BLOG : अपेक्षेप्रमाणेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेचे दुसरे नेते आणि सध्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सडकून टीका केली. गेल्या काही महिन्यांपासून रामदास कदम यांचे पंख छाटून त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता कसा दाखवता येईल याकडे काही शिवसेनेतीलच नेत्यांचे जातीने लक्ष असल्याचे म्हटले जात होते. अनिल परब यांच्या रिसॉर्टप्रकरणी एक कथित ऑडियो क्लिप बाहेर आली होती. त्यात रामदास कदम अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती भाजप नेते किरीट सोमैया यांना देत असल्याचे दिसत होते. अर्थात रामदास कदम यांनी तेव्हाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी असे काही केलेले नाही असे म्हटले होते.


मात्र या क्लिपमुळे शिवसेनेतील त्यांचे स्थान संपुष्टात येण्यास सुरुवात झाली होती. अनिल परब यांनी ही गोष्ट फारच मनावर घेतली आणि त्यांनी रामदास कदम यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरु केले. त्याचाच एक भाग म्हणून दोन-तीन दिवसांपूर्वी ते रत्नागिरीत तळ ठोकून बसले आणि तेथील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे बदल केले. हे बदल रामदास कदम आणि त्यांचा आमदार मुलगा योगेश कदम यांच्यावर थेट वार करणार होते. त्यामुळेच रामदास कदम पुन्हा चिडले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील खदखद व्यक्त करतानाच फक्त अनिल परबच नव्हे तर उदय सामंत आणि सूर्यकांत दळवी यांच्यावरही टीकास्र सोडले. एवढेच नव्हे तर अनिल परब शिवसेना चालवतायत का असा प्रश्न विचारण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. अनिल परब शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


मात्र एवढे सगळे सांगत असतानाच शिवसेना सोडणार नाही असेही त्यांनी म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रामदास कदम यांनी भेटीची वेळही मागितली आहे. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात त्यांनी काही मुद्द्यांना स्पर्श केला असून प्रत्यक्ष भेटीत सविस्तर बोलेन असे म्हटले आहे.


रामदास कदम यांना गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहिलेले आहे. अजित पवारांच्या जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचार प्रकरणाची बाडेच त्यांच्याकडे असत. ते जेव्हा गप्पा मारायला बोलवायचे तेव्हा ती बाडं दाखवायचे. केवळ अजित पवारच नव्हे तर आघाडी सरकारमधील आणखी काही मंत्र्यांची प्रकरणेही त्यांच्याकडे सप्रमाण आहेत असे ते सांगायचे. आणि कधी कधी कागदपत्रेही दाखवायचे. ते म्हणायचे हे सर्व मी बाळासाहेबांकडे देणार तसेच विधिमंडळातही गौप्यस्फोट करणार. आघाडी सरकार गेले आणि शिवसेना-भाजपचे सरकार आल्यानंतर रामदास कदम पर्यावरण मंत्री झाले. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पेतून पर्यावरण रक्षणाच्या योजना मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मिठी नदी प्रोजेक्टलाही त्यांनी भरघोस निधी दिला होता. रासायनिक पाणी नदीत सोडणाऱ्या कंपन्यांवरही त्यांनी वचक बसवण्याचा प्रयत्न केला होता. २०१९ मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आणि रामदास कदम बाजूला पडले. ते आता पक्ष सोडण्याच्या मानसिकतेपर्यंत आले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


या पत्रकार परिषदेमुळे रामदास कदम आता फार काळ शिवसेनेत राहतील असे वाटत नाही. उद्धव ठाकरे यांनी भेटीची वेळ दिल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढील मार्ग निवडला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांना पक्षातून काढलेही जाऊ शकते. त्यांच्या मुलाची योगेशची राजकीय कारकिर्द आत्ताच सुरु झाली. सुरुवातीलाच योगेशला राजकारणाला सामोरे जावे लागत आहे. रामदास कदमांनी म्हटल्याप्रमाणे ते शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहाणार असले तर योगेशलाही शिवसेनेत राहाण्यात सांगतील. पण एकूणच सध्याचे राजकारण पाहाता रामदास कदम शिवसेनेत राहिले तरी मुलाला मात्र हवा तो मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य देतील. तसे झाले तर योगेश कदम भाजपमध्ये जाऊन आपली पुढील कारकिर्द सुरू करू शकतो. पण भाजपमध्येही योगेशला हवी तशी संधी मिळेल की नाही याची शंकाच आहे.


छगन भुजबळ, राज ठाकरे, नारायण राणे अशा अनेकांनी शिवसेना सोडली. छगन भुजबळ शरद पवारांसोबत गेले तर राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. नारायण राणे यांनीही अगोदर स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि आता भाजपवासी होत केंद्रीय मंत्रीपद मिळवलेय. रामदास कदम आता कोणता मार्ग निवडतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.