India vs Pakistan : विश्वचषकाच्या मैदानात भारत विरुद्ध पाक 8-0. वर्ल्डकपमधली ही स्कोरलाईन भारताच्या पाकवरील निर्विवाद वर्चस्वाचं दर्शन घडवणारी. अहमदाबादच्या स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या मेन इन ब्ल्यूनी बाबरच्या पाकिस्तान टीमला चिरडून टाकलं. एक लाखांहून अधिक क्रिकेटचाहते टीम इंडियाची जर्सी घालून सामन्याचा आनंद घेत होते. त्या निळ्याशार समुद्रात पाकिस्तानचं जहाज भरकटलं आणि बुडालंदेखील.
टॉस जिंकून रोहितने प्रथम गोलंदाजी स्वीकारली तेव्हा थोडीशी धास्ती वाटली, पण ती तुम्हा आम्हाला. ती धास्ती रोहितला अजिबात नव्हती. कारण भारतीय संघाच्या कामगिरीचा रोहितला पूर्ण विश्वास होता. त्याच्या साथीदारांनी हा विश्वास कामगिरीत रुपांतरित केला. पाकच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात करत हातपाय पसरायला सुरुवात केली होती. त्याच वेळी खास करुन सिराजवर त्यांनी हल्ला चढवला. दुसरीकडून बुमरा टिच्चून मारा करत होता. तो दुखातीतून कमबॅक करतोय, असं अजिबात वाटलं नाही.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यावर क्लासी बॅट्समन बाबर आणि धोकादायक रिझवान यांची जोडी जमली तेव्हा 270 प्लसचं टार्गेट दिसू लागलेलं. रोहितनेही पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये ते बोलून दाखवलं. पण भारतीय गोलंदाजांच्या मनात काही औरच होतं. सिराजने बाबरचा स्पीडब्रेकर दूर केला आणि भारताच्या विजयाची फेरारी जणू तिथूनच सुसाट निघाली. बुमराने रिझवानला स्लोअरवनवर फसवलं. याचा बुमराने खास उल्लेख प्रेझेंटेशनमध्ये केला. तो म्हणाला, जडेजाचे चेंडू वळत होते, तेव्हाच स्लोअरवनचा वापर प्रभावी होऊ शकतो, हे मी ओळखलेलं.
खेळपट्टीवर चेंडू थोडा स्लो येत होता, टर्न होत होता. त्याचवेळी फास्ट बॉलरसाठी त्यामध्ये फार मदत नव्हती. अशा वेळी तुमचं व्हेरिएशन तुमचं महत्त्वाचं अस्त्र ठरतं, बनतं. वैविध्याची जी ताकद बुमराने दाखवली. तीच कुलदीपनेदेखील. त्याचा चायनमन आणि दुसऱ्या बाजूने निघणारा चेंडूदेखील त्याने प्रभावीपणे वापरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचप्रमाणेच इथेही मधल्या ओव्हर्समध्ये आपण सामन्यावरची पकड सुटू दिली नाही. म्हणजे पाहा ना ,10 ते 40 ओव्हर्सचा पॅच हा फार ट्रिकी असतो. तिथे मॅचची ग्रिप सुटण्याची भीती असते. नेमक्या त्याच टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी खास करुन स्पिनर्सनी पाकच्या फलंदाजीला वेसण घातली. बाबर-रिझवान सेट झाले होते, तरी त्यांना आपण धावांची लूटमार करु दिली नाही. ज्यामुळे दुसऱ्या एन्डने गोलंदाजी करणाऱ्या फास्ट बॉलर्सना विकेट मिळण्यास मदत झाली. 10 षटकांत एक बाद 49 ते 40 षटकांत आठ बाद 187 असा ब्रेक पाकला लागला त्याचं मुख्य श्रेय फिरकीपटूंचं आहे.
अर्थात भारताच्या प्रत्येक बॉलरची यामध्ये साथ लाभली. त्या प्रत्येकाने धावांचा दरवाजा लावून घेण्यात मोलाची भूमिका बजावली आणि तिथेच पाकिस्तानी फलंदाजीचा श्वास कोंडला. मग दोन बाद १५५ वरुन ते सर्वबाद १९१ असे ते पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. म्हणजे 36 धावांत 8 विकेट्स. हायलाईट्सही मोठ्या वाटाव्यात, तशा अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या आठ विकेट्स गेल्या. भारताची अर्धी मोहीम फत्ते झालेली. लक्ष्य छोटं असलं तरीही खेळपट्टीमध्ये असलेला टर्न, काहीवेळा लो बाऊन्स. यामुळे भारतीय फलंदाजीचा कस लागेल असं वाटत होतं. पण, शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूला रोहित शर्माने मनगटी नजाकतीने सीमापार धाडलं आणि भारताचे इरादे स्पष्ट केले.
शुभमन गिल दोन सामन्याच्या ब्रेकनंतर खेळत होता. त्याने 16 च धावा केल्या असतील पण ते चारही चौकार होते. तो बाद झाला तरीही दुसरीकडून रोहित शर्माची बुलेट ट्रेन वेगात निघालेली. आफ्रिदी, रौफ असे कोणतेही सिग्नल या ट्रेनने जुमानले नाहीत. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीवर तो जसा स्वार झाला होता, त्याचंच कंटिन्यूएशन वाटलं. पाकिस्तानची गोलंदाजी इतकी निष्प्रभ नाही. हे क्रेडिट रोहितचं आहे की, त्याने तिला बोथट ठरवलं. त्याच्या 63 चेंडूंमधील 86 धावांमध्ये होते तब्बल सहा चौकार, सहा षटकार. म्हणजे 60 धावा चौकार-षटकारांमधून त्याने वसूल केल्या. धोकादायक ठरु शकणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजीची त्याने लूट केली. ही लूट प्रेक्षणीय होती. कधी डोळ्यांचं पारणं फेडणारे दर्जेदार चौकार होते, तर कधी स्टेडियमच्या स्टँडची सैर करणारे टोलेजंग षटकार होते.
आधीच आव्हान तुटपुंजं, त्यात रोहितचा आक्रमक आवेश. पाकिस्तानने एव्हाना गुडघे टेकले होते. रोहित बाद झाल्यावर श्रेयस अय्यरने आपल्या नावावर एक अर्धशतक जमा करत राहुलच्या साथीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारताचा हा परफॉर्मन्स मोठा अशासाठी आहे की, पाकिस्तान या सामन्यात दोन विजय खिशात घेऊन आला होता. त्यातला एक विजय 345 चं लक्ष्य गाठत त्यांनी साजरा केलेला. इथे मात्र त्यांच्या खिशाला भारताने भगदाड पाडलं आणि त्यांना शरणागती पत्करावी लागली. त्यांना ती पत्करायला लावणाऱ्या रोहित शर्मा आणि टीमचं म्हणूनच खास कौतुक.
आणखी सात सामने शिल्लक आहेत. त्यात इंग्लंड, न्यूझीलंड आणि सामन्यागणिक धोकादायक होत जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेशी गाठ आहे. आपल्यासाठी समाधानाची बाब ही आहे की, आपली बेंच स्ट्रेंथही फॉर्मात आहे. अश्विन, इशान किशन, शमी, सूर्यकुमार यादव कधीही अंतिम अकरामध्ये येऊन कामगिरी बजावू शकतात. सामन्यागणिक आपण ट्रॉफीकडे कूच करतोय. आता हीच लय कायम राखायचीय. दसऱ्याआधीच दिवाळी झाली. गरबाही झाला. पाकचा बँड आपण वाजवलाय. पण, ही क्रिकेट मैफल अशीच रंगत राहू दे. रोहितसेनेला इतकंच सांगूया. जितते रहो.. ट्रॉफी की ओर बढते रहो..