किमान या क्षणापर्यंत तरी ज्यो बायडन यांनी निवडणुकीतल्या विजयावर हक्क सांगितला असेल आणि जानेवारी 2021 मध्ये व्हाईट हाऊस मध्ये जाण्याची तयारी केली असेल. अमेरिकेतल्या बहुतांश लोकांना आता हायसं वाटत असेल आणि अनेकांना तर गेल्या चार वर्षाच्या भयानक स्वप्नाचा शेवट झाला आहे असे वाटत असेल. ज्यो बायडन यांनी अमेरिकन सभ्यतेला मिळालेले सार्वमत अशा शब्दात त्यांच्या संभाव्य विजयाचे वर्णन केलंय आणि अनेक अमेरिकन लोकांना त्यांचा देश, जी जगातील सर्वात मोठी महासत्ता आहे, मुक्त जगाचा अग्रदूत आहे, स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आणि जगाला दिशा देणारा तसेच आपली कमी झालेली प्रतिष्ठा परत मिळवण्याच्या मार्गावर असल्याची शाश्वती मिळाली आहे. या निवडणुकीत हिंसा भडकण्याची शक्यता असल्याची भिती अनेकांनी व्यक्त केली होती. पेनसिल्व्हेनियामध्ये मेल इन बॅलेटच्या मतांची मतमोजणी करु नये अशी मागणी ट्रम्प समर्थकांनी करुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असताना आणि देशात आरोग्याचे संकटाने भयंकर रुप धारण केलं असताना, प्रशासनाने मतदारांना त्यांच्या मताचा अधिकार बजावण्यासाठी जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करण्यावर भर दिला नसतानाही अशा चांगल्या प्रकारे निवडणूक पार पडली याबद्दल आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनीही समाधान व्यक्त केलंय.


अमेरिका महान आहे आणि कायमच महान राहणार असा आपल्या विचारांचा संभ्रम निर्माण झाला असेल तर तोपर्यंत आताच्या परिस्थितीत अमेरिकेच्या निवडणुकीसंबंधीचे हे वर्णन एकदम सौम्य वाटेल. सर्वात धक्कादायक बाब जी प्रत्येकाच्या समोर येईल ती म्हणजे जेव्हा कधीही अंतिम निकाल हाती येईल त्यावेळी समजेल की मतदानाचा हक्क बजावलेल्या एकूण लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या अजूनही ट्रम्प यांच्यासोबत आहे. ट्रम्प यांचा पराभव होईपर्यंत त्यांच्या असे लक्षात येईल की 2016 मध्ये त्यांना मिळालेल्या मतांपैकी सुमारे 3 दशलक्ष मते गमावली आहेत. सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या दोन्ही सदनातील बॅलेन्स ऑफ पॉवर दोन्ही बाजूंकडे थोडा-थोडा झुकलेला आहे. परंतु ट्रम्प यांच्या बाजूच्या सध्या दु:खात असलेल्या राजकारण्यांनी त्यांच्या-त्यांच्या जागा कायम राखण्यात यश मिळवलंय. त्यांच्यापैकी काहीजणांनी तर मोठ्या बहुमताने आपल्या जागा कायम राखल्या आहेत. अशा वेळी ट्रम्प जरी सत्तेत नसले तरी अमेरिकेत ट्रम्पवाद कायम राहणार आणि त्याची भरभराट होत जाणार.


निवडणुकीपूर्वी ज्यो बायडन यांच्या मोठ्या फरकाने विजयाची चर्चा केली जात होती. सर्व चाचण्यांचा कल हा बायडेन सहज विजयी होतील असाच होता. पण मतदानानंतरची स्थिती ही अनेकांसाठी मनोरंजक ठरेल अशीच होती. सर्वात सुसंगत सत्य हे आहे की जगाच्या दृष्टीने अमेरिकेची सध्याची स्थिती ही दयनीय आहे. जगातील सर्वात शक्तीशाली आणि श्रीमंत देश, ज्याने जगावर राज्य गाजवले आहे त्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करता आला नाही. पाच दशकापूर्वी बॉम्बचा वर्षाव करुन व्हिएतनामसारख्या देशाला दुर्बल करणाऱ्या आणि क्युबासारख्या देशावर निर्बंध लादून, त्याची नाकेबंदी करुन, राजकीय दृष्ट्या दबाब टाकून त्या देशाला जगापासून वेगळं पाडणाऱ्या या महासत्तेला एका विषाणूच्या संक्रमणाला तोंड देता आले नाही. अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण हे जगातले सर्वात जास्त आहे, त्याबाबतीत प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतालाही अमेरिकेने मागे टाकले आहे. कोरोनामुळे अमेरिकेत रोज जवळपास 1000 लोकांचा मृत्यू होतोय आणि कालचा विचार केला तर एक लाखाच्यावर लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. हे केवळ ट्रम्प यांच्या निरीक्षणाखाली घडलंय असं नाही. ट्रम्पनी मार्चपासूनच कोरोनाचे संक्रमण कमी होतंय हेच सांगितले. तर दुसऱ्या बाजूने प्रशासनाच्या माध्यमातून अशा प्रकारची राजकीय धोरणं आखली ज्यामुळे हजारो नागरिकांचा अकाली मृत्यू झाला. तरीसुध्दा आजही अमेरिकेतली अर्धी लोकसंख्या ट्रम्प यांच्या मागे उभी आहे हे आश्चर्य आहे.


ट्रम्प यांचे व्यक्तिमत्व कपट, लबाडी आणि गुन्हेगारी यांच्यापेक्षा बरंच काही आहे. त्यांनी मेक्सिकन लोकांना बलात्कारी संबोधलं आणि स्थलांतरितांच्याविषयी त्यांच्या मनात प्रचंड तिरस्कार आहे. त्यांनी मुस्लिम लोकांना त्यांच्या राजकीय धोरणातून बाहेर काढलं, अमेरिकेत प्रवेश करायला मुस्लिमांवर बंदी आणावी अशी मागणी केली आणि जर त्यांच्या हातात अधिकार असते तर त्यांनी अमेरिकेतून सर्व मुस्लिमांना हद्दपार केले असते असे वक्तव्य केलं होतं. ट्रम्पनी त्यांच्या अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचे प्रदर्शन केले, त्यांचे गोल्फ क्लब, कार्यालयाची इमारत, अलिशान सदने आणि त्यांच्यावर अगदी बोल्ड लेटरमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आढळतो. त्यांनी 2017 साली केवल 750 डॉलर्स फेडरल इन्कम टॅक्स भरला असला तरी त्याआधी त्यांनी अनेक वर्षे कधीही कर भरला नव्हता. त्यांच्यापेक्षा हॉटेलमधील वेटर किंवा किराणा दुकानातील कामगार जास्त कर भरतात. परंतु ट्रम्प यांनी या विषयावर 'मुकं' आणि 'स्मार्ट' राहण्यास पसंती दिली. ते स्वत: त्यांच्या या करचुकवेगीरीचे समर्थन करतात आणि त्याचा अभिमान बाळगतात. आतापर्यंत किमान 20 महिलांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक आरोप केला आहे आणि ट्रम्प यांनी त्यांच्या विविध कृतीतून अनेकदा दाखवून दिले आहे की ते स्त्रियांचा किती द्वेष करतात. पण त्यांच्या व्याभिचार, लोभ, चोरी अशा अनेक पापांचा विचार करता बायबलमधील पापांच्या यादीचा विस्तार करावा लागेल. गोरे लोक हे सर्वोच्च आहेत, अमेरिका मुळातच गोऱ्या लोकांचा देश आहे आणि इतर वंशाचे लोक गोऱ्यांच्या मर्जीवर जगत आहेत अशा मतावर ते आजही ठाम आहेत. त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेण्याआधी वांशिक प्रश्नावर अमेरिकेत अनेक वेळा हिंसा झाली आहे. ट्रम्प अध्यक्षपदावर आल्यानंतर त्यांनी खुल्यापणाने गोऱ्या राष्ट्रवादाला चालना दिली, त्यांच्याबद्दल खुल्यापणाने प्रेम व्यक्त केले आणि डावे आणि समाजवादी लोक अमेरिकेचा द्वेष करतात असे सांगुन त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण केली. तरीही अर्धे अमेरिकन लोक आजही त्याच्यासोबत आहेत.


ज्यो बायडेन यांनी त्यांच्या सभेत अनेक वेळा सांगितले आहे की अमेरिकन लोक सभ्य आणि शालीन आहेत. निवडणुकीच्या आधी, अलिकडच्या काळात डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षात मतभेद अगदी टोकाला गेले. मतदानाच्या आदल्या दिवशी ज्यो बायडन म्हणाले की, "प्रश्न हा नाही की आपण कोण आहोत किंवा अमेरिका काय आहे." परंतु या निवडणूकीत त्यांच्या या मताच्या अगदी विरुध्द पहायला मिळाले. जरी काही ट्रम्प समर्थकांचे मतपरिवर्तन झाले असले तरी आताही अर्धी लोकसंख्या रिपब्लिकन पक्षाच्या क्रुरपणाचे समर्थन करते. त्यांची बीभस्त संपत्ती, परदेशी लोकांच्याबद्दलचा तिरस्कार, वांशिक विरोध, स्त्रियांबद्दलचा द्वेष, मर्दानी शक्तीबद्दलचा उन्माद आणि अमेरिकेत फक्त गोरेच राज्य करतील अशा प्रकारचे विचार त्यांच्याच ठासून भरलेले आहेत. अमेरिका जगात कायमच सर्वोच्च राहणार असे त्यांच्या मनावर ठामपणे बिंबले आहे. हीच जर अमेरिकेची जीवनशैली असेल तर मग जगाने त्यांची जीवन पध्दत ठामपणे नाकारावी. 2020 च्या निवडणुकीने जगाला काय शिकवले असेल तर ते म्हणजे जगाच्या विविध भागातून जीवन जगायला अमेरिकेत जाण्याची काही गरज नाही आणि अमेरिकन लोकांना त्यांच्या कल्पनेप्रमाणे अमेरिकेच्या सभ्यतेविना, अमेरिकन स्पिरीटविना अमेरिकेची निर्मिती करु द्यावी.