Ganesh Chaturthi 2023 : अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणार्‍या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्‍या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्‍या दिवशी विसर्जन करतात.


पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.


असे करतात हे पूजन


हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.


गणपती घरात असतानाच गौरी येत असतात. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीपूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असे हे तीन दिवसांचे व्रत आहे. गणपती पक्का शाकाहारी त्यामुळे मातोश्रींना जरी मांसाहार चालत असला तरी तो मुलाच्या म्हणजे गणपतीच्या दृष्टीस पडू नये म्हणून गौरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखविताना मध्ये पडदा धरण्याची प्रथा आहे. आपण देवावर आपल्या भावभावना लादतो, देवही आपल्यासारखाच आहे अशी समजूत बाळगतो. गणपतीसारखा त्रिखंडमान्य महान् ब्रह्मदेवता पुत्र असला तरी मातेला ‘तिखट’ खाण्याची इच्छा होते. ती इच्छा भक्तमंडळी पुरवितात आणि तरी पुरवीत असताना मातेचा आहार मुलाच्या नजरेला पडू नये म्हणून सावधगिरी बाळगतात.


गौरी पूजनाची प्रथा : 


हे गौरीपूजन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. त्यात विविधता कितीॽ गौरीचा चांदीचा वा पितळेचा मुखवटा असतो तो मुखवटा घालून गौरी सजवितात. नंतर ह्या गौरीला दागदागिने घालून नटविले जाते. काही ठिकाणी कागदावर गौरीचे चित्र काढून ते पूजतात. तर काही गावात नदीकाठचे पाच खडे आणून ते गौरी म्हणून पूजले जातात. तर कुठे मातीची लहान पाच मडकी आणून त्या मडक्यात हळद लावलेला दोरा, खारीक आणि खोबरे घालून त्या मडक्यांची उतरंड गौरी म्हणून पूजतात. काही लोकांत कुमारिका वासाची फुले येणाऱ्या लहान झाडाची मूठभर रोपे काढून आणतात, त्याच गौरी. घरातील प्रत्येक खोलीत ती कुमारिका ह्या गौरी घेऊन जाते.


घरातील पोक्त मालकीण तिला प्रत्येक खोलीत विचारते, गौरी गौरी कुठे आलातॽ तुम्हाला इथे काय दिसतेॽ मग ती कुमारिका ऐश्र्वर्यसूचक असे बोलते, अशी प्रथा आहे. कोकणात काही ठिकाणी तेरडयाची रोपे गौरी म्हणून गौरवितात. गौरी विसर्जनाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी मूळनक्षत्र असेल त्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते. बहुधा गणपती बाप्पा गौरीबरोबरच जातात. सार्वजनिक उत्सवाचा गणपती हा अनंत चतुर्दशीपर्यंत राहतो. घरोघरचे गणपती हे त्या त्या घरी चालणाऱ्या परंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस असे असतात. काही उत्साही लोक तर गणपती एकवीस दिवस वा बेचाळीस दिवसही ठेवतात. पण मग तो रोजचा पाहुणा झाला की नाही म्हटले तरी त्याच्याकडे थोडेफार दुर्लक्ष होतेच.


गौरी आणि गणपती जेव्हा एकाच वेळी घरात असतात तेंव्हा तो आनंद आगळावेगळाच आणि गौरीच्या आगमनाचे, पूजेचे, विसर्जनाचे असे तीनही दिवस धर्मशास्त्राने निश्चित करुन दिलेले असल्यामुळे गौरी मात्र ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात. आज येते, उद्याचा दिवस राहते आणि तिसऱ्या दिवशी विसर्जनासाठी निघते. गणपती हा गोडाचा भोक्ता. त्याच्यासाठी गोडाचा नैवेद्य रोज करावा लागतो; पण रोज रोज गोड खाऊन मध्येच तिखट खाण्याची इच्छा झाली तर तीही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गौरीच्या निमित्ताने भक्तमंडळींनी जशी काही आपलीच सोय करुन घेतली आहे. बाबा पद्मजींनी हिंदूचे सण आणि उत्सव याबद्दल लिहिताना गौरीचा उल्लेख ‘गणोबाची आई’ म्हणून केला आहे. ही गणोबाची आई महाराष्ट्राच्या सर्व सामाजिक स्तरात चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे आपल्या मुलावर आणि मुलाच्या भक्तांवरही विशेष प्रेम आहे.