कोरोना आला आणि जगण्याची भीषण नव्हे अतिभीषण स्टेज सुरू झाली. एक काळ तर असा होता की, सोशल मीडियावर स्क्रोल करताना प्रत्येक दुसरी पोस्ट कुणाचा तर मृत्यू, कुणाच्या जवळच्याचा मृत्यू, ऑक्सिजन हवाय, औषध हवंय, बेड हवाय अशीच. ही परिस्थिती अर्थातच कुणाला सांगायची गरज नाही. 


स्मशानभूमितले भीषण फोटो आले. एका चितेवरच अनेक लोकं जाळली गेली. एका खड्ड्यात माणसं पुरली गेली. आपल्या जवळच्या माणसाचे शेवटचे दर्शनही होणे जमले नाही अनेकांना. माणसं मरायची, मग प्लास्टिकमध्ये गुंडाळली जायची अन जाळली किंवा पुरली जायची. 


हे जाळण्याचे किंवा पुरण्याचे काम करणारी माणसं इतर कोणत्याही कोविड योद्धयांपेक्षा कमी नव्हती. नागराज (Nagraj Manjule) अण्णांचा 'वैकुंठ' (Vaikunth) शॉर्टफिल्म याच योद्ध्यांची कहाणी सांगतेय.


दिग्दर्शक म्हणून नागराज अण्णांनी फँड्री, सैराट यासारखे सिनेमे देऊन स्वतःला सिद्ध केलंच आहे. समाजातील अत्यंत क्रूर गोष्टी त्यांनी दमदार पद्धतीने त्याच समाजासमोर ठेवल्या. नागराज मंजुळे नवं काय देताहेत हे पाहण्यासाठी आज त्यांच्या कलाकृतीची लोक वाट पाहत असतात. आणि प्रत्येक वेळेला हे नवंपण ते देतात. दिग्दर्शक म्हणून अभिनेता म्हणून. बरं ते जे देतात ते आपल्या अवतीभवतीचंच असतं.


'वैकुंठ' अशीच आहे. 'पावसाचा निबंध' पाहिल्यावर  दोनचार दिवस पाऊस अंगावरून उतरायला तयार नव्हता. वैकुंठ पाहिल्यानंतर बराच वेळ झोप लागली नाही. स्मशानातल्या आगीचे लोळ आपल्या अंगाला चटके देताहेत असं वाटलं.


दिग्दर्शक म्हणून नागराज अण्णांनी फँड्री, सैराट यासारखे सिनेमे देऊन स्वतःला सिद्ध केलंच आहे. समाजातील अत्यंत क्रूर गोष्टी त्यांनी दमदार पद्धतीने त्याच समाजासमोर ठेवल्या. नागराज मंजुळे नवं काय देताहेत हे पाहण्यासाठी आज त्यांच्या कलाकृतीची लोक वाट पाहत असतात. आणि प्रत्येक वेळेला हे नवंपण ते देतात. दिग्दर्शक म्हणून अभिनेता म्हणून. बरं ते जे देतात ते आपल्या अवतीभवतीचंच असतं.


नागराज अण्णा भन्नाट रसायन आहे. तो दिग्दर्शक म्हणून अभिनेता म्हणून आपल्याला त्याच्या सोबत घेऊन जातो. मग आपण फँड्रीत जब्या असतो किंवा जब्याचा दोस्त असतो, सैराटमध्ये परश्या असतो किंवा त्याचा जिगर. वैकुंठमधला विकास चव्हाणही असाच आहे. तुम्हाला त्याचा सोबत स्मशानात घेऊन जातो. भीषणता दाखवतो. खरंतर तो काळच पुन्हा आपल्यासमक्ष उभा करतो. ती भीषणता पुन्हा तुम्हाला या 29 मिनिटात दिसते. ही ताकत आहे या माणसाची. यात दिसणारी प्रत्येक गोष्ट कलाकार आहे. दिसणारा प्रत्येक माणूस, स्मशानातील लाकडं, आग आणि राख सुद्धा.


अण्णांची एक खासियत आहे ती त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून दिसते ते म्हणजे सत्य परखडपणे मांडणे. ते यात दिसतेच आहे शिवाय वैकुंठ समानतेची भाषा करतो. स्मशानात कुणीच मोठं आणि लहान नसतं.  एक एक फ्रेम क्लास आहे, जी तुम्हाला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. 


अण्णा, कमाल आहात तुम्ही राव एक ही दिल कितनी बार जितोगे. वरिष्ठ सिनेपत्रकार रवी जैन सर म्हणतात त्याप्रमाणे नागराज मंजुळे ही खरोखर राष्ट्रीय संपत्ती आहे.


अमेझॉन प्राईमवर ही शॉर्टफिल्म आहे. नक्की पाहा.