कोरोनामुळे यंदाची आषाढी यात्रा खरेच वेगळी ठरली , वारकऱ्यांविना आषाढी होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ म्हणावी लागेल . ज्या ठिकाणी लाखोंचा भक्तिसागर पंढरपुरात जमा होतो आणि ग्यानबा तुकारामाचा जयघोष आसमंत दुमदुमून टाकतो त्या ठिकाणी यंदा होती ती फक्त निरव शांतता आणि पोलीस गाड्यांच्या सायरनचा आवाज . कोरोनाच्या संकटामुळे आळंदीहून ग्यानबा ते नगर येथून निळोबा पर्यंत सर्व पालखी सोहळे लाखोंचा जनसागर सोडून मोजक्या मानकऱ्यांसह एसटी बसने आले आणि दुसऱ्या दिवशी देवाची भेट घेऊन परतही गेले . यावेळी राज्यभरातील लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचे रूप आठवत घरूनच वारीचा आनंद घेत होते . यात्रा निर्विघ्न पार पडली , मुख्यमंत्री येऊन पूजा करून गेले , मानाचा वारकरी देखील उभा करून परंपरा जपल्याचे गवगवा मंदिर समितीने केला आणि लाखो विठ्ठल भक्तांनी हे सर्व गोड मानून घेतले .
आषाढी शांतपणे गेल्यावर सांगतासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्षाळ पूजेत गाभाऱ्यात पाणी अंगावर घेतल्यावर नवा वाद सुरु झाला आणि आता या वादाचे रूपांतर जातीच्या वाटेवर जाऊ लागल्याचे तर्क काही मंडळी चालवू लागली आहेत. मंदिराचा कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी असल्यानेच हा वाद संभाजी ब्रिगेड काढत असल्याचा दावा केला जात असला तरी हा व्हिडीओ काही संभाजी ब्रिगेडने काढलेला नाही आणि यात अधिकाऱ्याच्या अंगावर पाणी टाकले जात असल्याचे दिसत असल्याने या वादाला ब्राम्हण विरुद्ध ब्रिगेड असे रूप देणे सर्वस्वी चुकीचे आहे. वास्तविक प्रक्षाळ पूजा म्हणजे काही फार पुरातन परंपरा आहे म्हणणे धाडसाचे ठरेल . याचे मूळ नाव प्रक्षालन म्हणजे सफाई असा आहे. आषाढीच्या दरम्यान पूर्वीपासून हजारो भाविक मंदिरात आल्याने मंदिर घाण होते आणि ते साफ करण्यासाठीची ही प्रक्षालन पूजा ज्याचे नाव पुढे प्रक्षाळ पूजा असे पडले. बडवे उत्पातांच्या काळात या पूजेचे औचित्य मंदिरासोबत देवाचा गाभारा आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची सफाई अशीच होती. आषाढी दरम्यान पंचमीपासून पुढे जवळपास 15 दिवस यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन देता यावे यासाठी देवाचा पलंग काढला जातो ज्यामुळे देव झोपत नाही अशी भावना यात असते . यावेळी देवाचे सर्व नित्योपचार बंद करून केवळ रोजची नित्यपूजा, नैवेद्य, पोशाख आणि संध्याकाळी लिंबूपाणी यासाठी दर्शन थोड्याकाळासाठी बंद असते. या पंधरा दिवसात देव झोपत नसल्याने मंदिरही २४ तास उघडे असते.
यंदा मंदिराच्या विरोधात वाद उद्भवणार हे निश्चितच होते. कोरोनामुळे यंदा संप्रदायाच्या अनेक स्थानिक परंपरा होऊ दिल्या नव्हत्या. आषाढी ते कार्तिकी या पवित्र चातुर्मासाच्या काळात संप्रदायाने मागितलेल्या परवानग्या प्रशासनाने नाकारल्याने वारकरी संप्रदायातील काही मंडळी रागात होती. यातच आषाढी एकादशीला ना चंद्रभागेचे स्नान करता आले ना कळस दर्शन ना नगर प्रदक्षिणा यातच मंदिर प्रशासनाने आषाढी काळात कोणालाच मंदिरात प्रवेश न दिल्याने समितीकडून जे व्हिडीओ अथवा फोटो मिळायचे त्यावरच प्रसिद्धी माध्यमांना आपले काम करावे लागत होते. यावेळी एक शंका राज्यातील लाखो भाविकांच्या मनात कायम होती ती म्हणजे 24 तास अॅपवर देवाचे दर्शन सुरु असताना अचानक अनेक वेळा त्या सीसी टीव्ही स्क्रीन वर पिवळा पडदा का येत होता? यामुळेच या काळात चोरीछुपे दर्शनासाठी तर कोणाला सोडत नव्हते ना अशी शंका पिवळ्या पडद्याचे रहस्यही गुपितच राहिले.
ज्या गोष्टीमुळे वादाला तोंड फुटले तो व्हिडीओ देखील मंदिर समितीनेच दिलेला होता. या क्लिपमध्ये देवाला अभिषेक घालत असताना पूजा करणारे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि बालाजी पुदलवाड यांच्या अंगावर त्यांच्या कोणीतरी कर्मचाऱ्याने तांब्यातील पाणी ओतले. ही क्लिप व्हायरल झाली आणि संभाजी ब्रिगेडने यावर आक्षेप घेत देवाच्या अभिषेकाचे पाणी अधिकाऱ्यांच्या अंगावर ओतल्याबद्दल कारवाईची मागणी सुरु झाली. मंदिरात स्नानाची प्रथा ही बडवे काळापासून चालत आलेली आहे . यात प्रक्षाळ पूजेला देवाचा शिणवटा काढण्यासाठी प्रथम लिंबू साखर लावून चोळायचे आणि त्यानंतर देवाला रुद्राभिषेक करीत गरम पाण्याने अभिषेक घालायचा अशी परंपरा होती . याला देवावर पाणी उधळणे हा शब्दप्रचार रूढ आहे. प्रक्षाळ पूजेच्या वेळी मंदिर धुतल्यानंतर आणि विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक झाल्यानंतर उरलेल्या पाण्याने मंदिरात स्नान करण्याची परंपरा आहे . मंदिरातील महालक्ष्मीच्या मंदिरासमोर समोर चुली मांडून मोठं मोठ्या हंड्यात गरम केलेले पाण्याने याच ठिकाणी स्नान केले जायचे. म्हणजे मंदिरात स्नान करायची प्रथा नक्कीच आहे मात्र ती गाभाऱ्यात नाही तर मंदिराच्या दुसऱ्या भागात , पण प्रथा परंपरांची माहिती नसलेल्या कर्मचाऱ्यांनी देवाला स्नान घातल्यानंतर एक तांब्या तसाच कार्यकारी अधिकाऱ्याच्या अंगावर टाकला आणि नव्या वादाला तोंड फुटले .
आता आषाढीच्या काळात दुखावलेले अनेक मंडळी आता मंदिर समिती आणि प्रशासनाच्या विरोधात एकवटायला सुरुवात झाली असून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे . आता अभिषेक सुरु असताना अधिकाऱ्याच्या अंगावर पाणी टाकणाऱ्यांवर ही कारवाई करायची का परंपरेची माहिती नसताना देवावर उपचार करणाऱ्या मंदिर प्रशासनावर करायची असा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे . वादाचे तत्कालीन कारण कोणतेही असले तरी यंदा आषाढीमुळे वाद हा होणारच होता. शासन, मंदिर समिती आणि प्रशासनावरील राग निघतोय तो या प्रक्षाळ पूजेत. बाकी काही असले तरी आषाढी म्हणजे देवशयनी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत वारकरी संप्रदायाच्या मान्यतेनुसार विठुराया निद्रित असणार असल्याने त्याच्या दृष्टीआड सुरु असलेल्या या सर्व सावळ्या गोंधळापासून बिचारा देव मात्र अनभिद्न्य राहील असे म्हणणेच हितकारक आहे . एकंदर यंदाच्या आषाढीचे कवित्व वारकरी संप्रदायात वर्षानुवर्षे चर्चिले जाईल हे मात्र नक्की.