मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास, कठीण वज्रास भेदुं ऐसे
भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथां हाणू काठी


जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज असे किर्तनातून सांगत असत, पण याचे आता काय प्रयोजन? तर झाले असे की, मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या संदर्भातील G20 च्या विशेष संमेलनात या व्हायरसला Chinese Virus किंवा Wuhan Virus न संबोधता ती एक जागतिक समस्या आहे आणि त्याचे निराकरण करणे या गोष्टींवर भर देण्याचे जगाला आवाहन केले. लागोपाठ, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी टेलिफोनवर चिनी परराष्ट्र मंत्र्यासोबत बोलताना याच मुद्द्यावर सहमती दर्शवली. थोडक्यात काय, तर चीनची सध्या जोरदार धडपड चालू आहे, या अरिष्टाची जबाबदारी टाळायची, आणि चीन पुढे आमची तंतरते असा इतिहास आणि वर्तमान दोन्ही आहे. म्हणूनच मी वरील तुकोबांचा अभंग उपरोधिक पद्धतीने नमूद केला.


परराष्ट्र नीतीमध्ये पाकिस्तान पुढे 56 इंचांनी फुगणारी आणि वज्रास भेदण्यास तयार असणारी आमची छाती चीनपुढे मात्र मऊ मेणाहूनी की काय ती होते. उदाहरणार्थ, चीनच्या सैन्य तुकड्या वारंवार आपल्या सीमेत कुरघोडी करतात आणि आपले सरकार शक्यतो ही माहिती लपवते किंवा ते चिनी सैनिक यशस्वी मध्यस्थीनंतर कसे माघारी गेले हे विशद करण्यातच धन्यता मानते. चीनने आजतागायत कधी अरुणाचल प्रदेशावरील भारतीय सार्वभौमत्व मान्य केलेले नाही आणि बदल्यात आपण फक्त चीनची तिबेट, हाँगकाँग, मकाऊ आणि तैवानवरील मालकीच स्वीकारलीय असे नाही. तर चीनच्या दबावाखाली आपण तैवानसोबत अधिकृत संबंधही ठेवत नाही आणि दलाई लामांना आपण राजकीय गतिविधींमध्ये भागही घेऊ देत नाही. जेव्हा कोणी भारतीय राजकीय नेता, अगदी भले आपले पंतप्रधान देखील, अरुणाचलला भेट देतात तेव्हा तेव्हा चीनचे परराष्ट्र मंत्रालय त्वरित निषेध नोंदवते आणि आपल्यात कधीही चीनने जबरदस्तीने ताब्यात ठेवलेल्या झिंगाझियान प्रांतातील विगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी ब्र काढायची देखील हिम्मत होत नाही.


चीनची संयुक्त राष्ट्र संघात अझर मसूद या पाकिस्तानी अतिरेक्याची पाठराखण चालूच आहे आणि म्हणूनच तो आंतरराष्ट्रीय अतिरेकी म्हणून घोषित होऊ शकत नाही. मग भले त्याने जिहादच्या नावाखाली कितीही निरपराध भारतीयांचे मुडदे पाडलेले असोत. गेली कित्तेक वर्षे चीन जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशातील भारतीयांना व्हिसा देताना तो वेगळ्या कागदावर वितरित करून त्यांच्या पासपोर्टला स्टेपल ने जोडतो. हे कशासाठी तर आमच्या मनावरती ठसवण्यासाठी की चीन या दोन राज्यांवरील भारतीय सार्वभौमत्व मान्य करत नाही. चीन हा एकमेव सदस्य देश आहे की जो अणू तंत्रज्ञान पुरवठा करणाऱ्या देशांच्या संघटनेत भारताच्या प्रवेशाला विरोध करतोय. सातत्याने करतोय आणि म्हणूनच आज भारत या गटाचा सदस्य नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत केवळ चीन हाच एकमेव असा कायमस्वरूपी सदस्य देश आहे की जो भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला विरोध करतोय.


चीनने कित्येक वर्षांपूर्वीच डोन्गफेंग 41 हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित करून त्याचा वापर त्यांच्या सैन्यदलात सुरु केलाय. आजच्या घडीला 12 हजार ते 15 हजार किमी पल्ला असलेले हे जगातील सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. परंतु हाच चीन भारताच्या अग्नी 5 या 5 हजार किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रावर सातत्याने आगपाखड करत असतो आणि भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घालावी अशी त्याची मागणी आहे. कदाचित चीनची भीती हेच एक कारण असावे की भारताने पूर्णत्वाला नेऊन देखील 8 हजार ते 12 हजार किमी क्षमतेचे सूर्या क्षेपणास्त्र कधी जगापुढे आणले नाही. चीनने 2007 सालीच त्यांच्या उपग्रह भेदक क्षमतेचे परीक्षण केले आणि त्यांना घाबरणारा भारत 2019 पर्यंत या क्षमतेचे परीक्षणही करू धजत नव्हता.


उपरोक्त उल्लेख हे केवळ माझ्यासारख्या सामान्य माणसाला जाणवणाऱ्या चीनच्या भीतीच्या गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त आपले 56 इंची सरकार त्यांना आणखी किती किती ठिकाणी टरकते हे त्या सरकारला नक्कीच ठाऊक असेल. हे देखील इथे नमूद करण्यासारखे आहे की भारत आणि चीन दोघेही साधारण 1940 दशकाच्या शेवटीच सार्वभौम झाले आणि 1990 सालापर्यंच दोन्ही देशांची अर्थव्यवस्था जवळपास समान आकाराचीच होती. चीनपुरतं बोलायचं झालं तर भारताला झोडणे, धमकावणे आणि भारताची निंदा नालस्ती करणे या बाबतीत चीनच्या वागण्यात सातत्य आहे. उदाहरणार्थ, मागील आठवड्यात जेव्हा आपल्या पोलिसांनी कोरोना लॉकडाऊन मोडणाऱ्या लोकांना लाठीने झोडायला सुरवात केली तेव्हा चीनच्या सरकारी China Morning Post या दैनिकाने लगेचच शहाणपणा दाखवत भारताच्या मानवी हक्क उल्लंघनाचा निषेध केला आणि वरती भारताने लोकांना नियंत्रित करण्यासाठी चीनसारखाच ड्रोन्सचा वापर करावा असा सल्लाही देऊन टाकला. खरंतर चीनच्या कुठल्याही सरकारी संस्थेने मानवी हक्कांबद्दल बोलणं हाच एक विनोद आहे.


वास्तविक चीन आज जागतिक पातळीवर एक असा गावगुंड सावकार आहे, ज्याला वाटते की तो ताकदीच्या जोरावर कोणालाही धमकावले आणि पैशाने विकत घेईल. जसे की जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) सध्याच्या कोरोना संकटाबाबत आणि त्याच्या हाताळणी संदर्भात बऱ्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. WHO चे सध्याचे डायरेक्टर जनरल तेदरोस अधानोम जे इथियोपियाचे माजी आरोग्य आणि परराष्ट्र मंत्री आहेत, यांनी आत्तापर्यंत या संकटात सातत्याने चीनची पाठराखण आणि भलामण केलेली आहे. त्यांच्या चीनला झाका आणि जगाला उघडे पाडा ह्या नितीने जगातील लक्षावधी लोकांचे प्राण आता टांगणीला लागलेले आहेत. तेदरोस अधानोम हे नेहमीच चीनला क्लीनचिट आणि प्रशस्तीपत्रे देण्यात आघाडीवर राहिले आहेत. परंतु आजतागायत मी हा लेख लिहीत असेपर्यंत WHO या साथीच्या 'पेशंट झिरो' ला शोधण्यात अपयशी ठरलंय. WHO साठी हे अत्यंत असाधारण आहे, कारण या पूर्वीच्या बहुतेक सर्व साथीच्या रोगांचे मूळ शोधणं WHO ला मुळीच कठीण गेलं नव्हतं. अर्थातच चीन तथ्य लपवतोय आणि आकडेवारीचा झोल करतोय, हे सांगायला तज्ज्ञांची गरज नाही. आणि हे सर्व होतंय WHO च्या आशीर्वादानं.


तेदरोस अधानोम यांच्या इथियोपियात चीनने प्रचंड गुंतवणूक केलेली आहे. त्यांनी अक्षरशः हा कंगाल आणि अंतर्गत दुफळीने जर्जर झालेला देश विकतच घेतलाय म्हणा. याशिवाय नमूद करण्यासारखे असे की WHO ही संघटना सदस्य देशांच्या अनुदानावर चालते आणि हल्लीच्या काही वर्षात चीनने WHO ला त्यांचे अनुदान कैक पटीने वाढवले आहे, हा निव्वळ योगायोग नाही. या व्हायरसला China Virus किंवा Wuhan व्हायरस असे नाव न देता WHO ने याला COVID 19 (corona virus disease of 2019) असं नाव का दिले? याचं इंगित एव्हाना तुम्हा सर्वांच्या लक्षात आले असेलच. परंतु हे WHO च्या इतिहासाला धरून सातत्यपूर्ण नाही. उदाहरणार्थ 2012 मध्ये WHO ने तेव्हाच्या साथीला MERS (Middle East Respiratory Syndrome) असे नाव दिले, कारण त्याची सुरुवात सौदी अरेबियात झाली होती. थोडक्यात काय तर हा China Virus च आहे, की ज्याची किंमत भारत आणि सर्व जग अब्जावधी रुपयांमध्ये आणि हजारो प्राणांची आहुती देवून अदा करत आहे. चीनने हा व्हायरस निर्यात केला, चीन स्वतः बरा झाला आणि आता तो त्याच्या कारखान्यांमध्ये तुम्हाला या व्हायरसपासून बचावाचं सामान बनवून विकायला सज्ज झालाय.


>> लेखक प्रशांत वाडकर पेशाने इंजिनियर असून, सध्या कॅनडातल्या व्हॅनकूवरमध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर आहेत! मूळचे साताऱ्यातील कराडचे आहेत. या ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.