मोगॅम्बो खुश हुआ... खूश असल्यावरही आपल्याला या आवाजानं आजही धडकी भरते. मोगॅम्बोसारखा विलन बॉलिवुडमध्ये परत झालाच नाही. मोगॅम्बो हा तसा विनोदी, मनोवैज्ञानिक फॅसिस्ट खलनायक होता. लहान मुलांच्या चित्रकथेतल्या राक्षसारखा हा मोगॅम्बो दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या कल्पनेतून आला. सोनेरी केस. काळ्या आणि सोनेरी एम्ब्रायडरीचं जॅकेट घालून सोन्याच्या सिंहासनावर बसलेला मोगॅम्बो दगडासारख्या चेहऱ्यावर गालात हसून बोलतो.. मोगॅम्बो खुश हुआ..
या मोगॅम्बोला आपण विसरूच शकत नाही. आपण अमरीश पुरी यांना कधीच विसरू शकत नाही. मी. इंडियामधला मोगॅम्बो काढा, करण अर्जुन मधला ठाकूर दुर्जन सिंग काढा, राम लखन मधला कपटी काका बिश्वंभर काढा, नायक मधला अनिल कपुरला एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्यची ऑफर देणारा नेता सिनेमातून वगळून टाका एवढंच काय डीडीएलजेमधला सिमरनचा बाप नसता तर.... काय उरलं असतं सिनेमात. हा असा खलनायक होता ज्यामुळे अनेकांचं नायक म्हणून करीयर फळाला आलं..
उंच अंगकाठी, दमदार आवाज, गोल गोल फिरणारे रागीट डोळे, ओबडधोबड चेहऱ्यावरचा करारीपणा काय नव्हतं या माणसाकडे.. अमरीश पुरी यांच्या येण्यानं शोलेच्या गब्बरची हवा कमी झाली.. ती जागा मोगॅम्बोनं घेतली ती आजतागायत तशीच आहे.. म्हणूनच अमरीश म्हणायचे.. "मै सबसे ज्यादा लवेबल विलन हुँ।"
खुप कमी जणांना माहीत असेल की अमरीश पुरी यांना सुरूवातीच्या काळात कोणीही सिनेमात काम देत नव्हतं. अशावेळी 1967 साली त्यांना मराठी सिनेमात पहिल्यांदा काम मिळालं. 'शांतता! कोर्ट चालू आहे' या सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. 1971 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याआधी 1970 मध्ये त्यांचा प्रेम पुजारी हा हिंदी सिनेमा आला.. पण तांत्रिकदृष्ट्या त्यांना मोठ्या पडद्याची पहिली ऑफर दिली ती मराठी सिनेमानं..
सिनेमात काम मिळवण्यासाठी अमरीश भाईंनी केलेला स्ट्रगल कदाचीतच कोण्या अभिनेत्याला करावा लागला असेल. वयाच्या चाळीशीमध्ये त्यांना पहिला सिनेमा मिळाला आणि वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर प्रतिभेला साजेसे रोल त्यांना मिळाले.. पण अमरीश पुरी हे नाव जगाला परिचीत होण्याआधीचा कालखंड खुप मोठा होता..
22जून 1932 साली पंजाबमध्ये अमरीश पुरी यांचा जन्म झाला.. आपल्या मुलांनी सिनेमात काम करू नये अशी अमरीश पुरी यांच्या बाबांची इच्छा होती.. अमरीश पुरी यांचे भाऊ मदन पुरी यांनी सरकारी नोकरी सोडली आणि ते चित्रपटात काम मिळावं म्हणून मुंबईला निघून गेले.. अमरीश पुरी यांचे वडिल मात्र दुखावले गेले. आपल्या मुलांनी सरकारी नोकरीच करावी असं त्यांना वाटे.. त्याचं सर्वात मोठं कारण होते कुंदन लाल सेहगल... हिंदी सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार के.एल.सेहगल हे अमरीश पुरी यांच्या बाबांच्या सख्यातले होते.. कुंदनलाल सहगल यांचा सुवर्णकाळ त्यांनी पाहिला होता.. त्यानंतर उतरती कळा लागल्यावर दिवसरात्र दारू पिऊन अवघ्या 42 व्या वर्षी प्राण सोडलेले के.एल. सहगलही त्यांनी अगदी जवळून पाहिले होतेे. ते दुःख आपल्या मुलांच्या नशीबी नको हेच कारण होतं. अमरीश पुरी यांना सिनेमापासून लांंब ठेवण्याचं..
मोठे भाऊ मदन पुरी यांनी मुंबई गाठली, सिनेमात का सुरू केलं. मात्र 14वर्षाच्या अमरीश पुरी यांनी ठरवलं आता बाबांना दुखवायचं नाही. ते राष्ट्रीय स्वयंयेवक संघाच्या शाखेत जायला लागले. त्यावेळी त्यांची विचारधारा भिन्न आणि कट्टर होती. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात ते संघाच्या सर्व उपक्रमात भाग घेत. युवकांना सैनिकांसारखं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.. आपल्या आत्मकथेत ते लिहितात की, ‘बहुत ईमानदारी से कहूंगा कि मैं उनकी हिंदुत्व की विचारधारा की ओर आकर्षित हुआ था, जिसके अनुसार हम हिंदू हैं और हमें हिंदुस्तान की विदेशी शक्तियों से रक्षा करनी है. उन्हें निकाल बाहर करना है ताकि हम अपने देश पर शासन कर सकें. लेकिन, इसका धार्मिक कट्टरता से कोई सम्बंध नहीं था, यह मात्र देशभक्ति थी.’
पण 1948 साली गांधीहत्येनंतर अमरीश पुरी यांचे विचार बदलत गेले. संघाच्या सर्व कार्यामधून त्यांनी हळूहळू अंग काढून घेतलं. त्यानंतर त्यांनी फक्त आणि फक्त नाटकावर लक्ष केंद्रीत केलं.
1953 साली अमरीश पुरी मुंबईत आले. त्यांचे मोठे भाऊ मदन पुरी यांनी तोपर्यंत सिनेसृष्टीत मोठं नाव कमावलं होतं. पण अमरीश पुरी स्क्रीन टेस्टमध्ये अपात्र ठरवले जायचे. त्यांचं रंग रुप बघून त्यांना कोणी काम देत नव्हतं. फार दिवस भावाकडे ओझं नको म्हणून त्यांनी नोकरी करायला सुरूवात केली. कधीकाळी त्यांनी घरोघरी जाऊन माचिस विकली तर कधी कारकुनी कामं केली. त्यानंतर त्यांनी दीर्घकाळ कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी केली. इथेच अमरीश पुरी यांना त्यांची जीवनसंगिनी भेटली. कार्यालयात प्रेमसंबंध जुळले आणि वयाच्या 27व्या वर्षी त्यांचा विवाह मराठी कुटुंबातल्या उर्मिला दिवेकर यांच्याशी झाला. पण या संसारी जीवनात सिनेमाची ओढ त्यांची कायम होती.
काही वर्षांनी अमरीश पुरी यांची ओळख रंगमंचाचे सम्राट मानल्या जाणाऱ्या इब्राहिम अल्काझी यांच्याशी झाली. ज्या चेहऱ्याला बघून अनेकांनी नाकारलं त्या चेहऱ्याला पहिल्याच नजरेत रंगमंचाचे गुरू अल्काझी यांनी ओळखलं.. पहिलं इंग्रजी नाटक अमरीश पुरी यांना मिळालं.. सिनेमातलं करीयर सुरू होण्याच्या 10 वर्ष आधी त्यांना पहिलं नाटक मिळालं. त्यानंतर अमरीश पुरींची ओळख सत्यदेव दुबे यांच्याशी झाली. नाटकाचे नियम आवाजाचा उतारचढाव अंगअभिनय अशा अनेक गोष्टी सत्यदेव दुबेंनी अमरीश पुरी यांना शिकवल्या. 30 व्या वर्षी सरकारी नोकरी आणि संसार सांभाळून तितक्याच इमानदारीनं ते नाटकाला समर्पित होते.
रंगमंच्यावरच्या पहिल्या नाटकात मात्र अमरीश पुरी यांच्या अभिनयाची कसोटी लागली. धर्मवीर भारती यांच्या अंधा युग या नाटकात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली. अंंध व्यक्तीचा अभिनय असल्यानं त्यांना एकदाही पापणी मिटण्याची परवानगी नव्हती. तेव्हा रंगमंच हा उघडा असायचा त्यामुळे हवा आणि डास यांचा उच्छाद तर होताच पण अशा परिस्थितीत एकदाही पापणी न मिटता लांब संवाद त्यांनी लिलया पेलले. सत्यदेव दुबे सांगायचे की "महिलांमध्ये अभिनय शिकण्याची क्षमता अधिक असते. अमरीश थिएटरच्या जगात मला भेटलेली सर्वश्रेष्ठ महिला आहे.." अमरीश पुरी यांचा गुरूंनी केलेला हा सन्मान होता..
नाटकात भूमिका गाजत असल्या तरी रंग रूप बघणाऱ्या बॉलिवुडमध्ये अमरीश पुरी यांना संधी मिळत नव्हती.. 1970 मध्ये म्हणजे वयाच्या चाळीशीनंतर त्यांना रोल मिळू लागले मात्र त्यात फारसं काही करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पण अर्ध्या दशकानंतर समांतर सिनेमाचा काळ सुरू झाला पुणे एफटीआयआयसोबतच दिग्दर्शक शाम बेनेगल यांनी समांतर सिनेमाची चळवळ उभारली. रंगमंचावरच्या अनेक नवख्या तरूणांना संधी देण्यात आली. त्या गर्दीत अमरीश पुरी होते.
बेनेगल यांच्या निशांत, मंथन या सिनेमातून अमरीश पुरी यांच्या अभिनयाचा कस लागला तर गोविंद निहलानी यांच्या अर्धसत्य सिनेमात त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. इथूनच पुढे अमरीश पुरी पर्वाला सुरूवात झाली.
कमर्शियल चित्रपटात अमरीश पुरी यांची कारकीर्द खऱ्या अर्थानं सुरू झाली ती 1981 साली आलेल्या 'हम पाँच' या सिनेमानं. त्यानंतर आलेल्या 'विधाता' आणि 'हिरो' या चित्रपटांनी त्यांना खलनायक म्हणून ओळख दिली. प्राण यांच्यासारखा बंद गळ्याचा सूट घालून हंटर फिरवणारा खलनायक असो वा अमजद खानचा गब्बर असो सर्वांचं मार्केट डाऊन करून अमरीश पुरी यांचा खलनायकी काळ 80 च्या दशकात सुरू झाला.
अनेक खलनायक त्यावेळी स्पर्धेेत होते पण अमरीश पुरी यांच्यासोर एकही टिकला नाही. मिस्टर इंडिया मधल्या मोगॅम्बोनं अमरीश पुरी यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. ती अदाकारी बघून प्रेक्षकही म्हणायचे. "मोगॅम्बो खुश हुआ..."
अमरीश पुरी हा एक खलनायकी ब्रँड झाले होते. बॉलिवुड सोडा हॉलिवूडलाही अमरीश पुरींचं आकर्षण होतं. हॉलिवुडला मुंबईत आणलं ते अमरीश पुरी यांनीच. हॉलिवूडचे महान दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांना 'इण्डियाना जोंस अँड द टेम्पल ऑफ डूम' (1984) या सिनेमात अमरीश पुरी यांना घ्यायचं होतं. त्यामुळे स्क्रीनटेस्टसाठी अमेरिकेला या असं बोलावणं आलं. मात्र अमरीश पुरी यांनी अमेरिकेत जायला नकार दिला. तुम्हाला मी हवा असेल तर इथे भारतात येऊन स्क्रीनटेस्ट घ्या असं उत्तर अमरीश पुरी यांनी स्पिलबर्ग यांना दिलं. स्पिलबर्ग मुंबईत आले. स्क्रीनटेस्ट घेतली आणि तो रोल अमरीश पुरी यांना मिळाला. 'इण्डियाना जोंस एंड द टेम्पल ऑफ डूम' (1984) या सिनेमातला मोलाराम हॉलिवूडमध्येही गाजला. त्यानंतर त्यांना हॉलिवुडमधून अनेक ऑफर्स आल्या पण त्यांना देश सोडून काम करावंसं वाटलं नाही.
शाम बेनेगल, गोविंद निहलानी, शेखर कपूर, सुभाष घई, प्रियदर्शन, राकेश रोशन, राजकुमार संतोषी अशा अनेक प्रतिभासंपन्न दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. ज्या सीनमध्ये अमरीश पुरी असायचे तो सीन फक्त त्यांचा असायचा. मग समोर कितीही मोठा कलाकार असो, अमरीश पुरींसमोर करण्यासारखं त्याच्याकडे काही उरायचंच नाही..
80 आणि 90 च्या दशकात अमरीश पुरी यांचे एकामागोमाग अनेक हिट सिनेमे आले.. फूल और कांटे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, राम लखन, सौदागर, करण अर्जुन, घायल, गदर, दामिनी, आक्रोश, अर्द्धसत्य, भूमिका, चाची 420, घातक, हीरो, कोयला, मंथन, मेरी जंग, मि. इण्डिया, मुस्कराहट, नगीना, फूल और कांटे, राम लखन, ताल, त्रिदेव, विधाता अशी एक ना अनेक नाव घेता येतील.
काही सिनेमांमधला अमरीश पुरींचा खलनायक थरकाप तर उडवायचाच सोबत हसवूनही जायचा. तेहेलका मधला डाँग तुम्हाला आठवत असेलच.. "शोम शोम शामो शाशा" म्हणत आनंदाच्या भरात समोरच्याचे दोन तुकडे करून "गॉड राँग हो सकता है डाँग नहीं" असा डायलॉग बोलणारा खलनायक अंगावर काटा आणतो. पण या सिनेमातला त्याचा लूक बघून आपल्याला हसू आवरत नाही.
त्यानंतर सौदागरमधला चुनिया मामा. पुढे आलेले दोन दात, लांब केस. जेव्हा चुनिया मामा केसांना मिशांसारखं पिंजारतो तेव्हा समजून जायचं काहीतर वाईट घडणार आहे.
सलाखेंमधला लूक बघून तुम्ही लोटपोट झाले असाल. लांब केस, मोठा गॉगल त्यावर हसरा चेहरा, 90 च्या दशकातल्या हिरोईनसारखे केस आणि डिंपलवाली स्माईल... अमरीश पुरी म्हणजे अजबच रसायन होतं..
नगिनाचा भैरवनाथ बघा.. कपाळावर भलं मोठं भस्म, लांब केस, काळे कपडे घालणारा भैरव गालात हसून म्हणतो "आओ कभी हवेली पे.."
हातिमताई सिनेमातला लूकही तसाच कॉमिक.. हातात कवटी असलेली काठी, कपाळावर केसांची बट, कानावरच्या तशाच दोन बटा घेऊन पोपटात जीव अडकलेला अमरीश भाईंचा हा लूक कम्माल होता..
अमरीश पुरी यांचा अभिनय इतका प्रभावी होता की बायका त्यांचा अक्षरशः द्वेष करायच्या.. राम लखन मधला डोळ्यात सुरमा लावून पान चघळणारा कपटी बिश्वंभर असो किंवा 'करण अर्जुन'मधला ठाकूर दुर्जन सिंग.. लोकांना द्वेश वाटावा एवढा वाईट हा माणूस मोठ्या पडद्यावर वावरत होता.. दिलजलेमध्ये मडकं वाजवणारे अमरीश पुरी "आतंकवादी की कोई प्रेम कहानी नही होती" असा डायलॉग बोलतात तेव्हा वाटतं किती निर्दयी असावा हा माणूस.. पण नाही, ते खुप प्रेमळ होते..
खऱ्या आयुष्यात ते अत्यंत सहृदयी होते. त्यांच्या मुलांचे मित्र घरी यायला घाबरायचे.. पण हळूहळू त्यांच्याविषयीची भीती कमी होत गेली.. तितकेच ते धार्मिकही होते.. ऐकून आश्चर्य वाटेल पण अमरीश पुरी हे आसारामच्या सत्संगात नेहमी जात. पण आसारामनं अमरीश पुरींचं पडद्यावरचं काम प्रत्यक्षात केलं आणि आता जेलमध्ये आहे. यातला विनोदाचा भाग सोडा पण अमरीश पुरी एक परीपूर्ण कौटुंबिक व्यक्ती होते..
फक्त खलनायकच नाही तर काही सकारात्मक भूमिकाही त्यांच्या गाजल्या. मुस्कुराहट सिनेमातला न्यायाधीश बघून तर सिनेमा संपेपर्यंत लोक हसत होते.. घातक सिनेमातला दुर्धर आजारान ग्रस्त बाप आपल्या डोळ्यात टचकन पाणीही आणतो. परदेस मधला संयमी बापही तसाच..
सनी देओसलसोबत त्यांनी बऱ्याच सिनेमात काम केलं. अतीहावभाव, समोरच्या खलनायकाला कापरं सुटेल असा ओरडणारा सनी जेव्हा गदरमध्ये हापशी उपसण्याची करामत करतो.. तेव्हा समोर उभा असलेला अश्रफ अली (अमरीश पुरी) त्याला रोखू शकतील एवढी आग त्यांच्या डोळ्यात आणतात.. गदरमधली त्यांची एका प्रेमळ पित्यासोबतच एका कट्टर धार्मिक राष्ट्राच्या नेत्याची भूमिका सगळ्यांच्याच स्मरणात आहे.
70 ते 21 व्या शतकापर्यंत सर्व खान मंडळींसोबत काम करणाऱ्या अमरीश पुरी यांनी आमीर खानसोबत मात्र कधीच काम कलं नाही. किंवा आमीर खाननं त्यांच्यासोबत केलं नाही असंही म्हणू शकतो.
अमरीश पुरी आणि आमीर खान यांनी एकत्र काम न करण्यामागे एक किस्सा आहे. त्याचं झालं असं की आमीर खानचे काका नासीर हुसैन दिग्दर्शक होते. 1985 साली 'जबरदस्त' या सिनेमाचं ते शूटिंग करत होते. आमीर खान या सिनेमाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहात असल्यानं एका अॅक्शन सीनमध्ये ते अमरीश पुरींना सजेशन्स द्यायला लागले. त्यावर अमरीश पुरी यांचा पारा चढला. त्यांना वाटला आमीर हा कोणीतरी इंटर्न आहे किंवा शिकाऊ मुलगा आहे. त्यानं सीन समजावून सांगणं अमरीश पुरींना पटलं नाही.. त्यांनी आमीर खानचा सेटवर सर्व कलाकारांसमोर पाणउतारा केला. मोठा गोंधळ झाल्यानं दिग्दर्शक नासीर यांनी अमरीश पुरींना समजाऊन सांगितलं की तो माझा पुतण्या आहे. आणि सध्या दिग्दर्शनाचे बारकावे शिकतोय.. राग शांत झाल्यावर अमरीश पुरींनी आमीर खानची माफीही मागितली.. पण त्यानंतर हे दोघे एकाही चित्रपटात दिसले नाही. ( दामिनी चित्रपटात आमीर खान पाहुणा कलाकार होता. मानला तर तो अपवाद)
अमरीश पुरी फार प्रसिद्धीमाध्यमांसमोर आले नाही. तसंच मुलाखतीत ते आपला आवाज रेकॉर्ड करू देत नसत. त्यांच्या भाषेत सांगायचं तर "इंटरव्यू चाहिए तो आओ कभी हवेली पर"
अमरीश पुरी यांनी 300 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. 12 जानेवारी 2005 रोजी कॅन्सरनं त्यांचं निधन झालं.. गर्दीश, मुस्कुराहट, विरासत, करण अर्जुन, डीडीएलजे, गदर अशा अनेक सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. उठ सूट पद्म पुरस्कारांची खिरापट वाटली जाणाऱ्या आजच्या काळात अमरीश भाईंना मात्र अद्यापही पद्म पुरस्कार मिळाला नाहीय. पण त्यांच्या अदाकारीवर आणि संवादांवर बनणारे हजारो जोक्स, मिम्स त्यांच्या अभिनयची पोचपावती आहे. या दगडासारखा चेहरा आणि देह असलेल्या माणसाच्या मनात मेणाहून मऊ मन आहे.. जे शेवटच्या क्षणी स्वतःचा विचार न करता आपल्या सगळ्यांना म्हणतंय.. "जा जी ले अपनी जिंदगी"
या महान कलाकाराला आदरांजली..
ब्लॉगमधली अमरीश पुरी यांच्यासंदर्भातली वैयक्तीक माहिती ही त्यांचं आत्मचरित्र 'द अॅक्ट लाईफ' या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे..