प्रिय ए.आर,
तुला मी साधारण रोजापासून ऐकतोय. त्याही आधी 'स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट'चं तू दिलेलं संगीतही मला आवडलं होतं. 'रोजा' आला आणि तू धमाका केलास. त्यानंतर एकापेक्षा एक उत्तम गाणी तू दिलीस. त्या गाण्याची नावं.. सिनेमांची नावं मी इथे घेत नाही. कारण त्याची गरज इथे नाही. हे पत्र लिहिण्यामागचा उद्देश आज जरा वेगळा आहे.
कालपासून तुझं नवं स्टेटमेंट गाजतंय. तुझं ते स्टेटमेंट असं, 'मला वाटतं, माझ्याविरोधात मुंबईत एक टोळी सक्रिय आहे. ती माझ्याबद्दल अफवा पसरवतेय. कदाचित म्हणून माझ्याकडे आज हिंदी सिनेमाचं काम येत नाहीय. 'दिल बेचारा'साठी मी दोन दिवसांत चार गाणी करून दिली. त्यावेळी मुकेश छाब्रा मला भेटला माझ्याशी बोलला. माझ्याकडे न जाण्याबद्दल त्याला अनेकांनी त्याला सुचवलं. मी डार्क सिनेमे करतो. म्हणून माझ्याकडे जाऊ नये असं सुचवण्यात आलं. पण माझा नशीब आणि इश्वरावर विश्वास आहे. जे आपल्याकडे काम येतं ते इश्वराकडूनच येतं..'
तू खरंच बोललास असं? आणि तू जर बोलला आहेसच, तर या विधानाची सुरूवात तू 'आय थिंक..'पासून केलीस. या 'मला वाटतं..'ला काय अर्थ असतो? 'आय थिंक'ने सुरू केलेल्या गोष्टीत दोन पर्याय असतात. एक, तू विचार करतोयस तसं असेलही किंवा दोन, तसं नसेलही कदाचित. असो.. असेल असं आपण गृहित धरू. पण त्याच्या हिंटस काही आहेत की नाही? फक्त मुकेश छाब्रा म्हणाला म्हणून तू अशी स्टेटमेंट देणं हे तुला पटतं?
अरे तू कोण आहेस? तू कोट्यवधी भारतीयांचा देव आहेस. तू केवळ भारतच नव्हे, तर जगभरातल्या संगीतप्रेमींवर गारूडं केलं आहेस. तू कुणाचा संदर्भ देऊन बोलतोयस? मुकेश छाब्राचा? कोण मुकेश छाब्रा?आत्ता 'दिल बेचारा'च्या निमित्ताने तो माहीत झाला. तो तुझ्याकडे आला आणि त्याला दोन दिवसांत चार गाणी दिल्याचं तू सांगतोस. आता या 'दोन दिवसात चार गाणी..' यावर बोलू. या तुझ्या 'दोन दिवसात चार गाण्या'चा कुणीही कसाही अर्थ काढेल. म्हणजे, रेहमान, तू असा नव्हतास. तू एका सिनेमातल्या गाण्यासाठी सहा सहा महिने कष्ट घ्यायचास. एक जाहिरातीची ट्यून करायला दीड महिना घेतला होतास. मग तू दिवसाला दोन गाणी कधीपासून करू लागलास? तर हा काळाचा महीमा असतो.
आता यावरून 'रेहमान पूर्वी गाण्यावर फार कष्ट घ्यायचा. हल्ली दिवसाला दोन गाणी करतो' असं कुणी म्हटलं तर त्यात वावगं काय? काळाचा भाग असतो देवा. जशी मागणी तशी पुरवठा. छाब्रा तुझ्याकडे फार ऐनवेळी आला असणार.. त्याला लगेच गाणी हवी असणार.. तू बनवून ठेवलेल्या ट्यून त्याला दिल्या असणार.. आता हा भाग समजून घ्यायचा येतो. म्हणून इथल्या इथे दोन दिवसात चार गाणी या मुद्द्याचे दोन मतप्रवाह तयार झाले बघ. मुद्दा असा, की तू कधीच अशा वादात काही बोलला नव्हतास. तू कधीच संगीताव्यतिरिक्त इतर बाबीत लक्ष घातलं नव्हतंस.
तुझ्याकडे काम नाहीय हे तुला सांगायचं आहे का? तुला हिंदीत आणखी काम करायचं आहे हे तुला सांगायचं आहे का? तुला काही मेसेज द्यायचा होता का? मग तुला जे काही म्हणायचं होतं ते थेट म्हणायचंस की. साधं ट्विट केलं असतंस.. कुण्या मीडियाला बोलावून इंटरव्हू दिला असतास तरी त्यात हे मेन्शन करता आलं असतं. पण ज्या पद्धतीने तू हे बोललास ते गंभीर आहे. म्हणजे, ए.आर.रेहमान म्हणत असेल तर त्यात तथ्य असणारच. असं मानणारे 100 पैकी 90 लोक आहेत. उरलेल्या 10 लोकांना प्रश्न हा पडला आहे की ही कुठली टोळी आहे? रेहमानने काही हिंट्स का नाही दिल्या? त्याने आलेला एखादा अनुभव का नाही सांगितला?
कंगना रनौत, सोनु निगम यांची उदाहरणं आहेतच की. त्यांच्या प्रत्येक मताशी मी सहमत नाही. पण ही मंडळी नाव घेऊन बोलताहेत. तुला टोळीचा अनुभव कधी आला? की फक्त मुकेश छाब्रा म्हणतोय म्हणून तू हे सांगतोयस? तू इतक्या हलक्या कानाचा आहेस का रे?
रेहमान.. तू ए.आर. रेहमान आहेस.
जो जवळपास 30 वर्षं भारतीय सिनेसंगीतावर राज्य करतो आहे. ज्याने दोनदा ऑस्करवर आपलं नाव कोरलं आहे. जगभरात ज्याला मान्यता आहे तू तो द ए.आर. रेहमान आहेस. आणि तू मुंबईतल्या एका टोळक्याबद्दल बोलतोयस?
तू बोल ना. तू बोलच. पण आता सविस्तर बोल. टपली मारून जायचं नाही. मुकेश छाब्रा तुला काय म्हणाला..? कोणती टोळी काय बोलतेय तुझ्याबद्दल..? हे सगळं यायला हवं त्यात. विषय तू काढलास..आता जबाबदारी तुझी. आमच्या मराठीत म्हण आहे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. हा तसा प्रकार आहे.
तू 90 च्या दशकात जेव्हा आपला सिनेमा घेऊन आलास तेव्हा आपल्या कामातून तू या स्पर्धेच्या पलिकडे गेला होतास. तू संगीतकारांच्या स्पर्धेत कधीच नव्हतास. कसल्या टोळीच्या, अफवांच्या गोष्टी करतोयस? तुझे आरोपच मुळात सरधोपट आहेत. अरे इथे जो प्रसिद्ध आहे त्याच्या वावड्या उडतातच. त्याच्याबद्दल बाहेर काहीही बोललं जातं. आमच्यासमोर उदाहरणं आहेत. मराठीतल्या नावजलेल्या संगीतकारांबद्दलही असं बोललं जातं. ते पुढचं दीड वर्ष बिझी आहेत ते अमुक कोटीच्या खाली मानधन घेत नाहीत इथपासून अनेक वावड्या उठत असतात. पण त्यांच्याकडून ज्याला संगीत करून घ्यायचं आहे तो त्यांना भेटतो. त्यांच्याशी बोलतो. संगीतकाराला काम आवडलं तर तो करतो. हे तुलाही नवीन नाही.
तशा दंतकथा तुझ्याबद्दलही होत्या. तू कसा रात्रीच काम करतोस.. तुझ्यासाठी हिंदीतले बडे बडे दिग्दर्शक कसं आपलं वेळापत्रक बदलतात... याच्या बातम्या आल्या होत्याच की आमच्याकडे. काम करताना कसा ऐरोगंटली काम करतोस असंही लोक बोलत होते. पण या बातम्य फार चालल्या नाहीत कारण, तू कामात चोख होतास. तू आपल्या गाण्यातून कस्तुरी वाटत होतास.तू केलेल्या स्टेटमेंटमध्ये तुझ्याकडे काम नाही म्हणतोस तू. असं असूही शकतं. तुझ्याकडे नसेल कदाचित काम. किंवा आता तू जरा मोकळा असशील..काहीही असो. पण, देवा, काळ बदललाय. तुझ्या गाण्यांना स्पर्धा करतील.. किंबहुना तू आत्ता देत असलेल्या गाण्याला लाजवतील अशी गाणी अनेक प्रादेशिक भाषातले संगीतकार देऊ लागले आहेत. हा काळाचा भाग आहे. शिवाय तूही बिझी आहेसच की दक्षिणेत. (आता तू दक्षिणेत बिझी असशील ही अफवा नसेल असं मी मानतो.)
अचानक 'दिल बेचारा' यायला लागतो.. आणि त्यावर तुझं असं स्टेटमेंट येणं हे 'ठरवून' केलेलं काम वाटतं. एक मिनिट, तुला असं वाटू नये की मी काही त्या टोळीचं वकिलपत्र घेतलंय की काय.. तसं अजिबात नाही. तुझं हे स्टेटमेंट माझ्या वर्मी लागलं आहे. आता मला पाहायचंच आहे की ती कोण टोळी आहे.. ती कोण टोळी आहे जी तुला काम मिळू देत नाही. गोष्ट साधी सरळ आहे, देवा. जर मुकेश छाब्रासारखा नवोदित दिग्दर्शक तुला भेटून गाणी करू शकतो तर इतर मंडळी येऊच शकतात की तुझ्याकडे. तू तुझ्या 'दिल बेचारा'च्या कामातूनच तो मेसेज दिला होतास. मग मुकेश छाब्राने तुला इंडस्ट्रीतल्या अनेक गोष्टी सांगितल्या.. वगैरे वगैरे जे तू सांगतो आहेस, या तुला माहित नव्हत्या? लोक आपल्याबद्दल काय बोलतात हे तुला माहीत नव्हतं?
तुझ्याकडे गाणाऱ्या गायिका-गायक गावभर गात असतात. उलट त्या न्यायाने तुला प्रत्येक गोष्ट कळायला हवी. पण तू केवळ छाब्राचं नाव घेतलंस. मला तुझ्या स्टेटमेंटबद्दल आक्षेप नाहीय. हे स्टेटमेंट खूप कॅज्युअली झालंय असं दिसतं. तसं असेल तर हा प्रकार कॅज्युअल नाहीय.
तुझा चाहता म्हणून... पत्रकार म्हणून.. मला आता पुढची स्टेप ऐकायची आहे.कुठल्या टोळीबद्दल बोलतोयस तू? कोण आहेत या टोळीत? आणि मुकेश छाब्राला तुझ्याकडे न जाण्याबद्दल कुणी सुचवलं होतं? याची उत्तरंही आता तुला द्यायला हवीत. कारण, तू या वादात उडी घेतली आहेस. इथे प्रत्येकजण प्रत्येकाबद्ल अफवा पसरवत असतो. काही लोक मुद्दाम ते करत असतात काही लोकांना सांगोवांगी कळतात या गोष्टी.
आता तू ए.आर.रेहमान आहेस. तू जगविख्यात आहेस. त्यामुळे तू बिझी असण्याच्या कांड्या पिकणं यात बातमी नाहीय. तू अवाजवी मानधन घेणं हेही खोटं असेल तरीही मान्य असेल बहुतांश जणांना. पण तू फार डिप्लोमॅटिक भाष्य केलं आहेस. माझ्याकडे चांगल्या फिल्म येत नाहीत असंही म्हणतोयस तू. आता 'चांगल्या फिल्म' हे पु्न्हा व्यक्तिसापेक्ष आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तुझं हे स्टेटमेंट येणं हे व्यक्तिश: मला झेपलेलं नाही. हरकत नाही. तुझी मर्जी. तुला ते महत्वाचं वाटतं.
हे बघा.. आमच्यासाठी तू बाप संगीतकार आहेस. असा तू.. जेव्हा मुंबईतल्या टोळ्यांबद्दल बोलून नाराजी नोंदवू लागतोस तेव्हा वाटू लागतं . अरेच्चा, तुझाही कोणीतरी बाप आहे की काय..?आता माझं म्हणणं हे, तो बाप दाखवच. बघूच या आपण हा बाप कोण आहे..
हा बाप दाखव.. नाहीतर चल, आपण त्याचं श्राद्ध घालू.
कळव
सौमित्र