सर्व सजिवांना जिवंत राहण्यासाठी एक विशिष्ट तापमान लागते. त्यापेक्षा फार जास्त किंवा कमी तापमान झाले की जीव होरपळतो किंवा गोठून जातो. मुलांच्या मनालाही घरातून ऊबदार वातावरण मिळाले तर त्यांचे मन खुलते, बहरते. मात्र घरातील मोठी माणसे हिंसक, व्यसनी, अतिरागीट असतील तर मुलांच्या मनावर त्याचा किती वाईट परिणाम होतो हे आपल्याला माहीतच आहे. पण हा परिणाम स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजारापर्यंत जाऊ शकतो आणि हा आजार अनेक वर्षे कसा छळतो याचे वास्तव चित्रण 'मन सुद्ध तुझं' या एबीपी माझा वाहिनीवरील मालिकेच्या चौथ्या भागात येते. 


स्किझोफ्रेनियाला मराठीत छिन्नमनस्कता म्हणतात. कविता नावाच्या मुलीला तिची आई डाॅक्टरांकडे घेऊन येते. चार घरी स्वयंपाक करून जगण्यासाठी धडपडणारी निर्मला नावाची ही गरीब बाई असते. कविता बर्‍याचदा आपल्याच तंद्रीत असते. एकटीच काही तरी पुटपुटते. अंघोळ करत नाही. दिवसभर झोपून असते वगैरे तिच्या तक्रारी असतात. पण कविताचे म्हणणे असते की, तिच्या बापाने प्रचंड संपत्ती मागे ठेवली आहे आणि त्याची मोजदाद ती मनातल्या मनात करत असते. तिची आई कावेबाज आहे आणि ती सगळी संपत्ती हडप करील असा संशय कविता व्यक्त करते. 


निर्मलाबाईंना डाॅक्टर याबद्दल विचारतात तेव्हा त्या सांगतात की, कविताचा बाप कधीचाच वारला आहे. तो दारू पिऊन घरी यायचा तेव्हा कविता अंधारात, कोपर्‍यात लपून बसायची. असाच एक दिवस तिला अंधारात विंचू चावला. तेव्हापासून तिची भीती वाढत गेली. पुटपुटणे सुरू झाले. छिन्नमानस या आजारात कृती, विचार आणि भावना यांचा संबंध तुटतो. आपले विचार दुसर्‍याचे वाटायला लागतात. भास होतात, भीती वाढते.


अनुवंशिकता, मेंदूतील रासायनिक बदल आणि भोवतालचे वातावरण ही तीन प्रमुख कारणे छिन्नमानस या आजाराची सांगितली जातात. आयुष्यभर नियमित औषधे घेतली तर हा आजार बळावत नाही एवढेच.
मानसिक आजार म्हणजे सरसकट 'वेड लागणे' असे नसते.  तर या आजारांचे प्रकार आणि त्यावर उपचार समजून घेतले तर किती काळ धीर धरायचा आहे हे कळते. 


कविताचे पुढे काय करायचे? या प्रश्नाचे अनेक पर्याय तिची आई सुचवते. तिचे लग्न करून द्यावे का? तिला व्यवसाय करू द्यावा का? कुठे नोकरीला लावावे का? असे अनेक पर्याय. मात्र यातील एकही गोष्ट शक्य नाही हे डाॅक्टर आणि आईलाही माहीत असते. केवळ डाॅक्टरांशी बोलल्याने बरे वाटते म्हणून ती बोलत असते. 


जेव्हा एखाद्या प्रश्नाला अनेक पर्याय पुढे येतात. तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर नसते. आयुष्याने आपल्याला कोंडीत पकडलेले असते. हा विरोधाभास समजून घेणे हाच एक पर्याय उरतो. हेच सत्य डाॅक्टर आपल्या साहाय्यकाला एका शेरातून सांगतात...समझ सके तो समझ जिन्दगी की उलझन को सवाल उतने नहीं है जवाब जितने हैं।
येथे हा चौथा भाग संपतो आणि एक प्रश्नचिह्न तसेच मनात रेंगाळत राहते.

BLOG : केमिकल लोच्या... प्रेमात पडलेल्या मुलीची गोष्ट

BLOG : यांना झालंय तरी काय?