नागपुरातलं एक टूमदार घर, घराच्या मागेच अंबाझरी तलावाचं निळंशार पाणी. घराच्या एका खोलीत वाचनालयालाही लाजवेल असं भलंमोठं पुस्तकांचं कपाट, त्यात पाककलेच्या पुस्तकांपासून ते थेट अगाथा ख्रिस्ती सिडने शेल्डनपर्यंत सगळं काही. पुढे गेल्यावर आणखी एका खोलीत वृत्तपत्रांचा मोठ्ठा शेल्फ, त्यात नागपुरातल्या हितवादपासून ब्रिटन, अमेरिकेतलेही वृत्तपत्रे आणि जगातल्या इतरही कितीतरी देशातली वृत्तपत्रं चाळायची सोय असते.. तिथून बघावं तर मधोमध एक चौकोनी खांब दिसतो, पण त्या खांबाची चारही बाजुंनी सजावट केलेली असते जुन्या कॅसेट्सच्या जॅकेट्सनी, त्यात जगजित सिंग, लता मंगेशकर, रफी, अशा एका ना अनेक प्रसिद्ध गायकांच्या गाण्यांच्या कॅसेट्सच्या जॅकेट्सचा अगदी नाविन्यपूर्ण वापर केलेला दिसतो घराच्या मधोमध असलेला हा खांब सजवण्यासाठी, सहज वर भिंतीकडे लक्ष गेल्यावर तर आणखीच थक्क व्हायला होतं.. कारण जिन्सच्या पॅंटचा बॅग्सचा आकार तयार करुन त्याचीच सजावट केलेली दिसते एका भिंतीवर, दुसऱ्या एका भिंतीवर मोबाईल फोनचं युग सुरु झाल्यापासूनच्या जवळपास सगळ्या हॅंडसेट्सचंच डेकोरेशन दिसतं.. इतकं सगळं वर्णन ऐकल्यावर कुणाच्या तरी घरात डोकावून आपण त्यांचं घर का इतकं निरखून बघतोय असा प्रश्न नक्कीच पडेल, पण उत्तर ऐकल्यावर आणखीनच आश्चर्य वाटेल कारण हे टूमदार घर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नागपुरातलं सध्याचं सगळ्यात प्रसिद्ध रेस्टॉरंन्ट ‘द ब्रेकफास्ट स्टोरी’ आहे...


कॅसेट्सचा खांब

कोलाज मेन्यू कार्ड

नेहमीच्या रेस्टॉरन्टच्या कल्पनेला या ठिकाणी पूर्ण फाटा दिलाय.. एका घराचंच रेस्टॉरन्ट करुन टाकलंय तेही अतिशय नाविन्यपूर्ण आणि हटके सजावटीच्या साथीनं.. इथे आपल्याला नेहमीसारखे एकामागोमाग एक किंवा शेजारी शेजारी टेबलं दिसणार नाहीत.. उलट आधी सांगितल्याप्रमाणे एकेका खोलीत एकेक टेबल आणि प्रत्येक टेबलाभोवतीची सजावट आधीच्यापेक्षा पूर्ण निराळी.. बरं टेबलही एकासारखं दुसरं नाही. एक टेबल गोल, तर दुसरं एक टेबल आपल्याला घरातल्या डायनिंग टेबलसारखं वाटेल तर दुसरं थेट वर्गातल्या डेस्क बेंचसारखं, तर तिसऱ्यावर थेट सापशिडीचा खेळच मांडलेला दिसतो. तर एका टेबलच्या काचेखाली विविध देशांच्या नोटांची सजावट, आणखी एक टेबलचं टॉप सजलेलं दिसतं जुन्या पोस्टकार्ड आणि पत्रांनी. अशी नागपुरातल्या मुकुल कुलकर्णी नावाच्या आर्किटेक्टच्या कल्पनेतून त्यांच्याच राहत्या घरात सजली आहे ही ब्रेकफास्ट स्टोरी...

खिमा पाव

टूमदार घर

पुण्यामुंबईच्या तुलनेत खरं तर नागपुरातलं फुड कल्चर अजून बऱ्यापैकी मागे आहे, आंतरराष्ट्रीय पदार्थांची चव अजून तितकीशी नागपूरकरांना ओळखीची झालेली नाही... तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाची कमर्शियल सजावटही अजून नागपुरात फारशी रुळली नाही, असं असताना आंतरराष्ट्रीय सजावटीलाही मागे टाकणारी जबरदस्त सजावट आणि तितकाच वेगळा मेन्यू असलेलं केवळ ब्रेकफास्टसाठीची ही ब्रेकफास्ट स्टोरी म्हणजे सगळ्या वयाच्या नागपूरकरांची आवडती ‘गोष्ट’ झालीय... या सजावटीसाठी या अनोख्या जागेच्या मालकांची गेल्या कित्येक वर्षांची मेहनत आणि कल्पना अगदी कोपऱ्याकोपऱ्यात जाणवते.. मग आयुष्यभर संकलित केलेल्या कॅसेट्सचा वापर असो, घरातल्या प्रत्येक भिंतीला केलेली वेगळी सजावट असो किंवा रेस्टॉरन्टचाच भाग असलेलं अंगण असो.. या अंगणाची तर बातच काही और आहे.. या अंगणात एक विहीर आहे आणि एसीच्या गार हवेत न बसता ओपन एयरची मजा घेत न्याहारी कऱण्याची इच्छा असलेल्यांसाठी दोन टेबलं.. पण हे झालं पहिलं निरीक्षण, याच्याशिवायही अनेक छोट्यामोठ्या वस्तू या अंगणात मांडलेल्या आहेत.. म्हणजे जुना पितळेचा बंब, जुने लोखंडी तवे... रंगीबेरंगी बाटल्या, जुन्या पंख्यांची पाती.. कंदिलांचे वेगवेगळे प्रकार, नळांच्या जुन्या तोट्या अशा एक ना अनेक वस्तूंनी हे अंगण सजलंय.. हे वाचून कुणाला वाटू शकतं की घरात मावत नाहीत म्हणून जुन्या वस्तू दिल्यात की काय ठेऊन, पण त्या सगळ्या जुन्या वस्तू इतक्या मस्त मांडल्यात की त्यातही सौंदर्यबुद्धी दिसते.. टेबलवर खाद्यपदार्थांची वाट बघत बसलेली व्यक्ती तर हरखून जाते ते सगळं बघतांना...

टेबल टॉप

ब्रेकफास्ट

आता इतका Aesthetics किंवा सौंदर्यांचा आणि वैविध्याचा जर रेस्टॉरन्टच्या सजावटीसाठी विचार केलेला दिसतोय तर त्याचा मेन्यूही तसाच असणार याचा खवय्यांनाही अंदाज येतोच आणि त्याची चुणूक दिसते ती मेन्यूकार्डमधूनच.. मेन्यूकार्ड मागितल्यावर हातात येते ती एक लाकडी पाटी, त्या पाटीवर आपण लहानपणी करायचो तसा वृत्तपत्रांचा कोलाज वाटतो प्रथमदर्शनी, पण नीट वाचल्यावर त्यात पदार्थांची नावं कोरलेली दिसतात आणि त्याला साजेशी कार्टून कॅरिकेचर्सही... मेन्यूकार्डमधला मेन्यू खरं तर नावाला साजेसा नाश्त्याचा.. म्हणजे तुम्हाला इंग्लिश ब्रेकफास्ट, अमेरिकन ब्रेकफास्ट, अंड्याचे वेगवेगळे प्रकार ऑमलेट्स, स्क्रॅम्बल्ड एग्ज, बेक्ड बिन्स, टोस्ट, व्हेज, नॉनव्हेज सॅण्डविचेस, पॅनकेक्स, वॅफल्स असे सगळे आंतरराष्ट्रीय नाश्त्याचे प्रकार चाखता येतात... त्याचबरोबर कॉफी, चहाचे वेगवेगळे प्रकार आणि रंगबिरंगी ज्यूस आणि मिल्कशेक्सही आहेत ब्रेकफास्ट स्टोरीच्या मेन्यूकार्डमध्ये. केक्स आणि डेझर्टच्या शौकीनांसाठीही बरंच काही आहे या मेन्यूकार्डमध्ये, पण खरं सरप्राईज आणि या स्टोरीचा खरा क्लायमॅक्स असतो तो मेन्यूकार्डच्या पलिकडच्या एका फळ्यावर.. ओपन किचनच्या फळ्यावर रोज खास त्या दिवशी शेफने तयार केलेल्या दोन स्पेशल डिशेसची माहिती असते, एक डिश व्हेज तर दुसरी नॉनव्हेज.. आता या दोन डिशेस काहीही असू शकतात, घरगुती साबुदाणा वड्यापासून थेट मेक्सिकन किंवा थाई पदार्थांपर्यंत कुठलाही तो पदार्थ असू शकतो.. आणि खरं तर हा सरप्राईज आयटम खाण्यासाठीच नागपूरकर या निवांत जागेला वारंवार भेट देतात.. कारण दरवेळी काहीतरी नवीन खायला मिळणार याची खात्री असते.. कधी मुंबईची मिसळ असू शकते, कधी खिमा पाव, कधी पंजाबी छोले कुलचा, तर कधी थाय ग्रीन करी आणि राईस,  अगदी पिटा ब्रेड आणि फलाफल अशी लेबनिज डिश ब्रेकफास्ट स्टोरीच्या त्या दिवशीच्या मेन्यूचा भाग असू शकते.. म्हणजे जितकं देशी तितकंच आंतरराष्ट्रीय रेस्टॉरन्ट. पदार्थांचं प्रेझेंटेशनही त्या त्या पदार्थाच्या ख्यातीनुसार.. खरं तर असे वेगवेगळे पदार्थ रोज मेन्यूत समाविष्ट कऱण्याचा एक हेतू नागपूरकरांना एरव्ही ज्या पदार्थांची चव चाखायला मिळत नाही, ती संधी मिळवून देणं तर आहेच, पण त्याबरोबरच केवळ मेन्यूकार्डच्या चौकटीत रेस्टॉरन्टला अडकवून न ठेवता सतत प्रयोग करत राहणं हा ही आहे... या जागेचं नावच ब्रेकफास्ट स्टोरी असल्याने इतर रेस्टॉरन्टपेक्षा इथल्या वेळाही वेगळ्या, सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी पदार्थांची रेलचेल असते मात्र संध्याकाळी सातनंतर मात्र तिथे तुम्हाला काहीच मिळणार नाही...

न्यूजपेपर गॅलरी

पुस्तकांचं कपाट

ब्रेकफास्ट स्टोरीमध्ये सजावट आणि पदार्थ जसे वेगळे आहेत तसंच अनौपचारिक आणि घरगुती वातावरण असल्याने आलेला प्रत्येकजण तिथे मस्त रमतो, कुटूंबाबरोबर आलेले लहान मोठे लोक सापशिडीसारखे खेळ खेळू लागतात, तर काही लोक पुस्तकांच्या कपाटाकडे धाव घेतात.. फ्री वायफाय असल्याने कॉलेजची मुलं एखाद्या कोपऱ्यात रिलॅक्स होताना दिसतात तर मुलामुलींचे घोळके अंगणातल्या कट्टयावर गप्पा मारत बसतात.. सिनीयर सिटीझन्सना त्या रेट्रो सजावटीत त्यांचा भूतकाळ दिसतो, तर युवापिढीला त्यात नाविन्य दिसतं.. आणि प्रत्येकासाठी ती जागा वेगळ्य़ा पद्धतीने स्पेशल ठरते.. इतकंच नाही तर तर्री पोहे आणि सावजीच्या रस्स्यावर ताव मारणाऱ्या नागपूरकरांना आपल्या सरप्राईज मेन्यूच्या माध्यमातून नेहमी खायला मिळणार नाही अशा पदार्थाची ओळख करुन देण्याचं कामही ही ब्रेकफास्ट स्टोरी करतेय. वेगवेगळ्या विषयांवर सुट्टीच्या दिवशी ब्रेकफास्ट स्टोरीमध्ये व्याख्यानंही आयोजित केली जातात, अशी व्याख्यानं असली की त्या त्या विषयाची आवड असलेले लोक आवर्जून तिथे हजेरी लावतात, चटकदार न्याहारीबरोबर माहितीतही वाढ होत असेल तर अशी संधी कोण सोडेल,  खरंच आपल्या जागेचा इतका कल्पक वापर करुन मुकूल कुलकर्णींनी केवळ एक रसनातृप्तीचीच नाहीतर नागपूरकरांना हक्काची निवांतपणासाठीची जागा मिळवून दिलीय..

संबंधित ब्लॉग


जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार



जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट