BLOG : आज काँग्रेस पक्ष एका स्थित्यांतरातून जात आहे. देशात विचार स्वातंत्र्याची गळपेची होती आहे. 136 वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेला काँग्रेस पक्ष पुन्हा संविधानिक मार्गाने झगडतो आहे. यापूर्वीही काँग्रेससमोर संकटं आलं नाहीत असं नाही. पण काँग्रेसने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घेतली. आज काँग्रेस अनेक संकटांना सामोरं जाताना दिसत आहे. राहुल गांधींना तरुणांची साथ मिळत आहेत. काहीच महिन्यांपूर्वी तरुण रणझुंजार नेता कन्हैया कुमारने राहुल गांधींचा 'हात' धरला आहे. हार्दिक पटेल सध्या गुजरात काँग्रेसचं महत्त्वाचं पद सांभाळत आहे. काहीच दिवसांत जिग्नेश मेवानी काँग्रेसचं काम सुरु करतील.


कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल या तीन तरुण नेत्यांचा काँग्रेस पक्ष कसा उपयोग करुन घेतो, त्यांना किती ताकद देतो, भाजप विरोधातल्या त्यांच्या आवाजाला किती बुलंद करतो, हे ही महत्त्वाचं ठरणार आहे.


पक्षातील भलेभले दिग्गज नेते आज भाजप विरोधात बोलायला तयार नाहीत. कारण त्यांना भीती आहे, ती ईडी-इन्कम टॅक्स-सीबीआयच्या धाडींची आणि चौकशीच्या ससेमिऱ्यांची...!  याला पी चिदंबरम यांच्यासारखे काही नेते अपवादही आहेत म्हणा...!


स्वातंत्र्याच्या आंदोलनात हिंदूंबरोबर मुसलमान आणि शिखांनीही मोलाचं योगदान दिलं आहे. गेल्या 75 वर्षांत हा देश घडविण्यामध्ये सर्व भारतीयांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. स्वातंत्र्यानंतर जातीय दंगलींच्या काही घटना सोडल्यास हिंदू-मुसलमान गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. दरम्यानच्या काही वर्षांमध्ये हिंदू मुसलमानांमध्ये फुट पाडण्याचा काही संघटनांनी प्रयत्न केला. पण लोक गांधी-नेहरु-आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेऊन पुढे चालतात.


गांधी नेहरु घराण्याचा अलौकिक वारसा काँग्रेसकडे आहे. मोठेपणा मिरवण्याजोग्या अनेक गोष्टी त्यांच्या ठायी आहेत. पण काँग्रेस पक्ष त्याचं भांडवलं कधीच करत नाही. सोनिया-राहुल-प्रियांकाकडे नम्रभाव आहे. याची प्रचिती गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक नेत्यांना आली.


काँग्रेसचा पराभव होतोय तो कोणत्या ना कोणत्या नेत्यांच्यामुळे होतोय. कारण यापूर्वी राहुल गांधी यांनी पाच राज्यात सत्ता खेचून आणलीच होती. मात्र, पक्षातील बंडाळीमुळे काँग्रेसला जोरदार फटका बसला. 


काँग्रेसच्या एका अधिवेशनात काँग्रेस पक्षाचं महत्त्व अधोरेखित करताना तसंच ऐतिहासिक महत्त्व सांगताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलेलं भाषण खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, "काँग्रेस काही बर्फाचा गोळा नाहीय, जो उन्हात पिघळून जाईल. काँग्रेसजवळ महात्मा गांधींचं सत्य आहे, जवाहरलाल नेहरुंची ज्वाळा आहे, राजीव आणि इंदिरा गांधींचा त्याग, त्यांचं सांडलेलं रक्त आहे."


काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, नेत्याशी बोलल्यानंतर ते एकच आशा बोलून दाखवतायत, 


है अंधेरा बहोत, अब सूरज निकलना चाहिए,
जैसे भी हो, ये सूरत बदलनी चाहिए!
जो चेहरे रोज बदलतें हैं नकाबों कि तरह,
अब जनाजा धूम की तरह उनका निकलना चाहिए!!