आजूबाजूला विस्तीर्ण घनदाट जंगल, वर मोकळं आकाश आणि मध्येच उंचावर दगडी टेकडीवर एक गणपतीची पुरातन मूर्ती... गणपतीच्या अनेक मूर्ती, मंदिरं, तुम्ही पाहिले असतील पण बस्तरच्या जंगलात वसलेला हा निर्गुण-निरामय रुपातला श्रीगणेश पाहिल्यानंतर तुम्ही क्षणभर देहभान विसरुन जाता. ना कसलं मंदिर, ना गाभारा ना कसला कृत्रिम थाट… एक दगडी डोंगर हे बाप्पांचं आसन आणि बाजूला बस्तरच्या घनदाट जंगलाची आरास. देव अजून दुसऱ्या कुठल्या रुपात भेटायला पाहिजे?


छत्तीसगडमधल्या दंतेवाडाचा हा गणपती गेल्या अनेक दिवसांपासून मनात घर करुन होता. सोबत अनेक प्रश्नांचं कुतुहलही जागवत होता. मूर्ती 1 हजार वर्षे जुनी असल्याचं सांगतात. छिंदक नागवंशी घराण्याच्या राजांनी  त्याची स्थापना केल्याचंही म्हणतात. महाराष्ट्राच्या बाहेर गणपतीची प्रथा फारशी नसताना ती छत्तीसगढमध्ये आणि त्यातही या आदिवासी भागातच का आढळते असे एक ना अनेक प्रश्न घोंगावत होते. अखेर या वर्षी या गणपतीच्या भेटीचा आणि या प्रश्नांना भिडण्याचा योग जुळून आला.


छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून दंतेवाडा हे साधारण 350 किमी अंतरावर आहे. तिथून 13 किमी अंतरावर फरसपाल नावाचं गाव. याच फरसपालपासून आपला ट्रेक सुरु होतो. सकाळी दहा वाजता रायपूरमधून निघाल्यानंतर दंतेवाडात पोहचायला आम्हाला संध्याकाळचे सहा वाजले होते. जगदलपूरच्या सीमेपासून रस्ता अगदी डांबरी, गुळगुळीत सुरु होतो. प्रत्येकच नक्षलग्रस्त भागात सहसा ही एक समान गोष्ट आढळते. इतर नागरी वस्तीपेक्षा इथले रस्ते मात्र चांगले असतात.



दंतेवाडात मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी सकाळी आमची ढोलकल गणेशाची मोहीम सुरु होणार होती. ज्या दिवशी पोहचलो त्याच दिवशी रात्री दंतेवाडात मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. आता सकाळी पुन्हा असाच बरसत राहिला तर व्हिडीओ शूट करताना अडचण येणार ही धास्ती सतावत होती. पण सकाळी एकदम स्वच्छ वातावरण झालं आणि सोबत रात्रीच्या पावसानं सगळी भूमी तजेलदार बनवून आमच्या ट्रेकसाठी उत्तम पार्श्वभूमी तयार केली. सगळा भाग अनोळखी आणि त्यातही नक्षलग्रस्त प्रभावाखालचा असल्यानं स्थानिक गाईडच्या सोबतीनंच हा ट्रेक करणं बंधनकारक आहे. 


आमच्या सोबतीला असणार होता जीत आर्या… अनएक्सप्लोअरड बस्तरचा संस्थापक. चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून बस्तरच्या भूमीचं सौदर्यं जगाला दाखवण्यासाठी या तरुणानं शाश्वत आणि सामूहिक टुरिझमचं मॉडेल बस्तरमध्ये उभं केलंय.




3 हजार फूट उंचीवर हा गणपती वसला आहे. बस्तरच्या बैलाडिला डोंगराच्या रांगेत एकूण 12-13 डोंगर आहेत. त्यापैकी या डोंगराचा आकार हा ढोलासारखा आणि या डोंगरावर वसलेला म्हणून इथल्या गणपतीला स्थानिक लोक ‘ढोलकल गणेश’ म्हणतात. मूर्ती प्राचीन आहे, पण मग हा गणपती अचानक 2012 मध्येच कसा प्रकाशझोतात आला? याचं श्रेय़ जातं इथल्या दोन स्थानिक पत्रकारांना हेमंत कश्यप आणि बप्पी राय. त्यापैकी हेमंत कश्याप यांनी आम्हाला या सगळ्याची उगमकथा सांगितली. 


दुर्गम डोंगरावरचा हा गणपती स्थानिकांना तर माहिती होता, पण त्यापलीकडे छत्तीसगडमध्येही फारशी कुणाला त्याची माहिती नव्हती. बस्तरचा दसरा प्रसिद्ध आहे, या दसऱ्यासाठी गावोगावचे सरपंच एकत्रित येत असतात. ढोलकल जवळचे एक सरपंच एक दोन वर्षे दसऱ्याला आले की, हेमंत कश्यप यांना या गणपतीबद्दल सांगायचे, आमच्याकडे एक पुरातन मूर्ती आहे, तुम्ही या एकदा पाहायला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मग त्यांनी 2012 ला गणेश चतुर्थीच्या आधीच हा गणपती पाहायला जायचं ठरवलं. स्थानिकांसोबत या डोंगराची चढाई सर केली आणि या गणपतीचा पहिला फोटो काढला. जो रायपूरच्या ‘नई दुनिया’ या वर्तमानपत्रात प्रकाशित झाला. पण त्यापुढे प्रशासकीय पातळीवरही या गणपतीला बस्तरच्या पर्यटन नकाशात आणण्याचं श्रेय जातं एका मराठी अधिकाऱ्याला. त्यांचं नाव डॉ. अय्याज तांबोळी.




अय्याज 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी. त्यावेळी ते शेजारच्याच बिजापूर जिल्ह्यात सीईओ म्हणून काम पाहत होते. ढोलकल गणेशच्या ट्रेकची सुरुवात दंतेवाडा जिल्ह्यात होते आणि निम्मा डोंगर आणि प्रत्यक्ष गणपती मूर्ती असलेलं स्थान हे छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यातच येतं. एकदा काही कामानिमित्त प्रिंटिंग प्रेसमध्ये गेले तर तिथे एका डेस्कटॉपवर त्यांना गणपतीचा हा फोटो दिसला.


बस्तरच्या जंगलात इतका अप्रतिम गणपती कुठून आला या प्रश्नानं त्यांच्या मनात काहूर उठलं आणि मग अधिक माहिती घेतल्यानंतर त्यांनी हा गणपती त्यावेळच्या दसरा महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर छापला. ही निमंत्रण पत्रिका राजभवनावरही पोहोचली. त्यावेळी छत्तीसगढचे राज्यपाल होते शेखर दत्त, त्यांनीही ही सुंदर मूर्ती पाहून जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंतची सगळी साखळी पुढे हालली. आजवर स्थानिक आदिवासींच्याच माहितीचं असलेलं हे ठिकाण मग पुढे अधिक प्रकाशझोतात आलं. त्यात 2016 पासून जीत आर्यानं स्थानिक प्रशासनाच्या साहाय्यानं हा ऑफिशियल ट्रेक सुरु केला. अगदी कोरोनाच्या काळातही मागच्या एकाच वर्षात 10 हजार जणांनी या ढोलकल गणेशला भेट दिली. यावरुनच हा ट्रेक किती लोकप्रिय होत चाललाय याची कल्पना येते.    


काय वैशिष्ट्य आहे या ट्रेकचं? एकतर घनदाट जंगलानं, निर्सगाच्या विविधतेनं नटलेली ही भूमी. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, झाडं तुम्हाला या संपूर्ण प्रवासात भेटतात. पायथ्याला ट्रेक सुरु केलात की, अगदी वरपर्यंत पोहचेपर्यंत तुम्हाला सूर्यदर्शन होत नाही इतका घनदाट जंगलातला प्रवास. शिवाय इथल्या हिरवळीचा रंगही अगदी गर्द, दाट. शुद्ध लोहखनिजानं समृद्ध असलेली ही भूमी. त्याचा हा परिणाम. देशातल्या एकूण लोहखनिजापैकी 23 टक्के लोहखनिज हे एकट्या बस्तरमधून निघतं.




या ट्रेकचा शेवटचा 100-200 मीटरचा टप्पा मात्र अधिक खडतर. अगदी मोठमोठे दगड पार करत तुम्हाला वाट सर करावी लागते. ट्रेकिंगची खरी परीक्षा याच टप्प्यात होते. इतक्या भर जंगलात अचानक मध्यभागी डोंगरावर ही मूर्ती कुठून आली असावी याचं उत्तरही इथेच मिळायला सुरुवात होते. कारण एखाद्या मंदिराच्या बांधकामात वापरले जावेत असे मोठमोठे दगड इथं पाहायला मिळतात, काहींची रचना तर अगदी एकावर एक ठेवण्यासाठीच बनवल्याचं दिसतं. त्यामुळे प्राचीन काळी एखादं मंदिर इथे असावं, नंतर भूकंपामुळे ते उद्धवस्त झालेलं असावं ही शक्यता नाकारता येत नाही. पण या मूर्तीचा किंवा तिच्या स्थापनेचा नेमका काळ कुठला याची अद्याप ठोस माहिती मिळत नाही.


अकराव्या शतकात छिंदक नागवंशी राजांनी या मूर्तीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. या मूर्तीच्या गळ्यात असलेला नाग हा त्याचं प्रमाण असल्याचं सांगितलं जातं. पण महाराष्ट्रातही अनेक गणपती मंदिरं पेशव्यांच्या काळात बांधली गेली असताना त्याआधीपासून ही मूर्ती इथे असेल तर तो कुतूहलाचाच विषय. शिवाय आदिवासी जमातींमधले देव वेगवेगळे आहेत. त्यातही शक्यतो अनेकदा देवीच त्यांना पूजनीय असतात. दंतेवाडाही आज मां दंतेश्वरीची भूमी म्हणूनच ओळखलं जातं. मग हा गणपती इथल्या स्थानिक आदिवासींमध्ये कसा पोहचला. दंतेवाडाच नव्हे तर अगदी संपूर्ण बस्तरमध्येच आम्हाला गणपतीचे स्टॉल्स ठिकठिकाणी दिसत होते.


गणेशोत्सवाच्या तोंडावरच आम्ही बस्तरमध्ये पोहचल्यानं अनेक ठिकाणी ही लगबग दिसत होती. दंतेवाडापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर बारसुर नावाचं ठिकाण वसलेलं आहे. इथेही पुरातत्वदृष्टया अत्यंत महत्व असलेली जुळ्या गणपतींची सुरेख मूर्ती आहे. जुळे गणपती हा देखील प्रथमच ऐकलेला प्रकार. त्यामुळे बस्तरमध्ये गणपतीचं कनेक्शन, त्यातही आदिवासींमध्ये त्याचं स्थान हा मानववंशशास्त्राच्या दृष्टीनं अभ्यासाचाच विषय आहे.


2012 च्या सुमारास हा गणपती प्रकाशझोतात आला आणि अवघ्या पाच वर्षात म्हणजे 2017 ला एक विचित्र घटना घडली. अचानक हा गणपती इथून गायब झाला. रातोरात झालेल्या या घटनेनं सगळेच चक्रावले. डॉ. अभिषेक पल्लव हे सध्या दंतेवाडाचे एसपी म्हणून काम करतायत. त्या वेळीही ते सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून इथेच कार्यरत होते. ही मूर्ती परत मिळवण्यासाठी प्रशासनानं जंग जंग पछाडलं, स्थानिक आदिवासींना विश्वासात घेऊन त्यातून कुठला भडका उडणार नाही याचीही काळजी घेतली. अगदी जंगलात ड्रोन कॅमेरे लावून ही मूर्ती शोधण्यात आली. हा प्रकार नेमका कशामुळे झाला, कुणी केला हे अजूनही समोर आलेलं नाही. पण त्याबद्दल वेगवेगळ्या कहाण्या मात्र दंतेवाडात ऐकायला मिळतात. कुणी म्हणतं की हे नक्षलवाद्यांचं काम असणार, अभिजनांची देवता आदिवासींवर थोपवली जातेय या रागातून त्यांनी हे केलं असावं, त्या माध्यमातून स्थानिकांमध्ये उद्रेक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असाव, तर कुणाला त्यात वेगळी कॉर्पोरेट लढाई दिसते. कारण नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात एनएमडीसीसोबतच आता या भूमीतल्या शुद्ध लोहखनिजावर काही बड्या खासगी उद्योगपतींचीही नजर आहे. पण देवस्थान म्हणून मान्यता मिळत गेली तर पुढे इथं प्रकल्प उभारणं अवघड होऊ शकतं यातून हे केलं गेलं का अशीही एक दुसरी चर्चा.


अर्थात, हे सगळे तर्कवितर्कच आहेत. नेमकं काय घडल, कुणी केलं हे अजून तर समोर आलेलं नाही. पण प्रशासनानं जुनी मूर्ती पुरातत्व विभागाकडून डागडुजी करुन इथे बसवली आहे. अधिक सुरक्षा म्हणून ती इथल्या दगडांमध्येच पक्की करण्यात आली आहे.


गणपतीच्या मूर्तीपर्यंत पोहचल्यानंतर जिथपर्यंत नजर जावी तिथपर्यंत फक्त घनदाट जंगल आणि हिरवळीनं नटलेले डोंगर. खाली कुठल्या गावाचं निशाण तर सोडा, पण ज्या वाटेनं आपण वर आलो ती वाटही दिसत नाही इतकी गर्द झाडी. बस्तर हे पूर्वीच्या काळी संस्थान होतं. मध्य प्रदेशपासून छत्तीसगड वेगळं होईपर्यंत हा एकच जिल्हा इतका मोठा होता की त्याचं आकारमान केरळ राज्याइतकं होतं. आज बस्तरचं चार पाच जिल्ह्यांमधे विभाजन झालेलं आहे. आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणाची सीमा इथून सीमा इधून जवळ आहे. छत्तीसगडच्या अगदी दक्षिणेकडेचा हा जिल्हा. त्यातही पूर्वी हा सगळा भाग मध्य प्रांतात असल्यानं, या मध्य प्रांताची राजधानी नागपूर असल्यानं इथल्या जीवनशैलीवर तसा मराठीचा प्रभावही जाणवतो. ब्रिटीशकाळात इथे अनेक मराठी लेखनिक, प्रशासनिक अधिकारी नागपूरमधून जायचे.  नागपूरच्या भोसलेंच्या राज्याचा काही भागही इथपर्यंत होता. गणपतीचं महत्व वाढवण्यात ही देखील बाब कारणीभूत असावी असं आयएएस डॉ. अय्याज तांबोळी सांगतात. छत्तीसगडच्या या भागात गोंडी, हलबी भाषा बोलल्या जातात. हलबीवर बराचसा मराठीचा प्रभाव असल्याचंही जाणवतं.


हा खडतर ट्रेक पार करताना शेवटच्या शंभर मीटरची चढण तुमची अग्निपरीक्षा असते. तीव्र उताराचे भले मोठे दगड पार करत तुम्हाला वाट काढावी लागते. हे आव्हान पार केल्यानंतर तुम्हाला एका पॉईंटवरुन गणपतीचं पहिलं दर्शन होतं. जे इथपर्यंतचे सगळे कष्ट विसरायला लावणारं असतं. सोबतच गार वाऱ्यांची साथ या उंचीवर सुरु झालेली असते. त्यामुळे या अचाट निसर्गसौंदर्याला न्याहाळताना एक वेगळी अनुभूती अनुभवायला मिळते. सकाळी सुरुवात केली तर अगदी चार ते पाच तासांत हा ट्रेक पूर्ण करु तुम्ही पुन्हा पायथ्याला पोहचता. खाली पोहचल्यानंतर गावातच आदिवासींच्या हातचं स्थानिक भोजनही घेण्याचीही सोय आहे.    


 हा सगळा भाग नक्षलग्रस्त प्रभावाखालचा. दंतेवाडा, सुकमा ही नावं आपण एरव्ही नक्षलवादाशी संबंधित बातम्यांमध्ये ऐकतो. त्यामुळे आपल्या मनात काही जागांबद्दलचे पूर्वगृह तयार असतात. पण बाहेरुन वाटते तितकी इथली परिस्थिती भयावह नाही हे तिथं पोहचल्यावर जाणवतं. अगदीच निर्धास्त राहावं असंही नाही, पण काही बेसिक गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही बस्तरच्या या अद्भुत गणेशाचा थ्रिल नक्की अनुभवू शकता. महाराष्ट्राच्या भूमीशी असलेलं हे बस्तरचं हे सांस्कृतिक कनेक्शन अनुभवण्यासाठी एकदा तरी यायलाच हवं. बस्तर तुम्हाला थक्क करेल यात शंका नाही.