>> संताजी देशमुख, आटपाडी
सर्व जाती धर्माचे, बारा बलुतेदार एकमेकांच्या हातात हात घालून गुण्यागोविंदाने एकत्र नांदनारं माझ गाव. माझ्या गावाला पाच परमेश्वराचे गाव म्हणूनही ओळखतात. 'ज्याला न घडे काशी, त्याने यावे आटपाडीशी, असेही म्हटले जाते. माझ्या गावाला पश्चिमेकडून पूर्वेकडे नागमोडी वाहणारा ओढा आहे. फार फार पूर्वी आम्ही लहान असताना पाऊसपाणी जरा बरा असायचा तेव्हाच हा ओढा कधीतरी वाहत असायचा. तेव्हा गावाला एक वेगळीच शोभा यायची, गाव प्रसन्न वाटायचं पण हल्ली सततच्या दुष्काळामुळे ओढा कोरडाच असतो. ओढ्याच्या अलीकडे गाव आणि पश्चिमेला ओढ्याच्या पलीकडे अंबाबाईचे थोडेसे टेकावर अतिशय साधं दगडी पूर्वेकडे म्हणजे गावाकडे तोंड करुण मंदिर आहे. मंदिराच्या पुढे खुप मोठे पटांगण व कोरड ओढा पात्र आहे. आणि या मोकळ्या पटांगणातच सगळे गाव नागपंचमीचा सन साजरा करतं.
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिलाच सण. भले आमचा भाग दुष्काळी असला तरी या महिन्यात ऊण पाऊसचा खेळ चालू असतोच. आणि सगळीकडे कसे हिरवेगार, प्रसन्न वातावरण असते. आमची नागपंचमी मात्र आठ दिवस आधीच सुरु व्हायची. बेंदुर संपून थोडेथोडे वारे सुटायला लागले की आम्हाला वावडी किवा पतंगांचे वेध लागायचे. बुराडाच्या येथून पडलेल्या किंवा चोरून काम्बा आणायच्या, एक कागद आणि घरीच गव्हाच्या पीठाची खळ करायची आणि दिवसभर एकच उद्योग वावड़ी आणि पतंग. पुन्हा त्यात स्पर्धा लागायची की कोण मोठी वावडी करतोय. आमच्या गल्लीत केशव डोईफोडे नावाचा एक मुलगा होता. तो वयाने आमच्या पेक्षा खुप मोठा होता. तो खुप मोठी वावडी करायचा. त्याची वावडी गावात सगळ्यात मोठी असायची. आम्ही त्याच्याशी आठ दिवसासाठी मैत्री करायचो, कारण एक तर तो गल्लीतच राहायचा आणि चिल्लिपीली लहान मोठी गावातील, त्याची वावड़ी पाहायला यायचे. मग आम्ही उगीच तिथे थांबून फुकटचे शाइनिंग मारायचो. गल्लीच गर्व आणि अभिमान दाखवायचो आणि दुसरी गोष्ट म्हणजे वावडी केली तरी त्याचे मंगळसूत्र प्रत्येकला जमेल असे नाही. त्यात पण केशवचा हातखंड असायचा. मंगळसूत्र करणे सुद्धा एक तंत्र आहे. ते आम्हाला तिथे त्याच्याकडे समजले आणि त्याने मंगळसूत्र केले की वावडी कधीही गोचे खाणारा नाही किंवा साईडला ओढणार नाही किंवा जास्त ओढ देणार नाही. आणि ती व्यवस्थित वर उडणार याची खात्री असायची. आणि त्याकाळी सगळ्यांची परिस्थिती बेताची असायची. त्यामुळे आमच्याकडे वावडीला दोरा म्हणजे अनेक ठिकानचा गोळा केलेला असायचा किंवा एखाद्याची वावडी टुटून मिळालेला किंवा कुणाची तरी वावडी मुद्दाम तोडून त्यांचा मिळालेला. अनेक गाठी मारलेला दोरा आणि हा दोरा वावडीला बांधला की दोऱ्याच्या अनेक जोडलेल्या गाठीमुळे दोऱ्याला डेरे जास्त यायचे. मग आम्ही दिवसभर ती वावडी किवा पतंग उडावण्याच्या नादात ना जेवनाची फिकर ना शाळेचं ध्यान राहायचं.
जसजशी पंचमी जवळ येईल तसतसे सगळे गावतले वातावरण भारुन जायचे. सगळीकडे गर्दीच गर्दी, ओढ्यात वावडी उडावण्यासाठी गर्दी, तर पेठेत नवीन बांगडी भरण्यासाठी गर्दी, तर कुठे मळात, घरात बांधलेल्या झोक्यासाठी गर्दी. नुकत्याच लग्न झालेल्या माहेरवाशीन, आपल्या मैत्रिनींना भेटण्यासाठी, सासरचं सुखदुख सांगण्यासाठी गलोगल्ली गर्दीच गर्दी आणि इंडिया नव्हे तर खरा भारत आणि त्याच्या परंपरा पाहायच्य असतील तर अशा वेळेस ग्रामीण भागात पाहावा आणि संध्याकाळी जेवण झाली की जसजशी रात्र होईल तशी गलोगल्ली मुलींचे, नवीन लग्न झालेल्या माहेरवाशिन यांचे झिम्मा, फुगड़ी, फेर धरून पंचमीची गाणी सुरु व्हायची. म्हातारी कोतारी बाजूला बसून ऐकायची. एखदी चुकली तर त्यांना सांगायची. आम्ही लहान लहान मुलं मात्र त्या गोल रिंगनात बसून त्यांचे खेळ, गाणी ऐकायचो, बघायचो. एक वेगळेच जग असायचे. तिथे ना गरीब ना कुणी श्रीमंत, सगळे कसे समान असायचे.
या मुलींच्या झिम्मा फुगडी खेळाची एक कायम लक्ष्यात राहिल अशी एक आठवण म्हणजे, आमच्या वाड्याभोवती सुतार, लोहार, शिम्पी, डवरी, परीट, कोळी, गोंधळी, दलित समाजाचे लोक राहतात. त्यावेळेस एक वडर समाजाचे एक अतिशय गरीब कुटुंबही गल्लीत राहायला आले होते. त्यांच्यात दोन तीन मोठ्या मुलीं होत्या. दिवसभर दगड फोडायचे कष्टाचे काम करुण मुलीही आमच्या वाड्यात संध्याकाळी जेवण उरकुन खेळायला इतर मुलींप्रमाणे रोज येत. पण एके दिवशी रात्रीचे 10 वाजले असतील आणि मुलींचा डाव असा रंगत चालला होता. म्हातरी बाया माणसे पेंगत बाजूला ऐकत होती. आणि आम्ही लहान मुले त्या मुलींनी जो फेर धरला होता, त्या गोलात ऐकत बसलो होतो. आणि झिम्माचा खेळ एवढा रंगत आला होता की, त्या वडर समाजाची एक मुलगी झिम्मा खेळताना मागे सरण्याच्या नादात मागे असलेल्या खोल आडात जाऊन पडली. आडात पाणी फारसे नव्हते, पण सगळा गोंधळ उडाला. आम्ही लहान मंडळी घाबरून गेलो. म्हातारी मंडळींची तर झोपच उडाली. अनेक चर्चा झाल्यानंतर कुणी तरी डोके चालवले आणि जवळ असलेल्या म्हशीच्या गोठ्यातील मोठी अशी फोकेची पाठो आणि दोर आणला. त्या पाटीला दोर वजन तागडीप्रमाणे बांधला आणि त्या मुलीला एकदाच वर काढले. तिच्या आई आणि इतर बहिणीला सगळ्यांनी धीर दिला. तिच्या नाशिबने तिला फार काही इजा झालेली नव्हती. नंतर दोन दिवस खेल थांबला आणि नंतर पुन्हा सुरु झाला.
नागपंचमीच्या आधल्या दिवशी भावाचा उपवास, आमच्या घरी आमची आई घरातील एका मातीच्या भिंतीवर शेणाने सारवून हळदीचा पिवळा रंग करुन चार वाट्या किंवा सोळा वाट्याचा नागोबाचं चित्र काढायची. माझे काम म्हणजे चुण्याचा पांढरा रंग करून त्या नागोबाला पाढंऱ्या ठिपक्या देऊन नागोबाला सजवायचे. नागोबा कसा धाऊन आल्या सारखा वाटत असे. कधीही विकत कागदी नागोबा आणला नाही. सगळी गल्ली बघायला यायची. आदली रात्र सगळी मेहंदी काढण्यात जात असे आणि ज्या दिवशी नागपंचमी असे त्या सकाळी सकाळी उठून कुणाची मेहंदी जस्तीत जास्त रंगली याची स्पर्धा लागायची.
नागपंचमी दिवशी पुरणपोळीवर ताव मारायचो आणि पुरणापासून तयार केलेले दिंड, कानुले आवडीने खात असू. कधी 3 वाजतात याची वाट पाहत असू. एकदा का 3 वाजले की आमच्या गल्लीतील सर्व मुली लहान चिल्लर गँग आमच्या मारुतीच्या देवळापुढे जमायला सुरु होत असे. मग लहानांचा उपयोग हिला बोलव, तिला बोलव, ही राहिली ती राहिली यासाठी होत असे. नवीन नवीन लग्न झालेली माहेरवाशीन असेल तर तिला फार किंमत. ती येईपरर्यंत सगळ्या मुली वाट पाहत. तो परत किसन दौलत ऐवळे किंवा किसन अर्जुन ऐवळे यांचा बँड मंदिरापुढे हजर झालेला असे. मग आम्हा सर्वांचा लाड करणारी सगळ्यात थोरली छब्बू अक्का आली की मग सगळ्या मुली वाजत गाजत नटुनथटुन पेठेतून कलेश्वर मंदिराजवळून अंबाबाईच्या ओढ्यातून अंबाबाई मंदिराजवळ पोहचत. आम्ही उगीचच पुढे पुढे करत असू नुसती लुड़बुड.
मग सगळ्या मुली देवीच्या पाया पडत आणि नंतर पुन्हा अंबाबाई मंदिरापुढील पटांगणात फेर धरून पंचमीची गाणी, झिम्मा फुगडी असे खेळ चालत असत. तो पर्यंत इतर समाजातील मुलीं-मुलं माणसे, महिला लहान सहान आलेली असत. पटांगण आणि ओढा पूर्ण गर्दीने फुललेला असे, कुणी तिथे बंधलेला झोका खेळत असत तर कुणी आणलेले खाऊ खात असत. तर मोठी मुले किंवा वडिलधारी माणसे गरम गरम भजी, जिलेबीवर ताव मारत असे. तर पोरंठोरं मात्र वावडी, पतंग उडावण्यात आणि बघण्यात दंग असे. केशव डोईफोडेच्या वावड़ीपाशी मात्र खुप गर्दी झालेली असे.
आम्ही आमची गँग मात्र नखात ब्लेडचा लहान टुकड़ा घालून उगिचच दुसऱ्याच्या वावडीचा दोरा किंवा वावडीची ओढ़ किती आहे बघू, असले निमित्त करुन त्याचा दोरा तोड़ायचो. एकद का दोर तोडला की ती वावडी खालच्या ओढ्यात जाऊन पड़े. मग तिथे आमचे मेंबर आधीच खाली वाट पाहत असे की अजुन आपल्या कार्यकर्त्याने दोर कसे कापले नाहीत. ज्याची वावडी तुटली आहे तो खाली पोहचेपर्यंत वावड़ी दोरा आणि शेपुट सहित गायब झालेली असे. नंतर आम्ही तो दोरा वाटून घेत असू आणि तो डोरा वावड़ी पुढच्या वर्षीच बाहेर काढत असू.
आम्ही वावड़ी ,पतंग, तोडून झाले की इकडेतिकडे फिरुन झाले की आणलेला खाऊ खाण्याच्या आशेने पुन्हा इकडे मुलींकडे येत असू. मग मुलीही खेळूनखेळून दमल्यामुळे त्या आपआपले आणलेले खायला काढत. मग एक मोठा गोल करुन सगळे एकत्र बसत आणि खाऊचं वाटप करत असू. एकदा का खाऊन झाले की मुली काय खरेदी करण्यासाठी स्टॉलवर जात असत. तो पर्यंत एखादा जाणता माणूस आमच्यातील येत असे आणि पुन्हा त्या बँडवाल्याला बोलून सगळी लहान बारीक, सगळ्या मुली गोळा करुन पुन्हा पेठेतून वाजत गाजत आमच्या गल्लीतील तांबडा मारुती मंदिराकड़ें रवाना होत असू.
पण हल्ली या इंटरनेटमुळे, मोबाईलमुळे,टीव्हीमुळे जग एवढं जवळ आलं आहे. पण माणूस मात्र एकमेकांपासून दुरावत आहे. गर्दीत राहून सुद्धा माणूस एकटा आहे. ना प्रथा, ना परंपरा, कुणाला वेळ नाही जपायला. आता सगळे इवेन्ट झाले. नुसते जत्रेचे स्वरूप आले आहे. रेडीमेड झालेय, ना मायेचा ओलावा, ना संस्कृतीचा ओलावा.