BLOG : एखाद्या मशिनचे किंवा गाडीचे, यंत्राचे काही दिवसांनंतर आपण सर्व्हिसिंग करतो. गाडी किंवा मशिन नीट, सुरळीत असावे यासाठी आपण त्याचे सर्व्हिसिंग करतो. एखाद्या यंत्रासाठी जसे सर्व्हिसिंग करणे गरजेच तसेच नातं सुद्धा व्यवस्थित राहावं यासाठी आपण त्याचं सर्व्हिसिंग करून पाहायला काय हरकत आहे? कोणत्याही नात्यातला घट्टपणा वाढावा, संबंध जास्त चांगले व्हावे, ते अनुभवता यावे. ते सगळे क्षण प्रत्येकाला आयुष्यात खूप काही सांगून जाणारा असतो. आयुष्यात असणारी अनेक 'नाती' आपल्याला वेगळेवगळे अनुभव, समाधान, शिकवण देऊन जातात. विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी 'नात्यांचे सर्व्हिसिंग' या कथा संग्रहात अतिशय उत्तम पद्धतीने नात्यातील येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवाचे वर्णन केले आहे.
       

  
सुरुवातीच्या कथेमध्ये कोणीतरी एक म्हातारा माणूस सकाळी बँकेत आल्यावर त्यांच्या कर्जाचे असलेले प्रकरण सांगताना रंगवलेली कथा, त्यांच्या बायको आणि मुलासोबत असलेल नातं हे त्यावेळी उभ्या केलेल्या गोष्टीत वेगळेपणाचा विचार करायला लावणारी होती. थकबाकी आणि मानसिक स्थितीमुळे मी बँकेत आलोय अशी सुरुवात करून रडवेल्या चेहऱ्यासोबत कुटुंबाची माहिती परत परत बँकेत त्यांनी सांगितली. बायको सोबत नसणं आणि मुलगा छळ करत असल्याचं सांगून लक्ष दिलं जावं यासाठी प्रयत्न त्यांनी केले. बँकेकडून सगळ्या प्रकराची माहिती घेतली त्यावेळी मुलाची आई जिवंत असताना सुद्धा केवळ संपत्तीसाठी तो म्हातारा माणूस सगळी कथा रंगवत होता हे कळालं. ज्यावेळी त्यांच्या मुलाकडून बाजू ऐकून घेतली त्यावेळी केवळ पैसा मिळण्यासाठी सर्वकाही कथा रंगवली गेली असल्याचं समोर आलं. सुरूवातीची कथा वाचून सुद्धा कोणत्याही नात्यांचे सर्व्हिसिंग करायला हवं हे सांगून जाणारा ठरला.


भावानंतरच्या बहिणीच्या नात्याच्या अनुभवावेळी पाहिलेले रडवलेल्या चेहऱ्यानंतर सुद्धा नात्याचं जपणं राहून जायला नको, बहीण-भावामधल्या नात्याबद्दल हेच वाटलं. कोणत्याही वेळी श्रेय मिळण्याच्या धडपडीपेक्षा नात्याला जपणं, नात्याचं सर्व्हिसिंग सुद्धा करायला शिकलं पाहीजे याबद्दल लेखकांनी केलेली मांडणी विचार करायला लावते आणि स्वत:ला आलेल्या अनुभवाचा सुद्धा विचार करायला लावते हे नक्की.


बँकेत रोज येणारे अनुभव हे कोणत्या एका नसलेल्या सहीत सुद्धा एखादी गोष्ट दडलेली आहे. ज्यावेळी पैशांच्या हिशेबाऐवजी नात्यांचा केलेले हिशेब हा एखाद्या नव्या जगण्याचा प्रारंभ करायला विचारात नक्की पाडते. मागील काही दिवसात नोटबंदीचा सामना सगळ्यांना करावा लागला ज्या निर्णयाचा फटका अनेकांच्या आयुष्यात जाणवला. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात त्या नोटबंदीच्या निर्णयानंतर बँकेसोबत तयार झालेले नाते हे जणू त्यावेळेची गरज झालेली होती. त्यावेळी प्रत्येक बँकेत जसे वेगवेगळे अनुभव आले त्याचप्रमाणे विश्वास को-ऑप. बँकेत विश्वास ठाकूरांना आलेल्या अनुभवांचे कथन वाचताना उत्कंठेसोबत स्वत:ला विचार करायला भाग पाडते. 
     
कधीही कोणती घटना झाली की त्यावेळी कोणाचा दोष होता, कोण चुकलं? कोण बरोबर? याचा विचार डोक्यात यायला सुरुवात झाली की कोणीही माणूस त्या नात्यात मनात आलेल्या भावनेसोबत एकदा त्या नात्याचं सर्व्हिसिंग करायला पाहिजे असा विचार डोक्यात या पुस्तकातील कथा वाचल्यानंतर येतो. सुरूवातीच्या कथा या वाईट, चांगल्या, भल्या, बुऱ्या सगळ्याच प्रकारच्या मांडणी असणाऱ्या आहेत.


अनेक प्रसंगी नात्यातला विश्वास अधिक दृढ करणारी तर काही वेळेस त्या नात्यातल्या अविश्वासामुळे सुद्धा येणारा अनुभव खूप काही शिकवून देणारा ठरलेला असतो, अनुभवात भर टाकणारा असतो हे कथांमधून उलगडते. एखाद्या नात्याची झालेली ओळख जरी नवी असली तरी सुद्धा त्या नात्यामध्ये द्यावा लागणारा वेळ हा माणसं जोडून ठेवणारा असतो. तर तात्पुरता येणारा अनुभव हा आयुष्यभरासाठी वेगळेपणाची भावना निर्माण करतो.  


प्रत्येकाला जीवनाच्या वाटेत भेटलेली माणसे, त्यांचे मोठेपण आणि त्यांच्याकडून मिळालेली जीवन जगण्याची प्रेरणा ही शिदोरीच आहे. रक्ताची नाती ही अनोळखी नात्यांची घट्ट करणारी गुंफण असतात आणि ही आयुष्यभरासाठी पुरणारी असतात. रोजच्या आयुष्यात दिवभरात सोबत असणाऱ्या माणसांमुळे येणारे अनुभव हे प्रत्येकाला घरात, ऑफिसमध्ये, बाहेर समाजात फिरताना, कधी तात्पुरते असतात तर कधी शिकवणारे, कधी विचार करायला भाग पाडणारे.


एखाद्या जवळच्या माणसाचं आयुष्यात असणं आणि अचानक कायमचं निघून जाणं जसं डोळ्यात पाणी आणते आणि सोबत आठवण करून देतं... त्या प्रत्येक चांगल्या क्षणाची आणि वाईट वेळेची सुद्धा.! मग जाणवतं ते त्या नात्यांचे असणं.. एखादा व्यक्ती कायमचा निघून जाणं जितका चटका लावून जातं त्याचप्रमाणे तो सोबत असताना कधी आलेला दुरावा, अबोला नंतर विचारात पाडतो. अगदी अनोळखी नाते ज्यावेळी जवळ आणणारी असतात त्यावेळी रक्ताच्या नात्यासोबतच त्या नात्यांचा जिव्हाळा मनात जागा करतात.  


'नात्यांचे सर्व्हिसिंग' हा कथासंग्रह जीवन जगण्याची कला ही सकारात्मकतेतून आनंदासह वाचनावेळी नात्यामध्ये वेळेनुसार घ्यावी लागणारी भूमिकेवर विचार करायला लावणारी आहे. पंचवीस कथांची मांडणी करणारे हे नात्यांचे सर्व्हिसिंग प्रत्येकाने एकदा तरी वाचावे. नात्यांमधील विश्वास वाढवणे आणि तो अधिक घट्ट करणे या अवघड वाटणार्‍या गोष्टी तुम्हाला सहजपणे यामधून कळतील हे नक्कीच म्हणावे लागेल...