Ashadhi Ekadashi 2023:

  किती ते प्रेम.... विठ्ठलाचं वारकऱ्यावर आणि वारकऱ्याचं विठ्ठलावर...ही ओळ जितकी सहजपणे वाचली गेली तितकं हे प्रेम सोप्प नाहीये बरं का... हे प्रेम फार सायासातून झालंय. चालून चालून पार तळपायाला भेगा पडल्यात...टाचांमधून रक्त येतंय...त्या पायांच्या वेदनांची मात्र तमा नाही इतकं ते प्रेम. विठूरायापण या प्रेमाची परफेड करायली कमी पडत नाहीये बरं का. किंबहुना त्याचंच जास्त प्रेम आहे वारकऱ्यावर असं म्हटलं तरी चालेल.... सुरकुत्या पडलेले हात पाय फुगडीत रमलेत.... उतरत्या वयात असलेला पाठीचा कणा आता आवाज न करता वारीत दंग होऊन नाचतोय... पावसाच्या ओढीने पाणावलेले डोळे आता विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेत...शेतीची नोकरीची उद्योग धंद्याची चिंता तिकडे आपापल्या ठिकाणी सोडून लेकरं विठ्ठलाची एक नजर भेट होण्यासाठी कित्येक किलोमीटर चालत त्याच्या ओढीने निघतात तेव्हा कल्पना होते ते त्याच्या ओढीची. हेच ते प्रेम जे लेकरांना माऊली पर्यंत सहज ओढत नेतं.....कमरेवर हात ठेऊन उभा ठाकलेला विठुराया पण तिकडे भेटीसाठी व्याकुळ होऊन वाट पाहत ऊभा ठाकला असणार. कारण त्यालाच  राहवत नाहीये. म्हणूनच वारीत अश्वांच्या टापांबरोबर तो स्वत: धावतोय... स्वत: रिंगणात उतरलाय, शिस्तीत फेर धरणारा तो खुद्द विठ्ठल आहे. वारी संपेपर्यंत खाकीत दोन हात कंबरेवर ठेऊन उभा असलेला तोच तो...


शहरांत गावागावंत रोज आपल्या घरांत निवांत असणारी लेकरं रात्री-अपरात्री वारीत वस्तीला थांबतात तेव्हा नकळत गस्त ठेऊन संरक्षण करणारा विठुराया एक आचपण निजलेल्या वारकऱ्यांजवळ येऊन देत नाही. तहान भूक शमवून नाचणारे वारकरी कधी दिवस मोजत नाहीत पण तो विठोबा दिवस मोजतोय... कधी एकदा भेट होतेय असं झालंय त्याला. आग ओकणाऱ्या सूर्याला तर शमवलंच पण इतरत्र धो धो बरसून उतमात घालणाऱ्या पावसालापण वारीच्या मार्गातच नेमकं आवरतं आणलंय...हा योगायोगच का? फक्त एक योगायोग?


काही सेकंदाच्या भेटीत किती जणांचे गाऱ्हाणे तो ऐकत असणार नाही? भेटीसाठी आसुललेल्या माऊलीची नजरानजर होते तेव्हा काय तो आनंद होत असणार. शब्दांत सांगता येणार नाही इतका तो आनंद. महिनाभर चालेल्या देहाचा शीण एका झटक्यात उतरतो त्या एका दर्शनाने. खरंतर विठुराया वारकऱ्यांना आधीच भेटून गेलेला असतोय बहुतेक नकळतच. कारण अविरत शिस्तीत चालणाऱ्या या दिंड्या आणि वाऱ्या येड्यागबाळ्याचं काम नव्हे. कोणत्याही मोठ्या मॅनेजमेंटशिवाय हजारो वारकरी विठ्ठलनामाचा जप करत चालतात तेव्हाच तो विठुराया त्याच्यातच राहून सगळं सांभाळत असणार. तोच हे सगळं इतकं कौतुकाने पाहतोय की वारकऱ्याची पायी दिंडी तो स्वत: जगतोय. कित्येक तास हातात पालखी नाचवली जाते तेव्हा पालखीचा भार नकळत कमी करणारा तोच आहे...पालखीमागे वेड्यासारखे वारकरी पळतात...धावतात... इतक्या भल्या मोठ्या गर्दीत एकालाही दुखापत न होऊन देण्याची जबाबदारी तो स्वत: घेतोय...आया बहिणींना, लेकरांना दिवस रात्र सुरक्षित चालवतोय. प्रत्येकजण समोरच्याला 'माऊली' म्हणतंय...म्हणूनच की काय तो स्वत: वारीत हजर आहे.


तिकडे चंद्रभागा सज्ज आहे ती आषाढी एकादशीच्या दिवशी अवघा महाराष्ट्र मायेने जवळ घेण्यासाठी. चंद्रभागेत स्नान केल्यावर जणू वर्षभराचं मळभ मिटलेलं असतंय. दुसरीकडे महापूजेचा मान मिळाल्यावर त्या माऊलींना अवघ्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आता पुढचा जन्म मिळाला नाही तरी चालेल. जन्मोजन्मीचं पुण्य एकवटल्यावर काय होत तर हे होतं. त्या पुण्याला एकत्र करुन त्या एका आरतीचा मान मिळालेला असतो. हजारो लाखो वारकऱ्यांमधून त्या एका मानाच्या वारकऱ्याला निवडताना माऊली काय विचार करत असेल बरं? त्यालाच का निवडत असेल? असो...पण त्या गभाऱ्यातल्या पुजाऱ्याची पुण्याई पण काही कमी नसणार. पण मला वाटतंय माऊलीचं प्रेम सगळ्यांवर सारखंच असणार नव्हे आहेच.


प्रत्येक ठिकाणी सारखंच अस्तित्व.... शेतकरी चालत पंढरपुराकडे निघतो तेव्हा तिकडे त्याच्या शेतीची काळजी घ्यायला स्वत: विठ्ठल तिकडे उभा आहे. इकडे लहानगी पोरं नाचत निघतात तेव्हा त्यांच्या इवल्याश्या पायांना कौतुकाने बघणारापण तोच, आया बहिणी आहे त्या लुगड्यावर दिवस रात्र चालताना त्यांना प्रसन्न ठेवणारापण तोच, काय ड्रोन आणि काय कॅमेरा... ज्या कोपऱ्यात आपली नजर जाऊच शकत नाही तिथेपण गरीबाला शिदोरी पुरवणारा तोच. वारीत डॉक्टर बनून वारकऱ्याचे हात पाय तपासणारा, हवं नको ते पाहणारा तोच, दुखत्या पायाला वैद्य तपासतो तेव्हा साक्षात विठ्ठलच वारकऱ्याच्या चरणाला स्पर्श करतो की काय? करत असावा! डोईवरच्या तुळशी मायेला ताकीद देतोस ना? भार जाणवू देत नाहीस. मस्तकावर चंदनाचा टिळा स्वत: गिरवतोस ना? खरं सांग वारकऱ्याच्या डोक्यावरची ती पांढरी टोपी स्वत: डोक्यावर घालतोस ना? ...विठोबा, मला माहितीये - तुझा वारकरी सोडला तर तू एवढं आभाळाएवढं प्रेम कुणावरच करत नाहीस...मला माहितीये!


तो मुळी कंबरेवर हात ठेऊन उभा नाहीच. त्याचे हात अविरत झटत आहे...त्याच्या वारकऱ्यांसाठी गेले कित्येक दिवस तो राबतोय...त्या एका क्षणाची वाट पाहतोय. एक एक पाऊल मोजतोय. रित्या हाताने गाभाऱ्यात पोहचलेल्या वारकऱ्याची त्याला गळाभेट घ्यायची आहे. परतताना भरल्या हाताने त्याला पाठवायचं म्हणून विठ्ठला केवढा तो अट्टाहास. किती ते प्रेम. या लाखों वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जरा थकवा जाणवू देत नाहीस, तुझ्या मायेने जी ऊर्जा मिळतेय ती सागराप्रमाणे अथांग आहे... कुठुन आणतोस इतकं प्रेम?


तुझं दर्शन घेऊन वारकरी माघारी पततो तेव्हा तुझ्याही डोळ्यात पाणी येत असणार ना? परताताना म्हणूनच मोठी शिदोरी देतोस ना? कि तू आल्या पावली परत तसा वारकऱ्याच्या घरी परततोस? त्याच्याच सोबत जातोस? मला माहितीये तुला करमत नाही. मला माहितीये एक वेळ रखुमाई रुसली तर चालेल पण तू या वरकऱ्याला रुसु देत नसणारेस. कारण तुलाच करमत नाही रे. तुलाच करमत नाही........