BLOG : देशात 80-90 च्या दशकात काँग्रेस सर्व शक्तिमान होती. निवडणुका कशा जिंकायच्या हे माहिती असलेली अनुभवी नेते मंडळी काँग्रेसमध्ये खच्चून भरलेली होती. स्वातंत्र्य लढ्याचा, गांधी-नेहरू या नावांचा त्यांना वारसा होता. गरीबी हटाव ही घोषणा होती आणि एकविसाव्या शतकात उपयुक्त ठरतील असे कॉम्प्युटर क्रांतीचे कार्यक्रमही होते. नव्या भारताचं स्वप्न बघणारं युवा नेतृत्व सुद्धा होतं.
जातीचं, धर्माचं, मुस्लिम वोट बँकेचं, गणित चपखल बसलं होतं, वारंवार टेस्टेड आणि प्रुव्हन ओके होतं. आपल्याला कोणी टक्कर देऊ शकत नाही या भ्रमात ते होते. त्यामुळेच भाजपने रामजन्मभूमीचा मुद्दा हाती घेतला तेव्हा राम मंदिराचा विषय फक्त राजकीय आहे हे समजण्याची चूक काँग्रेसने केली. मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात तसे हिंदू कधी एक गठ्ठा मतदान करणारच नाहीत असा विश्वास काँग्रेस, डावे, जनता दल, सपा, बसपासह इतर पक्षांना होता.
राम मंदिरासाठी किंवा इतर कोणत्या कारणाने हिंदू एकत्र आला तरी त्याला जातीपातीत विभागणं सहज शक्य आहे हा विश्वास सुद्धा होता आणि तो विश्वास वृथा नव्हता. राजकीय दृष्ट्या भाजपला जवळजवळ अस्पृश्य बनवलं होतं, वाळीत टाकलं होतं अशी खंत वाजपेयींनी बोलून दाखवली होती. त्यामुळेच रामजन्मभूमीच्या मुद्दा संघ परिवार, विहिंप, बजरंग दलाने उचलला तेव्हा नाकं मुरडली गेली, कोर्ट कचेऱ्यांच्या चक्रव्यूहात अडकवला गेला. राजकीय फ्रंटवर भाजपने मुद्दा हाती घेतला तरीही इतर पक्ष फटकूनच राहिले.
राम हा काल्पनिक आहे, रामायण हे फक्त महाकाव्य आहे अशी मल्लिनाथीही काँग्रेससह अनेक नेत्यांनी केली. त्याला बहुजन-अभिजन असा वादाचा रंग देण्याचाही प्रयत्न झाला. एवढंच नाही तर अगदी कोर्टाच्या दरबारात रामाचं अस्तित्व मानण्यास नकार देत, श्रद्धेचे, आस्थेचे पुरावे मागितले गेले.. रामभक्तांच्या भावनांची खिल्ली उडवली गेली, हेटाळणी केली गेली. कुणी म्हणालं मंदिरापेक्षा शौचालय महत्वाचं. कुणी म्हणालं मंदिराऐवजी त्या जागेवर दवाखाना उभारा. कुणी थेट कौसल्या मातेवरच खालच्या पातळीवर टीका करण्यापर्यंत घसरलं. मुस्लिम मतांसाठी लांगुलचालन आणि हिंदूंना सर्वधर्मसमभावाची गोळी हे सगळं अनेक दशकं सुरु होतं. अगदी काही वर्ष आधीपर्यंत हा प्रकार सुरु होता.
हा सगळा प्रकार सामान्य मतदार, सामान्य राम भक्त, सामान्य हिंदू, रामकृष्ण-शिवपार्वतीच्या- शिवशंभूच्या, शिवरायाच्या कथा ऐकत लहानाचं मोठं झालेले आबाल वृद्ध, श्रद्धाळू महिला वर्ग, माताभगिनी शांतपणे पाहात होता. त्याने वेळ घेतला पण वेळ येताच आपलं निर्णायक मत दिलं आणि मोदींना मोठ्या बहुमताने निवडून आले. मोदींनी सुद्धा unapologetic हिंदू छबी जपत त्या सामान्य मतदारांचा विश्वास सार्थ ठरवला. हिंदू हिताचे वाटणारे पण प्रत्यक्षात देशहिताचे काही निर्णय घेणं आणि ते ठामपणे राबवणे सुरु केलं. त्यातील एक म्हणजे रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारणं सुरु केलं.
या सगळ्या आंदोलनाचा फायदा भाजपला झाला हे कोणीही अमान्य करणार नाही. इतर पक्ष सॉफ्ट हिंदुत्वावर उतरले तोवर उशीर झाला होता. भारतीय समाजमनातील रामाचं महत्वं वेळीच ओळखलं असतं तर कदाचित इतर पक्षांनाही राम मंदिराचं थोडंफार श्रेय घेता आलं असतं. सामान्य मतदारांचा विश्वास मिळवता आला असता.
जुन्या अनुभवातून अजुनही भाजप विरोधकांनी धडा घेतला आहे असं दिसत नाही. आजही राम मंदिराला फक्त भाजपचा कार्यक्रम म्हणून मोदी विरोधक, भाजप विरोधक बघत आहेत. मोदींना, भाजपला विरोध करण्याच्या नादात आपण कोट्यवधी लोकांच्या, सामान्य जनतेच्या भावनेला, आस्थेला, श्रद्धेला तर विरोध करत नाहीयत ना याचा विचार भाजपविरोधक अजूनही करायत असं दिसतं नाही. ही चूकीची पुनरावृत्ती सुद्धा त्यांना महागात पडू शकते.
राम मंदिराच्या रुपाने भाजपने आपल्या जाहीरनाम्यातील आणखी एक महत्वाचं आश्वासन पूर्ण केलं आहे. त्यामुळे विरोधकांना खिजवण्याच्या नादात अतिउत्साहात न जाता रामाला आवडेल असं वर्तन ठेवत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करणं गरजेचं आहे. राम सर्वांचा आहे याचं भान प्रत्येक पातळीवर राखणं गरजेचं आहे.
या निमित्ताने एक प्रसिद्ध किस्सा आठवतो, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे जुने सहकारी, मित्र. दोघांची मैत्री 30-35 वर्षांची. आज जो मजबूत भाजप दिसतोय त्याचा भक्कम पाया रचण्यात या दोघांचा मोठा वाटा. अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरु केली, त्याने भारतातलं सामाजिक, राजकीय वातावरण पूर्ण भारुन, बदलून गेलं होतं. या वादळाला दिशा बदलायला वेळ लागणार नाही याची जाण वाजपेयी सारख्या अनुभवी जाणत्या नेत्याला होती.
त्यावेळी वाजपेयींनी अडवाणींना एक सल्ला दिला होता. 'ध्यान रखिये आप अयोध्या जा रहे है.. लंका नही..' हे वाक्य प्रत्येक राम भक्तानं, प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने, प्रत्येक भारतीयानं आजच्या घडीला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
ध्यान रखिये आप अयोध्या जा रहे है.. लंका नही...