कोरोनाच्या या कहारामुळे आधीच धास्तावलेल्या नागरिकांच्या चितेंत केंद्रातून मुंबईमध्ये आलेल्या पाच सदस्यांच्या पथकाच्या अंदाजाने अधिक भर टाकली. मात्र अंदाज आणि वास्तव या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. याचा अर्थ त्यांनी जो अंदाज व्यक्त केला तसं होऊ शकत किंवा तसं होणारही नाही या दोन्ही शक्यता वर्तविल्या जाऊ शकतात. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेतली पाहिजे, अधिक सजग राहिलं पाहिजे असं मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी काही सूचना केल्या आहेत त्यांचे पालन आपण केले पाहिजे. साथीच्या आजारात इतर देशातील समान साथीचा अभ्यास करून आणि त्या आजाराच्या होणाऱ्या वाढीचे प्रमाण असे अनेक विविध मानकांचा वापर करून हे अनुमान काढले जातात.

Continues below advertisement

देशात सर्वात जास्त रुग्णसंख्या असण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रात असून त्यातही मुंबई आणि पुण्यामध्ये अधिक आहे. बुधवारी मनोज जोशी, अतिरिक्त मुख्य सचिव,(अन्न प्रक्रिया उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राच्या समितीने मुंबईतील विविध भागांना भेट देऊन पाहणी केली. विशेषतः त्यांनी धारावी येथे जाऊन कशा पद्धतीने राज्य सरकारने आणि महापालिकेने व्यवस्था केली त्यांच्या कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत. त्यांमध्ये त्यांनी येणाऱ्या काळात रुग्ण संख्या कशी वाढली जाऊ शकते याचे अनुमान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर त्यांनी अलगीकरणाकरिता जास्त व्यवस्था करावी, त्याचप्रमाणे आयसोलेशनचे बेड अधिक प्रमाणात वाढवावे, ऑक्सिजनसहित असणाऱ्या बेडची संख्या वाढवावी, तसेच टेस्टिंगच प्रमाण वाढवावं अशा काही महत्वापूर्ण सूचना केल्या आहेत.

याप्रकरणी, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेला संबोधून केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, "अशा पद्धतीचं अनुमान काढण्याचं एक शास्त्र निश्चित आहे. त्यांनी असा अनुमान काढण्याकरता काही गृहीतक धरली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर त्यांनी 3.8 दिवसाचा धरला आहे. मात्र सध्या आपल्याकडे रुग्णसंख्या दुपटीने होण्याचा दर हा 7.1 दिवस असा आहे. पूर्वी 8-9 दिवसापूर्वी रुग्णसंख्या दुप्पट ही 3.8 दिवसांनी होत होती ती आता 7.1 दिवसाने होत आहे. हे नक्कीच आशादायक चित्र आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्वात जास्त म्हणजे 90 हजारांपेक्षा जास्त टेस्टिंग केल्या गेल्या आहे. आजच्या घडीला रोज 7112 टेस्टिंग आपण करत आहोत. तसेच आजच्या घडीला 7000 वैद्यकीय साह्यक आणि आशा कर्मचारी यांच्या टीम संपूर्ण राज्यात सर्वेक्षण करण्याचं काम करत आहे. घरोघरी जाऊन रुग्ण शोधत आहोत. जरी उद्याच्या घडीला काही परिस्थिती उद्भवली तरी आपण 75-76 हजार लोकांची अलगीकरण करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. त्याचप्रमाणे दीड लाखापेक्षा जास्त आयसोलेशन बेडची व्यवस्था आपण संपूर्ण राज्यात केलेली आहे. याकरिता सामाजिक हॉल, मैदाने, शाळा यांचा वापर करणार आहोत, अजूनही यावर काम सुरु आहे".

Continues below advertisement

ते पुढे असेही सांगतात की, " या सर्व प्रकामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. आपण रोज नवनवीन गोष्टी करत आहोत. भारतीय वैद्यक संशोधन परिषदने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपण सध्या काम करत आहोत. त्याचप्रमाणे आजच्या घडीला 83% रुग्ण हे लक्षणविरहित आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणं नाहीत मात्र ते कोरोना बाधित आहे. तर 16 % लोकं सौम्य स्वरूपाची लक्ष आहेत. रुग्ण उपचार घेऊन घरी जाण्याचा दर वाढत आहे. एक टक्के रुग्ण आहेत जे गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. तर बोटावर मोजण्या इतक्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदने आपणास प्लासमा थेरपी करता परवानगी दिली आहे, त्याचा आपण वापर सुरु करत आहोत. घनदाट लोकवस्ती असणाऱ्या रुग्णांकरिता अलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात पूर्वी 14 हॉटस्पॉट होते, ते आता 5 झाले आहेत. ते आपण आणखी कसे कमी करता येतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत जे काही मृत्यू झाले आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणवर वरिष्ठ नागरिकांचा समावेश असून या रुग्णांना आधीपासून काही आजार होते असे निदर्शनास आले आहे. याकरिता आपण डॉ. अविनाश सुपे याचा अध्यक्षतेखाली समिती बनवून 'डेथ ऑडिट' सुरु केले आहे. एकही रुग्णाचा मृत्यू होणार नाही यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. त्याचप्रमाणे स्वॅब टेस्टिंग करण्याअगोदर आपण एक्स-रे च्या साहाय्याने त्यांच्या फुप्फुसावर काही डाग आहे का नाही हे सुद्धा डॉक्टर बघत आहेत. पूर्वी मृत्यू दर 7 होता आता तोच सरासरी 5 वर आला असून आणखी कमी कसा करता यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत".

राज्य सरकारच्या कोरोनाविषयक विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक सांगतात की, " माझी स्वतः केंद्रीय पथकाचे प्रमुख मनोज जोशी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी आपणास काही सूचना केल्या आहेत त्या आम्हाला मान्य आहेत. त्यानुसार आम्ही उपाय योजना करूच, त्याचवेळी आपण जे काही आतापर्यंत काम केले आहे त्याचंही त्यांनी कौतुक केले आहे. त्यांनी गणिती सिद्धांत मांडून जे काही अनुमान केले आहे ते मात्र भयावह आहे. तरीही त्यांच्या सूचनांचा आदर राखत आम्ही काम करत आहोत".

तर, डॉ ललित संखे, सहयोगी प्राध्यपक, जनऔषध वैद्यकशास्त्र, ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज आणि सर जी जी समूह रुग्णालय, सांगतात की, "आता ह्या पथकातील तज्ञांनी हे अनुमान काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरलं आहे ते बघणं गरजेचं आहे. आमच्या अभ्यासात अशी बरीच सूत्र आहेत कि त्यांचा वापर हा अनुमान काढण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यांनी याकरिता कोणती मानांकने गृहीत धरली आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. कदाचित त्यांनी वाईटातली वाईट स्थिती काय येऊ शकते याचा विचार केला असावा. मात्र हा अंदाज आहे हे वास्तव नाही. कारण असा अनुमान काढताना त्या ठिकाणाची लोकसंख्या, लॉकडाऊनचा काळ त्याचा तुलनात्मतक अभ्यास , इतर देशातील लोकांच्या आजाराची तुलना केली असेल तर तेथील लोकांची जीवनशैली अशा अनेक गोष्टीचा अभ्यास हा अनुमान काढण्यासाठी होऊ शकतो. तरीही त्यांनी दिलेल्या काही सूचना असतील तर विचारात घेतल्या पाहिजे".

या परिस्थितीत घाबरून न जात मात्र शिक्षित होण्याची गरज आहे. प्रत्यकाने सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला पाहिजे. मास्कचा वापर करून सजग राहिलं पाहिजे, आणि जर काही लक्षणे आढळ्यास त्यांनी महानपालिकेने आणि शासनाने तयार केल्याला फिव्हर क्लिनिक मध्ये भेट देऊन स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग