>> संतोष आंधळे


कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात आणि त्यातच मुंबईमध्ये वाढत असताना, आपल्याकडे गेल्या काही दिवसात एसिम्पोटोमॅटिक (लक्षणविरहित) रुग्णांची चाचणी करावी का? तर ती कशा पद्धतीने करावी, की केलीच पाहिजे, नाही केली तरी चालेल का? हे रुग्ण असतात कुठे? ते ओळखायचे कसे? त्यांच्यापासून समाजाला काही धोका आहे का? अशा विविध प्रश्नांना उधाण आले आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये याविषयी भीती निर्माण झाली आहे. खरंतर भीती पेक्षा अधिक कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली.


या सगळ्या प्रक्रियेत आपल्याला प्रथम एसिम्पोटोमॅटिक रुग्ण म्हणजेच (कोणतेही लक्षण नसलेले) लक्षणविरहित रुग्ण म्हणजे नेमके काय आहे, हे आधी व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. वैद्यकीय शास्त्रानुसार, एखादा व्यक्तीला संबंधित आजाराबद्दल कोणतेही लक्षणं नसणं, मात्र जर त्याची आजारासंबंधित असणारी चाचणी केली तर तो आजार त्याला असल्याचं चाचणीत स्पष्ट होणं याला लक्षणंविरहित रुग्ण असे म्हणतात. तसेच त्याला त्या आजाराचा वाहक, असंही म्हटलं जाऊ शकतं. लक्षणविरहित रुग्ण हे अनेकवेळा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले त्यांचे कुटुंबातील सदस्य, त्यांचे शेजारी असू शकतात किंवा अनेक आरोग्य कर्मचारी जे ह्या रुग्णांवर सध्या उपचार करत आहेत, असे अनेक जण. त्याचप्रमाणे काही लक्षणंविरहित रुग्ण असेही आढळून आले आहेत, की ते कुठेही इतर रुग्नांच्या संपर्कात आलेले नाहीत.


आरोग्य तज्ज्ञांनुसार जोपर्यंत चालता-बोलता धडधाकट माणूस हा लक्षणंविरहित रुग्ण असू शकतो की नाही हे त्याची चाचणी केल्यावशिवाय सांगणे कठीण आहे. आता ह्या नियमानुसार कुणीही माणूस हा लक्षणंविरहित रुग्ण असू शकतो. "आपल्याकडे सध्या भारतीय आरोग्य संशोधन परिषदेने नेमून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार चाचण्या केल्या जात आहे. एखादा कोरोनाबाधित रूग्ण सापडला तर त्याच्या संपर्कातील आलेल्याला रुग्णांवर 5 दिवसाच्या आत आणि 14 व्या दिवशी चाचणी करावी असे अपेक्षित आहे. त्याच प्रमाणे राज्यभर सध्या चाचणी करण्याचे काम सुरु आहे. दुसरा विशेष महत्वाचा मुद्दा म्हणजे आजपर्यंत लक्षणंविरहित रुग्णाकडून संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे लोकांनी उगाच घाबरून जाण्याचे कारण नाही. याकरिता स्वतःची काळजी घेऊन तोंडावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे अशा उपाययोजना सर्व सामान्य लोक करू शकतात. सध्या दिसत असणाऱ्या रुग्णांच्या आकड्यात लक्षणंविरहित रुग्णांचे प्रमाण हे लक्षणीय आहे", असे आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात.


डॉ. आवटे पुढे असेही नमूद करतात की "मात्र त्याचवेळी जे लोकं 'हाय रिस्क' अती जोखमीच्या वर्गवारीमध्ये मोडतात म्हणजे संक्रमित रुग्णाच्या जे सान्निध्यात आले आहेत, मात्र त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत म्हणून अशा लोकांची चाचणी थांबवणे योग्य नाही. त्यांची चाचणी ही केलीच गेली पाहिजे. त्याचप्रमाणे असे काही लोक आहेत, जे भीतीपोटी कोणतेही लक्षण नसलेली कोणत्याही रुग्णांच्या संपर्कांत न आलेली परंतु चाचणी करण्याकरता आलेली, अशा रुग्णांच्या मात्र उगाच चाचण्या करणं योग्य नाही."


राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग दररोज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल तयार करत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्षणंविरहित रुग्णांचे प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विभागाने 19 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, ज्या 2748 रुग्णाचा आकडा घेऊन विश्लेषण केले आहे. त्यानुसार 65 टक्के म्हणजे 1790 रुग्ण हे लक्षणंविरहित असे आहेत. तर लक्षणं असलेल्या रुग्णाची संख्या 342 म्हणजे 13 टक्के, तर गंभीर स्वरूपाच्या रुग्णाची संख्या 50 म्हणजे 2 टक्के, तर रुग्ण बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 365 म्हणजे 13 टक्के इतकी आहे. तर आतापर्यंत एकूण 201, म्हणजे 7 टक्के रुग्ण दगावले आहेत.


परळ येथील ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ञ डॉ समीर गर्दे सांगतात की, " मी स्वतः या मताशी ठाम आहे की, उगाचच विनाकारण लक्षणंविरहित लोकांची चाचणी करू नये. मात्र कुणी जर या रुग्णाच्या सानिध्यातील सदस्य असतील तर त्यांची चाचणी करावी. आज पर्यंत कुठेही जगभरात कुणीही सांगू शकलेलं नाही की लक्षणंविरहित रुग्णामुळे संसंर्ग होतो. लक्षणंविरहित रुग्णांमुळे रुग्णसंख्येचा आकडा मोठा दिसतो. त्यामुळे लोकांनी लक्षणं असल्याशिवाय चाचणी करू नये. अन्यथा जर आपण लक्षणंविरहित रुग्णाच्या चाचण्या करत बसलो तर आपल्या चाचण्यांच्या किटचा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही."


ते पुढे असेही सांगतात की "चीनमध्ये कोरोनाची लागण ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरु झाली असून, आपल्याकडे पहिला कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात सापडला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात. मात्र डिसेंबर-फेब्रुवारी या काळात मी आणि माझ्या पेशातील सहकाऱ्यांनी, मित्रांनी श्वसनविकाराशी संबंधित अनेक रुग्ण तपासले आहेत. त्यावेळी कोरोना वैगरे हा काही प्रकार नव्हता. त्यावेळी आम्ही आम्हाला जी नियमित औषधं त्याकरिता जी लागतात ती देऊन रुग्ण बरे होत होते. त्याकाळात आपल्याकडे कोरोना होता की नाही हे कुणालाही माहित नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की लोकांनी या आजाराला घाबरण्याची अजिबात गरज नाही मात्र काळजी घेतलीच पाहिजे. मास्क लावून जर तुम्ही स्वतःची व्यवस्थित काळजी घेलती तर तुम्हाला कुठलाही प्रादुर्भाव होणार नाही."
फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जगात या आजाराच्या रुग्ण संख्येमुळे आणि त्यातील बळीच्या संख्यमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आज कोरोना कोणाला झालाय असं म्हटलं तरी नागरिक त्या विषयवावर साधक बाधक चर्चाहीं डोळे विस्फटून करत आहे. त्यामुळे काही लोकांना असं वाटतंय किंवा त्यांचा गैरसमज निर्माण झालाय की आता शासन सरसकट लक्षणंविरहित रुग्णांच्या चाचण्या करणारच नाही.


पुण्यातील के. ई. एम रुग्णालयात काम करणारे श्वसनविकार तज्ज्ञ, सांगतात की, " भारतीय आरोग्य संशोधन परिषदेने आपल्याला मार्गादर्शक तत्वे आखून दिली आहेत. त्याप्रमाणे चाचण्या कराव्यात या मताशी मी ठाम आहे. तसेच लक्षणंविरहित रुग्ण हा थोड्या बहुधा प्रमाणात संसर्ग देऊन शकतो. त्याचं निश्चित प्रमाण आता सांगणे कठीण आहे. त्यामुळे आपल्या आरोग्य विभागाने बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुळात लॉकडाउनच्या काळात कुणी बाहेर पडूच नये. आपण गृहीत धरून चालायचं की मोठ्या प्रमाणात जनता लक्षणंविरहित आहे. त्यामुळे सर्व प्रतिबंधात्मक उपाय जे आजपर्यंत केले जसे की मास्क लावणे, गर्दीत न जाणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि काळजी घेणे हे नियमित सुरु ठेवले पाहिजे.


अनेक लोकं हर्ड इम्युनिटी तयार झाली की हा आजार निघून जाईल, असं म्हणत आहेत. या मुद्द्यांचं स्पष्टीकरण देताना डॉ कुलकर्णी सांगतात की, हर्ड इम्युनिटी म्हणजे मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण एकमेकांमध्ये मिसळतील, तेव्हा आपल्याकडे हर्ड इम्युनिटी तयार होईल. याचा अर्थ असा की, संसर्गरोगाच्या आजारांपासून अप्रत्यक्षपणे संरक्षण प्राप्त होते. मात्र तो बाधित रुग्णांचा समूह निश्चित करण्यासाठी वैद्यकीय शास्त्रात काही नियम आहेत. त्या नियमानुसार 65 टक्के जनता ही बाधित होणे अपेक्षित असते. त्यानंतर लोकांमध्ये अँटीबॉडीज् तयार होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे हा आजार झाला तरी त्याची लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र आपल्याला या स्टेजपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. त्या आधीच या रोगावर आपण मात करू, असा मला विश्वास आहे. सध्या शासन जे उपाय योजना करत आहे, त्या बरोबर आहेत. त्यामुळे लोकांनी लक्षणंविरहित रुग्णांच्या बाबतीतील टेस्टिंगचा मुद्दा सोडून स्वतः या आजरापासून कसा बचाव करता येईल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग