BLOG : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आंध्रप्रदेशात आली आहे, ही यात्रा आंध्रप्रदेशात काँग्रेसला जिवंत करू शकेल? चार दिवसात 100 किलोमीटरचा प्रवास करुन ही यात्रा कुर्नुल या एकमेव लोकसभा मतदारसंघातून पुन्हा कर्नाटकमध्ये येऊन तेलंगणात जाईल. UPA-1 व UPA-2 मध्ये देशात काँग्रेसला सत्तेवर आणायचे सर्वात मोठे काम हे आंध्रप्रदेश या राज्याने केले. काँग्रेसचे दिवंगत नेते YS राजशेखर रेड्डी यांचे इथे एकहाती वर्चस्व होते. पुढे मुलाने वेगळा पक्ष काढल्यापासून काँग्रेसने या राज्याकडे दुर्लक्षच केले असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. कॉंग्रेसला 2004 साली 29 व 2009 साली 33 खासदार देणाऱ्या या राज्यात सध्या काँग्रेस आकड्याने शून्य आहे. चार दिवसाच्या पदयात्रेने या राज्यात फार काही फरक पडेल असे नाही, पण तिथल्या पक्षाच्या केडरला पक्ष जिवंत असल्याचे जाणवेल. 2024 चे लक्ष्य भेदण्यासाठी आंध्रप्रदेशाला दुर्लक्षित करून काँग्रेसला चालणार नाही. तिथे विशेष लक्ष द्यावे लागेल. 


आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देतो म्हणून पूर्ण राज्यात YS जगन यांनी रान पेटवले. मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर या बद्दल जास्त पुढे काही झाले नाही. राहुल गांधींनी काल पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आल्यावर आंध्रप्रदेशाला विशेष दर्जा बहाल करू अशी घोषणा केली आहे. तसेच YS जगन यांनी अमरावती राजधानी घोषित करताना शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनीचा त्यांना योग्य मोबदला मिळाला नसल्याने त्रस्त झालेले शेतकरी सुद्धा राहुल गांधी यांना भेटले. या विषयाचाही त्यांनी पुनरूच्चार केला. राज्याच्या राजधानीसाठी हजारो एकर पिकावू जमीन सरकारने घेतली. न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय दिल्यानंतरसुद्धा राज्यातील सरकार तो निर्णय पायदळी तुडवत आहे. सर्व शेतकऱ्यांनी मिळून राहुल गांधीना विनंती केली की हा मुद्दा संसदेत तुम्ही उचलावा. जेणेकरून आमच्या सारख्या शेकडो शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल.


जेव्हा राहुल गांधी यांनी पूर्ण यात्रा चालणाऱ्या युवकांच्या सोबत संवाद साधला असता त्यांना विचारलं जाते तुम्ही कोणती सनस्क्रीन वापरता? अशा प्रश्नावर सुद्धा राहुल गांधी मिश्कीलपणे सांगतात की "मी कोणतीही सनस्क्रीन वापरत नाही, आईने पाठवली आहे पण वापरत नाही." असं दिलेलं उत्तर किती खुला संवाद आहे याची जाणीव करून देते. युवकांच्या सोबत बोलताना राहुल गांधी म्हणतात की, ही यात्रा ऐतिहासिक आहे, आजच्या पिढीसाठी नव्हे; तर पुढील पिढीच्या भविष्यासाठी ही यात्रा आहे. आज आपण विरोधात आहोत, आता आपल्याला रस्त्यावर चालण्याशिवाय व जनतेत जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. त्यांची ही टिप्पणी राहुल गांधी हे पूर्ण तयारीने लोकांत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही यात्रा माणसं जोडण्याची नांदी आहे हे सहज लक्षात येतं. त्यांची शालीन छबी यात्रेच्या माध्यमातून अधिक खुलत आहे. या यात्रेत संवाद साधताना राहुल गांधी यांनी कसलाही आडपडदा ठेवलेला नाही. प्रत्येक घटकाला भेटून आपलं करण्याचा प्रयत्न राहुल करत आहेत. राहुल गांधींचे वैशिष्ट्यपूर्णरित्या सहज संवाद साधणे, भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या व्यक्तीसोबत संवाद साधताना राहुल गांधी यांची साधी जीवनशैली आणि निखळ बोलणे युवकांच्या मनातील जोश जागा करताना सहज दिसून येते. 


कल्पना करा रोज सकाळी लवकर उठून चालणे, हजारो लोकांना भेटणे. अनोळखी लोकांचे ऐकणे, त्यांना समजून घेणे. त्यांच्यासोबत उभे राहणे, विचारांची देवाणघेवाण करणे. या लोकांच्या सोबतच त्यांचा दिवस संपतो. दिवसभरात साधारणपणे हजारो लोकांसोबत राहुल गांधी संवाद साधतात. यामध्ये महिला, कामगार, सामान्य नागरिक, शेतकरी, तरुण, विद्यार्थी यांच्यासोबत संवादाची देवाणघेवाण होते. 


या संवादात राहुल गांधी विविध प्रश्नांवर लढण्यासाठी खंबीरपणे तयार असल्याचे ठामपणे सांगतात. राहुल गांधी यांच्या या पराकोटीच्या संवादामागे निव्वळ राजकारणच नाही तर देशाबद्दल असणारी आत्मीयता, तगमग, सकल प्रश्नांची जाणीव आणि लढण्याचा दृढनिश्चय दिसून येतो. देशातील तरुणांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, सातत्याने पसरवला जाणारा धार्मिक द्वेष अशा सर्व समस्यांमधून देशाला मुक्त करण्याचा दृढसंकल्प करून राहुल गांधी खऱ्या अर्थाने देशातील तरुणांना त्यांच्या भविष्यासाठी भारताला एकत्र जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.


आजच्या घडीला देश द्वेष, महागाई आणि बेरोजगारीचा सामना करत आहे. हा मुद्दा राहुल गांधी युवकांच्या सोबत संवाद साधताना आवर्जून मांडत आहेत. देशभरात द्वेषाच्या वातावरणाविरुद्ध लढणारी तरुणांची फळी निर्माण करत, त्यांना सत्याची जाणीव करून देत शांततेच्या मार्गाने ही यात्रा चालली आहे. युवकांना निडर होऊन आपल्या प्रश्नांवर संवैधानिक मार्गाने लढण्याचा रस्ता दाखवणारी ही भारत जोडो यात्रा लोकांमध्ये खोलवर पसरत चालली आहे, रूजत चालली आहे. युवकांना या यात्रेबद्दल आत्मीयता निर्माण होत आहे, हेच यात्रेचे यश म्हणावं लागेल.


टीप- लेखात दिलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. याच्याशी एबीपी माझा सहमत असेलच असे नाही.