स्वतःचा कणा गेला असताना, दुष्काळाचा कणा मात्र जिद्दीनं फोडणारा 77 वर्षांचा वाघ...!!!


 

ही असं सरळ उभारता येत नाही. तोल जातोय, असं कमरतनं हालत असल्यासारखं उभारावं लागतंय. डॉक्टरला दाखवलं , ते म्हणलं- मणका गेल्यात जमाय,, ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. मग दुसरया मोठ्या डॉक्टरला दाखवलं तर तेबी तेच म्हणलं. थोडा वेळ उभारलं की ही पाय असं आता सुजल्यासारखं जोरात सुजत्याती. घरापासनं चौका पर्यंत चाललं तर वेदना सुरू होत्यात. चालायलाच नको वाटतं. अंगावर शंभर हत्तीचं ओझं दिल्यासारखं होतं दहा-वीस पावलं चाललं की.

हे सगळं खरं असलं तरी कसंय की, कर्ता पुरुषच अडचण म्हणून एका जागेवर बसला की घर काय अन गाव काय --सगळं जाग्यावर बसतं.

म्हणून रोज पहाटे बरोब्बर 5.30 ला काम चालुय त्या ठिकाणी लोकं यायच्या आत हजर असतो... 45 दिवसातला एक दिवस आजवर चुकलेला नाही, किंवा 5 मिनिट उशीर झालेला नाही. एक दोनदा चारचाकीचा ड्रायव्हर उशिरा आला म्हणून घरच्या दोन चाकीवर एक जण कामाच्या ठिकाणी सोडायला आला, पर चालू गाडीतच तोल जाऊन तसाच मागच्या मागं पडलो. ही जी लागलंय पाठीला ती पहिल्या वेळी पडल्याची जखमय अन ही गुडघ्याची जखम दुसरया वेळची. पण तरीबी पहाटे 5.30 च्या आधी कामावर हजर होतो. एकदा CCT नीट झालीय का बघताना बर्म अन त्या खड्ड्याच्या मधी पाय अडकून पडलो. त्यातबी लागलं.

खरं सांगायचं तर "45 वर्षात अंगाला जेवढ्या जखमा झाल्या नसतील तेवढ्या - या 45 दिवसात झाल्यात."

पण ह्या शरीराच्या जखमापेक्षा मनाची "दुष्काळाची" जखम लय खोलवराय.
म्हणून त्या कमी करायला आता ह्या शरीराच्या जखमा झेलायच्या...

72 पासनं गावात अजून दुष्काळाय, 7 ते 8 पाण्याचे सोर्स आहेत पण सगळेच्या सगळे जानेवारी आला की मुरगळून पडायला लागतात, मग आणा लांबनं हापश्यावरनं किंवा असलं कोणाच्या तर, हिरीतनं पाणी, जानेवारी ते जून मध्यापर्यंत 5 महिने, वर्षानुवर्षे हीच बोंबाबोंब. लोकांनी फक्त पाणी आणायला म्हणून सायकली अन जुन्या दोन चाकी गाड्या ठेवल्यात. असं करावं लागणं ही काय गावाच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट नाई.

गेली 50 वर्ष झालं नावाला राजकारण अन करायला खऱ्या समाजकारणात आहे, गावाला आजवर लोकांच्या मदतीनं अनेक पुरस्कार मिळवून दिलेत. लोकराज्य, कुटुंब नियोजन, निर्मल ग्राम, स्वच्छतेचे अशे इतर अनेक, पण गावाला आजपर्यंत पाणी मिळवून देऊ शकलो नाही, दुष्काळ हटवू शकलो नाही, ही टाचणी कायम ह्रदयाला बोचती. लोक सायकल, कमरे-डोक्यावर पाणी आणायलेले दिसायचे तवा काळीज आतल्या आत फाटून जायचं.

शेवटी चिडून एकदा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना धरणा वरनं नळ योजना करावी म्हणलं , त्याला 8 कोटी खर्च येणार होता, पण परत मनात प्रश्न की पाऊसच नाही पडला तर काय?? सगळं पैशे पाण्यात. मग लय विचार केला की नैसर्गीक पाणीसाठा कसा करता यईल?? स्वावलंबी कसं होता येईल?? अनेक प्रश्न होते.

यावर्षी मात्र उत्तर सापडलं -पाणी फौंडेशनची ही स्पर्धा. श्रमदानाने अन स्वतः काम केलं की लोकांना त्या कामाची किंमत राहते, आयतं काय मिळालं की नाही. लोक आपणच केलेल्या कामाची पोटच्या पोरासारखी काळजी घेतील. मग जिथं जिथं गेल्यावर्षी काम झालतं तिथं तिथं भेटी दिऊन आलो. सगळी माहिती घेतली. कसं अन किती काम झालंय सगळं बघितलं. अशात हे पाठ दुखणं चालुच होतं. सगळं फिरून रात्री गाडीतनं उतरलं की दोघांनी धरून उतरावं लागायचं- पाय एवढं सुजून बंब झालेले असायचे. पाय ताटकळून जायचे.

मग काम झालेल्या गावांना भेटल्यावर, साधारण पुसट कल्पना आली की नेमकं काय करावं लागणार ते. एक बैठक घेतली सुरूवातीला, लोकांना समजावलं काय अन कसं करायचं ते, मग दुसरी, मग तिसरी, मग चौथी अशा करत करत तब्बल 41 बैठका स्पर्धा सुरू व्हायच्या आत घेतल्या. "गुडघ्याएव्हढ्या लेकरापासनं ते गुढघ्यातनं वाकलेल्या म्हताऱ्यापर्यंत सगळ्यांना आता गावातला दुष्काळ कसा हटू शकतो अन त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार" याचा विश्वास आला होता. शेवटी 7 एप्रिल च्या रात्री बाराच्या ठोक्याला दुष्काळावर पहिली कुदळ मारली गेली. अन ती 45 दिवसात सलग शिवार उकरत शेवटी थांबली ती फक्त 22 मे च्या मध्यरात्री 12 लाच... स्पर्धा सुरू झाल्यावरबी लोकांना झालेल्या कामाची अन उरलेल्या कामाची माहिती असावी, आणि त्यांचा उत्साह वाढता रहावा, त्यांच्या अडचणी समजाव्या म्हणून बैठका घेतच होतो, 20 बैठका स्पर्धा सुरू असताना घेतल्या. म्हणजे अश्या टोटल 61 बैठका आम्ही गावात घेतल्यात. त्याचा आमाला प्रचंड फायदा झाला कारण सरासरी मग 500 लोक रोज कामाला असायची. कधी हजार बाराशे सुदीक आली.
एवढ्या लोकांचं नियोजन महत्वाची गोष्ट होती, मग कोअर टीम सोबत चर्चा करून आम्ही गावशिवारात कामाच्या 6-7 साईट तयार केल्या. कुठं CCT, कुठं LBS, कुठं इनलेट-आउटलेट, कुठं कंपार्टमेंट बंडींग. टायमिंग पण असंच ठेवलेलं, समजा कुणी म्हणलं की सकाळी 7 ला जमत नाही कारण हे हे काम असतं, की त्याला 8 ते 10 च्या batch ला बोलवायचं, मग काय बोलणार तो? अशा आम्ही तब्बल 6 batch केलत्या कामाच्या. सकाळी 6 ते 8, 8 ते 10, 10 ते 12, मग संध्याकाळी 4 ते 6, 6 ते 8, अन 8 ते 10. आता दिवसातल्या ह्या वेळेत जमणार नाही असं कोणीच नसायचं. याचं काटेकोर नियोजन शेवट पर्यंत ठेवलं.

मणक्याच्या त्रासामुळं अन प्रचंड पाठदुखीनं कामाच्या ठिकाणी बी जास्त वेळ उभा राहता यायचं नाही,, मग या सगळ्या साईटवर ही अशी एक एक खुर्ची ठेवलेली , अन एक माईक कायम सोबत , कामाला अळम-टळम दिसली की पुकारायचं, लोकं परत काम करायची. उत्साह वाढवत राहायचं कायम, कोणतरी सांगणारं असलं की लोकं थोराड होत्यात. "खांदा पटापट, भरून पाठवा, टॅक्टर उभाय लय वाढुळ, डिझेल फुकट नाही त्याचं, भरा पटापट पाट्या, उरकलं का??" अशी लगीनघाई कायम हिथं सुरू.

कधी कधी लोकं टाळाटाळ बी करत्यातीच, आता समजा ओढा रुंदीकरण आहे, किंवा शेततळं घ्यायचंय, मग दोन दिवस विचारून बघायचं, तिसऱ्या दिवशी तसं टाळाटाळ दिसलं की, त्याच्याबरोबर माईक वरनंच समोर उभा राहून कामाच्या ठिकानावरच चर्चा करायची, सगळ्या गावासामोर. "पैशाची अडचनाय का?, का नकु म्हणतोय?" मग त्याची अडचण समजून घ्यायची. ती जाग्यावर सोडवायची अन शेवटी एकच सांगायचं की "मला निर्णय हवाय, अन तो बी पॉजीटीव!". मग ते करायचं गपचूप शेततळं.

आता कधी-कधी असं order द्याव्या लागतात पण नाईलजाय. कारण लोकांना त्यांचाच फायदा कधी-कधी कळत नाही लवकर. आता त्याच्या शेतात साठणाऱ्या पाण्याचा मला स्वतःला काय फायदा होणाराय का??
मग अशी भलाईची कामं कधी-कधी ऑर्डर देऊन करावी लागतात. मला माहितीय की पाऊस पडल्यावर हीच , आज नाही म्हणणारी लोकं , उद्या नाचत नाचत येणारेत.

सकाळी हे काम झालं की दुपारी थोडा आराम करायचा म्हणला की कोणतरी दारात असतंयच आलेलं की "काका डिझेल संपलंय!", मग त्याचं नियोजन, तोवर दुपारच्या मीटिंगची वेळ होते, दुसरया दिवसाचं नियोजन असतं, अजून एक पोकलेन JCB कमी पडतोय असं समोर येतं, मग त्यासाठी फोना-फोनी. असं करत वेळ जातो. गेली 25 वर्ष जिल्हा परिषदेवर आहे. सध्याला सुद्धा विरोधी पक्षनेता आहे. 25 वर्षात असा एखादाच दिवस असेल की तिथं गेलो नाही, आता मात्र ह्या 40 दिवसात जायचं लय कमी केलंय ह्या कामामुळं. सध्या फक्त दुपारी एखादा तास जाऊन येतो. बरीच कामं जिल्ह्याची आता गावातनंच करतोय. परत आलं की गावातलं काम सुरू.

हे काम करताना सगळ्यात चांगलं तवा वाटलं जवा आमच्या गावातल्या शाळेतल्या पन्नास एक मतिमंद मुलांनी स्पर्धेला लागणारी 10 हजारांची रोप वाटिका तयार करायला घेतली. बघता बघता त्यांनी 30 दिवसात 19 हजार रोपं लावली, ती बी इतक्या सुंदर पद्धतीनं की 90 टक्के बिया उमलून आता त्याची ही अशी रोपं झाल्यात. असं या आधी कदाचीतच कुठल्या गावात झालं असेल.

आता खरं सांगू का आमचं टार्गेट कधीच पूर्ण झालतं. पण आमी लोकांना मुद्दाम सांगतीलंच नाही. कारण टार्गेटसाठी काम करणं आमचा उद्देश नव्हता. आम्हाला गाव कायमचं दुष्काळ मुक्त करायचंय, अन ते बी ह्या 45 दिवसातच. अन खरं सांगतो ह्या 77 वर्षात गावात एवढं काम झालेलं कधीच पाह्यलं नव्हतं, आता मात्र स्वतःच्या डोळ्यानं हा बदल बघतोय. जिथं तिथं आख्या संपूर्ण शिवारात नुसतं पाणी अडवण्याचं उपचारच उपचार, कुठं CCT चं शेत, कुठं इनलेट-आऊटलेट, कुठं LBS, कुठं माती नाला बांध, तर कुठं Deep CCT,

"मनाला पडलेलं इतक्या दिवसाचं वर्षानुवर्षाचं दुष्काळाचं खडडं,, ह्या वर्षी मात्र पाण्याच्या सुकाळानं लेपुन निघणारेत..."

शरीराच्या जखमा मलम पट्टी ऑपरेशननं उद्या कमी होतील, पण ही दुष्काळाची जखम ह्रदयाला सलत राहिली असती... आयुष्यभर आता नाही राहणार.. एवढं शंभर टक्के..!!!

///
ज्या माणसापुढं गाव नाही, तालुका नाही, तर एक संपूर्ण जिल्हा आज आदरानं झुकतो त्या उत्तर सोलापूर तालुक्यातल्या 'वडाळा" गावच्या बळीराम काका साठेंची ही कहाणी...

उद्या हे गाव महाराष्ट्रात पहिलं नाही आलं तरच आश्चर्य वाटेल...

---
सचिन अतकरे...!