कोरोनाबाधितांच्या जागतिक यादीत आपण आज पंधराव्या स्थानावर आहोत. चौदाव्या स्थानावर बेल्जिअम आहे. बेल्जिअम हा नॉन बीसीजी गटातला देश आहे. अमेरिका, इटली, हॉलंड, लेबॅनॉन, बेल्जिअम या पाच देशांनी बीसीजी लसीकरणाची जागतिक पॉलिसी कधीच स्वीकारली नव्हती. विशेष म्हणजे कोरोनाबाधितांच्या जागतिक यादीत भारताच्या खालचे स्थान हॉलंडचे आहे !


14 व्या स्थानावर असलेल्या बेल्जिअमने प्रती दशलक्ष 39,362 व्यक्तींच्या गतीने 4,56,194 टेस्ट केल्या आहेत. त्यापैकी 50,509 लोक बाधित आढळले आहेत. टेस्ट केलेल्या लोकांपैकी सरासरी 11 टक्के दराने बाधित रुग्ण आढळले आहेत. भारताचा ही सरासरी 4.14 टक्के आहे. युरोपियन देश असणार्‍या बेल्जिअमची लोकसंख्या केवळ 1 कोटी 13 लाख 58 हजार आहे, म्हणजे मुंबईपेक्षा कमी !


तिथल्या पुरुषांचं सरासरी वयोमान 79 वर्षे आहे तर महिलांचे सरासरी वयोमान 84 वर्षे आहे. याच निकषासाठीची भारताची आकडेवारी 67 आणि 70 वर्षे अशी आहे.पाच वर्षाखालील बालकांच्या मृत्यूचं तिथलं दरहजारी प्रमाण केवळ 4 आहे तर आपल्याकडे हेच प्रमाण 37 आहे.बेल्जिअममध्ये पंधरा ते साठ वयोमानात मृत्यूमुखी पडण्याचं पुरुष आणि महिलांचं दरहजारी प्रमाण 89 आणि 54 असं आहे तर आपल्याकडे ते त्यांच्या सरासरीच्या दुप्पटीहून अधिक 214 आणि 138 असे आहे.


बेल्जिअमचे 2019 सालचे प्रतिडोई उत्पन्न 45,176 डॉलर्स इतके आहे. 2019 सालचे आपले दरडोई उत्पन्न बेल्जिअमपेक्षा बावीस पट कमी म्हणजे 2044 डॉलर्स होते.बेल्जिअममधला प्रती व्यक्ती आरोग्यविषयक बाबींवर होणारा खर्च 4392 डॉलर्स इतका आहे तर आपल्याकडे हीच आकडेवारी 267 डॉलर्सची आहे.बेल्जिअम आपल्या जीडीपीपैकी 10.6 टक्के रक्कम आरोग्य व्यवस्थेवर खर्च करतो तर भारत केवळ 4.7 टक्के आरोग्यासाठी खर्च करतो.बेल्जिअममधील किमान तापमान हिवाळ्यात 1 डिग्रीपर्यंत खाली जातं आणि उन्हाळ्यात 23 डिग्रीपर्यंत वाढतं. जुलै आणि डिसेंबरमध्ये तिथे पाऊस पडतो. ब्रिटनपेक्षा अधिक आणि हॉलंडपेक्षा कमी असं तिथलं वर्षावृष्टीचं प्रमाण आहे.


आपल्याकडील तापमान, हवेतील सापेक्ष आद्रता हे हवामानविषयक घटक आणि बीसीजी लसीकरणाचा प्रभाव या कारणांपायी कोरोनाबाधितांचे प्रमाण तुलनेने कमी आहे तर गलिच्छ वस्त्या, सार्वजनिक शौचालये असलेल्या झोपडपट्टया, अत्यंत दाट लोकवस्ती या मुळे बाधितांचे प्रमाण आणखी खाली येण्यास अटकाव होतो आहे.


बेल्जिअममधील कोरोनाबाधितापैकी मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण 16.42 टक्के आहे. भारतात हे प्रमाण तुलनेने खूपच कमी 3.43 टक्के आहे.
कोरोनाबाधित व्यक्तींपैकी 8339 व्यक्ती तिथे बर्‍या झाल्या आहेत, बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण 25 टक्के भरते. आपल्याकडे बरे होण्याचे प्रमाण थोडंसं अधिक (28.69 टक्के) आहे.



सोबतच्या चित्रात तीन रंगातले बिंदू दिसतात त्याचे पृथ:करण असे आहे.



निम्न उत्पन्न गटातील देश ज्यांनी बीसीजी लसीकरण केले आहे ते काळ्या निळ्या ठिपक्यात आहेत (भारत त्यातच समाविष्ट आहे). उच्च उत्पन्न गटातील देश ज्यांनी बीसीजी लसीकरण राबवले आहे ते देश काळ्या ठिपक्यांनी दर्शवले आहेत तर उच्च उत्पन्न गटातील देश ज्यांनी बीसीजी लसीकरण राबवलं नाही ते लाल ठिपक्यात दर्शवले आहेत. कोरोनाबाधित असण्याचे आणि मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण तिसर्‍या गटात अधिक आढळले आहे. या आधीच्या पोस्टनुसार 15 मे पर्यंच आपल्याकडील स्थिती बर्‍यापैकी स्पष्ट झालेली असेल.


समीर गायकवाड यांचे ब्लॉग :


 BLOG | कोरोनाचे संक्रमण - इतिहासाची अनोखी पुनरावृत्ती

BLOG | गोष्ट एका डॉक्टरांच्या फोटोची...



BLOG | जागतिक कोरोनाबाधितांच्या यादीतलं आपलं स्थान काय सांगतं?