भारतात निवडणुका आता व्यक्तिविशेष म्हणजे चेहऱ्यांभोवती फिरतायत हे नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिलंय. निवडणूक लढवणाऱ्या पक्षाकडे जर आश्वासक आणि मतदारांवर प्रभाव पाडू शकेल असा चेहरा असेल तर त्या पक्षासाठी निवडणूक जिंकणे सोपे जाते असे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाने 2014 साली मोदींचा चेहरा पुढे करून निवडणूक लढवली आणि त्यांना मोठं यश मिळालं. तिथून मग मोदींचा चेहरा पुढे करून निवडणुका लढवण्याचा सपाटाच भाजपने लावला. भाजपसाठी मोदींचा चेहरा ब्रँड आहे. मोदींची लोकप्रियताही कायम आहे, त्यामुळे निवडणुकीत आपल्याबाजूने वातावरण निर्मिती करणे भाजपला सोपे जाते. पण गंमत अशी की लोकसभा निवडणुकीत तर मोदींचा चेहरा कमाल दाखवतो पण विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्या त्या राज्यात जर एखाद्या पक्षाकडे आश्वासक चेहरा असेल तर मात्र तिथे त्या पक्षाला यश मिळते. म्हणजेच आश्वासक चेहरा हा निवडणुकीचा केंद्रबिंदू झालाय हे गेल्या काही वर्षातील निवडणुकांमध्ये आपल्याला दिसले. तेच पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दूचेरी या राज्यांच्या निवडणुकांमध्ये दिसले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीची देशभर चर्चा झाली म्हणून आधी या राज्यापासूनच सुरूवात करू.
भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावली, देशभरातील आपले नेते आणि कार्यकर्ते यांची फौजच तिथे होती. भाजपचे चाणक्य, देशाचे गृहमंत्री अमित शाह तर तिथे ठाण मांडूनच बसले होते. शिवाय तृणमूल काँग्रेसचे अनेक बडे नेते आपल्या तंबूत घेण्यात भाजप यशस्वी ठरला. साम, दाम, दंड, भेद सगळे प्रयोग झाले. पण या निवडणुकीत भाजपकडे चेहरा होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच. तृणमूलच्या सुप्रिमो ममता बॅनर्जींच्या समोर मुख्यमंत्री होऊ शकेल या तोडीचा चेहरा भाजपला उभा करता आला नाही. त्यामुळे ही निवडणूक दीदी विरूद्ध मोदी अशीच झाली. मोदींचा चेहरा हा पश्चिम बंगालमध्येही लोकप्रिय असला तरी त्यांची सत्ता राज्यात येऊनही मोदी काही मुख्यमंत्री होणार नव्हते. म्हणजेच राज्यात ममतांना पर्याय ठरेल असा सक्षम चेहरा भाजपकडे नव्हता म्हणून इतकी ताकद लावूनही भाजपला यश मिळाले नाही.
दुसरी निवडणूक तामिळनाडूची. या राज्यात दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्येच सरळ लढत होती. सत्ताधारी एआयडीमके सोबत भाजप आणि डीमके सोबत काँग्रेस लढली. एआयडीमके दुसऱ्यांदा सत्तेवर येण्यामागे जयललितांचा चेहरा होता पण त्यांच्या निधनांतर त्या पक्षात बरेच गट पडले. शिवाय त्या पक्षाकडे राज्यभर अपील होईल असा चेहरा नाही. असा अपिलींग चेहरा होता डीएमकेकडे. तो म्हणजे करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन यांचा. द्रमूकचे संघठन आणि जोडीला स्टॅलिन यांचा चेहरा असल्याने ही निवडणूक डीएमकेनी जिंकली. भाजपने आश्वासक चेहरा ठरू शकेल म्हणून सुप्रसिध्द अभिनेते रजनीकांत यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याला यश आले नाही.
तिसरे राज्य आसाम. या राज्यात भाजपचीच सत्ता होती. इथे मोदींचा ब्रँड चेहरा होताच. पण मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि हेमंत बिस्व सर्मा यांचा अपिलींग चेहरा होता. असा चेहरा विरोधी काँग्रेसकडे नव्हता. तरुण गोगोई यांच्या निधनानंतर तर मोठी पोकळी होती. त्यामुळे भाजपला इथे यश मिळण्यामागे त्यांच्या पक्षाचे इथले दोन आश्वासक चेहरे सोनावाल आणि हेमंत बिस्व सर्मा हेच होते. यांच्या तोडीचे चेहरे उभे करु न शकल्याने काँग्रेसला मोठी ताकद लावूनही आणि एआययुडीएफ या पक्षासोबत युती करूनही यश आले नाही.
काँग्रेसची हीच गत झाली केरळमध्ये. केरळमध्ये डाव्यांची एलडीएफ आणि काँग्रेसची युडीएफ अशी थेट लढत होती. पण एलडीएफकडे मुख्यमंत्री पी विजयन यांच्यासारखा अपिलिंग चेहरा होता. ज्यांनी गेल्या पाच वर्षात चांगलं काम केलं होतं. शिवाय कोरोनाची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली होती. दुसरीकडे युडीएफ ओमान चंडी की शशी थरूर याच गोंधळात राहिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी तिथून खासदार असल्याने काँग्रेसला केरळमध्ये यंदा सत्ता मिळेल असे वाटत होते. राहुल गांधींनीही तसा जोर लावला होता. त्यांनी इथे जोरदार प्रचार केला. पण राज्यात त्यांच्या पक्षाकडे विजयन यांना तुल्यबळ ठरेल असा चेहरा नसल्याने त्यांना यश आले नाही. राहुल गांधींनी तिथून लोकसभेची निवडणूक लढवल्याने लोकसभेसाठीचा चेहरा म्हणून गेल्या लोकसभा निवडणुकीत केरळने 20 पैकी तब्बल 19 जागा काँग्रेसच्या पारड्यात टाकल्या होत्या. पण ही निवडणूक विधानसभेची असल्याने इथे राहुल गांधींचा चेहरा चालला नाही. आणि राज्यात काँग्रेस चेहरा देऊ शकली नाही. भाजपने आपली 75 प्लसची अट दूर करत 88 वर्षीय मेट्रोमॅन ई श्रीधरन यांना मैदानात उतरवून चेहऱ्यावरती निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला खरा. पण पी विजयन यांचा चेहरा इथे वरचढ ठरला.
या चार राज्यांच्या निवडणुकीची तर बरीच चर्चा झाली. पण ज्या पुद्दुचेरी या छोट्या राज्याच्या निवडणुकीची फारशी चर्चा झाली नाही. त्या पुद्दुचेरीतही निवडणूक चेहऱ्याभोवतीच फिरली. भाजप आघाडीने इथं सत्ता मिळवली असली तरी या आघाडीचा प्रमुख चेहरा इथं होते एन. रंगास्वामी. हे रंगास्वामी आधी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी एन आर काँग्रेसची स्थापना केली. पुद्दुचेरीला झोपडपट्टी मुक्त करण्याचे काम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या चेहऱ्याला पुढे करत भाजपने ही निवडणूक लढवली आणि त्यांना यश मिळाले.
याचाच अर्थ असा की पश्चिम बंगाल सारखे मोठे राज्य असो की पुद्दूचेरीसारखे छोटे राज्य. या निवडणुका चेहऱ्याभोवती फिरल्या असेच दिसले. ज्या पक्षांकडे प्रादेशिक पातळीवर आश्वासक चेहरे होते, त्यांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे इथून पुढे राज्यभर अपिल होईल असा आश्वासक चेहरा हाच निवडणुकीचा केंद्रबिंदू असणार आहे हे नक्की. हे आपल्याला या पाच राज्यांच्या निवडणुकांनीच दाखवलंय असे नाही तर दिल्ली (केजरीवाल), आंध्रप्रदेश (जगनमोहन रेड्डी), नवीन पटनायक (ओरिसा) या राज्यांच्या निवडणुकांनीही दाखवून दिलंय. यातून राष्ट्रीय पक्षांसाठी धडा असा की देशभरातील आपल्या ब्रँड चेहऱ्यावर प्रादेशिक स्तरावर निवडणुका लढवणे आता सोपे असणार नाही. राज्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रादेशिक पातळीवर आश्वासक चेहरा पुढे करावा लागेल. कारण निवडणुका आता चेहऱ्यांवर लढल्या जातायत. चेहरा जसा लोकसभेत महत्त्वाचा ठरतोय तसा तो विधानसभेतही महत्त्वाचा ठरतोय हे निवडणुकीचे निकाल सांगतायत.