The Japanese Wife: सध्याच्या डिजीटल जगात पत्रलेखन ही केवळ एक कल्पना आहे, असं वाटतं. 90 च्या दशकापर्यंत पत्रलेखनाद्वारे लोक एकमेकांसोबत संवाद साधत होते. प्रियकराला किंवा प्रेयसीला आपले प्रेम व्यक्त करायचे असेल, तर पत्र हा एकच पर्याय 90 आणि त्या आधीच्या दशकातील तरुण तरुणींकडे होता. पत्र हे त्या कपलच्या लव्हस्टोरीचा साक्षीदार ठरत होते. सध्या टिंडर सारख्या डेटिंग वेबसाइटमुळे तसेच सोशल मीडियामुळे पत्रलेखन ही संकल्पना संपुष्टात आली आहे, असं वाटतं. 'हम आपके हैं कौन' मध्ये टफीनं दिलेले पत्र असो किंवा मैने प्यार किया मधील कबुतरानं दिलेलं पत्र, बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये देखील पत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण पत्राद्वारे संसार थाटणाऱ्या जोडप्याची कथा 'द जॅपनीज वाईफ' या चित्रपटात मांडण्यात आली आहे. हा चित्रपट देखील एका अपूर्ण पत्रा प्रमाणेच आहे, असं म्हणता येईल. 


अपर्णा सेन या दिग्दर्शिका त्यांच्या चित्रपटातून बंगाली संस्कृतीला जगासमोर मांडतात. त्यांनीच 'द जॅपनीज वाईफ'  या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बंगालमध्ये राहणाऱ्या स्नेहमॉय चॅटर्जी या शिक्षकाची अन् जपानमध्ये राहणाऱ्या मियागी या तरुणीची लव्हस्टोरी अपर्णा सेन यांनी त्यांच्या 'द जॅपनीज वाईफ' या चित्रपटातून मांडली आहे. एका सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या प्रेमपत्राप्रमाणेच अपर्णा सेन यांच्या 'द जॅपनीज वाईफ'  या चित्रपटाचे कथानक खुलत जाते. या चित्रपटात स्नेहमॉय चॅटर्जी ही भूमिका अभिनेता राहुल बोस यानं साकारली आहे तर चिगुसा टाकाकूनं मियागी ही भूमिका साकारली आहे. 


मियागी अन् स्नेहमॉय चॅटर्जी यांचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप
स्नेहमॉय चॅटर्जी हा सुंदरबन येथील एका शाळेत शिक्षक असतो. चित्रपटाच्या सुरुवातीला असं दिसतं की, जपानमध्ये राहणारी मियागी ही पत्राद्वारे स्नेहमॉयला सांगते की, ती त्याची 'पेन फ्रेंड' व्हायला तयार आहे. पेन फ्रेंड म्हणजे असे दोन अनोळखी व्यक्ती ज्यांची मैत्री पत्राद्वारे एकमेकांसोबत संवाद साधून होते. स्नेहमॉय चॅटर्जी आणि मियागी हे पेन फ्रेंड होतात. मियागीला स्नेहमॉयचा पत्ता कसा मिळतो? हे मात्र चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेलं नाही.  बरेच दिवस स्नेहमॉय आणि मियागी हे पत्राद्वारे संवाद साधत एकमेकांबद्दल जाणून घेतात. स्नेहमॉय मियागीला त्याच्या कुटुंबाबाबत सांगतो. स्नेहमॉयचे आई-वडिल हे तो लहान असतानाच जग सोडून जातात. तो त्याच्या मावशीसोबत राहात असतो. तर आई आणि भाऊ असं मियागीचं कुटुंब असतं. बंगाली कुटुंबात वाढलेल्या स्नेहमॉय हा मियागीला पत्र लिहिण्यासाठी इंग्रजी भाषा शिकतो. एकेदिवशी मियागी  स्नेहमॉयला एक खास भेट पाठवते. जपानमधून आलेला या मोठ्या बॉक्सची चर्चा सुंदरबनमधील लोकांमध्ये होते.  स्नेहमॉय हे गिफ्ट उघडून पाहतो. तर या बॉक्समध्ये जपानमध्ये मिळणाऱ्या काही खास वस्तू असतात. हे पाहून स्नेहमॉयची मावशी त्याला विचारते की, ही भेटवस्तू कोणी दिली?' या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र स्नेहमॉय टाळतो. त्यानंतर मियागी ही  स्नेहमॉयला एक कॅमेरा देखील पाठवते, या कॅमेऱ्यामध्ये मावशीचे आणि तुझ्या घराचे फोटो पाठव, असं स्नेहमॉयला सांगते. स्नेहमॉय त्याच्या मावशीचे फोटो काढायला सुरुवात करतो तेवढ्यात मावशी एका मुलीची ओळख स्नेहमॉयलासोबत करुन देते. या मुलीचं नाव संध्या असते. संध्या ही विधवा असते. त्या मुलीचे  स्नेहमॉयसोबत लग्न व्हावे अशी स्नेहमॉयच्या मावशीची इच्छा असते. संध्या ही स्नेहमॉय आणि त्याच्या मावशीसोबतच राहात असते. याबाबत स्नेहमॉय मियागीला पत्राद्वारे  सांगतो. त्यानंतर मियागी स्नेहमॉयबद्दलचे प्रेम पत्राला उत्तर देऊन व्यक्त करते. येथून मियागी आणि  स्नेहमॉय यांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपला सुरुवात होते. 


एकदाही न भेटलेले मियागी अन् स्नेहमॉय पत्राद्वारेच थाटतात संसार
स्नेहमॉय हा एक शिक्षक असतो. मियागीला पत्र पाठवण्यासाठी तो एक्स्ट्रा क्लास घ्यायला सुरुवात करतो. एकेदिवशी मियागी तिच्या पत्राबरोबरच एक अंगठी पाठवते. जपानमध्ये अंगठी घातल्यानंतर विवाह झाला, असं मानलं जात. मियागीच्या या पत्राला उत्तर देत स्नेहमॉय तिला सिंदूर आणि बांगड्या पाठवतो. त्यानंतर दोघे संसाराला सुरुवात करतात. हे सर्व पत्राद्वारेच सुरु असते. स्नेहमॉय एका पत्रात मियागीला म्हणतो की, 'तू इकडे आलीस तर.. अशी कल्पना मी अनेकदा करतो. पण माझ्याकडे तिकीटासाठी पैसे नाहीत. आमच्या घरात साधं वेस्टर्न टॉयलेट देखील नाही.' तब्बल 15 वर्ष मियागी आणि स्नेहमॉय यांच्यात संवाद सुरु असतो. पण काही ना काही कारणांमुळे मियागी भारतात येऊ शकत नाही. तरीही स्नेहमॉय तिची साथ सोडत नाही. या दरम्यान ते एकमेकांना अनेक भेटवस्तू पाठवत असतात. शारीरिक  संबंध, घरात येणाऱ्या अडचणी अशा वेगवेगळ्या भावना ते पत्राद्वारे मांडत असतात. यामध्येच मियागीच्या आईचं निधन होते. आता मियागी एकटीच राहात असते. मियागीला स्नेहमॉयकडे यायचे असते. पण तिची तब्येत ठिक नसते. त्यामुळे ती येणं टाळते. अशातच  स्नेहमॉयच्या मावशीची तब्येत देखील बिघडते. आता  स्नेहमॉयच्या घरातील सर्व कामे संध्या करत असते. संध्या आणि स्नेहमॉय यांच्यामध्ये एकदाही संवाद होत नसते. संध्या अनेक वेळा स्नेहमॉयसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते पण स्नेहमॉय तिच्यासोबत बोलत नाही. स्नेहमॉय हा त्याच्या पत्नीची म्हणजेच मियागीची तब्येत बिघडल्यामुळे चिंतेत असतो. एकदा भर पावसात स्नेहमॉय हा मियागीला फोन करायला जातो. फोनवरुन मियागी आणि स्नेहमॉय यांच्यात संवाद होतो. दोघेही एकमेकांचा आवाज ऐकून खूप आनंदी होतात. मियागीची तब्येत बिघडलेली असते, त्यामुळे स्नेहमॉय तिला काळजी घ्यायला सांगतो आणि तो कायम तिची वाट बघेल, असंही सांगतो. पावसात भिजून घरी आल्यानंतर स्नेहमॉयला ताप येतो. स्नेहमॉयची डॉक्टर तपासणी करतात, त्यानंतर कळतं की स्नेहमॉयला निमोनिया झाला आहे. अशातच स्नेहमॉय हे जग सोडून जातो. संध्या, स्नेहमॉयची मावशी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळतो. 


अखेर मियागी भारतात येते
स्नेहमॉयचं निधन झाल्यानंतर त्याची मावशी संध्याला स्नेहमॉयच्या जॅपनीज पत्नीचा पत्ता शोधून पत्र लिहायला सांगते. त्यानंतर काही दिवसांनी चित्रपटाच्या शेवटी डोक्यावरचे केस काढलेली आणि पांढरी साडी नेसलेली मियागी स्नेहमॉयच्या घरी येते. पण स्नेहमॉयची भेट मात्र त्याच्या 'जॅपनीज वाईफ'शी होत नाही.