BLOG : आमच्या इकडे 'पिंजरा' हा एक कोडवर्ड आहे. थेट कर्नाटकमधील गुलबर्ग्यापासून ते पुणे जिल्ह्यातील चौफुल्यापर्यंत आणि बसवकल्याणपासून ते थेट नगर जिल्ह्यातल्या राहुरीपर्यंत आणि इकडे शेजारी उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात देखील सढळ हाताने याचा वापर होतो. 


रिकाम्या पिशवीची घडी घालून दुमडून हाती घेऊन एकट्या दुकट्याने रस्त्याच्या कडेने काही महिला सर्रास दिसतात. हायवेवर ढाब्याजवळ या अधिक दिसतात. भिरभिरत्या नजरेने या रस्त्याकाठी उभ्या असतात. यांना 'नेमकं' ओळखून एखादं वाहन थांबलं की या पुढे होतात. वाहनचालकाशी वा आतील इसमांशी त्यांचं बोलणं होतं. डील झाली की ती बाई त्या वाहनात बसून निघून जाते. कधी कधी बोलणं फिसकटतं, कधी बोलणं होतच नाही मग उन्हे उतरल्यावर त्या माघारी फिरतात. वाहनासोबत गेलेली बाई रात्री बऱ्याच उशिरा वा दुसऱ्या दिवशी तिच्या घरी परतते. हायवेवरचं लोअर ग्रेड ट्रॅफिक या बायकांना 'पिंजरा' म्हणतं. 'डायवर' 'किन्नर' यांच्या देहाची आग शमवणारा 'पिंजरा' !


हायवेवरचा हा उद्योग विदेशातून आपल्याकडे आलाय असे आपल्यापैकी कुणाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे. याचे जनक आपणच आहोत. मध्यप्रदेशमधील नीमच, रतलाम आणि मंदसौरमध्ये पिढीजात हा व्यवसाय चालत आलाय. अर्थात तिकडे पिंजरा म्हणत नाहीत. असो... आपला मूळ विषय होता 'पिंजरा'!


'पिंजरा' सिनेमाला 31 मार्च रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचं कुठं तरी वाचलं आणि अशा अनेक भल्या बुऱ्या गोष्टींची नोंद ठळक झाली. 'पिंजरा'.. 1972 सालचा हा सिनेमा.  त्यात एका तमासगिर कलावंतिणीची चित्तरकथा होती. जोडीला होती मास्तरच्या आयुष्याची थट्टा. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात पन्नास ते सत्तरच्या दशकापर्यंत शिक्षक, डॉक्टर आणि नर्स या पेशांना सर्व भाषीय सिनेमांत आदराचे प्रेमाचे मानाचे स्थान होते. आयडियालिस्टिक सिनेमाचे ते आदर्श होते आणि त्यागसमर्पित रोमँटिसिझमच्या नायक नायिकांचा भार त्यांच्यावर होता. 


'पिंजरा' आला आणि त्याने मास्तरांच्या आदर्श प्रतिमेला सुरुंग लावला. याच दरम्यान हिंदी सिनेमात उत्कट प्रेम आणि आदर्शवादी जीवनविचार यांना तिलांजली देणारा सूडाने लडबडलेला 'अँग्री यंग मॅन'चा जमाना आला. दोन दशकांनी 'दीनानाथ चौहान' या आदर्शवादी शिक्षकास भिंतीवरील फ्रेममध्ये चिणून त्याचा मुलगा 'विजय' हा बेभान गॅंगस्टर झाला. विशेष बाब म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात मराठी सिनेमात 'सांगत्ये ऐका'पासून पिंजरापर्यंत तमाशापटांना सन्मान लाभला होता. लोकाश्रय लाभला होता. नंतर मात्र आस्तेकदम तमाशा केवळ आयटेम नंबर झाला.


भुवयांची अशक्य हालचाल करत अतर्क्य स्टेप्स घेत नाचणारी संध्या आणि निव्वळ इव्हेंट्सना हजेरी लावण्यापुरते उरलेले किरण शांताराम हेच आताचे 'पिंजरा'चे अवशेष आहेत. बाकी जगदिश खेबूडकरांनी लिहिलेल्या लावण्यांना दीर्घ काळ मरण नाही, त्या जिवंत राहतील. 'मला लागली कुणाची उचकी', 'छबीदार छबी', 'आली ठुमकत नार लचकत', 'इश्काची इंगळी डसली' आणि 'आला गं बाई आला' यांच्या खाणाखुणा नक्कीच मागे उरतील !
तमाशापटांचा प्राण गाण्यात लावण्यांत असतो आणि राहील.              


यामुळेच बऱ्याच ब्रेकटाईमनंतर आलेल्या 'नटरंग' सारख्या तमाशाप्रधान सिनेमास लोकांनी डोक्यावर घेतलं, अर्थात त्याला इतर अनेक दर्जेदार आणि सक्षम घटकही कारणीभूत होते. एक मात्र खरे की आता तमाशापटांचे ते दिवस कधीच फिरून येणार नाहीत.  'पिंजरा' हा तमाशापटांच्या शवपेटीला ठोकलेला अखेरचा मोठा खिळा होता !


याला आता पन्नास वर्षे पूर्ण झालीत. काळ बराच बदललाय. मनोरंजनाच्या व्याख्या बदलल्यात आणि साधनेही अमुलाग्र बदललीत. परिणामी आता चित्र काय दिसत्येय? हायवेवर उभ्या असणाऱ्या डी-ग्रेडेड सेक्सवर्कर्सना 'पिंजरा' म्हणून ओळखलं जातं !


सन 2012 साली भुईंजपाशी एक अशीच चाळीशीपार झालेली बाई भेटलेली.  तिला चार गोष्टी समजावून सांगितल्या. काही मदत केली, 'पुन्हा इथं येणार नाही..' असं आपण होऊन म्हणाली ती. मात्र 2016 सालच्या पावसाळी रात्री भादलवाडीपाशी तीच भेटली. तेंव्हा नजरेस नजर देत नव्हती. खूप खोदून विचारलं तेंव्हा तिने सांगितलं, तिची आई सिनेमातल्या तमाशात एक्स्ट्राचं काम करायची. नवरा म्हणणारा सोडून गेला मग तिच्या आयुष्याचा तमाशा झाला. लोकांनी तिच्या देहावर ढोलकी वाजवून घेतली. आईच्या पाठोपाठ तिची वाताहत झालेली.. असो..  


'पिंजरा'मुळे आणखी दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे गावोगावच्या यात्रांत जत्रांत भरणारे तमाशाचे फड नावारुपाला आले. त्यांना झोतात येण्याची संधी लाभली. तेव्हा तमाशा बारी हा बऱ्यापैकी पैसा कमावून देणारा धंदा झाला होता, ठराविक जातीपातीच्या बायका पोरी मुबलक उपलब्ध होत होत्या. फक्कड नाचगाणं व्हायचं, फेटे उडायचे. माणसं देहभान हरपून नाचायची, वयाची बंधने कधीच मागे पडली होती. 


दुसरी विशेष गोष्ट घडली ती म्हणजे अनेक खेड्यापाडयांच्या बाहेर कुत्र्याची छत्री उगववीत तशी लोकनाट्य कलाकेंद्रे उगवली. यातून कित्येकांच्या पोटापाण्याची सोय झाली तर कित्येकांच्या देशोधडीला लागण्याचा नवा शासनमान्य लोकप्रिय मार्ग खुला झाला. मात्र कालांतराने यांची संख्या इतकी वाढली की लोकांच्या 'सज्जन' अपेक्षांचा अतिरेक होऊ लागला. हरेक जिल्ह्यातील काही नामांकित कलाकेंद्रे वगळता रसिकांचे रुपांतर आंबटशौकिनांत होत गेले. 
बैठकीच्या लावणीचे देखणे रूप कधी विद्रूप झाले कळलेच नाही, 'ओली' 'सुकी'ची घाण कधी रूढ झाली उमजले नाही. 
    
आता रुपेरी पडद्यावर वा मोठाल्या इव्हेंट्समध्ये साजऱ्या होणाऱ्या तमाशानृत्यातल्या नर्तिका कोण आहेत? तर ज्यांच्या गतपिढ्यांनी तमाशापटांना नाके मुरडली होती, ई ई गावंढळ असं संबोधलं होतं. आता यापोटी त्यांना पैसे बक्कळ मिळत असतील मात्र ती शान लाभत नाही.


आता अखेरची नोंद, तमाशापट असोत वा रिअल लाईफमधला तमाशा असो की असोत कलाकेंद्रे, खरी नृत्यकला क्वचित पाहण्यात येते. शंभर ठिकाणी पिना लावलेली नऊवारी साडी दुटांगी धोतरात कधी रुपांतरीत झालीय कळायला मार्ग नाही. नुसते अंगाला हिसके देत आचकट विचकट हावभाव सुरु असतात, अर्थात लोकांनाही तेच हवे असते. ती जान ती शान आता उरली नाही, उरलीत शेकडो बुजगावणी आणि हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही बावनखणी !


कदाचित म्हणूनच हायवेवरच्या 'त्या' स्त्रियांना पिंजरा हा कोडवर्ड मिळाला असावा. 'पिंजरा'च्या प्रारंभी राजकमल प्रॉडक्शनचा लोगो असणाऱ्या दोन नर्तिका दिसायच्या ज्या आपल्या ओंजळीतली फुले अर्पण करत असत. आता तमाम नर्तिकांच्या ओंजळी रित्या झाल्यात आणि फुलांचे कधीच निर्माल्य झालेत. नियतीने 'पिंजरा'वर घेतलेला हा सूड आहे की तमाशातील स्त्रीदेहाच्या अवमूल्यनाचे हे कमाल टोक आहे हे ज्याने त्याने ठरवायचंय.