त्यादिवशी फक्त जिन्यावर मध्येच का उभे राहता असा प्रश्न त्याने दोन महिलांना विचारला. शब्दाला शब्द वाढत गेले, प्रकरण हातघाईवर आले. अशावेळी अर्थातच महिलांच्या बाजूने लोक उभे राहतात... इथेही तसच झालं. दोघा तिघांनी त्याला धक्काबुक्की सुरु केली. आणि त्यात नको होतं, तेच झालं. त्याचा तोल गेला... आणि लोकल अवघ्या 20 फुटांवर असताना तो रुळांवर कोसळला. बिचाऱ्याने उठण्याचा प्रयत्न केला, रुळ ओलांडण्याचाही प्रयत्न केला! पण लोकलच्या वेगापुढे त्या साठीतल्या माणसाचा वेग कमी पडला आणि त्या तापलेल्या चाकांनी त्याचे दोन तुकडे केले.
तेव्हापासून अनेक प्रश्न डोक्यात घोंगावताहेत.
लोकलखाली चिरडलेल्या मृतांच्या कुटुंबियांची काय अवस्था होत असेल? ते पुन्हा लोकलने प्रवास करत असतील का? आपल्याच माणसाचे शेवटचे क्षण पाहताना त्यांना काय वाटत असेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे.... असे अपघात टाळता येतील का?
नक्कीच टाळता येतील!
मुंबईच्या रणरणत्या उन्हात मुंबईकरांची डोकीही तापलेली असतात. लोकलच काय, हल्ली थंडगार एसी मेट्रोमध्येही लोकांची डोकी आग ओकतात.
पण असं का होतंय? याचा कधी विचार केला आहे? त्या दोन्ही महिला आणि त्यांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या पुरुषांना खरंच त्या माणसाची हत्या करायची होती का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे.
गेल्यावर्षीचीच आकडेवारी माझ्यासमोर आली! 8 मेची बातमी होती! 1 मे पासून 6 मेपर्यत 6 दिवसात 61 मुंबईकर लोकल अपघातात दगावले. हा आकडा विषण्ण करणारा आहे. खरं तर हे अपघात नाहीत, तर व्यवस्थेने केलेले खून आहेत, असच म्हणावं लागेल.
देशाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी लोकल असा मुंबईच्या लोकलचा लौकिक आहे. पण मुंबईची लोकल जितकं देते, तितका परतावा तिला मिळतो का? तर नाही.
ना लोकलची संख्या वाढतेय, ना रुळांचं जाळं विस्तारतंय, ना प्रवास सुरक्षित होतोय, ना प्रवासाचा वेळ कमी होतोय.
पण मुंबईकरांना हे सगळं सहन करण्याची सवय लागली आहे.
काय झालंय... की मुंबईकरांना गृहित धरण्याची सवय लागली आहे. मुंबईचं स्पिरिट या गोंडस नावाखाली... गृहित धरलं जातंय...
चलता है... चलने दो!
हे असच चालायचं.
जाने दो ना यार!
आपुन का क्या जाता है?
ही वाक्ये बहुदा मुंबईत सर्वाधिक उच्चारली जात असावीत. आणि हेच मुंबईकरांच्या जीवावर उठतंय.
इंग्रजांनी सुरु केलेल्या या उपनगरीय रेल्वेने 70 लाख मुंबईकरांना वेग दिला हे खरंय. पण त्या बदल्यात तिला काय मिळालं?
आता तर रेल्वेचा वेगळा असा अर्थसंकल्पच बंद करुन सरकारने त्यानंतर होणाऱ्या चर्चांनाच लगाम घातला.
एरव्ही रेल्वे अर्थसंकल्प आला... की मुंबईच्या लोकलला "वाटाण्याच्या अक्षता" ही ठरलेली हेडलाईन द्यायची. दोन दिवस त्यावर तडकून बोलायचं आणि तिसऱ्या दिवशी मधुर आवाजात लोकल देरी से चल रही है. असं ऐकून मनातल्या मनात शिव्या घालायच्या आणि घामेजलेल्या डब्यात स्थितप्रज्ञासारखा प्रवास करायचा. हे असं मुंबईकर आजन्म करत आले आहेत.
पण हा निगरगट्टपण आम्हा मुंबईकरांमध्ये कुठून आला?
मुंबई दिवसागणिक नव्हे तर तासागणिक भरगच्च होत आहे. भौगोलिक मर्यादांमुळे तिचा विस्तार तर होतच नाहीये, पण माणसं मात्र नित्यनेमाने वाढत आहेत.
मुंबई कुणालाही उपाशी मारत नाही, हा लौकिक न राहता मुंबईसाठी शाप झाला आहे. आणि याच स्थैर्यासाठी मुंबईतलं इनकमिंग थांबत नाहीये. म्हणजेच मुंबईची अवस्था एका अशा फुग्यासारखी झाली आहे, ज्यात त्या फुग्याच्या क्षमतेपेक्षा दहापट हवा भरलेली आहे, आणि तो फुगा कोणत्याही क्षणी फुटण्याच्या मार्गावर आहे.
खरं तर राजधानी दिल्लीचे शिल्पकार गणेश देवळालीकर यांचा विचार आज मुंबईत रुजवण्याची गरज आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिल्लीची उभारणी करणाऱ्या या माणसाने. निवृत्तीनंतर प्रत्येकाने दिल्ली सोडायला हवी, असा विचार मांडला. फक्त विचारच मांडला नाही, तर स्वत: निवृत्तीनंतर ते कायमचे बडोद्याला निघून गेले.
शहरावर ताण येऊ नये म्हणून मांडलेला हा विचार साधा असला, तरी प्रचंड परिणामकारक आहे. पण असा विचार किती मुंबईकर करतात? पूर्वी गिरणीत काम करणारी माणसे निवृत्त झाली की आपापल्या गावी परतायची... पण आज ते प्रमाण कमी झाले आहे. अनेक संभावना, अमर्याद संधी, भविष्यातले स्थैर्य... यामुळे मुंबईतच चिकटून राहण्याचे प्रमाण वाढले आहे.
पण देवळालीकरांनी जो विचार मांडला तो आपल्या मुंबईत शक्य आहे का? नक्कीच शक्य आहे. फक्त या चमचमत्या मुंबईचा मोह सुटायला हवा. पण घोडं इथेच अडते. मुंबईत राहणारा वेगवान माणूस बाहेरच्या जगातल्या संथ वेगाशी जुळवून घेऊ शकत नाही, असा एक भ्रम पसरला आहे. पण हे साफ खोटय... इथे बाहेरुन आलेल्या माणसांना मुंबई सुटत नाही. मुंबईतली कमाई, मुंबईतला कामाचा परतावा नक्की जास्त आहे. पण म्हणून मुंबईला असं का ओरबडायचं? मुंबई तुम्हाला जितकं देते, तितकं तुम्ही मुंबईला देता का? याचा विचार कधी केलाय?
तो विचार जोपर्यंत आपण करत नाही! तोवर मुंबईकरांचे तुकडे होतच राहणार.
त्यामुळे लोकलच्या चाकांखाली येऊन मरायचं की शांतपणे जगाचा निरोप घ्यायचा हे आपणच ठरवा.
संबंधित ब्लॉग :
राहुलची खिचडी : देवा तुला शोधू कुठं?
राहुलची खिचडी : खेलो इंडिया खेलो!!!
राहुलची खिचडी : मुख्यमंत्र्यांची भाषणबाजी आक्रस्ताळी का झालीय?