होय... रविवारी क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर खऱ्या अर्थानं क्रिकेटच जिंकलं असं मी म्हणेन. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत कोण जिंकणार आणि कोण हरणार हे सांगणं कठीण. याच नियमानं एक क्रिकेट स्कोरर म्हणून सामना संपायच्या आधी मी आजवर कधीच सामन्याचा निकाल स्कोरशीटवर लिहिला नाही. (आता क्रीडा पत्रकारितेत मात्र जिंकल्याच्या आणि हरल्याच्या दोन्ही बातम्या सामना संपायच्या आत तयार ठेवाव्या लागतात.) पण विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सामन्याचा अंतिम चेंडू पडूनं, त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही एखाद्या संघाला निर्विवाद यश मिळत नाही, त्याक्षणी कोण भारी ठरतं? हा खेळच ना? पटतंय का?


Cricket is a game of glorious uncertainties... असं क्रिकेटमध्ये एक वाक्य आहे. या वाक्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. क्रिकेट हा खरोखरंच अनिश्चिततेचा खेळ का आहे हे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे साक्षीदार झालेल्या लाखो-करोडो जणांच्या लक्षात आलंच असेल.
सामना टाय झाला... त्यानंतर सुपर ओव्हर टाय झाली... आणि मग सामन्याचा निकाल लागला तो दोन्ही संघांनी फटकावलेल्या चौकार आणि षटकारांच्या निकषावर. न्यूझीलंडनं अंतिम सामन्यात १७ चौकार-षटकार लगावले. पण या बाबतीत इंग्लंडची बाजू उजवी ठरली. इंग्लंडच्या तराजूत २६ चौकार-षटकारांची रास होती. त्यामुळे निकालाचं पारडं इंग्लंडच्या बाजूनं झुकलं. आणि लॉर्ड्सवर इतिहास घडला.

ऑइन मॉर्गनच्या फौजेनं खरंतर गोलंदाजीत कमाल दाखवून सामन्यात वर्चस्व मिळवलं होतं. पण त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांना किवी आक्रमण भेदणं कठीण गेलं. अपवाद बेन स्टोक्स आणि जॉस बटलरचा. स्टोक्स आणि बटलरची ११० धावांची भागीदारी इंग्लंडच्या चाहत्यांच्या मनात कायमची कोरली जाणार. कारण या भागिदारीनं त्यांना एका ऐतिहासिक क्षणाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. पण त्यांना तो उंबरठा गाठून देण्याची मदत कोणी केली असेल तर ती ट्रेंट बोल्ट आणि मार्टिन गप्टिलनं.

होय... जिंकण्यासाठी 9 चेंडूत 22 धावांचं आव्हान असताना स्टोक्सचा मिडविकेट सीमारेषेजवळ उडालेला झेल ट्रेंट बोल्टनं घेतला खरा पण त्याच्या काही इंच मागे सीमारेषा असल्याचं तो विसरला. आणि त्याचं ज्यावेळी त्याला भान आलं तेव्हा स्टोक्स आणि इंग्लंडच्या खात्यात सहा धावा जमा झाल्या होत्या. त्य़ाच वेळी नियतीनं केन विल्यम्सनच्या हातात जाणारा विश्वचषक काढून घेतला. पण तिनं तो अजूनही इंग्लंडकडे सोपवला नव्हता. ते काम अखेरच्या षटकात मार्टिन गप्टिलनं पार पाडलं.

इथं नियती खरंच किती निष्ठूरपणे वागली बघा. सेमीफायनलमध्ये याच गप्टिलच्या एका अप्रतिम थ्रोवर धोनी धावचीत झाला आणि न्यूझीलंडला फायनलचं तिकीट मिळालं. गप्टिल रातोरात हीरो झाला. किवी प्रसारमाध्यमांत आणि सोशल मीडियात त्याच्या कर्तबगारीची वाहवा झाली. पण त्या यशाचं मोल केवळ तीनच दिवस टिकलं. याच गप्टिलच्या फायनलमधल्या शेवटच्या षटकातल्या थ्रोमुळे ते मातीमोल झालं. खरंतर यात गप्टिलची चूक मी म्हणणार नाही पण त्या चुकीला तो कारणीभूत ठरला. अगदी कावळा बसावा आणि तक्षणी फांदी तुटावी तसाच. कारण त्यानं डीप मिडविकेटवरुन मारलेला थ्रो यष्टिरक्षक लॅथमच्या हातात विसावणार तोच, रन आऊट होऊ नये म्हणून स्टोक्सनं मारलेल्या डाईव्हमुळे तो थ्रो स्टोक्सच्या बॅटवर आदळला. चेंडूनं दिशा बदलली आणि थेट सीमारेषा गाठली. दोनच्या जागी सहा धावा इंग्लंडच्या खात्यात जमा झाल्या. आणि नियतीनं विश्वचषक म़ॉर्गनच्या झोळीत टाकला. पुढे जे काय झालं ते फक्त सोपस्कार होते. एका ऐतिहासिक विजेतेपदाचे आणि सलग दुसऱ्यांदा पदरात पडणाऱ्या पराभवाच्या कटू आठवणींचे...

ज्या इंग्लंडमध्ये क्रिकेटचं बीज रुजलं त्याच इंग्लंडला विश्वचषक जिंकण्यासाठी ४४ वर्ष वाट बघावी लागली. १९७९, १९८७ आणि १९९२ च्या विश्वचषकात इंग्ंलंडला फायनलमध्ये धडक मारुनंही विजेतेपदानं हुलकावणी दिली होती. पण ऑइन म़ॉर्गन आणि कंपनीनं तो इतिहास बदलला. फायनल गाठली आणि विश्वचषकावर नावही कोरलं. माईक ब्रेअरली, माईक गॅटिंग आणि ग्रॅहम गूचच्या संघाला शक्य झालं नाही ते मूळचा आयरिश असलेल्या ऑइन मॉर्गननं करुन दाखवलं.

मजेशीर गोष्ट म्हणजे इंग्लंडमधल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची हजारो तिकीटं अनेक भारतीयांनी विकत घेतली होती म्हणे. पण भारत विश्वचषकातून सेमीफायनलमधूनच बाद झाल्यानं त्यांनी ती लाखोंना विकली. पण ज्यांनी खरच लाखो रुपयांना तिकीट घेतली आणि लॉर्ड्सवरच्या त्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले त्या सर्वांना त्या तिकिटासाठी मोजलेली किंमत ही आता फुटकळ वाटत असेल. त्यांनी ती तिकीटं आता आपल्या तिजोरीत आयुष्यभर जपून ठेवावीत. किंवा फ्रेम करुन भिंतीवर लटकवून, आलेल्या गेलेल्यांना दाखवून ऐटीत मिरवावं.

एकूणच विश्वचषकाच्या फायनलच्या निमित्तानं क्रिकेटची खरी मजा मनमुरादपणे अनुभवता आली. आणि हो न्यूझीलंड हरली... इंग्लंडनं विश्वचषक पटकावला... पण माझ्यासारख्या सर्वसामान्य क्रिकेटरसिकाला त्या सामन्याविषयी विचाराल तर तुम्हाला एकच उत्तर मिळेल... लॉर्ड्सवर खरच क्रिकेट जिंकलं...!!
वेल डन इंग्लंड.... हार्ड लक न्यूझीलंड...!!