काय झालं का तुमचं स्टेटस, पोस्ट, फोटो टाकून आणि हो आदरांजली वाहून... आता तरी त्या मोबाईलमधून बाहेर या आणि जागे व्हा! अरे लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी.
गुरुवारी सीएसएमटी जवळील पूल कोसळला. यात निष्पाप तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेची बातमी ऐकली आणि धक्का बसला. पण या घटनेनंतर मनाला भांबावून टाकणारी आणखी एक घटना घडली.
एरवी आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांना मदतीचा हात देत धावणाऱ्या मुंबईकरांच वेगळं रूप पाहायला मिळालं. काल ही घटना घडली आणि मुंबईकर पुन्हा एकदा थांबले, पण या वेळी मदत करण्यासाठी नसून तर मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवण्यासाठी. का आणि कशासाठी? हाच एक प्रश्न माझ्या मनात आला. म्हणून मुंबईकर या नात्याने मला याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
आपण किती निष्ठूर होत चाललो आहोत? ह्या मोबाईलने एवढं वेड लावलं आहे की आपण माणुसकीसुद्धा विसरत चाललो आहोत. आपल्यासमोर दिवसभरात एवढं काही घडत तरीही आपण त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करत पुढे निघून जातो. काल एवढी मोठी घटना घडली पण एकाही माणसातली माणुसकी काही पाहायला मिळाली नाही. जर ती माणुसकी दिसली असती तर काही लोकांचा जीव वाचला असता. मृत जाहिद खानच्या भावानेच याबद्दल वक्तव्य केलं आहे. आणि हो मी तर म्हणेन की मुंबईकरांनी मदत देखील केली असेल पण वेळ निघून गेल्यावर केलेल्या गोष्टींचा उपयोग शून्यच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही दुर्घटना आणि आपलं निष्क्रिय प्रशासन!
ज्या पुलाच्या ऑडिटमध्ये पूल धोकादायक नाही असा उल्लेख होतो. तोच पूल कोसळतो. मग रेल्वे आणि महापालिका प्रशासनाची एकमेकांवर चिखलफेक सुरू होते. पण आमचा मुंबईकर मात्र मुंबई स्पिरिट म्हणत दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला लागतो. काही असतात ते आपलं मतं व्यक्त करतात तर काही मेणबत्त्या घेऊन शोक. पण या विरुद्ध कोणताही सामान्य मुंबईकर आवाज उठवत नाही.
मागे सुद्धा अशाच घटना घडल्या. एल्फिन्स्टन पूल, अंधेरी पूल याच घटना घ्या. घटना घडल्यानंतर अनेक चौकश्या झाल्या, अनेक ऑडिट झाले, नवीन पूल बांधले. पण प्रत्यक्षात यातून निष्पन्न काय झालं काहीच नाही. आणि so called मुंबईकर सगळं विसरून आपलं रोजच आयुष्य जगू लागला. पण ठोस असं काहीच केलं नाही.
आता तरी सुजाण, सजग, तत्पर अशा मुंबईकरांनी आवाज उठवायलाच हवा. किती दिवस असे किड्या मुंग्यांसारखे मरत राहणार? आता हीच वेळ आहे उठा जागे व्हा त्या मोबाईलच्या दुनियेतून खऱ्या माणुसकीच्या दुनियेत या आणि आपल्या हक्कासाठी लढा... एवढीचं आशा!
जागे व्हा मुंबईकर... जागे व्हा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2019 01:46 PM (IST)
तुमचं स्टेटस, पोस्ट, फोटो टाकून आणि हो आदरांजली वाहून झाली असेलचं... आता तरी जागे व्हा, सुजाण व्हा, सजग व्हा, तत्पर व्हा! त्या मोबाईलच्या दुनियेतून खऱ्या माणुसकीच्या दुनियेत या आणि आपल्या हक्कासाठी लढा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -