BLOG : काल ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा सिनेमा पाहिला. गेली 17 वर्ष मी ठाण्यात रहाते, हे 17 वर्षांचं वास्तव्य आनंद दिघेंचं कोअर एरिया असलेल्या चरईमधलं. जिथे आनंद दिघेंच्या कार्याचा वटवृक्ष विस्तारला त्या टेंभी नाक्यावरुन रोजचं येणं जाणं. फुटपाथवरून चालताना पारश्यांच्या आग्यारीजवळ त्यांचं वास्तव्य असलेल्या मठीत मी कुतुहलाने कधी डोकावलं नाही, असं सहसा झालं नाही. गेल्या 17 वर्षांच्या काळात, बिल्डिंगमधून बाहेर पडल्यावर चार चार पावलांच्या अंतरावर मला आनंद दिघे दिसतात. गल्लीबोळातल्या मित्रमंडळांच्या फलकावर, फ्लेक्सवर, रिक्षांवर, वडापावच्या गाड्यांवर, आमदार-खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये, गणेशोत्सवात, नवरात्रीमध्ये आणि काहींच्या देवघरातसुद्धा आनंद दिघे या नावासाठी एक राखीव जागा मी कायम पहात आले आहे. 2001 साली आनंद दिघे गेले, 2005 साली मी ठाण्यात रहायला आले. त्यामुळे आनंद दिघेंना मी प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. पण त्यांच्या पश्चातही दिघेंची ठाणेकरांच्या मनावरची पकड मी आजतागायत अनुभवत आलेय, त्यामुळे एक वेगळं कुतुहल आणि त्यांच्या मृत्यूसंदर्भातल्या चर्चांमुळे विलक्षण गूढ या नावाभोवती मला सातत्याने जाणवत राहिलंय.


त्यामुळेच आनंद दिघेंवर सिनेमा येणार म्हटल्यावर काहीशी संमिश्र भावना मनात होती. आनंद दिघेंच्या लूकमधला प्रसाद ओक पाहिला आणि प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. सिनेमा येणार कळल्यावर सोशल मिडियावर वेगवेगळ्या अँगलने चर्चाही सुरू झाल्या, कोणाला प्रसाद ओकमध्ये हुबेहुब आनंद दिघेंचा भास झाला, तर कोणाला त्याच्या लूकमध्ये उणीवाही दिसल्या. काहीजणांना कोण आनंद दिघे असाही प्रश्न पडला, तर काहीजणांनी आता गल्लीबोळातल्या नेत्यावरही सिनेमे येऊ लागले अशी टीका टिप्पणीही केली.


खरंतर राजकीय नेत्यांवरचे बायोपिक पहाणं मी कटाक्षाने टाळते. कारण व्यक्तीपूजा ही भारतीय समाजमनाला लागलेली कीड आहे, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. कोणताही व्यक्ती आयुष्यभर आदर्शवत वागू शकत नाही. त्यात राजकारण्यांना मस्तकी धरुन नाचणाऱ्यांबद्दल माझ्या मनात ‘कीव’ या पलिकडे दुसरी कोणतीही भावना नाही. आणि याच सगळ्या गोष्टींमुळे धर्मवीर सिनेमा पहाण्याबद्दल माझ्या मनात दोन प्रवाह होते.


पण मृत्यूपश्चात 20 वर्षांनंतरही ठाणेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा माणूस नेमकं जगलाय तरी कसं? राजकारणापलिकडे त्याने आयुष्यात काय केलंय आणि शिवसेनेपलिकडे त्याने इतर माणसांना नेमकं काय दिलय?  या दोन प्रश्नांनी मला सिनेमागृहाकडे ओढत नेलं, आणि त्यानंतर मी पुढचे तीन तास जे अनुभवलं ते प्रेक्षक म्हणून आणि ठाणेकर म्हणून मला अंतर्बाह्य सुखावणारं होतं.


सिनेमा सुरु होतो आत्ताच्या काळात, कोण आनंद दिघे असा प्रश्न घेऊन हा सिनेमा सुरू होतो, आणि दिघेंशी संबंधित एकेकाच्या फ्लॅशबॅकमध्ये त्या प्रश्नाचं ठोस उत्तर देण्याचा हा सिनेमा प्रयत्न करतो. दिघेंच्या पुण्यतिथीच्या निमित्त कार्यक्रमात हेच हजारो लोक एकत्र आलेले असतात. सिनेमामध्ये फ्लॅशबॅक हे तंत्र सिनेमाच्या मुख्य गाभ्याला आणि प्रवाहाला धक्का लागू न देता कसं हाताळवं, हे प्रवीण तरडेकडून शिकण्यासारखं आहे. ठाण्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर शिवसैनिक ‘आनंद दिघे जिंदाबाद’ अशा घोषणा देत असतात, काही क्षणासाठी आपणही त्या विजयाच्या आनंदाशी एकरुप होतो, आणि दुसऱ्याक्षणी ‘आनंद दिघे अमर रहे’ ही घोषणा आपल्याला जागं करते आणि थेट काळजाला हात घालते.


संघटनेसाठी आपलं आयुष्य गहाण ठेवणाऱ्या दिघेंसारख्या कडव्या शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना उभी राहिली, वाढली आणि टिकली हा थेट संदेश या सिनेमाने दिलाय. सोबतच ठाण्यातली शिवसेना ही केवळ आणि केवळ ‘आनंद दिघेंची’ शिवसेना आहे आणि आत्ता शिवसेनेत असलेले ठाणेकर नेते ही फक्त ‘आनंद दिघेंची’ माणसं आहेत हे या सिनेमाचं थेट सांगणं आहे. केवळ ठाणे शहरातच नाही तर ठाणे जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या सीमांपलिकडे संघटनेच्या कक्षा रुंदावण्यात आनंद दिघे या माणसाचा सिंहाचा वाटा आहे हे प्रत्येक ठाणेकर आणि राज्यातला प्रत्येक शिवसैनिक जाणून आहे.


खरंतर गेल्या तीन-चार वर्षात शिवसेनेची राजकारण करण्याची पद्धत बदलली आहे, संघटनेचं पक्षात रुपांतर होत असताना जे बदल आवश्यक आहेत, ते बदल शिवसेनेत दिसत आहेत आणि अर्थात काळानुरुप प्रत्येकाला बदलावं हे लागतचं, काळाचा बदल हा नियम राजकारणाला वर्ज्य नाही. पण 80-90 च्या दशकातली शिवसेना ज्या शिवसैनिकांनी अनुभवली आहे, शिवसेनेची आक्रमकता अनुभवली आहे, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या आक्रमकतेवर, रोखठोक भूमिकांवर भरभरुन प्रेम केलंय, त्या सगळ्यांना तीच जूनी शिवसेना या सिनेमाच्या माध्यमातून नक्की अनुभवायला मिळेल.


ठाण्यातल्या पांढरपेशा समाजालाही आनंद दिघे या नावाचा धाक होता, आदर होता. जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर कठीण प्रसंग निर्माण झाले, तेव्हा आपल्या पारंपरिक लोकप्रतिनिधीकडे न जाता त्यांनीही धाव घेतली ती टेंभी नाक्याकडे. दिघेंनी काही ठराविक लोकांवर उपकाराचं छत्र धरलं, त्यामुळे त्या लोकांना दिघेंचं खरं रुप कळूच शकलं नाही, असं म्हणणाऱ्या चार दोन डोक्यांनी एकदा आपल्या घराबाहेर पडून आपल्याच आजूबाजूच्या चार जुन्या पण जाणत्या लोकांना विचारलं तर ते सांगतील की ‘आनंद दिघे’ हे रसायन काय होतं.


इथे कोणालाही क्लीनचीट देण्याचा प्रयत्न नाही...जे चुकलं ते चुकलंच, पण ज्या माणसांना कोणी वाली नव्हता, ज्यांचा कोणाकडे वशीला नव्हता, ज्यांना स्वतःच्या समस्यांचं समाधान कोणाकडे शोधायचं हे माहित नव्हतं त्यांच्यासाठी टेंभीनाक्यावरचा आनंद आश्रम हे आश्रयस्थान होतं. दिघेंचे फोटो देव्हाऱ्यात ठेऊन पुजले जातात ही केवळ वदंता नाही तर वास्तव आहे आणि जे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे या सिनेमात दाखवलेल्या घटना उगाच ओढून ताणून, कोणा एकाला मोठं करण्यासाठी दाखवलेल्या नाहीत, तर कधीकाळी त्या ठाण्यात घडलेल्या आहेत.


अगदी दोन-तीन आठवड्यापूर्वीच्या आंदोलनात महिला शिवसैनिक रस्त्यावर उतरल्या होत्या. महिला शिवसैनिक आक्रमक झाल्यावर त्यांना हमखास शिवसेनेच्या रणरागिणी अशी उपमा दिली जाते...जर आज त्या महिलांमध्ये शिवसेनेसाठी एवढी आक्रमकता असेल, आजपासून आणखी 30-35 वर्षांपूर्वी ती आक्रमकता किती असेल याची पुरेपुर जाणीव आपल्याला स्नेहल तरडेने बिर्जे बाईंची भूमिका साकारताना दाखवली आहे. राबोडीत उसळलेली दंगल बिर्जेबाईच्या घरापाशी पोहचली, तेव्हा दिघे तिथल्या दंगेखोरांवर अक्षरशः तुटून पडले. त्यावेळी सिनेमात बिर्जेबाई दिघेंकडे बोट दाखवून म्हणते ‘हा माझा साहेब आहे’ त्यावेळी बिर्जेबाईच्या मागे असलेला बाळासाहेबांचा फोटो तिथे का आहे? हे ठाण्यातल्या शिवसैनिकाला विचारा, आणि कधीतरी ठाण्यातल्या अनेक रिक्षांवर ‘एकच साहेब’ असं का लिहिलेलं असतं ते ही कुतुहलापोटी एखाद्या अनुभवी शिवसैनिकाला विचारा, तो तुम्हाला त्याचा सगळा इतिवृत्तांत सांगेल.


या सिनेमाला जे सांगायचं आहे, ते तुम्हाला तेव्हाच कळेल, जेव्हा तुम्ही मिनिंग बिटवीन द लाईन्स वाचायला सुरुवात कराल. आणि याचं श्रेय पुन्हा एकदा प्रविण तरडे याच माणसाला द्यावं लागेल. शब्दांशी खेळणं हा या माणसाच्या हातचा मळ आहे, आणि त्याचा तो खुबीने वापर करतो. लक्षवेधी संवाद हे या सिनेमाचं आणखी एक बलस्थान. या सिनेमामध्ये इतिहासातील काही प्रतिमांचा अगदी समयोचित वापर केला गेलाय. अफझलखान वध, कालीमाता, विवेकानंद हे त्या त्या प्रसंगांच्या गरजेनुसार फ्रेममध्ये आपल्याला कुठे ना कुठे दिसत रहातात. पात्रमांडणी आणि पात्रनिवड यातही हा सिनेमा अगदी 98 टक्के यशस्वी होतो, कुठे होत नाही हे समजायला प्रेक्षक सूज्ञ आहेत. सिनेमा ज्या काळात घडतोय, तो काळ दाखवत असताना, आत्ताच्या काळातल्या खुणा काही ठिकाणी आपलं अस्तित्त्व दाखवतात, पण सिनेमाचं कथानक, अभिनय, संवाद, आणि प्रवाह यात आपण इतके गुंतून जातो की मग त्या गोष्टींकडे आपसूक डोळेझाक होते.


त्या काळातल्या काही पात्रांना इथे पुनरुज्जीवीत करावं लागलंय तर काहीजणांना त्यांच्या तारुण्याची छटा द्यावी लागलीये. मेकअप ब्रशला मी कायम जादूची काडी असं म्हणते. माणूस जे नाही ते दाखवण्याची किमया ही काडी करु शकते. असलेलं झाकणं आणि नसलेलं दिसणं हे केवळ मेकअपब्रशनेच नाही तर त्यामागे असलेल्या सिद्धहस्त रंगभूषाकारांमुळे शक्य असतं, विद्याधर भट्टेंसारखा जादूगार, त्यांचे ते कसलेले हात मागे नसते, तर कदाचित सिनेमाचा जो परिणाम आपल्याला प्रेक्षकांच्या मनावर आता दिसतोय, तो तेवढ्या प्रभावीपणे दिसला नसता. त्यांच्या याच जादूमुळे आज कित्येकांना दिघेंच्या पुनर्भेटीचा आनंद मिळाला आणि माझ्यासारख्या कित्येकांना आभासी का होईना, पण प्रत्यक्षभेटीचा अनुभव घेता आला.


आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, शिवराज वायचळची भूमिका. तरुणवयातल्या दिघेंची भूमिका त्याने साकारली आहे. मो.दा.जोशी जेव्हा कार्यकर्त्यांच्या घोळक्यात एकट्या दिघेंच्या खांद्यावर हात ठेवतात, तेव्हा आभाळ ठेंगणं झाल्याची भावना, आपण साहेबांच्या किती जवळ आहोत हे दाखवण्याचा एका कार्यकर्त्याचा प्रयत्न त्याने उत्तम वठवला आहे.


पण हे सगळं घडत असताना दिघेंच्या रुपातला प्रसाद ओक केव्हा समोर येतोय?  याची उत्सुकता प्रेक्षागृहाला व्यापून उरलेली असते. आणि पहिल्यांदा तो येतो, पोस्टरच्या माध्यमातून...केवळ त्याक्षणी, त्या पोस्टरपुरती तो प्रसाद ओक वाटतो, पण त्यानंतर जेव्हा जेव्हा तो समोर येतो, तो आनंद दिघे म्हणूनच... म्हणजे हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रसादला भेटून विचारावसं वाटलं... हे कसब इतके दिवस का दडवून ठेवलस?  प्रसादने या भूमिकेसाठी इतका जीव ओतलाय, ज्याप्रमाणे विष्णुपंत पागनीस हे तुकारामांची भूमिका साकारण्यासाठीच जन्माला आले, असं वाटतं, त्याप्रमाणे प्रसादही दिघेंची भूमिका साकारण्यासाठीच अभिनेता झाला ही भावना निर्माण होते. हे उदाहरण देण्यामागचं कारण म्हणजे आजही गावखेड्यातल्या घरांमध्ये तुकाराम म्हणून आपल्याला विष्णूपंत पागनीसांची प्रतिमा दिसते. संत तुकाराम सिनेमानंतर लोक तुकाराम समजून पागनीसांच्या पाया पडायचे. आज प्रसाद जर एका दिवसासाठी दिघेंच्या वेषात ठाण्यातल्या रस्त्यांवर फिरला, तर त्यालाही कदाचित असा अनुभव येऊ शकतो. काया, वाचा, मने एखादी व्यक्तिरेखा निभावणं म्हणजे काय याचा वस्तूपाठ प्रसादने दिघेंची भूमिका साकारताना समोर ठेवलाय. त्याच्या डोळ्यातल्या अभिनय पहाणं ही एक पर्वणी आहे. अभिनेता परकाया प्रवेश करतो म्हणजे नेमकं काय करतो हे पहायचं असेल तर प्रसादने साकारलेली दिघेंची भूमिका नक्की पहावी. प्रवीणचं दिग्दर्शन आणि लेखनावरचं प्रभुत्व, आणि प्रसादची अभिनयातली प्रतिभा या जोरावर हा सिनेमा यशस्वी होतोय याद वाद नाही.


सिनेमाचं संगीत आणि गाण्यांमधले शब्द थेट काळजाला हात घालणारे हेत. सिनेमाचं थीम साँग तर सिनेमागृह दणाणून सोडणारं आहे. पण गुरुपौर्णिमेचं गाण्यात मात्र शब्दाशब्दात कृतज्ञता ओतप्रोत भरली आहे. मग ती कृतज्ञता दिघेंची बाळासाहेबांप्रती असेल, किंवा मग दिघेंच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या प्रती असेल. गुरुपौर्णिमा आणि पाद्यपूजेचा प्रसंग हा सिनेमाचा कळस आहे. पूर्वार्धात सिनेमा दिघेंची तोंडओळख करुन देत सेल, तर उत्तरार्धात हा सिनेमा आपल्याला दिघेंचं अंतरंग उलगडून दाखवतो.


सिनेमाचा शेवट काय आहे, हे सगळ्यांनाच माहितेय, आणि त्यामुळेच सिनेमात अर्ध्यावरती मोडलेल्या डावाची कहाणी सांगणारं भातूकलीच्या खेळामधली हे गाणं सतत अस्वस्थ करत रहातं. ‘आनंद हरपला’ या गाण्याने ठाणेकरांच्या ह्रदयावर असलेल्या जखमेवरची खपली काढलीये. त्यातलं ‘घराघरातील, उंच थरातील, गोविंद हरपला’ हे वाक्य इतकावेळ रोखून ठेवलेल्या अश्रूंना अलगद वाट करुन देतं. दिघेंचं जाणं ही ठाणेकरांच्या मनावरची खोल जखम का आहे?  हे जाणून घ्यायचं असेल, तर हा सिनेमा पहायलाच हवा. सिनेमाचा अल्बम ऐकला तर ढाण्या वाघ हा पोवाडा त्यात आहे, जो मुख्य सिनेमात नाही. तो का नाही?  हा प्रश्न आहेच. पण सिनेमा मिनिंग बिटविन द लाईन्समधून जे काही सांगतो, ते हा पोवाडा थेट बोलतो.


80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचं सूत्र खऱ्या अर्थाने कोणी अंगीकारलं असेल तर ते म्हणजे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी. त्यांच्या मृत्यूच्या 21 वर्षांनंतर सुद्धा आज ठाण्यातल्या प्रत्येक बॅनरवर आणि कित्येक ठाणेकरांच्या मनात आनंद दिघे यांचा हक्काचा कोपरा राखीव आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही ठाणेकरांनी आपल्या मनात त्यांना जीवंत ठेवलं, त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा निगुतीने जपल्या. त्यांचं स्थान अबाधित ठेवलं, त्यांचं स्थान जपलं... ते केवळ आनंद दिघे या पाच अक्षरांवरच्या प्रेमापोटी. आणि म्हणूनच आनंद दिघेंबद्दल म्हणावसं वाटतं. ‘आनंद मरते नहीं’


 हा सिनेमा पाहिल्यानंतर, टेंभीनाक्यावरच्या ‘आनंद आश्रम’ समोरुन जात असताना कित्येकांच्या मनात जर कुतुहलासोबत कृतज्ञतेचे भाव निर्माण होत असतील, तर या सिनेमाच्या यशासाठी बाकी कोणत्याही पोचपावत्यांची गरजच उरत नाही.