BLOG : ...या आधीच्या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे आम्हाला सकाळी उठून विट्याला पोहोचायचं होतं. सकाळी 7.30 दरम्यान हॉटले सोडलं आणि विट्याच्या दिशेनं निघालो. रस्त्यात आम्हाला आमचे प्रतिनिधी कुलदीप माने भेटले आणि पुढचा प्रवास सुरु झाला. जवळपास 60 किमीचं अंतर पार करायचं होतं. तासगाव मार्गे आम्ही विट्याला निघालो. मी आयुष्यात पहिल्यांदा सांगलीत गेलो होतो. माझ्यासाठी सगळच नवीन होतं.


तासगावपासून विट्यापर्यंतचा पट्टा मनमोहक होता. दोन्ही बाजूला झाडं आणि मधून रस्ता. सकाळीच बाहेर पडलो होतो, त्यामुळे कोवळ्या उन्हात हे दृश्य आणखी भन्नाट वाटत होतं. सुमारे 10.00 वाजता आम्ही विट्याला पोहोचलो. आमचा पायगुण चंद्रहार पाटलांसाठी शूभ ठरला.  विट्यात पाऊल ठेवताच पहिली ब्रेकिंग न्यूज मिळाली. चंद्रहार पाटलांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली होती. आम्ही थेट पाटलांच्या तालमीत पोहोचलो पण ते तिथे नसून आपल्या भाळवणी गावात होते. आम्ही म्हटलं, इथे शूट करण्यापेक्षा थेट गावात जाऊन शूट करु. तालमीपासून भाळवणी किमान 10 किमी अंतरावर होतं. 


मुख्य शूट व्यतिरिक्त आम्हाला काई एक्सट्रा शॉट्स घ्यावे लागतात त्यामुळे म्हटलं पुढच्या दहा किमीमध्ये आपलं हे होऊन जाईल. आमची इन्होवा पुढे, कारच्या बूटमध्ये कॅमेरा घेऊन अनिल संगरे सर आणि कारच्या टपावर दिपेश महाजन. कारच्या पाठीमागे मी, साईड कारमध्ये सिद्धेश. माझ्या आयुष्यातील अविस्मर्णीय 10 किलोमीटर म्हणजे चंद्रहार पाटलांची तालीम ते भाळवणी गाव. मला अनेकांनी सांगितलं होतंच पण विटा इतकं सुंदर असेल असा विचार अजिबात केला नव्हता. त्या 10 किमीमध्ये शेतं लागली, जंगल लागलं आणि छोटी-छोटी गावंसुद्धा लागली. जे काही मी पाहीलं ते सुंदर होतं. प्रत्येक माणसाने कोकणात जावं असं मी अनेकदा म्हटलंय, पण आता प्रत्येकाने कोकणासह सांगलीतही जावंच. 


आम्ही अर्ध्यातासात भाळवणी गावात पोहोचलो. आम्ही पोहोचताच लोकांनी फटाक्यांनी माळ लावली. मला वाटलं आमच्यासाठी असेल पण नाही... तो जल्लोष होता चंद्रहार पाटलांना उमेदवारी मिळण्याचा. गावात पोहोचल्यावर समजलं की चंद्रहार जवळच्या मंदिरात गेलेत. आम्ही पुन्हा गावच्या वेशीवर जाऊन वाट पाहू लागलो. जवळपास अर्ध्यातासाने 5 फॉर्च्युनर गाड्यांचा एक ताफा वेगानं आला आणि गावच्या कमानी जवळ थांबला. सर्व गाड्यांच्या ड्रायव्हर्सनी अक्षरशः कचकचून ब्रेक दाबले. साऊथ इंडियन फिल्ममध्ये नायकांच्या एन्ट्रीला मागे टाकेल अशीच काहीशी चंद्रहार पाटलांची एन्ट्री झाली. 


एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवली ती म्हणजे, गावातील पैलवानाला ठाकरे गटानं खासदारकीची उमेदवारी दिली असूनही फार अशी गर्दी झाली नव्हती. पण असो चंद्रहार पाटील येताच आमच्या कुलदीपने पटकन त्यांचा एक छोटा इंटरव्हूव केला आणि मुंबईला पाठवून दिला. उमेदवारी मिळताच पाटलांची पहिली मुलाखत एबीपी माझाकडे होती. आम्ही देखली नशीबवान होतो की नेमकं त्याच वेळी आम्ही गावात होतो. कुलदीपला मी सहज विचारलं की, "आता आपण गावात होतो, पाटील होते तर तुझं काम पटकन झालं पण जर आपण इथे नसतो तर? यावर कुलदीप हसत म्हणाला, "मला एका 8 मिनिटांच्या इंटरव्हूवसाठी 60 किमी लांब यावं लागलं असतं. "खरचं, आम्ही मुंबईत बसून काम उशीरा झालं की रिपोर्टर्सना नावं ठेवतो. पण या 25 दिवसांच्या दौऱ्यात त्यांचं आयुष्य जवळून पाहिलं आणि त्यांच्या संयमाचं, मेहनतीचं आणि पर्फेक्शनचं कुतूहल वाटलं. एका इंटरव्हूवसाठी, एका बाईटसाठी त्यांना 60-70 किमी एका दिशेनं प्रवास करावा लागतो. जाऊन येऊन 120 किमी होतात. हे आपण करु शकतो का असं स्वतःलाच विचारलं मी.  


असो, पुढे चंद्रहार पाटलांच्या गाड्यांचा ताफा पाहून विनोद सरांना एक कल्पना सुचली. आम्ही सुरुवातीचा भाग एका साऊथ इंडियन फिल्मप्रमाणेच शूट केला. चंद्रहार पाटील साईडकारमध्ये बसताना माझा जीवमुठीत आला होता. एवढा धिप्पाड माणूस फीट होईल का? साईडकार लोड घेईल का? बाईक उलटली तर? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले... म्हटलं आपण बाईक चालवण्यावर फोकस करु. इंटरव्हूव सुरु झाला आणि मस्त गप्पा रंगल्या. महत्वाचं म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा चंद्रहार पाटलांची उत्तर एका टिपिकल राजकारण्याप्रमाणेच होती. 


इंटरव्हूवचा शेवट आम्ही तालमीत करणार होतो म्हणून आम्ही थेट लोकेशनला पोहोचलो. मुळात आता ती फक्त तालीम उरलेली नाही, तिथे चंद्रहार पाटलांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम सुरु आहे. हॉस्टेल, पैलवानांसाठी CBSE शाळा, स्विमिंग पूल, मॅट कुस्ती ग्राऊंड अशा अनेक संस्थांचं निर्माण होणारे. त्यांचं स्वप्न आहे की विट्यात त्यांना Wrestling University उभारायची आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील पैलवान इतर राज्यांमध्ये जात होते पण आता इतरांनी आपल्याकडे यावं अशी पाटलांची इच्छा आहे. एका मुलाला पैलवान करण्यासाठी जे काही लागतं ते सगळं चंद्रहार पाटील सांगलीच्या विट्यात उभारणार आहेत. चंद्रहार पाटलांचा इंटरव्हूव करता इतकी मजा आली की संपल्यावर वाईट वाटू लागलं. 


काम झालं.. आम्ही सर्व पैलवानांचा निरोप घेतला आणि बाहेर पडलो. शेजारीच एक हॉटेल होतं... आता सांगलीत आलोय म्हटल्यावर मटण खाल्लचं पाहिजे. सकाळचा ब्रेकफस्ट स्कीप झाला होता त्यामुळे मस्त सर्वांनी मटण थाळी घेतली आणि पोटभर जेवले. जेवणानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो, संध्याकाळी आमचा मुक्काम होता सोलापुरात. विटा सोडताना फार विचित्र वाटत होतं, माहित नाही काय. मी ड्रायव्हरदादांना गाडी थांबवायला सांगितली. मी उतरलो आणि दिपेशला बोलावलं, म्हटलं "एक फोटो काढ.. मला फोकसमध्ये नको ठेऊ, विट्याच्या बोर्डवर फोकस कर". दिपेशनं मस्त फोटो काढला! विटा सोडताना इथे परत येणार याची खूणगाठ बांधली आणि मार्गस्थ झालो. 


अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर आठवलं की कोल्हापूरच्या एपीसोडचा काही भाग बाकी होता. भर रस्त्यात गाडी थांबवली, कपडे बदलले आणि कोल्हापूरचं शूट सांगलीत केलं. याला मीडियामध्ये 'चीट करणं' म्हणतात. मी हे सांगितलं नसतं तर तुम्हाला ते कळलं की नसतं इतक काटेकोरपणे ते केलं जातं. 15 मिनिटांमध्ये उरकलं आणि सोलापूरला निघालो. मुंबईत राहून आम्ही रस्त्यांवरून प्रशासनाला फार नावं ठेवतो पण रत्नागिरी-सोलापूर महामार्ग पाहताच मी सर्व तक्रारी मागे घेतल्या. गाडी टॉप गिअरवर टाकून सोडून द्या! भला मोठा रस्ता, ना खड्डे - ना झटके! सांगली ते सोलापूर कधी पोहोचलो समजलंच नाही. विट्याहून सोलापूरच्या दिशेनं जाताना खिडकीबाहेर नजर गेली. सगळं काही भकास होतं, रखरखीत होतं. इथे पावसाची गरज आहे हे स्पष्ट जाणवलं. 


सोलापुरात आमची वाट पाहत होता आफताब शेख. आफताब आमचा सोलापूरचा प्रतिनिधी. मी मुंबई विद्यापीठात मास्टर्स करत असाताना आफताब मला एक बॅच सिनिअर. इतका भला माणूस देव साऱ्यांच्या आयुष्यात देवो. आम्ही हॉटेलला पोहोचताच तासाभरात आफताबही पोहोचला... म्हणाला,"चला सोलापूर फिरवतो!". फ्रेश होऊन बाहेर पडलो. आफताब आणि विनोद सर बूलेटवर बसले आणि आम्ही आफताबची स्कूटी घेतली. बाकीचे दुसऱ्या गाडीवर होते. 


आफताब म्हणाला, महापालिकेत जाऊ.. मी विचार केला..काय आहे पाहण्यासारखं...! पण जेव्हा आम्ही सोलापूरच्या मनपा कार्यालयासमोर पोहोचलो, मला धक्काच बसला. मुंबईच्या CSMT स्टेशनबाहेर उभं असल्यासारखं वाटू लागलं. जशी मुंबई मनपाची इमारत आहे, त्याच पद्धीनं सोलापूरची देखील बांधण्यात आली आहे. बंर, त्यावर केलेली रोषणाई म्हणजे धमालच! फोटो काढण्याचा मोह कुणालाही आवरेना. सर्वांचे फोटो काढून झाले आणि आता जेवणाची वेळ झाली. आफताब एका मस्त हॉटेलला घेऊन गेला. सर्वांनी बिर्याणी मागवली. बिर्याणी कशी होती सांगण्यापेक्षा पुढच्या वेळेसही तीच बिर्याणी खाईन इतकंच सांगतो. त्या रात्री आम्ही एका राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्याला सुद्धा भेटलो. त्यांनी एकंदरीत सोलापूरच्या राजकारणचं वर्णन ऐकण्यासारखं होतं. अर्थात ते एकाबाजूने होतं पण अभ्यासू होतं. त्या चर्चेचा फायदा आम्हाला इंटरव्हूवमध्येही झाला. सोलापुरात रात्री फिरताना उष्णतेचा सर्वाधिक त्रास झाला. रात्री 11 वाजता सुद्धा वाफा मारत होत्या. 


सोलापुरातील दुसरा दिवस दगदगीचा राहिला. सकाळी नाश्ता न करता थेट पोहोचलो प्रणिती शिंदेंच्या निवासस्थानी. प्रणितीताईंना पहिल्यांदा भेटत होतो आणि त्यामुळे दडपण होतं. त्यांना स्वाभाव फार फटकळ आहे, आहे ते थेट तोंडावर बोलून मोकळ्या होतात. त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे हेच डोक्यात होतं. पण त्या येताच वातावरणात उर्जा जाणवली. त्या जितक्या कठोर आहेत तितक्याच प्रेमळ.त्यांना तात्काळ बाहेर जायचं असल्यानं आमचा इंटरव्हूव होऊ शकला नाही, संध्याकाळी 4.30 साठी पोस्टपोन झाला. आम्ही ओके म्हणून निघतच होतो की मागून प्रणितीताईंचा आवाज आला. थांबा.. आत बसा.. नाश्ता करुन जा. एकादशी असल्याने साबूदाण्याची खिचडी समोर आली. माझं आणि विनोद सरांचं यावर एकमत झालं की आतापर्यंत खाल्लेली सर्वात भारी खिचडी होती ती. 


भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी 1 वाजताचे वेळ दिली होती... तोपर्यंत लोकांचे बाईट्स घेतले. बाईट्सच्या नादात आफताबने अर्ध सोलापूर फिरवलं आम्हाला. उकाड्यामुळे आमचा अर्धा जीव गेल्यात जमा होता. ठिक 1 वाजता आम्ही राम सातपुतेंना भेटण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहचलो. तिथे त्यांची बैठक आणि प्रेस सुरु होती. ती होताच सातपुते म्हणाले, आधी जेवण करून घेऊ नंतर शूट करू. आम्ही सकाळपासून वैतागलो होतो त्यामुळे आम्ही जेवणं टाळलं. 


ठिक दोन वाजता राम सातपुते हॉटेलबाहेर पडले. भर दुपारी इंटरव्हूव शूट केला. बाहेरचा उमेदवार असा राम सातपुतेंचा काँग्रेसकडून प्रचार केला गेला. मात्र रसत्यात अनेक लोक समोरुन त्यांच्याशी बोलायला, फोटो काढायला येत होते. त्यामुळे कुठे तरी त्यांची क्रेझ आहे हे मान्य करावच लागेल. त्यात राम सातपुते एकदम हँडसम माणूस, दिसायला सिनेमातील भल्लालदेव सारखे त्यामुळे तरुणांना त्यांच्याबद्दल ओढ आहे. सातपुतेंचा इंटरव्हूव अडीच वाजता वाईंडअप झाला आणि प्रणितीताईंनी 4.30 ची वेळ दिली होती. आफताब म्हणाला, चला ज्यूस पाजतो. बंर, याचा रोजा...आणि हा आमची काळजी घेण्यात व्यस्त. रमजानचा महिना सुरु असल्यानं आमच्या आफताबचा रोजा होता.. त्यातही तो दिवसभर आमच्यासोबत भर उन्हात फिरत होता. सतत आम्हाला मार्गदर्शन करत होता, आम्हाला हवं नको ते पाहत होता. एक वेळी अशी आली देखील होती की तो मला म्हणाला.. घशात टोचू लागलंय... मी म्हटलं, जा घरी..पण गडी काही हलेना. आफताब सारखा मित्र सर्वांच्या आयुष्यात असायला हवा.


प्रणितीताईंच्या इंटरव्हूवसाठी अजून तासभर तरी वेळ होता... त्यामुळे आम्ही पोहोचलो थेट शरद कोळींच्या ऑफिसला. मला पर्सनली खूप आवडला हा माणूस. दिखाऊपणा अजिबात नाही... ज्या प्रकारे बाईट देताना बोलतात त्याचप्रमाणे समोर कॅमेरा नसला तरी बोलतात. कोळींचं ऑफिस पाहून तर मी चाट पडलो. एन्ट्रीला वेटिंग रुम, त्यानंतर पत्रकार कक्ष ज्यात पत्रकारांसाठी एक कंप्युटर, पुढे त्यांची मुख्य केबिन आणि त्याच्यामागे एक रुम ज्यात किंग-साईज बेड ठेवलाय. महत्वाचं म्हणजे, तिथे कुणीही जाऊन आराम करु शकतं. 


ठिक 4.30  वाजता आम्ही प्रणिती शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचलो. त्या नुकत्याच एक दौरा करुन माघारी आल्या होत्या. घरी देखील त्यांनी जनता दरबार भरला होता, अनेक लोक भेटीसाठी पोहोचले होते. आम्ही तासभर वाट पाहिली आणि अखेर प्रणिती शिंदे घराबाहेर पडल्या. प्रणिती शिंदेंचा देखील एक ऑरा आहे, एक रुबाब आहे. त्या येताच वातावरणात ताकद जाणवली, थोडी आदरयुक्त भीती जाणवली. त्यांचं बोलणं-वागणं अगदी रुबाबदार. उद्या त्यांचं नाव महिला मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत गेलं तरी मला नवल वाटणार नाही.


आम्हाला खुप उशीर झाला होता, पुढे अहमदनगर गाठायचं होतं त्यामुळे 15 मिनिटांमध्ये इंटरव्हूव संपवला. हॉटेलमधून बॅगा घेऊनच बाहेर पडलो होतो. त्यामुळे शूट संपताच आफताबचा निरोप घेतला आणि नगरला निघालो. सोलापूर हायवेला आलो आणि ट्राफिक लागलं. मार्ग काढत काढत बाहेर पडतो तेच 6.40 वाजले. रियाजचाचांच्या इफ्तारीची वेळ. आम्ही सुद्धा दुपारी जेवलो नव्हतो, सो आम्ही सुद्धा वाडापाव खाऊन घेतले. 


अंधार पडला होता, 7.30 झाले होते. रियाज चाचांना रात्री कमी दिसायचं म्हणून त्यांना गाडीत बसवलं आणि विनोद सर आणि मी बाईकवर बसलो. मोहोळच्या पुढे हायवे सोडला आणि करमाळ्याच्या दिशेनं निघालो. महत्वाचं म्हणजे, गावागावातही इतका जबरदस्त रस्तारपाहून आम्ही शॉक झालो.जिथे रस्ता खराब होता तिथे काम सुरु होतं. सोलापुर ते नगर 240 किमी अंतर होतं. सकाळपासून सगळेच थकले होते त्यामुळे रात्री 11 वाजता गाडी जिथे असेल तिथे थांबवायची असं ठरलं. 


काळाकुट्ट अंधारात विनोद सर बाईक पळवत होते, साईड कारमध्ये मी मजा करत होतो. मी आधीच ठरवलं होतं, कारमध्ये बसून आपण एकतर फोन वापरणार किंवा झोपणार. त्यापेक्षा बाईकवर बसून वेगळा अनुभव घेऊ. रात्री 10.45 वाजता गाडी करमाळ्यात पोहोचली, म्हटलं इथुन पुढे नगर 97 किमी आहे आणि उद्याचा पहिला इंटरव्हिव पारनेरला आहे जा नगरपासून 35 किमी. सकाळी उठून 135 किमी अंतर पार करायचं ठरलं आणि आम्ही करमाळ्यातच थांबलो. फार कष्टाने एक हॉटेल शोधलं. रुममध्ये जाताच विचित्र वास आला. बेडवर पाल आणि उंदरांची विष्ठा होती. वर पाहिलं तर भिंतींवर पालींचं सामराज्य होतं. वॉशरुम तर पाहण्यापलीकडे होतं. देवाचं नाव घेतलं आणि झोपलो. इतर वेळी 7 वाजे पर्यंत झोपणारे आम्ही दुसऱ्या दिवशी 6 वाजताच तयार होतो. कधी एकदा हॉटेल सोडतोय असं झालं होतं.


नाश्ता वगैरे उरकला आणि 7 वाजता नगरच्या दिशेनं रवाना झालो. काहींनी वॉशरुमपाहून अंघोळ नव्हती केली त्यामुळे सर्वात आधी नगरला एक चांगलं हॉटेल बूक केलं. डायरेक्ट पारनेरला जाणं योग्य झालं असतं पण सर्वांनाच फ्रेश व्हायचं होतं. 11 च्या आसपास आम्ही नगरमध्ये दाखल झालो. 12 वाजता निलेश लंके पारनेरला भेटणार होते. आम्हाला थोडा उशीर होणार होता आणि तसं आम्ही आमचे स्थानिक प्रतिनिधी सुनील भोंगळ यांना कळवलं होतं. सुनील सरांनी देखील सगळं मॅनेज केलं होतं. आम्ही 12.15 वाजता पारनेरमध्ये दाखल झालो. निलेश लंके जेवत होते. तोच वेळ मार्गी लावला आणि कॅमेरा सेट करुन घेतला. निलेश लंकेंनी अद्याप अजित पवार गटाचा राजीनामा दिला नव्हता, शरद पवारांकडे जाण्याची घोषणाही केली नव्हती. हे सर्व ठरलं होतं पण घोषणा संध्याकाळी होणार होती. आमचा प्रॉब्लम हा होता की, आम्ही आता शूट केलं आणि संध्याकाळी लंके पवारांकडे गेले तर शूट निरर्थक ठरेल कारण सगळी समिकरणं बदललेली असतील. आम्ही लंकेंना विनंती केली की आमच्या मुलाखतीत तुम्ही हा निर्णय घेतला आहे असाच विचार करुन बसा आणि तसंच बोला. लंकेही तयार झाले... त्यामुळे राजीनामा देण्याआधीच आमच्याकडे राजीनाम्यानंतरची मुलाखत तयार होती.


निलेश लंके कोणत्याही कार्यापूर्वी गावच्या देवळात जातात. या इंटरव्हूवआधी सुद्धा ते आपल्या देवाची भेट घेऊन आले. ज्या गावात लंकेचा जन्म झाला, जिथे शाळा झाली तिथेच लंकेंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली आणि आमदार झाले. आता हात रस्ता त्यांना दिल्लीत नेणार का हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. गावातील मुख्य रसत्यावर बाईक आणली आणि लंकेंची क्रेझ जाणवली. पुढे इंटरव्हूव समाप्तीच्या दिशेनं जात होता की एवढ्यात लंके म्हणाले... "आता मी चालवतो बाईक, तुम्ही साईडला बसा". पुढे पारनेरच्या मुख्य रस्त्यापर्यंत लंकेंनीच बाईक चालवली, बाईक तशी कठीण आहे चायवालया, पण त्यांनी केलं मॅनेज. आम्ही लंकेंचा निरोप घेतला आणि पुन्हा नगरच्या दिशेनं निघालो. परतीच्या प्रवासात बाईक मीच चालवली, वळण आलं की माझी तारांबळच उडायची. मनातल्या मनात रियाज चाचांना मानवंदना दिली.


जवळपास 2.30 वाजता आम्ही नगरमध्ये दाखल झालो. जेवायचं कुठे तर अर्थात...'हॉटेल संदीप'. मटण हंडी आणि बाजरीची भाकरी! पण एक मतावर मी ठाम आहे, नगरमधी संदीप मेन ब्रांच असली तरी पुण्यातल्या संदीपचं जेवण नगरच्या संदीपपेक्षा चांगलंच होतं. पुणे-सातारा-सांगली-कोल्हापूर... जेवणाच्याबाबतीत या जिल्ह्यांना कुणी टच सुद्धा  करु शकत नाही. 


जेवण होताच आम्हील निघालो सुजय विखे पाटलांकडे. विळद घाटा जवळ विखे पाटलांचं भलं मोठं कॅम्पस आहे. मेडिकल ते इंजीनियरिंग... इथे सगळंच नाही. हॉस्पिटलच्या डॉक्टर्ससाठी खास A+ श्रेणीचे क्वार्टर्स आहेत. सुजय विखेंसह चर्चा करताना ते म्हणाले की आपण हायवेवर शूट करु...माझ्या कार्यकाळात झालाय तो. विखे येईपर्यंत आम्ही पुढे गेलो आणि सगळे सेट करुन ठेवलं. विखे आले...साईडकारमध्ये बसले आणि इंटरव्हूव सुरु झाला. 


सुजय विखे म्हणजे जॉली माणूस...आम्ही त्यांना अनेक पर्सनल प्रश्न विचारले पण एकही उत्तर त्यांनी टाळलं नाही. घराणेशाहीच्या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तराचा सर्व राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांनी विचार करावा. विखेंच्या इंटरव्हूव वेळी बाईक मी चालवत होतो... प्रत्येक 300 मीटरच्या अंतरावर काही लोक उभे होते जे विखेंचं स्वागत करत घोषणा देत होतं. काहींनी तर शाल आणि श्रीफळ आणलं होतं. दोन तीन वेळा हा प्रकार पाहिला आणि लक्षात आलं की मागे जी लोकं होती त्यातलीच अनेक लोकं पुन्हा पुढे दिसतायत म्हणजे हे प्लॅन केलेलं आहे. मी हा विचार करतोय इतक्यात सुजय विखेच म्हणाले, "हे सगळं काही नाही...कुणी तरी यांना फोन करुन बोलावून घेतलं असणार... कार्यकर्ते आहेत माझे." ते जे काही असलं तरी ऑन कॅमेरा हे मान्य करणं हीच मुळात फार मोठी गोष्ट आहे. विखेंचा इंटरव्हिव झाला आणि आम्ही पुन्हा हॉटेलवर पोहोचलो. चहा वगैरे घेतला आणि आराम करत होतो. रात्री कुठे जेवायचं हा प्रश्न होता, सुनील सरांना फोन केला तर ते निलेश लंकेंची सभा आटपून हॉटेलवर आले. त्यांच्यासोबत नाशिकचे कॅमेरापर्सन किरण कटारे सर पण होते. हॉटेल सगमला जायचं ठरलं. बाकीच्यांनी हंडी मागवली पण मी आणि सिद्धेशनी एक बिर्याणी मागवली आणि त्यातंच भागवलं. 


दुसऱ्या दिवशी आम्हाला नगरमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन शिर्डी गाठायची होती. सकाळी लवकर उठलो आणि मार्केटमध्ये पोहोचलो. जरा जास्त लवकर पोहोचलो कारण मार्केट अजून बंदच होतं...10.30 नंतर सगळं खुलं झालं आणि आमच्या कामाचा वेगही वाढला. कापड बाजारला असताना मैत्रिणीचा मेसेज आला... "दुर्गासिंह लस्सीवाल्याकडे जा"... मी म्हटलं "ओके"...आम्ही पोहोचलो...लस्सी वगैरे घेतली आणि मैत्रिणीला फोटो पाठवला. ती म्हणाली..."दुर्गासिंह लस्सी म्हटलं..हा द्वारकासिंह आहे." मनातल्या मनात मला मुर्ख नक्कीच म्हणाली असेल. पण होत..कोणताही सिंह का असेना...द्वारकासिंहची लस्सी देखील अफलातून होती. आम्ही केसर-पिस्ता लस्सी घेतली जी आम्ही प्यायलो नाही तर खाल्ली. मजा आली. ही मजा संपवून आम्ही महात्मा गांधीच्या पुतळ्या जवळ आलो. शेवटचा शॉट बाकी होता..सुर्य तापला होता..आणि आम्ही सुद्धा...4-5 रिटेक्सनंतर शॉट फायनल झाला आणि आम्ही निघालो. जाताना एका Ice-Cream वाल्यानं  थांबवलं. तो आमचं सगळं शूट पाहत होता. मला वाटला त्याला दया आली असावी आणि कुल्फी वगैरे देईल...आम्ही पोहोताच त्यानं आम्हाला विचारलं...काय वाटतं?कोण येईल? मी कपाळावर हात मारला आणि हाच प्रश्न त्याला विचारला..तो लंके-विखेंचं नाव न घेत सरळ म्हणाला..मोदी!


पुढची कहाणी... भाग चार मध्ये


याच लेखकाचा हा ब्लॉग वाचा :