पाच वर्षाचा जयनील वसईकर गेला. तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस जयनील मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला डायलेटेड कार्डीओमायोपॅथी ह्या आजाराने ग्रासलं होतं. या आजारामध्ये हृदयाचं पम्पिंग होण्याची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात कमी होते आणि हृदय बदलणं हा त्यावरील एकमेव उपचार असतो. मात्र याकरिता रुग्णाला मेंदूमृत व्यक्तीचं 'हृदय' मिळणं अपेक्षित असतं. भारतात मेंदूमृत व्यक्तीच्या अवयवदानाविषयी मोठ्या प्रमाणात उदासीनता आहे. आजही मेंदूमृत व्यक्तीचं अवयवदान या विषयांवर फार कमी लोकं बोलताना दिसतात किंवा जनजागृती ज्या प्रमाणात व्हायला हवी तेवढी होताना दिसत नाही. जयनील वर्षभर कॅन्सरसारख्या आजाराविरुद्ध लढून बरा झाला आणि ह्रदयाच्या आजाराने त्याला गाठलं. ह्या आजाराशी तो जोरदार झुंज देत होता, त्याच्या हृदयाचं पम्पिंग कृत्रिम पद्धतीने नियमित व्हावं म्हणून त्याला एकमो या मशीनवर ठेवण्यात आलं. या मशीनमुळे त्याच्या हृदयाचं पंपिंग होत आहे. त्याच्या हृदयाचे पम्पिंग केवळ 5-10 टक्के आहे, जे सर्वसाधारण 60-65 टक्के इतके असते. या मशीनवर कधी अतिदक्षता विभागात तर कधी साध्या स्वतंत्र वॉर्डमध्ये असे 45 पेक्षा जास्त दिवस त्यावर उपचार झाले, अखेर मंगळवारी त्याची  प्राणज्योत मालवली. त्यांच्या पालकांना उपचारासाठी पैसे नको होते, त्यांना हवं होतं ते मेंदूमृत व्यक्तीचं हृदय. महाराष्ट्रात, देशात अनेक ठिकाणी व्यक्ती विविध कारणामुळे मेंदूमृत होत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना अवयवदानविषयी फारशी माहिती नसते किंवा सांगितलं जात नाही. त्यामुळे आपल्याकडे अवयवदान कमी प्रमाणात होतं.


जयनील फक्त एक उदाहरण आहे, मात्र जयनील प्रमाणेच काही लहान मोठी माणसे आपल्या राज्यात हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत. साधारणतः 87 व्यक्ती आजही महाराष्ट्र राज्याच्या प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यांना हृदय हवं आहे, याकरिता त्यांनी त्याच्या नावाची नोंदणी संबंधित रुग्णालय आणि मेंदूमृत व्यक्तीच्या अवयवाचे नियमन करणाऱ्या राज्यात विभागावर चार संस्था आहे त्याला झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर (झेड टी सी सी )  असे म्हणतात, त्या मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथे कार्यरत आहेत, तिथे नोंदणी केलीय. या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च तसा खूप मोठा आहे, कधी -कधी तर तो खर्च 40-50 लाखांपेक्षा अधिक होतो. त्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही औषधोपचार पूर्ण आयुष्यभर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे लागतात. अनेक रुग्ण एवढा खर्च येतो म्हणून खितपत आपलं आयुष्य त्या आजारांसोबत जितके वर्ष जगता येईल तितके जगत असतात. वैद्यकीय शास्त्र खूप प्रगत झालं आहे. पूर्वी अशा आजारांवर फारसे उपचार करता येत नव्हते मात्र आता ते शक्य झाले आहेत. आज अनेक रुग्ण राज्यात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत.

जयनीलचे वडील मंगलेश हे नंदुरबार येथे पोलीस दलात चालक म्हणून कार्यरत आहेत. गेले दोन वर्ष ते आपल्या मुलाला वाचविण्यासाठी सर्व शर्तीचे प्रयत्न करत होते. गेले तीन महिने ते आपल्या मुला सोबत मुलुंड येथील  फोर्टिस रुग्णालयात राहत होते. नंदुरबार येथे राहणाऱ्या वसईकर दांपत्याला दोन मुले असून जयनील हा पाच वर्षाचा होता तर दुसरा आशिष दोन वर्षाचा आहे. वयाच्या चौथ्या वर्षी जयनीलला पोटाच्या कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर वर्षभर जयनीलवर मुलूंडच्याच फोर्टिस रुग्णालयात  उपचार सुरु होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी किमोथेरपीच्या सायकल पूर्ण केल्या. त्या आजारातून बरा झाल्यावर, दोन ते तीन महिन्यांनी त्याला उलटीचा भंयकर त्रास जाणवू लागला. लघवी कमी होऊ लागली तसेच चेहऱ्यावर सूज येऊ लागली. जयनीलला हा त्रास सुरु झाल्यावर वडिलांनी त्याला तात्काळ डॉक्टरांकडे नेलं. अनेक चाचण्या केल्यानंतर त्याला डायलेटेड कार्डीओमायोपॅथी हा आजार असल्याचं निदान झालं. या आजारामध्ये हृदयाच्या ठोक्यांची गती मंदावते आणि ती मोठ्या प्रमाणात कमी झाली असेल तर हृदय प्रत्यारोपणाशिवाय अन्य पर्याय नसतो.  थोडक्यात त्या हृदयाचे पम्पिंग होण्याची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली असते. नेमकं हेच जयनीलच्या बाबतीत झालं होतं.

जयनीलचे वडील मंगलेश वसईकर आपल्या या वेदनादायी प्रवासाबद्दल माहिती देताना सांगतात, " गेली दोन वर्ष मी माझा मुलगा बरा व्हावा त्यासाठी संघर्ष करत होतो आणि त्याला चांगलं करण्यासाठी सगळे  प्रयत्न केले. परंतु मी माझ्या मुलाला वाचवू शकलो नाही.  मी आणि माझे कुटुंब किती वाईट परिस्थितून जात आहे ते महत्वाचे नाही. मला माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू बघायचे होते. माझ्या मुलाच्या उपचारासाठी मला पोलीस योजनेमधून आर्थिक मदत झाली आहे. माझे सर्व वरिष्ठ एस पी साहेब माझ्या सोबत या लढ्यामध्ये होते.  त्यासाठी पोलीस दलाचा मी आभारी आहे. मला माझ्या मुलाच्या हृदयाची धडधड नैसर्गिक पद्धतीने व्हावी याकरिता मेंदूमृत अवयवदात्याची गरज होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही.  यासाठी अवयवदान या विषयावर जनजागृती झाली पाहिजे. जयनीलसारखे अनेक रुग्ण हृदयाची वाट पाहत आहेत. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे अवयदान या विषयावर सगळ्यांनी बोललं पाहिजे. "

याप्रकरणी फोर्टिस रुग्णालयातील इंटेन्सव्हिस्ट आणि ऍनेस्थेसिस्ट, जे हृदय प्रत्यारोपण करण्याच्या टीम मध्ये आहेत, ते डॉ शिवाजी माळी यांनी ए बी पी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, " जयनील खरोखर खूप  'फायटर' मुलगा होता. आधीच्या कॅन्सरच्या आजारातून बरा होऊन तो या हृदयाच्या आजाराशी झुंज देत होता.  त्याच्या हृदयाची धडधड कृत्रिमरीत्या सांभाळली जावी म्हणून त्याला त्याला एकमो मशीनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र जास्त काळ या मशीनवर ठेवणं योग्य नाही या काळात त्याची प्रकृती खालावू शकते. आतापर्यंत जास्तीत जास्त 42 दिवस एका रुग्णाला या मशीनवर ठेवण्यात आलं होतं.. पण तो रुग्ण वयाने मोठा होता. मात्र जयनील हा वयाने खूपच लहान असून सुद्धा 45 दिवस या मशीनवरील उपचारांना चांगला प्रतिसाद देत होता. मात्र लवकर हृदय न मिळाल्याने त्याची तब्बेत खालावली आणि त्यातच त्याचं निधन झालं. त्याला वाचविण्यासाठी आई वडिलांनी मोठा संघर्ष केला. त्याला  मेंदूमृत दात्याकडून हृदय मिळणं अपेक्षित होतं. त्याचा रक्तगट ओ पॉजिटीव्ह आहे. तसेच त्याचं वजन 20 किलोग्रॅम होतं. त्यामुळे अपेक्षित दात्याचं हृदय हे ओ पॉजिटीव्ह रक्तगटाचे आवश्यक असून त्याचे वजन जास्तीत जास्त 40-50 किलो असणे अपेक्षित होतं. कारण लहान मुलांचे अवयवदान फार मोठ्या प्रमाणात होत नाही, त्यामुळे इतका फरक असणारा दाता मिळणं गरजेचं होतं.

ते पुढे असेही म्हणतात की, "गेले वर्षभर कोविडचा काळ असल्याने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अवयवदान होऊ शकलेलं नाही. त्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. अनेक रुग्ण प्रतीक्षायादीवर असून त्यांना अवयव मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. "

आपल्या देशात आणि राज्यात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, 1994 अंतर्गत अवयव प्रत्यारोपण केले जाते. या कायद्यात 2014 साली काही सुधारणा करण्यात आल्या. अवयवदानाबद्दल यापूर्वी भरपूर लिहिले गेले आहे. या बाबत थोडक्यात या लेखातून माहिती देण्याचा प्रयत्न करूया. आपल्याकडे मेंदूमृत अवयवदानामध्ये ह्रदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, त्वचा, डोळे, फुफ्फुसे आणि आतडे  देखील दान केले जाते. यामध्ये त्वचेचा वापर गंभीररित्या भाजलेल्या व्यक्तीमध्ये करता येतो. अन्य अवयवाचे गरजेनुसार अन्य रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करता येते. ज्या रुग्णांचा एखादा अवयव कायमचा निकामी होतो आणि औषध उपचारानेही बरा होत नाही, त्यावेळी त्याला अवयव प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यावेळी त्या रुग्णाच्याच नात्यातील निरोगी व्यक्तीचा अवयव घेऊन रुग्णाच्या शरीरात त्या अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. त्याकरिता रक्तगट मॅचिंग होणे गरजेचे असते.  जिवंत व्यक्ती जवळच्या नातेवाईकाला अशा पद्धतीने अवयव देऊ शकतात. फक्त मूत्रपिंड (किडनी) आणि यकृत (लिव्हर) याच अवयवाचे जिवंतपणी दान करता येते. या व्यतिरिक्त जे अवयव दान करता येते त्याला मेंदूमृत अवयवदान असे म्हणतात.

सगळ्यात जास्त अवयव मेंदूमृत अवयवदानामार्फत केले जातात. एक मेंदूमृत व्यक्ती 7-8 व्यक्तींना नवीन आयुष्य देते. मेंदूमृत प्रक्रियेत रुग्णाचा मेंदू मृत स्वरूपात असून बाकीचे सर्व अवयव व्हेंटिलेटरच्या साहाय्याने कार्यरत असतात. रस्त्यांवरील अपघात, मेंदूत अतिरक्तस्राव आणि अन्य कोणत्या कारणांमुळे मेंदूचे कार्य थांबते आणि तो रुग्ण व्हेंटिलेटर असेल तर त्याच्या नातेवाईकाच्या संमतीने त्या व्यक्तीचे अवयवदान करता येते. या करीता रुग्णालयातील समुपदेशक रुग्णाच्या संबंधित नातेवाईकांशी बोलून अवयवदानासंदर्भातील सविस्तर माहिती देतो. त्या रुग्णाच्या नातेवाईकाने एकदा का समंती  दिली की मग अवयवदानाच्या प्रक्रियेस सुरुवात होते.

मेंदूमृत झालेल्या व्यक्तीचा जिवंत राहूनही उपयोग नसतो. त्यांचा एकदा का व्हेंटिलेटर काढला तर ती व्यक्ती काही दिवसाने मृत होते. जर एकदा का व्यक्ती मृत झाली तर त्या व्यक्तीचे कोणतेही  अवयव वापरता येत नाही. त्यानंतर फार-फार तर त्वचा आणि डोळ्याचा वापर होऊ शकतो. मात्र इतर कोणतेही अवयव वापरता येत नाही. जर ही प्रक्रिया लवकर केली तर प्रत्यारोपण यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते. आपल्या मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण नेत्रदान करून पुन्हा पाहू शकतो.  तसेच इतर अवयव दान केल्यानेही आपण वेगळ्या रुपात जिवंत राहू शकतो. गेल्या काही वर्षात अशा पद्धतीने अवयवदान केल्यामुळे आज हजारो व्यक्ती त्यांचं आयुष्य व्यवस्थितपणे जगत आहेत. आपल्या राज्यात बहुतांश सर्वच अवयव प्रत्यारोपित केले जातात. अयवय प्रत्योरपणात निष्णात डॉक्टर आपल्या राज्यात असून त्याकरिता आवश्यक असणारी अत्याधुनिक साधनसामुग्री असलेली रुग्णालयेही राज्यात आहेत आणि गेली काही वर्षे अत्यंत यशस्वीपणे अवयव प्रत्यारोपण करत आहेत. सध्या भारतात या अवयवांव्यतिरिक्त हाताच्या प्रत्यारोपणासही सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सध्या हळू हळू प्रगती सुरु आहे.

आपल्याकडे शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आहेत. मात्र आपल्याकडे मेंदूमृत अववयवदानासाठी शासकीय रुग्णालयात फारसे प्रयत्न होत नाहीत. कारण याकरिता मोठ्या प्रमाणात काम करावे लागते. आपल्याकडे एखादी व्यक्ती मेंदूमृत झाली तर किमान चार-पाच विविध शाखेच्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीला  'ब्रेनडेड सर्टिफाइड' करावे लागते. त्यासाठी मेडिसिन, इंटेसिव्हिस्ट, न्यूरोफिजिशियन, ऍनेस्थेसिस्ट  ह्या विषयातील तज्ञांची गरज असते. त्यासोबत अनेक वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात, त्यानंतरच ब्रेनडेड जाहीर करण्यात येते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना समुपदेशन करून अववयदानासाठी तयार करावे लागते. हा भाग खूप जिकिरीचा असतो. त्या नातेवाईकाच्या सहमतीनंतरच अवयवदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. मग ते अवयव काढल्यानंतर जी काही झेड टी सी सी ची प्रतीक्षा यादी असते त्यानुसार त्या अवयवाचे वाटप करण्यात येते. अवयव काढून घेईपर्यंत त्या ब्रेन डेड रुग्णांला वैद्यकीय दृष्ट्या व्यवस्थित सांभाळणे गरजेचे असते. ज्या पद्धतीने अवयवदान शासकीय रूग्णालयातून होणे अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही. मात्र हे चित्र हळू हळू बदलणं गरजेचं आहे. शासकीय रुग्णालयाला या प्रकरणी काही मर्यादा असतील तर त्या दूर करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. कारण गरिबांना ह्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेकवेळा खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियाची मागणी  मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मात्र याला येणारा खर्च हा खूप मोठा आहे. याकरिता शासकीय रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर कराव्या लागणार आहे. त्याकरिता जंतुसंसर्ग होऊ नये याकरिता विशेष कक्ष रुग्णालयात चालू करावे लागतील. शासकीय रुग्णालयावर इतर आजाराच्या रुग्णाचा ताण मोठ्या प्रमाणात असतो, हे वास्तव असले तरी प्रत्यारोपणाच्या विशेष शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु कराव्या लागणार आहेत.

राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या माहितीनुसार, सध्या राज्यात साधारणतः अवयवांची गरज असणारी रुग्णाची  प्रतीक्षायादी खूप मोठी आहे मूत्रपिंडासाठी 5487, यकृतासाठी1095, हृदयासाठी 87 आणि फुफ्फुसासाठी 19 रुग्ण प्रतीक्षेत आहेत. यापैकी किडनीसाठी प्रतीक्षेत असणारे रुग्ण डायलेसीसवर आणखी काही महिने जगू शकतात. मात्र हृदय, यकृत आणि फुफ्फुस यासारखे अवयव असणाऱ्या रुग्णाची परिस्थिती ही बिकट असते. कारण त्यांना अवयव प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

अवयवदान ही काळाची गरज असून अनेक गरजू रुग्ण आपल्याला लवकर अवयव मिळावा म्हणून हताश होऊन वाट पाहत असतात. त्यांच्याकडे हतबलतेपलीकडे काहीच नाही. या प्रतीक्षायादीवरील रुग्णांची संख्या कमी असली तर त्या रुग्णाच्या नातेवाईकाच्या अनेक व्यथा आहेत. त्यामुळे या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया आणि त्याच जोडीला मेंदूमृत अवयवदानाबाबत जनजागृती  करून लवकरच या स्वरूपाचे अवयव दान सुरु होणे  ही सध्याची निकड आहे. ह्या रुग्णांबद्दल फारसे आपल्याकडे बोलले जात नाही. मात्र त्यांची परिस्थिती ही खूपच वाईट असते, हे रुग्ण प्रत्येक घटका मोजत  त्यांचे आयुष्य काढत असतात. या अशा रुग्णांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियाकरिता वेगळी काही व्यवस्था उभारली जाऊ शकते का याचा विचार वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी करायला हवा. तसेच शासनाने मोठ्या प्रमाणात अवयवदानासाठी जनजागृती केली पाहिजे. ज्या प्रमाणे अनेक रुग्णालयात गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदयानुसार, येथे गर्भलिंग निदान होत नाही असे बोर्ड लावले जातात. त्याप्रमाणे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात अवयवदानविषयीची सर्व माहिती रुग्णालयात मिळेल असे बोर्ड लावणे सक्तीचे केले पाहिजे. किमान लोकांना या विषयाची शास्त्रीय माहिती मिळू शकेल त्यातूनच लोकांना अवयवदाना विषयी जागृती निर्माण करण्यास मदत होईल.