रविवारची दुपार म्हणजे आराम करण्याची आणि महत्वाचं म्हणजे कुटुंब नावाच्या समाजातील सर्वात जुन्या संस्थेसोबत व्यतीत करण्याची वेळ. त्यात जर इंग्लड आणि इटलीमधील युरो चषकासाठीचा अंतिम सामना असेल तर मग दुग्धशर्कराचा योग. कारण दोन्ही संघ आपल्या विजयी ट्राफीचा दुष्काळ संपवण्यासाठी झुंजत होते. इटलीने 1968 साली युरो चषक जिंकला होता तर इंग्लंडने 1966 साली जर्मनीला पराभूत करुन फुटबॉल विश्वचषक उंचावला होता. इंग्लंडने आतापर्यंत एकदाही युरो चषक जिंकला नाही. 


फुटबॉलला इंग्लंडमधून वगळलं तर इंग्लंडला काहीच अर्थ उरणार नाही. या देशातील फुटबॉल चाहत्यांची गोष्टच काही निराळी आहे. त्याबाबतीत या देशातील फुटबॉल चाहत्यांची जगभरात कुख्याती आहे. अमेरिकन पत्रकार बिल बफोर्ड याने 1990 साली फुटबॉलच्या चाहत्यांचा उत्साह, गुंडप्रवृत्ती आणि तशा अनेक गोष्टींवर 'Among the Thugs' हे एक पुस्तक लिहिलंय. त्यामध्ये त्याने मॅचेस्टर युनायटेड या इंग्लिश फुटबॉलच्या संघाच्या चाहत्यांबद्दल, ज्यांच्याबद्दल त्याने अनेकदा प्रवास केलाय, बऱ्याच नोंदी केल्या आहेत. त्यावेळी त्याला असं जाणवलं की या देशातील फुटबॉलच्या चाहत्यांची भावना तशीच आहे जशी एखाद्या धर्मांध व्यक्तीची असते. त्या भावनांची तुलना त्याने इंग्लंडमधील राष्टवादी पक्ष 'द नॅशनल फ्रन्ट'च्या सदस्यांच्या भावनेशी केली आहे. 1990 साली इटलीतील सार्डिनिया या ठिकाणी फुटबॉलच्या विश्वचषक सामन्याच्या दरम्यान झालेल्या दंगलीमध्ये तो अनपेक्षितपणे सापडला. त्यावेळी त्याने लिहिलं आहे की, त्यावेळी झालेली हिंसा ही असामाजिक तत्वांना नवी 'किक' देते. अशा हिंसेदरम्यान फुटबॉल चाहत्यांच्या भावना या एखाद्या नशील्या पदार्थाचे सेवन केल्यानंतर ज्या पद्धतीन उत्साहित होतात तशाच पद्धतीने उत्साहित होतात. 


माझ्या लॉस एंन्जल्समधील घरी बसून दुपारी युरो कपच्या सामन्याचा आस्वाद घेणं खरोखरच आनंददायी होतं. या खेळाची मला थोडीशी आवड असली तरी त्या खेळातील कट्टरतावादापासून मी अद्याप दूर आहे. एखादा व्यक्ती एखाद्या संघाचा समर्थक कसा बनतो, आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी कर्कश आवाज कसा काढतो, दुसऱ्या संघाच्या समर्थकांवर बीयरच्या बाटल्या कसा फेकतो, त्यांच्याशी वाद कसा घालतो आणि हिंसाचारावर कसा उतरतो हे सर्वच रहस्यमय आहे. असाच काहीसा प्रकार युरो चषकाच्या अंतिम सामन्यात झाल्याचं पहायला मिळालं. वेम्बले येथे काही हजारो प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये विना-तिकीट प्रवेश केला, त्यांनी काही लोकांना मारहाण केली. बफोर्डने वर्णन केल्याप्रमाणे, केवळ खेळ सुरु होणार या विचारानेच त्या लोकांमध्ये अतिउत्साह निर्माण झाला आणि हा सर्व प्रकार घडला. त्यामुळे खेळ पाहताना माझे तीन तास तणावपूर्ण गेले, तसेच इंग्लंड आणि इटलीतील हा अतीटतीचा सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला. 


या अंतिम सामन्यात इंग्लंडचा संघ असायला हवा होता का असा प्रश्न निर्माण होत होता. मीच नाही तर अनेक लोकांना हा प्रश्न सतावत होता. उपांत्य फेरीतील सामन्यात डेन्मार्क विरोधात इंग्लंडला जी पेनल्टी मिळाली होती तो खरं तर एक फाऊल होता. त्यावर रेड कार्ड दाखवायला हवं होतं. माझ्यातील भारतीय मनाने ब्रिटिशांनी भारतावर केलेल्या शासनाचा नेहमीच अभ्यास केलाय. मला असं नेहमी वाटतंय की, इंग्लंडने सातत्याने जगाला असं भासवण्याचा प्रयत्न केलाय की तो प्रामाणिक आहे आणि खेळ भावनेला सर्वोच्च मानतो. पण सत्य याहून वेगळं आहे. 18 व्या शतकातील उत्तरार्धात आपल्या वाढत्या ताकतीच्या जीवावर इंग्लंडने भारतीय राज्यांशी केलेल्या अनेक करारांचा कधीच सन्मान केला नाही. 


केवळ भारतातच नव्हे तर गोऱ्या लोकांच्या अमेरिकेतही इंग्लंडने स्थानिक लोकांशी केलेले अनेक करार पाळले नाहीत, त्यांचं उल्लंघन केलं. तसेच या लोकांना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. आता इंग्लंडला अनावश्यक पेनल्टी मिळाली होती तो रेफरीच्या चुकीमुळेच. आता यावर विचार करुन काही उपयोग नाही. खरं तर मी काही इटलीच्या संघाचा चाहता नाही किंवा इंग्लंडच्या संघाचा. पण युरो चषकाचा अंतिम सामना बघताना मी इटली जिंकेल अशीच आशा करत होतो. ज्यावेळी इंग्लड आणि अन्य कोणत्या देशाला निवडायची वेळ येते त्यावेळी मी मार्क मार्केजच्या 'एनी वन बट इंग्लंड' या सुंदर पुस्तकाच्या शीर्षकाला फॉलो करतो. मार्क मार्केजचे हे पुस्तक क्रिकेट, कट्टरतावाद आणि राष्ट्रवाद यावर आधारित आहे. हा पण यालाही एक अपवाद आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांचा विचार असेल तर मी इंग्लंडचे समर्थन करतो. कारण ऑस्ट्रेलियातील वंशवाद आणि कट्टरतावाद हा कित्येक पटींनी अधिक विद्रूप आहे. 


इंग्लंडच्या संघातील डिफेंडर ल्यूक शॉने पहिल्या दोन मिनीटांमध्येच आंतरराष्ट्रीय सामन्यातील आपला पहिला गोल केला होता. युरो फायनलच्या इतिहासातील हा सर्वात वेगवान गोल होता. त्याने केलेला गोल हा अप्रतिम होता आणि इंग्लंडने संपूर्ण टूर्नामेन्टमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्या पद्धतीनेच याही सामन्याची सुरुवात केली. माझ्या हृयाचे ठोके वाढले होते पण मी गुंडगीरी करणारा फुटबॉलप्रेमी नाही. खरं तर मी फुटबॉलचा सामान्य चाहताही नाही. मी वेंबलेमध्ये गोळा झालेल्या आणि इंग्लडमधील असंख्य पबची कल्पना करत होतो ज्या ठिकाणी माझ्या विचारांच्यापेक्षा अधिक गतीने बीयर वाहत होती. मला असंही वाटत होतं की जर इंग्लंडचा संघ जिंकला तर ब्रेक्झिटचे समर्थन करणारे लोक असाही दावा करतील की युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यामुळे इंग्लंडमधील फुटबॉल पुन्हा जिवंत झाला. काही लोक जुन्या पीढीतील गोष्टी उकरुन काढतील आणि असंही सांगतील की शेवटी इंग्लंड हा इंग्लंड आहे, युरोपच्या आजच्या परिस्थितीला युरोपातील इतर देशच जबाबदार आहेत. खरं तर केवळ डेन्मार्कमध्येच नव्हे तर संपूर्ण युरोपात गडबड सुरु आहे. अनेक लोकांना असा विश्वास वाटत होता की इंग्लंडचा विजय हा त्याच्या अंतर्गत संरचनेला पुन्हा एकदा मजबूत करणारा ठरेल. 


सुरुवातीच्या अर्ध्या वेळेपर्यंत इंग्लडच्या संघाने सामन्यावर वर्चस्व ठेवलं होतं. पण नंतरच्या वेळेत एका गोलचा लीड हा कायम ठेवण्यासाठी त्याने सुरक्षात्मक खेळाचा अवलंब केला. त्यानंतर इंग्लंडने खेळाचा वेग मंदावला आणि वेळ जाऊ देण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यावेळी मला इंग्लंडच्या कोचला असं जाऊन सांगावसं वाटलं की तो देश जगाच्या एक चतुर्थांश भागावर युनियन जॅक फडकावल्यानंतर असा शांत बसला नव्हता. साम्राज्य निर्माणाप्रमाणे फुटबॉलही अनिश्चिततेचा खेळ आहे. मैदानात शेवटच्या वेळेत इटलीच्या संघाने वर्चस्व साधलं. 67 व्या मिनीटाला बानुसीने गोल केला आणि इटलीने 1-1 अशी बरोबरी साधली. शेवटी सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. 


सामना अतिरिक्त वेळेत गेला तर हृदयाचे ठोके वाढतात आणि जर पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला तर मात्र हृदयविकाराचा धक्काही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओव्हरटाईममध्येही सामन्याचा निकाल लागला नाही तर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जातो आणि प्रत्येक संघाला पाच-पाच किक मारण्याची संधी दिली जाते. पेनल्टी शूटआऊट मध्येही निकाल लागला नाही तर 'सडन डेथ' हा प्रकार आहे. पेनल्टी शूटआऊट हा प्रकार म्हणजे संघासाठी आणि प्रेक्षकांसाठीही एक प्रकारची शिक्षा असते. त्यांनी दिलेल्या वेळेत सामना संपवलेला नसतो. त्यामुळे आता ड्रा च्या आधारेच निकाल लावण्यासारखं असतं. 


युरो 2020 मधील पेनल्टी शूटआऊट हा गेल्या काही वर्षातील फुटबॉलच्या इतिहातासीत एक वेदनादायी घटना ठरला आहे. इटलीने हा सामना 3-2 असा जिंकला. इंग्लंडच्या संघातील पेनल्टी शूटआऊटची संधी ज्यांना मिळाली त्यापैकी तीन खेळाडू हे फ्रेशर्स होते, त्यांना अतिरिक्त खेळाडू म्हणून सामन्याच्या शेवटी संधी मिळाली होती. आणि हा प्रकार अशा वेळी होत होता ज्यावेळी इंग्लंडवासिय कित्येक वर्षानंतर युरो कपची आतुरतेने वाट पाहत होते. दोन पेनल्टीनेतर इंग्लंडचा संघ 2-1 ने आघाडीवर होता पण साकाची तिसरी पेनल्टी चुकली.


या खेळाचे वैशिष्ट असं आहे की एका संघाचे चाहते दुसऱ्या संघाच्या चाहत्यांचा आदर करत नाहीत आणि आपल्या संघाच्या चुकींनाही माफी करत नाहीत. साकाने गरजेच्या वेळी गोल जाळ्यात मारला नाही हे इंग्लंडचे चाहते कायम लक्षात ठेवतील. 


सध्याची परिस्थिती पाहता ज्या विषयाची चर्चा व्हायला नको त्यावर चर्चा होताना दिसत आहे. रेशफोर्ड, सांचो आणि साका हे तीन खेळाडू गौरवर्णिय नाहीत. इंग्लंड हा इंग्लंड आहे असं मानणाऱ्या काही लोकांना असं वाटतंय की या तिनही खेळाडूंना नोटिस द्यायला हवीय. इंग्लंडच्या पराभवानंतर काहीच वेळात या तिन्ही खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं, अपशब्द वापरण्यात आले. साका नायजेरियन वंशाचा आहे पण त्याचा जन्म हा ब्रिटनमध्येच झाला. पण काही लोकांनी साकाला परत नायजेरियाला पाठवायला हवं अशी मागणी केलीय. 


फुटबॉल असोसिएशन ऑफ इंग्लंडने या तीन खेळाडूंवर सोशल मीडियातून होणाऱ्या वर्णभेदी कमेन्टचा निषेध केला. खेळाडूंना माकड म्हणण्याची परंपरा ही इंग्लंडच्या मैदानात फार पूर्वीपासून आहे. वर्णभेद नष्ट करण्याच्या कामात या देशात बरंच काही करण्यासारखं आहे. त्यामुळेच मी नेहमी इंग्लंडच्या पराभवाची इच्छा व्यक्त करतो. 


ब्राझिलवासियांच्या नजरेतून पाहिल्यास हा खेळ एक सुंदर खेळ आहे. संघात विविध खेळाडूंचा समावेश असण्याबरोबरच या खेळाचे अनेक वैशिष्टे आहेत. खरं पाहता रेशफोर्ड, सांचो आणि साका या तीन खेळाडूंनी इंग्लंडच्या संघात जागा मिळवली ही इंग्लंडसाठी अभिमानाची गोष्ट आहे. निळ्या जर्सीतील इटलीचा संघ म्हणजे राष्ट्रीय टीमच्या रुपातील क्षेत्रिय संघ आहे. इटलीतही पुनर्निमाणाचे वारे वाहिले पण त्याचा संघ हा प्राचिन परंपरांचा अवशेष आहे.


फुलबॉलचे भविष्य हे ना इंग्लंडच्या संघामुळे असेल ना इटलीच्या किंवा इतर संघांमुळे असेल. जर आपल्याला सभ्य व्हायचं असेल तर आपल्या खेळाडूंना विजयी अथवा पराजित या रुपात पाहणं बंद करावं लागेल. खेळाडू जेव्हा फक्त खेळण्यासाठी खेळतील त्यावेळी आपल्या मनातील असलेल्या या सर्व सीमा पुसून जातील. खेळातील या भावनेला अंमलात आणण्यासाठी अनेक दशकं लागतील किंवा काही पीढ्या लागतील, पण खेळांमध्ये जीनवातील विविध आयामांना समजण्यासाठी अपार संभवना लपल्या आहेत हे नक्की. 


(अनुवाद: अभिजीत जाधव)