वॉटर कप स्पर्धा सुरू झाली, सुरुवातीला उत्साह खूप होता. 8 एप्रिल रोजी म्हणजेच पाहिल्या दिवसापासूनच 40, 50 लोक आले. मात्र दोन-तीन दिवसानंतर हळू-हळू संख्या कमी होत चालली. कारण समजायला दोन-तीन दिवस गेले, सकाळी 8 ते 10 हे श्रमदानाचं टायमिंग, मात्र 9 नंतरच एवढं जोरदार ऊन पडायचं. उन्हाच्या झळया जीव चिरत जायच्या. जीभ कोरडी अन अंग तडतडायला लागायचं. लोक मग इच्छा असुनही माघारी जायला निघायचे.


एके दिवशी सगळे बसले. चर्चा सुरू झाली,  "लोक का कमी होतायत वरचेवर.?" कारणं हळू-हळू समजायला लागली, सकाळी 8 च्या आत महिला स्वयंपाक उरकून येऊ शकत नव्हत्या, पुरुष 9 नंतर उन्हामुळे काम करणं अशक्य होतंय म्हणत होते. फक्त एक तास काम होत होतं, त्यातही फक्त 40 जण कामाला , काम कसं उरकणार?? मग उपाय काय? काहीही झालं तरी गाव दुष्काळ मुक्त करायचंय या एका वर्षातच. उपाय काय मग? उपाय काय? संध्याकाळी जमेल का? उपाय काय? संध्याकाळी परत स्वयंपाकाची अडचण. मग आता??

सकाळ गेली, दुपार गेली, संध्याकाळ शक्य नाही, मग फक्त रात्रच शिल्लक राहतेय. पण रातरी लोकं कशी येतील??

दबक्या आवाजात प्रश्न विचारला गेला, की रात्री श्रमदान... केssलंsssत....?

हे ऐकून कोणाच्याही चेहऱ्यावर निराशेचे भाव आले नव्हते.  आशा वाटली अन तेवढ्यात एकजण म्हटला "मला" चालेल. मग दुसरा, तिसरा: चालेल, 10 वा, सर्वांचेच हात वर गेले. हे अद्भुत अन गावात कधी न घडलेलं , ना उर्वरित महाराष्ट्रातलं कधी काही ऐकलंय, असं घडत होतं. एक दोन दिवस केलं असेल गावानी पण 40 दिवस फक्त रात्री श्रमदान?? त्या दिवशी रात्री 8 पासून रात्री 12 पर्यंत 40 जण श्रमदान करून गेले. जेवण स्वयंपाक सगळं संध्याकाळीच उरकलेलं असायचं मग काही महिला ही येऊ शकत होत्या. हळू-हळू संख्या पूर्वपदावर आली. काम जोमाने सुरू झालं.

यात विशेष हे होतं की हे येणारे 40 च्या, 40 जण निव्वळ रोजंदारीवर जाणारे, म्हणजे अक्षरक्ष: हातावर पोट असलेले. कोण शेजारच्या गावात शेतमजूर, कोण दुसऱ्याच्या विहिरीवर, कोण नाल्यावर जाणारं, कोण पेंटर , स्वतःच्या गावात 5 टक्के सुद्धा लोक मजुरी करणारे नव्हते, कारण गाव इनमीन 1000 लोकसंख्येचं. त्यात सुपीकता अन इतर रोजगाराची कामे काहीच नाहीत.  रोजगारी अन स्वतःचं घर जाळून ही मंडळी रात्रभर काम करत होती. गावातले बरेच लोक यांना अपेक्षेप्रमाणे "येडे" म्हणू लागले.

(ते म्हणले नसते तर त्यांना 'वेडे' म्हणायची वेळ आली असती.)

पाचव्या , सहाव्या दिवसापासून मग हा नित्यनियमच सुरू झाला, रात्री 8, 9 पासून ते रात्री 12, 1, 2 ... एके दिवशी तर चक्क पहाटे 4 पर्यंत काम करण्यात आलं. कोणालाही बोलवायला मात्र जावं लागत नाही. सगळे 8 वाजले की पंचायतीसमोर आपापली टिकाव खोऱ्या घेऊन हजर. गाव भौगोलिक दृष्ट्या संपूर्ण खड्ड्यात, गावात कुठल्याच मोबाईलला रेंज नाही, मग मेसेज फोन करून बोलवणं भानगड नाही.

कामाच्या ठिकाणी फक्त अन फक्त पाणी, ना काही नाश्ता ना इतर काही सुविधा, लाईटही नाही,  फक्त 4, 5 बॅटरया आणि मनोरंजन म्हणजे, कंटाळा आला की लोक स्वतःच काम करत-करत "तुफान आलंया" मोठ-मोठ्याने म्हणणार! रात्रीत आवाज घुमायचा. वरून हे काम कुठं,, तर गावापासनं 3-4 किलोमीटर दूर, अक्षरक्ष: दोन-दोन जणांना मोटार सायकलीवर 4, 4  फेऱ्या करत आणावं लागायचं. पण यांचं काम हार न मानता रोज सुरू, आणि जे 40 जण येतात ते रोज "येतातच", गेल्या 40 दिवसात यातल्या एकानेही सुट्टी वगैरे काही घेतलेली नाही. यांना या कामाचा एक फुटकी सुद्धा मोबदला तर नाहीच नाही.

श्रमकरीही वेडे, एक मिलीटरी मॅन काल सेवा संपवून रिटायर होऊन गावात परतला तर त्याच रात्री 10 ला कुटुंबासाहित श्रमदानाला, आता रोजच. एक शिक्षक संपूर्ण सुट्टी इकडे श्रमदानात घालवतोय, कोण सख्या मेव्हणीच्या लग्नाला फक्त 10 मिनिटात अक्षता टाकून माघारी येतंय, एक मजुरी जोडपं असं की यांना साधी एक गुंटा सुद्धा जागा नाही, तरी हे श्रमदान रोज करणार, का तर ते त्यांच्या त्यांना माहीत.

काल रात्री यांना भेटलो अन इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर, काम बघितल्यावर, त्यांचा उत्साह वाढवल्यावर शेवटी विचारलं की

"एवढे रोजगारी असून , आज कमावलं तरच आज भाकरीचा चंद्र दर्शन देणार, असं असतानाही तुम्ही कसंकाय सगळं सोडून काम करताय? तुमचं घर कसं अन कोण चालवतंय. वाईट नाही वाटत का??"

भयाण रात्रीच्या अंधारात, इचू काट्याच्या अन सापाच्या रानात, डोंगरावर एका कडेला बॅटरीच्या अंधुक उजेडात सगळे बसलो असताना, शेजारी शांतता चिरायला कुठलाही आवाज नसताना....एकजण सपशेल सांगत होता... अन मला स्वदेसचा तो सीन हुबेहूब डोळ्यासमोर दिसत होता...

"जन्मलो तवापसनं रोजगारीच करतोय, बाप-चुलतं बी तेच करायचा, मी बे तेच करतोय, आता आमच्या पोरावासनीबी आमी तेच करायला लावायचं का? अन आमी बी हे उरलं फाटकं आयुष्य नुसती रोजगारीच करायची का? मग ह्यावरशी ठरवलं की पुरं झालं आता,, जिंदगीची एवढी वर्ष रोजगारी करत होळी किली, आता महयना ह्या कामाला देऊन बघू, लयात लय काय हुईल, तर 40 दिस उसनं-पासनं करून जगावं लागल. पर जर आमच्या घामाच्या धाराला निसर्गानं उद्या सवताच्या हातानं फुलं डुबली ,  गावात पाणीच पाणी आलं तर, आमची रोजगारी सुटून आमी आमच्या ह्या वर्षानुवर्षे कोरडवाहू असलेल्या मातीत ही$$ मनुन कष्ट उपसू, रोजगारा पेक्षा काही हजार लाख नक्कीच जास्त मिळतील, पोराला चांगलं शिकवता ईल. नुकसान तर काय नाई, फक्त एकच की कष्ट, ते तर आयुष्यभर करतच आलोय की?? त्याचं काय नुकसानीत पकडत न्हाई आमी........"

पहाटे 2, 3 पासतोर डोंगराच्या कुशीत जाऊन आपलं गाव पाणीदार करायला झटणारया ह्या 40 सैनिकांना आखा महाराष्ट्र आज सलाम करतोय... तो उगाच नाही.... ????????

गाव : चुंब

तालुका : बार्शी

जिल्हा : सोलापूर.

--

सचिन अतकरे यांचे याआधीचे ब्लॉग :

जगावेगळ्या रोपवाटिकेची कहाणी


श्रमदानासाठी परदेशातून मदत करणारे सादिकभाई


सलाम दोस्तहो...


...हे वाचायला थोडीशी ताकद लागेल...!

द ग्रेटेस्ट वॉटर हिरो - अजित देशमुख