1998 सालची झालेली राज्यसभेची निवडणूक, महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय होती. असं काय घडलं होतं त्या निवडणुकीत? या निवडणुकीमुळे देशाचं आणि राज्याचं राजकारण का ढवळून निघालं? त्यावेळी राज्यात युतीचं म्हणजेच शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं.
सोनिया गांधींनी नुकतचं काँग्रेसचं अध्यक्ष पद स्विकारलं होतं. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राम प्रधान यांचा 1998 च्या राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात बेबनाव निर्माण होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या दिशेने पहिली ठिणगी पडली. 1998 आणि 2022 या दोन्ही निवडणुकीत काय साम्य आहे. हे पहाणं महत्वाचं आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी त्यावेळी सुद्धा सात उमेदवारी अर्ज भरले गेले होते. निवडणुकीतली चुरस शेवटच्या क्षणापर्यंत रंगली होती.
तत्कालीन उमेदवार
1. सतीश प्रधान (शिवसेना)
2. प्रितीश नंदी (शिवसेना)
3. प्रमोद महाजन (भाजप)
4. राम प्रधान (काँग्रेस)
5. नजमा हेपतुल्ला (काँग्रेस)
6. सुरेश कलमाडी (अपक्ष)
7. विजय दर्डा (अपक्ष)
माजी सनदी अधिकारी राम प्रधान जे गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळाली होती. राम प्रधानांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काँग्रेस अंतर्गत बंडाळी होऊन सुरेश कलमाडी आणि विजय दर्डा काँग्रेसचे हे दोन्ही नेते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते.
तत्कालीन पक्षीय बलाबल
1. शिवसेना – 73
2. भाजप – 65
3. काँग्रेस – 80
4. अपक्ष – 45
विजयासाठी पहिल्या पसंतीची 42 मत आवश्यक होती. काँग्रेसकडे असलेल्या सदस्य संख्येच्या जोरावर समर्थक अपक्षांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे दोन्ही उमेदवार अगदी सहज निवडून येणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. ही निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढतं गेली आणि जो निकाल आला तो आज साधारण 24 वर्षानंतर सुद्धा चर्चेचा विषय ठरतो.
पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची मत घेत भाजपचे उमेदवार प्रमोद महाजन आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष विजय दर्डा विजयी झाले. शिवसेनेचे प्रितीश नंदी हे दुसऱ्या फेरीत विजयी झाले. काँग्रेसच्या नजमा हेपतुल्ला आणि अपक्ष सुरेश कलमाडी हे तिसऱ्या फेरीत निवडून आले. आता चुरस होती ती दोन प्रधानांमध्ये म्हणजेच शिवसेनेचे सतीश प्रधान आणि काँग्रेसचे राम प्रधान यांच्यात.
तत्कालीन विधिमंडळ सचिव अनंत कळसे यांच्याकडून या बाबत माहिती घेतली असता, सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. आणि दुपारी 4 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली होती. कळसेंनी सांगितलेल्या माहितीनुसार साधारण दोन तासात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे होती. मात्र या हायव्होल्टेज ड्रामामध्ये झालेली मतमोजणी साधारण साडेतीन तास चालली. यावेळी मतमोजणीच्या पाच फेऱ्या झाल्या होत्या.
चुरसीच्या लढतीत सतीश प्रधान आणि राम प्रधान यांच्यात फक्त अर्ध्या मतांचे अंतर होते. अखेरच्या फेरीत शिवसेनेच्या सतीश प्रधान यांना 39.83 मते तर काँग्रेसच्या राम प्रधान यांना दुसऱ्या पसंतीची पुरेशी मते न मिळाल्याने त्यांच्या मताचे एकूण मूल्य 37.90 झाले होते. हे दोन्ही उमेदवार 41 मतांचा कोटा पूर्ण करू न शकल्यामुळे सर्वात जास्त मते मिळालेल्या सतीश प्रधान यांना विजयी घोषित करण्यात आले. आपला पराभव शरद पवारांनी घडवून आणल्याचं प्रधानांनी आपल्या पुस्तकात लिहलं आहे.
दोन्ही उमेदवार निवडुन आणण्यासाठी पुरेशी मते असताना काँग्रेसचेच अधिकृत उमेदवार राम प्रधान यांचा पराभव सोनिया गांधीच्या जिव्हारी लागला होता. यावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. राम प्रधानांनाचा पराभव आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना या दोन राजकीय घडामोडींची सुरूवात या निवडणुकीच्या निमित्ताने झाली. शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे पुढच्या काळात शरद पवारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. आणि 10 जून 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 10 जून 2022 राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 23 वर्ष पूर्ण होतायत.