BLOG : हेमा कमिटीचा अहवाल सार्वजनिक कधी करणार? हा एकच सवाल केरळातल्या फिल्म सर्किटमध्ये सध्या विचारला जातोय. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत महिलांचं होणारे लैंगिक शौषण यासंदर्भात 2017 ला हेमा कमिटी स्थापन करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी या कमिटीनं आपला रिपोर्ट मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना सादर केला. पण अजूनही तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यावरून आता केरळातल्या फिल्म इंडस्ट्रीत मोठं वादळ आलंय. अनेक आघाडीच्या अभिनेत्री आता पुढे आल्यात. त्यांनी झालेल्या लैंगिक छळाला सोशल मीडिया, टेलिव्हिजन डिबेटवरुन वाचा फोडलीय. कमिटीचे सदस्यही माध्यमामध्ये आपलं मत व्यक्त करतायत. यामुळं वातावरण आणखी तापलंय.
रिटायर जस्टीस के हेमा यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन झाली होती. निवृत्त प्रशासकीय अधिकारी के बी वलसारा कुमारी आणि अभिनेत्री शारदा हे देखील या त्री-सदस्यीय कमिटीत होत्या. त्यांनी तीन वर्षांमध्ये केरळ फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्री, साइड एक्ट्रेस, मॉब आर्टीस्ट, महिला टेक्निशियन अशा बऱ्याच जणींच्या इन कॅमेरा मुलाखती घेतल्या. सर्वात जास्त फोकस हा अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणावर होता. या कमिटीच्या रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे झालेत. जवळपास 300 पानांच्या रिपोर्टमध्ये अनेक लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख आहे. शिवाय महिलांना शुटींग स्थळी वेगळं चेंजिंग रूम आणि बाथरुमची व्यवस्था या सारख्या अनेक शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केलं गेलं.
एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत के हेमा यांनी या रिपोर्टचा उल्लेख केला. मल्याळम सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा लैंगिक छळ होतोय ही गोष्ट आता नवीन नाहीय. या विरोधात अनेकींनी आवाज उठवला आहे. ही बाब ही त्यांनी नोंदवली आहे. आता या रिपोर्टसंदर्भात सोशल मीडियावर खल सुरू झालाय.
भावना मेनन या मल्याळम अभिनेत्रीनं आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला इन्टापोस्टनं वाट करुन दिली. तिचा अनुभव भयंकर होता. जुलै 2017 मध्ये घडलेल्या त्या घटनेनंतर ती प्रचंड दहशतीखाली होती. चार जणांनी गाडीतच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याचं व्हिडियो रेकॉर्डींग ही केलं. आणि ती जुमानत नाही महटल्यावर तिला धावत्या गाडीतून फेकून दिलं. आघाडीचा मल्याळम अभिनेता दिलीपला या प्रकरणी अटक झाली आणि त्यानंतर जामीन ही मिळाला. या घटनेनंतरच जस्टिस हेमा कमिटीची स्थापना झाली होती. पण अजूनही तिला न्याय मिळालेला नाही. ती आपल्या इन्स्टापोस्टमध्ये लिहते 'माझ्यावर झालेल्या अत्याचारात माझं नाव, माझं जगणं दबलं होतं. मी गुन्हा केलेला नसताना मी अपमानित झाले, शांत झाले आणि स्वत:ला विलग केलं. पण मी नंतर आवाज उठवला, पण आता अनेक जणी पुढे येतायत. मला माहितेय अन्यायाविरोधातल्या या लढाईत मी एकटी नाही. गुन्हा करणाऱ्याविरोधात मी उभी राहिल या प्रक्रियेत माझ्यासोबत राहणाऱ्या प्रत्येकाचे आभार.'
करीब करीब सिंगलची अभिनेत्री पार्वती थिरुवोथु हीनं आपला अनुभव सांगितला. नुकत्याच एका न्यूज डिबेटमध्ये तिनं आपबिती सांगितली. अर्थात नावं घेतली नाही, पण इंडस्ट्रीत हे कॉमन आहे आणि गुन्हेगारांवर नक्कीच कारवाई व्हायला हवी असं मत तिनं मांडलं. सेक्स रॅकेट मल्याळम सिनेक्षेत्रात घडतंय आणि त्याकडे दुर्लक्ष होतंय. हा मुद्दा तिनं उचलून धरला.
मल्याळम सिनेमातला आघाडीचा दिग्दर्शक सनल कुमार ससीधरनं सांगितलेला किस्सा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. त्यानं इन्टापोस्ट लिहलेय. फेब्रुवारी 2017 ला रॉटर्डम आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याच्या 'सेक्सी दुर्गा' सिनेमाचा वर्ल्ड प्रिमियर झाला. स्क्रिनिंग संपल्यानंतर प्रेक्षकांमधून सनलला थेट मल्याळम भाषेत प्रश्न आला. 'देवाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळात या सिनेमातले प्रसंग कधी घडतील का?' सनलनं त्याचं उत्तर दिलं, 'जगात जिथं जिथं पितृसत्ताक समाज आहे, तिथं स्त्रीयांच्या बाबतीत अशा घटना घडू शकतात'. सनल म्हणतो 'भावना मेननच्या बाबतीत जे घडलंय ते भयंकर आहे. गेली पाच वर्षे ती आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात झगडतेय. खालच्या कोर्टातून उच्च न्यायालयात धावतेय. पक्षपाताविरोधात आवाज उठवतेय. न्याय मिळत नाही म्हणून वकिल बदलतायत. भावनाच्या दिग्दर्शक मित्रानं आरोपी अभिनेत्याविरोधात सर्व पुरावे, त्यानं गाडीत केलेलं रेकॉर्डींग सर्व पुरवलंय. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या कार्यालयात हे पुरावे पोचलेत. शिवाय आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यानं म्हटलंय. पण जो वर टीव्ही चॅनलमध्ये बातमी आली नाही तोवर त्यावर चर्चाच घडली नाही. या सर्व प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा अशी त्यांची मागणी आहे. ही एका सेलिब्रेटी अभिनेत्रीची अवस्था असेल तर केरळातल्या सर्वसामान्य महिलेचं काय होत असेल, तिला कसा न्याय मिळेल?'
नव्या घडामोडींनंतर केरळातल्या सिनेक्षेत्रात खळबळ उडालेय. केरळा चलचित्र अकादमीनं यावर निषेधाचा सुर काढलाय. हे सर्व घडत असताना सरकारनं हेमा कमिटी रिपोर्ट पब्लिक करायला हवा. यातल्या अनेक शिफारसींचं पालन व्हायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारनं गुन्हेगारांना शिक्षा मिळेल असं न्यायाचं काम करायला हवं असा आवाज उठू लागलाय. मुळात मुद्दा हा आहे की रिपोर्ट का पब्लिक केला जात. हा क्लोज रिपोर्ट असला तरी त्याच्याशी संबंधित अभिनेत्री आणि सर्व घटकांना त्याची माहिती द्यायला हवी, असं मत केरळा चलचित्र अकादमीच्या व्हाईस प्रेसिडेंट बिना पॉल यांनी म्हटलंय. केरळातले फिल्म एक्टिविस्ट व्हि के जोसेफ म्हणतात हे एक गंभीर प्रकरण आहे. त्यावर चर्चा व्हायलाच हवी. आता वातावरण पुन्हा तापलेलं असताना ती फक्त माध्यमातली चर्चा राहू नये, तर दोषींवर कारवाई व्हावी त्साठी आता सरकारवर दबाब आणला जात आहे.