महाराष्ट्रात 1995 साली युतीचं सरकार आलं आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मनोहर जोशी यांना मिळाला. पण याचा अर्थ मनोहर जोशी हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयातील मुख्यमंत्री होते का? की, बाळासाहेबांच्या हृदयातील मुख्यमंत्री कुणीतरी वेगळेच होते, आणि ऐनवेळी बाळासाहेबांनी बुद्धीचा कौल मानला आणि मनोहर जोशींच्या नावावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली?


 माझ्या मनात हे दोन प्रश्न तब्बल 27 वर्षांनी पुन्हा उभे राहण्याचं एकमेव निमित्त म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं झालेलं निधन. सुसंस्कृत आणि सुशिक्षित कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण करणारा, तसंच लोभस व्यक्तिमत्त्वाचा शिवसेनेच्या पहिल्या फळीतला नेता ही सुधीरभाऊंची ओळख चाळिशी ओलांडलेल्या प्रत्येक मराठी माणसाला आहे. पण दुर्दैवानं त्या पुढच्या पिढीतल्या मंडळींना सुधीरभाऊंची थोरवी सांगायची तर शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाचा किस्सा पुन्हा सांगण्याची गरज आहे. आणि जुन्याजाणत्या सूत्रांच्या हवाल्यानं स्पष्टच सांगायचं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयातील पहिले मुख्यमंत्री सुधीर जोशी हेच होते. पण ते वास्तवात घडू शकलं नाही. कारण बुद्धी आणि हृदयाच्या द्वंद्वात बाळासाहेबांनी बुद्धीचं ऐकलं असावं का?  जुन्याजाणत्या मंडळींच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा तर बाळासाहेबांचं मन आणि त्यांची बुद्धीही मुख्यमंत्रीपदासाठी एकच नाव घेत होती, ते म्हणजे सुधीर जोशी यांचं. पण काही राव आणि काही महाजनांनी बाळासाहेबांना मनोहर जोशींना झुकतं माप देण्याचा सल्ला दिला. कारण मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत यशस्वी होण्यासाठी माणूस हा पेशानं नाही, तर पिंडानंच राजकारणी असावा लागतो. आणि त्या निकषावर मनोहर जोशी हे सुधीरभाऊंपेक्षा कैकपटीनं सरस होते. अखेर सुधीर जोशींचे ते सख्खे मामाच ना!


 जुनीजाणती मंडळी आजही सांगतात, मध्यरात्र उलटली तरी मनोहरपंत की सुधीरभाऊ हा विचार बाळासाहेबांच्या मनात सुरु होता. त्यामुळं दुसऱ्या दिवशीच्या एका मराठी दैनिकानं दिलेला मथळा होता... मुख्यमंत्री जोशीच, पण कोणते? अखेर रात्री अडीचच्या सुमारास मनोहर जोशींच्या नावावर बाळासाहेबांनी शिक्कामोर्तब केलं. मग सकाळी शिवसेना भवनातल्या विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीसाठी येता येता भाजपच्या तत्कालिन चाणक्यांनी सुधीरभाऊंच्या कानात मनोहर जोशींचं नाव फायनल झालं असल्याची बातमी दिली. त्यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी मनोहर जोशींचं नाव चर्चेत आणण्यासाठी सुधीर जोशींना सूचक ही भूमिका बजावावी लागली. आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता होता राहून गेले.


 सुधीरभाऊंच्या मनाचं मोठेपण म्हणजे त्यांनी बाळासाहेबांचा तो निर्णय, साहेब म्हणतील ते फायनल या शिवसैनिकांच्या निष्ठेनं स्वीकारला. मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्याची कटुता त्यांच्या वागण्याबोलण्यात, त्यांच्या व्यवहारात, त्यांच्या चेहऱ्यावर किंवा शिवसेना आणि बाळासाहेबांवरच्या निष्ठेत कुठंही उमटली नाही. म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगावसं वाटतं की सुधीरभाऊ राजकारणात असले तरी ते राजकारणी कधीच नव्हते.


सुधीर जोशी हे राजकारणात असले तरी अतिशय सरळमार्गी होते. त्यांनी खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यात कधीच कुणावर चिखलफेक केली नाही. राजकीय व्यासपीठावर त्यांनी नेहमीच मुद्द्याला धरून टीका करण्याचं सुसंस्कृतता दाखवली. तसंच विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आपल्यावर चिखलफेक करण्याची संधी मिळणार नाही, याचंही त्यांनी राजकीय कारकीर्दीत भान राखलं. सुधीरभाऊंच्या घराचा दरवाजा हा येणाऱ्या- जाणाऱ्यांसाठी कायम सताड उघडा असायचा. याचं कारण बाळासाहेबांनी दिलेला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मंत्र त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा बाणा होता.




 वसा समाजसेवेचा, झेंडा शिवसेनेचा


 सुधीरभाऊ हे मूळचे कोकणातले असले तरी मुंबईकर आणि त्यातही दादरवासी ही त्यांची ओळख बनली होती. सुधीरभाऊंच्या वडिलांची म्हणजे गजानन जोशी यांची दादरच्या कोहिनूर सिनेमासमोरच्या (सध्या नक्षत्र मॉल) इमारतीत खानावळ होती. यशवंत भोजनालय हे त्या खानावळीचं नाव. सुधीर जोशी यांच्या आई ही मनोहर जोशी यांची सख्खी बहीण. साठच्या दशकात मामा-भाच्याची जोडी तरुण होती. दोघांच्या वयात जेमतेम तीन वर्षांचं अंतर. दादर आणि आसपासच्या गिरणगावातल्या तरुणांसारखी मामा-भाच्याची जोडीही बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी माणसांवरच्या अन्यायाच्या मुद्द्याकडे आकर्षित झाली होती. मग त्याच प्रेरणेतून 1966 साली शिवसेना आणि मग शिवसेनेच्या माध्यमातून त्या दोघांनीही राजकीय कारकीर्दीची तुतारी फुंकली.


मुंबई महापालिकेच्या 1968 साली झालेल्या निवडणुकीत सुधीरभाऊ पहिल्याच फटक्यात नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढच्या पाच वर्षांत त्यांनी मुंबई महापालिकेत शिवसेना गटनेता आणि विरोधी पक्षनेता ही पदं भूषवली. भाऊंची कर्तबगारी पाहून 1973 साली लोकांनी त्यांना पुन्हा नगरसेवकपदावर निवडुन दिलं. त्याच वर्षी बाळासाहेबांनी सुधीरभाऊंना मुंबईच्या महापौरपदाचा मान दिला. शिवसेनेच्या इतिहासात ते मुंबईचे दुसरे महापौर ठरले. त्या काळात अवघ्या 33 वर्षांचा एक तरुण मुंबईच्या महापौरपदावर बसणं ही अनोखी बाब होती.


 सुधीरभाऊंनी मुंबईचा महापौर या नात्यानं अनेक सामाजिक उपक्रम राबवले. पण त्याच सुमारास स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून त्यांनी पक्षबांधणीचंही भक्कम काम केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच कष्टकरी आणि रांगडा मराठी तरुण हा बाळासाहेब आणि त्यांच्या संघटनेकडे आकर्षित झाला होता. पण शिवसेनेची आंदोलनाची आक्रमक भाषा सुशिक्षित आणि नोकरदार वर्गाला आपली वाटत नव्हती. त्या वर्गाला शिवसेनेच्या झेंड्याखाली आणण्याचं श्रेय सुधीरभाऊंना जातं. त्यांनी सुशिक्षित मराठी तरुणांना बँका, विमा आणि सार्वजनिक उपक्रमांमधून नोकरी मिळवून देण्यासाठी स्थानीय लोकाधिकारची चळवळ सुरु केली. मराठी भाषिक आणि भाकरीसाठी नोकरी अशी सांगड घालणारा सुधीरभाऊंचा समाजकारणातला तो प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. त्यामुळं सुशिक्षित नोकरदार मराठी वर्ग आधी स्थानीय लोकाधिकार समिती आणि त्यातूनच शिवसेनेकडे वळला. त्यामुळंच वळलेल्या मुठींची, रांगड्या वळणाची शिवसेना कडक इस्त्री आणि टायवाल्यांनाही आपलीशी वाटू लागली.


 सुधीरभाऊंची सामाजिक नाळ इतकी घट्ट होती की, एक विधीमंडळ सदस्य म्हणून त्यांनी  नेहमीच लोकाभिमुख कामांना आणि निर्णयांना प्राधान्य दिलं. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असताना त्यांनी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांवरचा अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. कोकणातल्या मुबलक पावसाचं समुद्रात वाया जाणारं पाणी अडवून छोटे छोटे बंधारे बांधण्याची योजना त्यांनी मांडली होती. युतीच्या पहिल्या सरकारात महसूलमंत्री असताना सातबाराचा उतारा सर्वसामान्य माणसांना सहज कसा उपलब्ध होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतजमिनीवरचं आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी हाही त्यांचा आग्रह असायचा. 


समाजसेवेला जोड साहित्य, संगीत आणि क्रिकेटची


 सुधीरभाऊंच्या जीवनात सामाजिक कार्याच्या बरोबरीनं साहित्य, संगीत आणि प्रामुख्यानं क्रिकेटचाही अनोखा संगम झाला आहे. त्यामुळं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गरवारे क्लब हाऊसच्या कार्यकारिणीत ते जितक्या सहजतेनं सामील होत, तितक्याच सहजतेनं ते दादर सार्वजनिक वाचनालयाच्या कामकाजात सहभागी होत. शिवसेनेसारख्या कडव्या संघटनेचे नेते असलेले सुधीरभाऊ दादरच्या साने गुरुजी विद्यालयाचेही विश्वस्त होते हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही. पण तिथं ते प्रकाश मोहाडीकरांच्या सोबतीनं शाळेचं विश्वस्तपद सांभाळत. सुधीरभाऊंना संगीताचाही कान होता. इतकंच नाही, तर ते स्वत: हार्मोनियम वाजवून मराठी गीतं गात. सुधीर फडके यांचं तोच चंद्रमा नभात हे त्यांचं सगळ्यात लाडकं गाणं होतं.


 सुधीर जोशी यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राजकारणात मानाची मोठमोठी पदं भूषवूनही त्यांचं दादरमधलं मूळचं निवासस्थान कधीच बदललं नाही. प्लाझा सिनेमाच्या मागच्या गल्लीत, जी नॉर्थ वॉर्ड ऑफिससमोर त्यांची हृदगत ही इमारत आहे. त्या इमारतीतून ते कधीही गगनचुंबी टॉवरमध्ये किंवा टोलेजंग बंगल्यात गेले नाहीत. या इमारतीच्या गच्चीवर सुधीरभाऊंना त्यांच्या चाळीशी-पन्नाशीतही शेजारपाजाऱ्यांनी पतंग बदवतानाही पाहिलं आहे.




 सुधीरभाऊंना शिवसेनेच्या पहिल्या फळीतल्या प्रत्येक नेत्यासारखी वक्तृत्त्वाची दैवी देणगी लाभली होती. त्यामुळं त्यांची भाषणं उत्तम होतच, पण शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातलं किंवा मोठ्या सभांमधलं त्यांचं सूत्रसंचालनही खुमासदार व्हायचं. शिवाय कपाळावर येणारी झुलपं हातानं मागं सारण्याची त्यांची शैली लोभसवाणी होती. सुधीरभाऊंना विनोदबुद्धीही उपजत होती. त्यामुळं बाळासाहेबांच्या मैफिलीतही त्यांना हक्काचं स्थान होतंच, पण ऐन भरातल्या राजकीय कारकीर्दीत दोन अपघातांना सामोरं जावं लागूनही ते मनानं कधीच खचले नाहीत. पनवेलनजिकच्या जीप अपघातात सुधीरभाऊंचा हात घासला जाऊन फाटला होता. त्यावर झालेल्या शस्त्रक्रियेत त्यांच्या पोटाजवळची त्वचा काढून हातावर लावण्यात आली होती. त्यावेळी भाऊंनी केलेला विनोद त्यांच्या मैफिलीतल्या माझ्या मित्रानं सांगितला. ते म्हणाले होते, आता जास्त जेवून चालत नाही. हात वाढतो.


 सुधीरभाऊंना त्यांच्या आयुष्यात झालेल्या दोन कार अपघातांमुळं शारीरिक मर्यादा आल्या होत्या. त्यामुळं वयाच्या साठीआधीच त्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची वेळ आली. पण उमद्या स्वभावामुळं ते आयुष्याची लढाई हरले नाहीत. शक्य होतं तोवर ते शिवसेना भवनात बसून पक्षाची छोटीमोठी कामं करायचे. आणि आयुष्याच्या संध्याकाळीही त्यांनी शिवसेनेची मोठी सभा कधीही चुकवली नाही. त्यामुळंच सुधीर जोशी यांच्या निधनाची बातमी जुन्या आणि नव्या पिढीच्या शिवसैनिकांनाही सारखीच भावूक करणारी ठरली.