पुण्याच्या सिंहगड कॉलेजला Civil engg पूर्ण केलं. उत्साह भरपूर आहे. शिकून आपल्या शिक्षणाचा गावासाठी फायदा व्हावा असं खूप वाटतंय. उच्चशिक्षण घ्यायला application केलं. ऑस्ट्रेलियाला ऍडमिशन झालं. विजा वगैरे फॉर्मलिटीज झाल्या अन मेलबर्नला MS साठी गेलो. स्वप्न पूर्ण होत होतं. आई वडिलांनी केलेल्या कष्टाचं चीज होत होतं. आता स्वतःचाच अभिमान वाटत होता.  8,9 महिने होत आलेत इकडे. सगळं व्यवस्थित सुरु आहे.

आई वडील अन गावाची, मातीची आठवण गाव, राज्य, देश सोडल्यावर सगळ्यांना असते तशी सारखी आतल्या आत असतेच. फक्त कोणाशी बोलत नाही. 'गावापासून दूर गेलेला माणूस, मातीच्या इतक्या जवळ कसा येतो' समजत नाही. दिवस छान चालले होते. तशात पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचं तुफान गावात घोंघावायला लागलं. गावातल्या ग्रुपवरचे, मित्रांचे इकडे व्हाट्सअपवर अपडेट यायला लागले. तसं अस्वस्थता वाढायला लागली. 'आता संधी आलीय की गावासाठी घाम गाळायची अन नेमकं आपण असे बाहेर'. नुसती घालमेल व्हायला लागली. पण वडील म्हणजे देव माणूस. सामाजिक कामात कायम प्रसिद्धी पासून दूर राहत, पण सर्वात पुढे राहून काम करणारे. ते भारतातच असल्याने या कामाकडे लक्ष ठेवून होते. तेवढाच आधार वाटायला लागला. पण घालमेल तशीच. काही समजत नव्हतं.

गावात काम जबरदस्त सुरु होतं. लोक उत्साहाने रोपवाटिका, शोषखड्डे, CCT इतर श्रमदान करत होते. अर्ध्या-अधिक, गाव पेटून उठल्यासारखं झालेलं.

गावातलंच एक जोडपं. गावाविषयी अतिशय प्रेम असलेलं. गावसाठी सतत काही न काही करणारं. सर्वांच्या आदरस्थानी असणारं. अशात त्यांच्यासाठी अन गावासाठी एक अतिशय वाईट बातमी आली. गावातला पण परगावला असणारा सर्वांचा लाडका मित्र, म्हणजे या जोडप्याचा मुलगा दुर्दैवाने मरण पावला. सगळं गाव दु:खाच्या डोंगराखाली दबलं गेलं. कोणाला काही समजेना. सगळं कामही साहजिक थांबवलं गेलं. 3 दिवस अशातच गेले. मुलाचे वडील या मोठ्या दुःखातून थोडे शुद्धीत आले. पहिली गोष्ट त्यांनी केली ती हेलावून टाकणारी होती.

त्यांचे शब्द होते-- 'गावातलं सुरु असलेलं काम थांबवू नका."

मुलाच्या वडिलांचाच असा सांगावा गावाला थोडंसं दुःखातच पण हलकं बळ देऊन गेला. थोडंसं काम हळू -हळू शांतपणाने सुरू झालं. उत्साह नव्हताच आता गावात, पण काम सुरू होतं.

धन दिलं गेलं. आता गावात एक वेगळीच गोष्ट घडत होती. मुलाचे वडील स्वतः रडत नव्हते अन गावातल्या कोणाला अन कुटुंबालाही रडू देत नव्हते, "तो समाजासाठी आला अन समाजासाठी गेला" तुम्ही रडू नका असं सर्वांना सांगत होते. ही ताकद त्यांनी कुठून आणली होती देव जाणे. धन दिलं गेलं. माती झाली. अन तेवढ्यात गावाला जबरदस्त धक्का बसावा अशी गोष्ट घडली. त्या मुलाचं गावातलं भावकी अन पाहुणे वगैरे मिळून 40 जणांचं कुटुंब गावात तिसऱ्या दिवशी श्रमदानाला आलं होतं. (आपली मनातल्या मनात का होईना पण प्रतिक्रिया काय असावी याचीही गावाला शुद्ध नव्हती). कुटुंबाने बराच वेळ श्रमदान केलं. सर्वांशी थोडा संवाद साधला. त्यांचे डोळे सर्वाना पुन्हा उभा राहण्याचं बळ देत होते - स्वतःचं दुःख लपवून.

आता संपूर्ण गावात थोडीफार शुद्ध आली, गाव परत पूर्वीसारखं जोमाने श्रमदानाला यायला लागलं. परत एक संथ, पण कामाला उत्साह आला. मुलाचे वडील संपूर्ण गावाला सोबत घेत होते. गावात 1 मे ला महाश्रमदान झालं. लोकांनी येणाऱ्या जलमित्रांची जबरदस्त सेवा करत अन सर्वांनी मिळून श्रमदान करत 1 कोटी 20 लाख लिटर पाणी साठवण अन मुरवण क्षमता निर्माण केली.

गाव आता परत पेटून उठलं होतं. पूर्ण जोमात होतं. अशात.. परत एक प्रचंड प्रेरणा देणारी गोष्ट गावाने पाहिली.  त्या मुलाच्या वडलांनी गावात 'श्रमदानाच्या कामासाठी असलेल्या पोकलंड वगैरे मशीन्सच्या डिझेलसाठी पैसे कमी पडू नयेत' म्हणून स्वतः 50,000 रुपये दिले.

---

गावातल्या या वटवृक्षापेक्षा ताकदवान असलेल्या वडिलांचा, आईचा अन ताईचा प्रचंड अभिमान वाटतोय, .....मलाही........

कारण हे "माझे" वडील आहेत.

होय... माझे...

मेलबोर्नमध्ये माझा दुर्दैवी अंत झाला.... पण घरच्यांनी माझ्या मृत्यूनंतरही गावातलं काम थांबू दिलं नाही. घरच्यांची प्रत्येक action इकडे आभाळात, माझी छाती अभिमानाने फुलवत होती. दुःख आत मध्ये दाबून, त्यांनी जे काही केलं या दिवसात ते मला समाधानी करत होतं. माझ्या मृत्यूमुळे गावात जे घडेल, त्याच्या भीतीचं माझ्यावरचं डोंगराएव्हढं ओझं- माझ्या वडिलांनी अन घरच्यांनी मिळून दूर केलं.

"बाबा, आई, ताई!!" - "मला तुमचा प्रचंड अभिमान वाटतोय हो".

तुमच्या वागण्याने अंगावर शहारे आणता तुम्ही माझ्या. गाववाल्यांनो, माझं all the best तुमच्या आधीही कायम सोबत होतं, आताही सोबत आहे.

तुमचाच..........

ओम

 (टीप : ही बार्शी तालुक्यात घडलेली सत्य घटना आहे. या वडिलांना, ओमला, त्याच्या कुटुंबाला--- संपूर्ण भारतभूमीचं वंदन, तुम्ही तुमच्या कार्यातून गाव, राज्य, देश बदलत आहात!!!)

संबंधित ब्लॉग :

द ग्रेटेस्ट वॉटर हिरो - अजित देशमुख