांना याची माहितीही  नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. या नवीन सर्वेक्षण चाचणीच्या अहवालामुळे कोरोनासंदर्भातील नवीन धोरण ठरवण्यास केंद्र सरकारला फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी आणखी कोणती काळजी घ्यायची का? हेसुद्धा निश्चित होण्यास मदत होईल.


ज्यावेळी पहिलं सिरो सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्यावेळी देशात लॉकडाऊन होता. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे, लॉकडाऊन शिथीलतेमुळे नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत, त्यामुळे आता रुग्णसंख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे अशा काळात जर हे सर्वेक्षण झाले तर नक्कीच निकाल पहिल्या सर्वेक्षण निकालापेक्षा वेगळे असतील यामध्ये शंका नाही. त्यामुळे ही पुन्हा होणाऱ्या देशभरातील संसर्गाची तपासणी शास्त्रीय दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.