एक बोलकं व्यंगचित्र सोशल मीडियावर पाहिलं. एक मुलगी रस्त्याच्या कडेला असलेल्या बोर्डाकडे पाहते आणि वाचते.. बेटी बचाओ. आणि त्या मुलीचा चेहरा प्रश्नार्थक दाखवलाय. हे उपाहासात्मक व्यंगचित्र हे आजच्या आपल्या देशातलं वास्तव आहे.


बेटी बचाओचा नारा तर दिला जातोय.. पण कुणा कुणापासून? मुलगी म्हणून जन्माला येणं ही मोठी चूक आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःचा स्वतःला विचारायला हवा. माझ्या देशाचं, न्याय व्यवस्थेचं आणि मी राहत असलेल्या सुसंस्कृत समाजाचं हे दुर्दैवच की मुलीवर बलात्कार झाल्यावर सुरुवातीला तिची जात पाहिली जाते. जाता जात नाही ती जात, असं म्हणतात ते काही खोटं नाही. हे सतत पेटत राहणाऱ्या निखाऱ्याप्रमाणे एक ज्वलंत वास्तव आहे. बलात्कार करणारे आरोपी कोण, तिथं सत्तेत कोण ते पाहिलं जातं.


हाथरसची एक मुलगी आपण गमावली. सामूहिक बलात्कार, तिची मान तोडली, जीभ कापली, तिचे अंत्यविधीही कुटुंबियांना डांबून उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्रीच्या वेळी परस्पर करुनही टाकले. कुटुंबियांचा टाहो सो कॉल्ड ‘दबंग’ पोलिसांच्या कानी काही पडला नाही. कदाचित त्यांना तसे आदेश असतीलही.. निपटारा करण्याचे. पीडितेच्या कुटुंबियांना घरात डांबलं, धमकावलं, मुलगी कोरोनाने गेली असती तर 25 लाख तरी मिळाले असते का? वैगरे वैगरे अगदी असंवेदनशील वक्तव्य तिथल्या दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी तर म्हणाले की पोस्टमॉर्टम रिपोर्टप्रमाणे मुलीवर बलात्कारच झाला नाही. एबीपीच्या टीमने सत्य शोधण्यासाठीच, पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठीच 27 तास गांधीगिरी मार्गाने आंदोलन केलं. अखेर यश मिळालंच. हाथरसच्या निर्भयाच्या घरातलं वातावरण हे मन हेलावून टाकणारं होतं. जिथे कुटुंबियांना धमकावलं जातं, घरात लहान मुलांसाठीही दूध, भाजीसाठी बाहेर पाठवलं जात नाही, असं निर्दयी, कठोर मनाचं प्रशासन सामान्यांसाठी की फक्त नेत्यांपुढे हुजरेगिरीसाठी काम करतं हा प्रश्न साहजिकच पडतो.


एक बलात्कार.. आणि संपूर्ण कुटुंब उद्धवस्त.. तो दुःखाचा डोंगर न पेलावणाराच आणि कुणाच्याही वाट्याला येऊ नये. उत्तर प्रदेश सरकारमध्ये 34 महिला आमदार आहेत. त्या आमदारांना मुली, बहिणी कुणीच नाहीत? कुणीही पुढे येत नाही. असं म्हणतात की एका महिलेचं दुःख फक्त एक महिलाच समजू शकते. पण, यूपीतल्या महिला फक्त काळीजशून्य आमदार निघाल्या. त्याच ठिकाणी सर्व विरोध झुगारुन काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटतात. पीडितेची आई प्रियंका गांधींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतात आपलं मन मोकळं करतात. हा ही अनेकांना राजकारणाचाच भाग वाटलाय. जर हे राजकारण आहे तर अशा राजकारणाची गरज आहे. जिथे अत्याचार तिथे मतांचा जोगवा मागणाऱ्या नेत्यांनी, न्यायासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास देण्याची गरज आहे. प्रियंका गांधी आणि राहुल गांधींचा दिल्ली ते हाथरस हा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांना अडवलं जातं, रस्त्यात कार्यकर्त्यांवर लाठीमार होतो. प्रियंका गांधी मध्ये पडतात. तर एक दबंग पोलिसवाला प्रियंका गांधींच्या कुर्त्याला हात घालतो. गलिच्छ आणि नीचपणाचं ओंगाळवाणं दर्शन संपूर्ण देशाला घडतं. जिथे एक राष्ट्रीय नेत्याशी अशी वर्तवणूक तिथे सामान्य मुलींच्या सुरक्षेची आणि अदबीने वागण्याची अपेक्षा आपण यूपी पोलिसांकडून कशी करु शकतो?


इथे पोलीस तर पोलीस भाजपचे आमदारही ‘सुभानअल्लाह’ आहेत. बलियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह आणि भाजप नेते रणजीत बहादूर श्रीवास्तव.. यांनी मुलींवर संस्कार नसल्याने बलात्कार होत असल्याचं नीच वक्तव्य केलंय. भाजपच्या या बहादूर नेत्यांचा भर चौकात जाहीर 'सत्कारच' व्हायला हवा. जिथे नेताच असं बोलतो तिथले त्यांचे बोलबच्चे मोकाटच सुटणार ना! भाजपच्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी हे वेळीच आवरायला हवं, त्यांच्या मुक्ताफळं उधळणाऱ्या नेत्यांना, आमदारांना ‘वेसण’ घालायला हवं. जनतेनं विश्वासाने मत दिलंय, त्याबदल्यात अशी वक्तव्य करुन, स्वतःच्या सुसंस्कृतपणाचं, चारित्र्याचं ओंगाळवाणं दर्शन त्यांनी घडवू नये.


या नेत्यांच्या गलिच्छ भाषेचा उगमही तोच समाज आहे. जो मुलींना पूर्वजात पायातली चप्पलच समजत आलाय. बाई ही फक्त उपभोगाची वस्तू हे टार्गेट ठेवणारे आणि नंतर तुम्ही काही केलंच नाही आणि जर केलं असेल तर योग्यच हे शिकवणारा आणि नराधमांना पाठिशी घालणारा ‘तो’ समाज हा महिला, मुलींसाठी घातकच आहे. अत्याचारानंतर आपण पेटून उठतो. #निर्भया #wewantjustice #womensafety हा ट्रेंडही करतो. मात्र नंतर काय? अत्याचार झाल्यावर मानसिकता बदलली पाहिजे वैगरे आपण बोलतो, ऐकतो. पण ती बदलणार कशी? माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण, ही व्यवस्थाही पुरावे मागते, कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून.. कोर्टाची पायरी चढली की कधी खाली उतरणार याची शाश्वती नाही. न्याय मिळतो पण कधी कधी न्याय मागणारा वैकुंठवासी कधी होतो, हे कुणालाही समजत नाही. पुन्हा जर ठरवूनच पुरावे राहू दिले नसतील, किंवा असलेले नसले केले गेले तर? हाथरसमध्ये सक्तीनं पीडितेचा मृतदेहच पोलिसी अंत्यसंस्कारांनी गायब केला गेला. मग पुराव्यांचं काय!


बलात्कार फक्त एका, चौघा- पाच जणांनी केलेला नसतो तर तो एक सामाजिक बलात्कार असतो. समाजाने केलेला... दुष्कृत्यानंतर नराधमांना पाठिशी घालणाऱ्या समाजातील काही अपप्रवृत्ती आणि त्यांना तसं करु देणारे इतर सर्व असा संपूर्ण समाजच त्या पीडितेवर रोज, क्षणाक्षणाला बलात्कारच करत असतो. एक समाज म्हणून आपण काय करु शकतो, याचा पुन्हा पुन्हा विचार करा. माझ्या मुलीने अरेला कारे केलंच पाहिजे, तिला अनोळखी स्पर्श झाला तर तिथे तिने त्याला धडा शिकवलाच पाहिजे, मुलांच्या फालतू, डबल मिनिंग जोक्सना प्रोत्साहन न देता तिथेच त्यांना अडवलं पाहिजे, समोरच्याची नजर ओळखायला शिकवलं पाहिजे. तिच्यावर संकट ओढावलं तर मदतीसाठी कुणाचीही वाट न पाहता तिच तिची रक्षक झाली पाहिजे. ही सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. आजही आपल्या देशात खेळण्या बागडण्याच्या वयात मुलींना भाकरी भाजता आलीच पाहिजे, हा अट्टाहास असतोच. मात्र त्यासोबतच पोटाची भूक जर मुलगी भागवू शकते तर तिच्यावर वाकडी नजर टाकणाऱ्याच्या नजरेत चुलीतला निखाराही तू टाकू शकतेस ही हिंमत आपण तिला दिली पाहिजे.


मुलगी कुठल्याही जाती धर्माची असो तिच्यावर संकट आलेलं पाहून धावून जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे, हे आपण आपल्या ‘वंशाच्या दिव्यांना' शिकवलं पाहिजे. हेच संस्कार त्यांना दिले पाहिजेत. माझ्या देशाची सुसंस्कृतांचा देश म्हणून जगभर ओळख आहे. मात्र दिव्याखाली अंधार ठेवून मिरवायचं की पणत्यांनी आसमंत उजळून टाकायचा, हे आपल्याच हाती आहे. नाही का?


वृषाली यादव यांचे अन्य ब्लॉग