कोरोनाबाधितांचा आकडा देशभर वाढत असताना, रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचा आकडा पण वाढत आहे ही आनंदाची बातमी आहे. देशात सध्या 10, 477 रुग्ण कोरोनाबाधित असून आतापर्यंत 1488 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेने कंबर कसली असून घरोघरी जाऊन रुग्णाची तपासणी करण्यात येत आहे. सर्व रुग्णांना उत्तम उपचार  मिळत आहेत. यामुळे कोरोनाच्या या संकटाचा मुकाबला सगळ्यांनी एकत्र येऊन केला तर आपण लवकरच आपला देश कोरोनामुक्त होऊ शकतो.


 नुकत्याच शासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 2916 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी सुमारे 60 ते 70 टक्के जणांना लक्षणे दिसत नसून 25 टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत तर पाच टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी  सुमारे 295 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ठिकठिकाणी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला जात असून समाजातूनही या रुग्णांचे स्वागत केले जात आहे.


नागरिक रोज कोरोनाबाधितांच्या रुग्ण वाढीची संख्या ऐकून सध्या कंटाळले आहेत. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधून केलेल्या संवादात कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये सहा महिन्याच्या चिमुकल्यापासून ते 83 वर्षांच्या आजीबाईंचा समावेश असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. कोरोनाला हरविणाऱ्या सहा महिन्याच्या कल्याण येथील चिमुकल्याच्या आईशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्याचे अभिनंदनही केले. गेल्या  महिन्यात 9 मार्चला राज्यातील पहिले दोन कोरोना रुग्ण  सापडले होते.पुण्यातील राहणाऱ्या या जोडप्याने 14 दिवस रुग्णालयात राहून यशस्वी उपचार घेतले आणि  23 मार्चला बरे होऊन घरी गेले आहेत.


कोरोनाच्या या सगळया कोलाहलात आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सतत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांचं मनोबल वाढवत असून त्यांना सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. शासनाच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील 166, ठाणे मनपा 6, ठाणे ग्रामीण 3, कल्याण डोंबिवली 14, मीरा भाईंदर 2, नवी मुंबई 9, पनवेल 3, उल्हासनगर 1, वसई विरार 2, नागपूर 11, पुणे महापालिका परिसर 27, पिंपरी चिंचवड 12, पुणे ग्रामीण 4, अहमदनगर ग्रामीण 1, अहमदनगर महापालिका क्षेत्र 2, नाशिक ग्रामीण 1, रत्नागिरी 1, सिंधुदुर्ग 1, सांगली 25, सातारा 1, यवतमाळ 3 आणि गोंदिया 1 अशा एकूण 295 रुग्णांचा समावेश  आहे.


महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जारी केल्याला पत्रकात कोरोनाच्या या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं जेवढ कौतुक करावं तेवढ कमीच आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी,  एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा तशी शक्यता आहे असा जरी आढळलं तरी त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहे. या अशा प्रकारामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त करून यामुळे लोकांचा कल या आजराची  लक्षण लपविण्याकडे राहील आणि लॉक डाउन सक्त केलेल्या सर्व उपाययोजना निष्प्रभ ठरतील. तसेच त्यांनी पत्रकात ह्या आजारावर मात  केलेल्याला रुग्णाच्या आकडेवारीच दर आठवड्याला एक न्युज बुलेटिन काढून राज्य आणि केंद्र सरकारने जारी करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी  केलेली ही  मागणी स्तुत्य असून यामुळे नागरिकांमध्ये सकारत्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकते.


यामुळे नागरिकांनी न घाबरता कोणत्याही प्रकारची लक्षणं न लपविता वेळीच योग्य उपचार घेतले पाहिजे. देशातील सगळ्यांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केल्यास लवकरच कोरोनावर मात करून देश पूर्वस्थितीवर येईल. यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचं पालन केले पाहिजे.



   संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग