Blog : मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही संभाजीनगरला पोहोचलो, सकाळी जालन्याला जाऊन मनोज जरांगेंना भेटलो आणि पुन्हा माघारी संभाजीनगरलाच आलो. संभाजीनगरमधील दुसऱ्या दिवसाची सुरुवात धाकधुकीने झाली. आम्हाला चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील दोघेही भेटणार होते. कृष्णा केंडे सरांनी दोघांनीही लाईनअप केलं होतं, पण वेळ नक्की नव्हती. असा अनुभव आम्हाला पुण्यात रवींद्र धंगेकरांसोबतही आला होता आणि त्याचं काय झालं हे तुम्हाला चांगलंच माहितीये. 


सकाळी सर्वात आधी आम्हाला चंद्रकांत खैरे भेटणार होते पण वेळ निश्चित नसल्याने आम्ही सकाळी 7 वाजताच उठून तयार होतो. आला फोन की निघू लगेच.  सात ते नऊ झाले तरी फोन काय येईना. साडेनऊला आम्हीच खैरेंना फोन केला आणि वेळ विचारली. त्या फोनवर त्यांनी आमचा ब्लड प्रेशर वाढवलं. आदित्य ठाकरे काही कारणास्तव संभाजीनगरला आले होते आणि खैरे त्यांना रिसीव्ह करण्यासाठी  विमानतळावर गेले होते. पक्षाचा बडा नेता येणार असेल तर खालच्या फळीतील नेत्यांचा सगळा फोकस त्यांच्यावर असतो. त्यामुळे मुलाखत कॅन्सल होणार की काय अशी परिस्थिती झाली. आम्ही कृष्णा सरांना पुन्हा कॉल केला आणि सगळी परिस्थिती समाजावून सांगितली. त्यांनी त्याच कॉलवर खैरेंना मर्ज केलं आणि आम्हाला वेळ देण्याची 'विनंती' केली. चंद्रकांत खैरे पटकन तयार झाले आणि 11.30 वाजता आम्हाला बोलवलं. 


घड्याळात पाहिलं तर  9 वाजून 45 मिनिटं झाली होती. खुप वेळ होता. प्रश्नांची तयारी सुद्धा झाली होती. त्यामुळे आम्ही सगळे बेडच्या दिशेनं वळलो आणि 11 वाजेपर्यंत निवांत झोपलो. आम्ही ठीक 11.30 वाजता खैरेंच्या निवासस्थानी पोहोचलो. बाहेर लोकांची गर्दी होती. कामं घेऊन लोक भेटायला आले होते. आम्हाला सुद्धा तासभर वेटिंगमध्ये बसवलं होतं. वेट करण्यात प्रॉब्लेम नव्हता पण बाहेर ऊन वाढत चाललं होतं. आम्ही तसेही भाजलो होतो त्यामुळे आम्हाला आमची चिंता नव्हती पण खैरेंनी ऊन पाहून मुलाखत रद्द केली तर काय हा प्रश्न होता. 


मी आणि सिद्धेश  चंद्रकांत खैरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो. त्यांना सगळं समजावलं आणि बाहेर पडलो. आमच्या मागे खैरे सुद्धा बाहेर पडले. बाईक, माईक आणि कॅमेरे तयारच होते. आता रुट फानयल करायचा होता. खैरे एका गेटेड सोसायटीमध्ये राहतात त्यामुळे तिथे लोकांची गर्दी गाड्या असं काही नसतं. खैरे म्हणाले आतच करु. त्यांचा एक कार्यकर्ता म्हणाला बाहेर जाऊ. खैरे पटकन त्याला म्हणाले "तू तुझं काम कर.." त्या कार्यकर्त्यानं माझ्याकडे पाहिलं. हसला आणि डोळा मारला. मलाही समजलं की आता हा खैरेंना सोसायटीच्या बाहेर घेऊनच जाणार. मुलाखत सुरु झाली आणि आम्ही खैरेंच्या घरासमोरील लेनमधून बाहेर पडलो. आमच्यासमोर आमची इनोव्हा आणि त्यात कॅमेरे होते आणि त्यांच्या पुढे रस्ता दाखवायला खैरेंचा कार्यकर्ता बाईकवर होता. भावानं डावीकडे न वळता उजवीकडे बाईक वळवली. मी बघतच बसलो. त्यानं तिथून मला थंब्स अप केलं. डावीकडे गेलो असतो तर सोसायटीत शिरलो असतो. उजवीकडे वळलो अन् थेट सोयाटीच्या बाहेर मुख्य रस्त्याला आलो. रस्त्यावर ट्राफिक नव्हतं पण तुफान गर्दी होती. आम्ही फक्त कार्यकर्त्याला फॉलो करतो आणि तो शॉकवर शॉक देत होता. आधी सोसायटीतून बाहेर आणलं आणि आता सर्विस रोडला गाडी वळवून थेट हायवेला घेतली. तापलेला सूर्य आणि तापलेला डांबरी रस्ता. खैरेंनी नक्कीच मुलाखतीनंतर त्याला झापलं असणार. 


खैरेंची अर्ध्याहून अधिक मुलाखतही हायवेवर शूट झाली त्यात  भर रसत्यात एक घोळ झाला. मुलाखत सुरु असाताना माझा माईक बंद पडला. तो तात्काळ सुरु होणं गरजेचं होतं. आम्ही तिथेच हायवेवर गाडी थांबवली, खैरेंना मी सॉरी म्हट्लं आणि आमचे कॅमेरामॅन अनिल सरांकडे गेलो. पाच मिनिटांत माईक सुरु झाला आणि मी पुन्हा बाईकवर बसलो. 


चंद्रकांत खैरेंची मुलाखत हायवेवरच संपली. प्रत्येक मुलाखतीनंतर आम्ही त्या नेत्यासोबत बाईकवर बसून एक फोटो काढायचो. त्यामुळे विनोद सरही आता कारमधून उतरुन आमच्या बाईक जवळ आले. इतक्यात खैरेच म्हणाले..."मला जरा याच बाईकमधून माझ्या ऑफिसजवळ सोडना ना...". कालपर्यंत नेते बाईकवर बसायला तयार नव्हते आणि आज खैरे उतरायला तयार नव्हते. त्यांना आमची बाईक जाम आवडली होती. आम्ही सुद्धा मनाचा मोठेपणा दाखला आणि खैरेंना त्यांच्या ऑफिसपर्यंत सोडलं. स्वःतीची SUV असताना सुद्धा खैरेंना बाईकवरून पुढे जाण्याचा मोह आवरला नाही. भर उन्हात ते आमच्यासह फिरत होते. त्यांनाही त्यांच्या तरुणपणीचे दिवस नक्की आठवले असतील. 


खैरेंना जय महाराष्ट्र केला आणि पहिला फोन इम्तियाज जलील यांना केला. त्यांना संध्याकाळी चार वाजचा भेटायला बोलावलं. आमच्याकडे दीड तास होता. त्यामुळे आम्ही पोटची आग विझवायची ठरवलं. गुगल मॅपवर लोकसेवा हॉटेल टाकलं आणि निघालो. लोकसेना म्हणजे संभाजीनगरमधील अनेक फेमस हॉटेल्स पैकी एक. गुरुवार असल्याने मी आणि सिद्धेश व्हेज खाणार होतो त्यामुळे आम्ही खेवगा मसाला मागवला. संभाजीनगरला चालायस तर शेवगा मसाला खाच, असं अनेक जण बोलले होतं त्यामुळे सगळ्यांचा मान ठेवला. मी सांबारमधला शेवगा पण काढून ठेवणारा माणूस त्यामुळे पुढच्या काही मिनिटांत शेवग्याचा मसाला येणारे हा विचार करुन टेन्शन आलं होतं. बरं ही भाजीच शेवग्याची होती. आता शेवगाच बाजूला काढलं तर खायचं काय? 


टेबलवर जेण येताच खमंग सुटला होता. कधी नव्हे ते पहिल्यांदा ताटात शेवगा घेतला आणि सुरु केलं. ते जे काही होतं के तुफान होतं! आयुष्यात कधीच शेवगा न खाणारा मी..त्यादिशी मात्र त्या शेंगांचा चोथा होईपर्यंत खाल्लं. पोट छातीला लागलं होतं. बिल देऊन बाहेर पडलो आणि सरळ कारमध्ये बसलो. आम्हाला कडक झोप आली होती पण पर्याय नव्हता, चार वाजता इम्तियाज जलीलांनी वेळ दिली होती.  


आम्ही वेळेआधीच जलीलांच्या निवासस्थानी दाखल झालो. एकंदरीत जलीलांकडे पाहता वाटलं होतं की मोठा फौजफाटा असेल पण तिथे एक पोलिस अधिकारी सुद्धा नव्हता. एक त्यांचा ड्रायव्हर आणि एक त्यांचा गार्ड. 10 मिनिटांनी आत बोलावलं. जलीलांचं घर पाहून मन शांत झालं. त्यांनी उत्तम दर्जाचं इंटिरिअर केलं पण त्याहूनही घराची थिम ही मन रिलॅक्स करणारी होती. रोजच्या दगदगीनंतर त्यांना घरी येताच आराम मिळत असेल हे नक्की. आम्ही बसलो असाताना इम्तियाज जलील आले. खासदार माणूस पण अतिशय शांत स्वभावाचा मनमेळावू आणि दिलखुलास. जलीलांसह पाच मिनिटं बोललो आणि त्यातंच त्यांना आमचं मन जिंकलं. त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच बिलाल याला सुद्धा बाहेर बोलावलं आणि आमची भेट घडवून दिली. 


जलीलांच्या मुलाखतीचं आम्हाला थोडं टेन्शनच होतं. त्यांचं कारण म्हणजे रमाजानचा महिना होता आणि त्यांचाही रोझा सुरु होता. बंर, त्यांचा रोजा असताना सुद्धा त्यांनी आम्हाला आवर्जुन रुहअफजा पाजलं. आम्ही मुलाखतीसाठी बाहेर पडलो. जलील शर्ट बदलण्यासाठी आत गेले हाते. आम्ही बाहेर पडताच माझं लक्ष गेलं ते त्यांच्या गेट शेजारी लावलेल्या पाटीवर. त्यावर त्यांच्या घराचं नाव लिहिलं होतं..."मन्नत" हो मुंबईतील वांद्रे येथे शाहरुखच्याही बंगल्याचं नाव मन्नतच आहे. बरं...जरा आणखी नीट पाहिलं तर जाणवलं की मन्नतचा फाँट सुद्धा सेम आहे. म्हटलं नक्कीच शाहरुखच्या घराशी काही तरी संबंध असणार. आता हिच थिम घेऊन आम्ही मुलाखतीची सुरुवात करायची ठरवली आणि ती झाली सुद्धा. जलील सुद्धा खूश झाले. ते म्हणाले, "रोज सिरिअस राहून मुलाखत देण्यापेक्षा हे बरं आहे." संपूर्ण मुलाखतीत जलील दिलखुलास बोलले. खैरेंच्या मुलाखती प्रमाणे यातही माईकचा इशू झाला. इथे सुद्धा आम्ही भर मार्केटमध्ये गाडी थांबवून माईक रिपेअर केला. इम्तियाज जलील एका शब्दानेही नाही बोलले नाही. खासदार होते पण अगदी मित्रासारखे वागले. मुलाखत संपल्यानंतर बाईकचं हँडल जलीलांच्या हाती गेलं. त्यांना बाईक चालवण्याचा मोह आवरला नाही. 


आमची बाईक चालवणं तसं सोपं नव्हतं. बाईकला साईडकार सुद्धा होती त्यामुळे जजमेटं घेताना गोंधळ व्हायचा. इम्तियाज जलीलांचं ही तसं झालं. एका ठिकाणी जजमेटं चुकलं. शेजारी एक स्कूटी उभी होती आणि आम्ही जवळपास तिला आदळणार होता. मी भितीपोटी थेट हात बाहेर काढला मलाच जोरात फटका बसला. बंर मी सुपरमॅन नाही. त्यामुळे त्याचा काही उपयोग नव्हता. हे कमी होतं की काय पुढे मोठा किस्सा होता होता राहिला. जलील बाईक चालवत असाता मी साईडकारवर बसलो होतो. मार्केटमधून बाहेर पडताना रस्त्यावर काही कुत्रे होते. आम्हाला पाहून ते थेट अंगावर आले. मी लगेच खालून हेल्मेट काढलं सेफ्टीसाठी साईडकारमध्ये असल्याने ते थेट माझ्या चेहऱ्याचा चावा घेऊ शकत होते. मला काही सेकंदांसाठी यमराज दिसला होता. पण नशिब बलवत्तर होतं. कुत्रे पुढे येताच माग असलेल्या जलीलांच्या कार्यकर्त्यानी ते पाहिलं आणि पटकन त्यांची बाईक पुढे आणून सगळ्या कुत्र्यांना हाकलून लावलं. तो नसता तर कुत्र्यानं लचकाच तोडला असता. 


खैरेंप्रमाणेच इम्तियाज जलीलांना सुद्धा आम्ही त्यांच्या ऑफिसला सोडलं आणि पुढे निघालो. पण निघताना मी जलीलांना थांबवलं आणि म्हटलं. "मला तुमची विचारधारा अजिबात पटत नाही. माझ्या आणि तुमच्या विचारधारेत जमीनआसमानचा फरक आहे पण तरिही माणूस म्हणून तुम्ही फार आवडलात आणि हे नातं टिकवायलाही आवडेल. मी कधीच कुणा नेत्यासह फोटो काढला नाही पण तुमच्यासोबत काढायचाय..." हे ऐकून जलील हसले आणि पाठीवर थाप मारली. माझ्या खांद्यावर हात ठेवून फोटोसाठी मस्त पोज दिली.


दोन्ही महत्वाच्या मुलाखती झाल्या होत्या. आता फक्त बाईट्स घ्यायचे होते..ते घेण्यासाठी आम्ही क्रांती चौकात जाणार होतो. मी आणि सिद्धेशने बाईक घेतली आणि इनोव्हा पुढे गेली. काहीच सेकंदात इनोव्हा दिसेनाशी झाली पण आमची बाईक सुरुच होईना. बाईकी बॅटरी पूर्णपणे ड्रेन झाली होती. तेवढ्यात एक मुलगा तिथे आला...म्हणाला..चलो धक्का मारते हैं. आम्ही दोघांनी धक्का दिला आणि नशिबाने साथ बाईक सुरु झाली. पुढे 15 मिनिटांत क्रांती चौकात पोहोचलो आणि लोकांचे बाईट्स घेतले. अंधार पडू लागला होता त्यामुले पॅकअप केलं. पॅकअप केल्यावर लक्षात आलं की आमचं हॉटेलचं बूकिंग संपलं होतं आणि आज रात्रीचं केलं ही नव्हतं. 


आम्ही मुंबई ऑफिसला फोन केला आणि त्यांनी एक हॉटेल बूक केलं. आम्ही दोन मिनिटांत दाखल झालो. काही तरी टेक्निकल एरर असल्यानं बुकिंग दाखवत नव्हतं. आम्ही एक तास हॉटेलच्या लॉबीमध्ये सामान घेऊन बसलो होते. अखेर असं सांगण्यात आलं की हॉटेल फूल झालंय आता रुम मिळणार नाही. खरं तर आमचं बूकिंग ऑनलाईन व्हायंच पण समजा 4 रुम्स मोकळ्या असतील आणि हॉटेलमध्ये येऊन किंवा थेट हॉटेलशी संपर्कसाधून ते कुणी बूक केले तर ती प्रोसेस होईपर्यंत वेळ जातो आणि तोर्यंत ऑनलाईनसुद्धा ते 4 रुम्स अवेलेबल असं दाखवत असतं. याच वेळी जर ते आपणही बूक केलं तर ते क्रॉसबूकिंग होतं. ते रुम्स आपल्याया मिळत नाही. 


असो आम्ही बॅगा उचलल्या आणि दुसऱ्या हॉटेलकडे निघलो. हे जरा लांब होतं. तिथे पोहोचलो आणि तिथेही असंच घडलं. आमची पुन्हा क्रॉसबूकिंग झाली. लग्नाचा सिझन असल्यानं अनेक हॉटेल्स फूल होते. आता आमच्या मुंबई ऑफिसने तिसरं हॉटेल बूक केलं. संभाजीनगरमधील काही टॉप हॉटेल्स पैकी एक इथे जाताना धाकधूकच होत होती, पण देव पावला इथे आमची सोय झाली. हॉटेल इतकं मोठं होतं की रिसेप्शन पासून रुममध्ये जाईपर्यंत जेवण हजम व्हायचं. पण भारी होतं..आम्ही सुद्धा दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात होतो त्यामुळे थोडी मजा करायची ठरवलं. रुममध्ये गेलो...कपडे चेंज केले आणि थेट खाली जाऊन स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या. दिवसभाराचा थकवा एकाक्षणात गायब!


पोहून झाल्यावर आम्ही जेवायला बाहेर पडलो. चूल आणि लोकसेवा झालं होतं त्यामुळे गाडी काळे बंधूला थांबवली. मी आधी म्हटल्याप्रमाणे शेवग्याच्या शेंगा मी बघून सुद्धा घ्यायचो नाही, पण दुपारीच मी प्रेमात पडलो होतो त्यामुळे रात्री सुद्धा शेवगा मसालाच ऑर्डर केला. महत्वाचं म्हणजे, काळे बंधूला आम्ही शेवगा सूप प्यायलो. चिकन अळणीला फेल करणारा पदार्थ होता. रात्री 12 च्या सुमारास पुन्हा हॉटेलवर आलो. सकाळी  उठून परभणी गाठायचं होतं त्यामुळे सगळेच लवकर झोपले. 


पुढची कहाणी... भाग 08 मध्ये


याच लेखकाचा हा ब्लॉग वाचा :


BLOG : नाही नाही म्हणत जरांगे तयार झालेच! जय-वीरू : पडद्यामागची कहाणी भाग - 6


काळाकुट्ट अंधार आणि टायर पंक्चर! जय-वीरू : पडद्यामागची कहाणी भाग - 2