>> अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
आपल्या देशात दरवर्षी विविध कारणांनी जाणाऱ्या बळींची आकडेवारीवर आधी नजर टाका.
1. अर्भक मृत्यु - 7,20,000
2. रस्ते अपघात - 1,48,707
3. MDR-TB क्षयरोग - 2,20,000
4. तंबाखू सेवन - 10,00,000
5. कोविड 19 - 1981 ( आजपर्यंत )
मग कोरोनाला घाबरायचे तरी कशाला?
कोरोना हा नवा विषाणू आहे, यावर आजही लस उपलब्ध नाही, निश्चित औषध उपलब्ध नाही. याचा R0 ( R naught ) म्हणजे संसर्ग पसरण्याची क्षमता खूप जास्त आहे. लॉकडाऊन केला नसता तर एक व्यक्ती महिनाभरात 406 लोकांना संसर्ग देऊ शकतो. लॉकडाउन 50 टक्के केला तर 15 आणि 75% केला तर केवळ 2.6 व्यक्ती बाधित होतात. आपली लोकसंख्या , घनता, दारिद्र्य व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अभाव यामुळे लॉकडाऊनचा कटू पर्याय शासनाला निवडावा लागला. जी चूक अनेक प्रगत देशांनी केली ती आपण केली नाही.
आताही कोरोना कुठेही निघून गेलेला नाही. तो इथेच आहे. दीड महिण्यापूर्वी आपल्याला त्याच्या बद्दल माहिती कमी होती, लढाईसाठी साधने अपुरी होती पण आता बरेच प्रबोधन झाले आहे, सर्वांना धोक्याची जाणीव करून दिली आहे. त्यामूळे प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. हे खुप कठीण आहे पण त्याला दुसरा पर्याय दिसत नाही. जोपर्यंत शास्त्रज्ञ यावर लस अथवा औषध शोधत नाहीत तोपर्यंत आपल्याला कोरोनासह जगायचे आहे. त्यासाठी मास्क, हातांची स्वच्छता, फिजिकल डिस्टन्सिंग हे आपल्या सवयीचा भाग बनले पाहिजे. हे काही दडुंक्याच्या जोरावर बळजबरीने शिकवण्याची गोष्ट नाही असे मला वाटते.
आता या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले प्रचंड मोठे आर्थिक संकटही जीवघेणे आहे. आपली पूर्ण अर्थव्यवस्था ही लिब्रलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोलबलायझेशनच्या प्रतिमाणावर आधारलेली असल्याने ती लगेच स्वयंपूर्ण खेडीच्या मोडवर स्वीच होवू शकत नाही. हे स्थित्यतंर केवळ वेदनादायी नाही तर जीवघेणे आहे. करोडो लोक बेरोजगार आणि लाखो लोकांची उपासमार होण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक चालू करण्यात आली आहे. त्यामूळे जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवत नसून कृषी अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणात रूळावर येण्यास प्रारंभ झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 19 सीमेवरील चेकपोस्टमधील आकडेवारी प्रमाणे एका दिवशी 5 मे रोजी 6900 मालवाहतूकीच्या वाहनांनी प्रवेश केला. यापैकी 4078 वाहने कोल्हापूर जिल्ह्यात थांबणारी होती. याचा अर्थ सुमारे 8000 चालक आणि क्लीनर यांचा प्रवेश जिल्ह्यात झाला. तसेच 342 वाहने वेगवेगळ्या राज्य आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यातून वैध पास घेवून कोल्हापूरात आली. कोणी मयत, कोणी डिलिव्हरीसाठी, कोणी लहान मुलांना सोडण्यासाठी, घेवून जाण्यासाठी, उपचारासाठी, शासकीय कर्तव्यावर हजर होण्यासाठी इत्यादींना हे परवाणे त्या त्या जिल्ह्यातून जिल्हाधिकारी अथवा पोलीस आयुक्त देतात. आलेल्या प्रत्येक व्यक्तीची जिल्ह्याच्या सीमेवर तापमान तपासून , नोंद करून त्यांना CPR, IGM , SDG इत्यादी ठिकाणी पाठवले जाते. तेथे वैद्यकीय तपासणी करून आवशकयता भासल्यास स्वॅब घेतला जातो. अन्यथा इंन्टिट्युशनल किंवा होम क्वॉरंटाईन केलं जाते. एखादी व्यक्ती रुग्णालयात पोहचली की नाही हे ही पडताळले जाते. यामध्ये काही त्रुटी असल्या तरी त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण या सर्वामध्ये हे लक्षात आले की, आपण एखाद्या बेटाप्रमाणे राहू शकत नाही. आपण काही स्वयंपूर्ण नाही अथवा होऊ शकत नाही. आपला शिरोळ तालुका सांगलीशी, सांगलीचा शिराळा तालुका शाहुवाडीशी, आपले चंदगड बेळगावशी एवढे कनेक्टेड आहे की तेथे जिल्हा हे युनिट लागू करताना अनेक व्यावहारिक अडचणी येतात. त्यामुळे आपल्याला काही रिस्क घ्यावी लागत आहे.
अशा काळात आपले उद्दीष्ट कोरोनामुक्ती किंवा ग्रीन झोन न राहता, आपल्याला कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू कसा होणार नाही, केसेसचे प्रमाण कमीत कमी राहील जेणेकरून रिकव्हरी रेट हा डिटेक्शन रेट पेक्षा जास्त राहील. आपली आरोग्यव्यवस्था ही कोलमडणार नाही , कम्युनिटी ट्रान्समिशन होणार नाही आणि आपली अर्थव्यवस्थाही रूळावर येण्यास प्रारंभ होईल अशी असली पाहिजेत असे माझे प्रामाणिक मत आहे. आपण ग्रीन झोनमध्ये गेलो म्हणून सेलिब्रेट करणेही योग्य नाही आणि मुंबईवरून आलेला व्यक्ती पॉझिटिव्ह आला म्हणून शॉकमध्ये जाणे ही योग्य नाही. अनेक गावामध्ये तर मुंबईहून आलेल्या व्यक्तीला अतिशय तिरस्काराची वागणूक मिळत आहे. शेवटी हा आपलाच देश आणि आपलाच महाराष्ट्र आहे. ही मुंबईही आमचीच आहे. तिला गुणदोषासह स्वीकारले पाहिजे.
शास्त्रज्ञांना लस अथवा गुणकारी औषध मिळेपर्यंत आपल्याला कोरोनासह जगायचे आहे. आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून स्वीकारायचे आहे. शेवटी आरोग्य आणि अर्थव्यवस्था ही आपल्या गाडीची दोन चाके आहेत. दोघांचेही संतुलन ठेवत, नेहमी पेक्षा कमी वेगाने, अडखळत का होईना मात्र जिद्दीने आणि कोरोनाला हरवण्याच्या निर्धारानेच आपण पुढे वाटचाल केली पाहिजे असे मला वाटते. या संकटातही निर्माण होणाऱ्या नव्या रोजगार व उद्योगांच्या संधी शोधल्या पाहिजेत. यासाठी आपण प्रशासनाला नेहमी विधायक मदत करतच आहात, यावरही आपणा सर्वांचे मत, उपाय , टीका, टीप्पणीचे मनापासून स्वागत आहे.