मी आठवीत असताना ' लैंगिक शिक्षण' हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता. त्यावेळी माध्यमं इतकी फास्ट नव्हती की ज्या दिवशी निर्णय होईल त्याच दिवशी तो माघारी घेण्याचा दबाव निर्माण व्हावा. त्यामुळे काही दिवसातच म्हणजे 15 जूनला शाळा सुरु झाल्यानंतर 2- 3 दिवसात. आमच्या एका सरांनी प्रार्थनेच्यावेळी जाहीर केलं की आज आठवी ते दहावी पर्यंतच्या मुलांचा आणि मुलींचा लैंगिक शिक्षणाचा तास होणार आहे. तरी आठवी ते दहावीच्या मुलांनी आठवीच्या वर्गात आणि मुलींनी नववीच्या वर्गात एकत्र यावं. ठरल्याप्रमाणे सर्व विद्यार्थी एकत्र देखील जमले. दहाच मिनिटात आमच्या शाळेतील एक जेष्ठ शिक्षक वर्गात शिरले आणि त्यांनी दबक्या आवाजात लैंगिक शिक्षण विषयाबाबत सांगायला सुरुवात केली. यावेळी एक बाब अशी लक्षात आली की सरांनी यावेळी साधं विषयाचं नाव देखील फळ्यावर लिहिलं नव्हतं.

आणि मी तर इकडं संपूर्ण एक वहीचं विषयाचं नाव टाकून रेडी ठेवली होती. मला आठवतंय सर एकच वाक्य बोलले होते पौगंडावस्थेत मुलाने पदार्पण केल्यानंतर त्या मुलाच्या लिंगात ताठरता यायला लागते. करंगळी एवढा असेल तर अंगठ्या एवढा होतो. बस्स झालं समोर बसलेल्या तीनशे- चारशे पोरांनी जोरात कालवा करायला सुरुवात केली. वर्गात भयंकर हशा पिकला आणि त्यामुळे सरांनी लाजून वर्गातून काढता पाय घेतला. त्यानंतर दुपारच्या सुमाराला शाळेत पालकांची मोठी गर्दी जमलेली मला दिसली. पण ती का आणि कशासाठी आलीये याची काही माहिती मी घेतली नाही. कालांतराने महाराष्ट्रभर हा विषय चांगलाचं चिघळला आणि शालेय शिक्षण विभागाने हा अतिशय महत्वाचा विषय अभ्यासक्रमातून मागे घेतला. आता तुम्ही म्हणाल हे मध्येच आठवण्याचं कारण काय? ? तर सांगतो ऐका.

काल दुपारी सपत्निक टकाटक सिनेमा बघितला आणि दोघांच्याही तोंडातून एकच वाक्य बाहेर पडलं. व्वा मस्त सिनेमा बनवलाय. गरज आहे अशा विषयांची. हा विषय खूप महत्वाचा आहे. खरंचं दिग्दर्शक मिलिंद कवडे, पटकथा लेखक मिलिंद कवडे, अजय ठाकूर आणि संवाद लेखक संजय नवगिरे यांचं कौतुक आहे. निदान त्यांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने का होईना समाजासमोर हा महत्वाचा विषय पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. वेगळ्या पद्धतीने यासाठी की या चित्रपटाला 'ए' ग्रेड आहे.

सिनेमात धमाल कॉमेडी, बोल्ड दृश्यं आणि दुहेरी अर्थांच्या संवादांचा भरणा आहे. परंतु एक बाब प्रामाणिकपणे नोंदवावीशी वाटते ती ही की, ग्रामीण भागातील लोकांशी चर्चा करताना तुम्ही कितीही मोठे पत्रकार असलात तरी इन शर्ट करून अगदी सुटाबुटात जाऊन चालत नाही. तुम्हांला त्यांच्याप्रमाणे राहावं लागतं. बोलण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यातून तर आपलेपणा निर्माण होतो. अशीच काहीशी भूमिका दिग्दर्शकाची असावी असं मला वाटतं. सिनेमाची कथा ज्या वयातील प्रेक्षकांसाठी आहे त्या वयातील प्रेक्षकांना समजेल, आवडेल आणि पटेल त्याप्रमाणेचं सिनेमाची बांधणी असावी असं मला वाटतं.

आणि हाच प्रयत्न दिग्दर्शकाने इथं केलेला दिसतो. त्यामुळे सिनेमात वावगं काही आहे असं मला वाटतं नाही. दुसरी एक बाब अशी की, काल दुपारी प्रेक्षागृहात आमच्या शेजारी काही तरुणमंडळी बसली होती. सिनेमातील दुहेरी अर्थाच्या डायलॉगवर जोरजोरात टाळी देऊन हसत होती. परंतु सिनेमातील मिनाक्षीच्या 'मी पुढे जाऊन प्राध्यापक होणार आहे. कारण आयुष्यात प्रत्येकाला एका विशिष्ट वळणावर का होईना एका गाईडची (मार्गदर्शकाची)गरज असते. ते योग्य वेळी झालं की झालं पुढचं संपूर्ण आयुष्य सुखकर होऊन जातं'. हे ऐकल्या नंतर त्या मुलांनी कौतुकाने जोरात टाळ्या वाजवल्या.

मंडळी, मला वाटतं प्रेक्षागृहातील हा बदल ज्याक्षणी मी त्या मुलांच्यात पाहिला त्यावेळी मी हे पक्क केलं की दिग्दर्शकाने त्याला जे अपेक्षित होतं ते साध्य केलं आहे. बाकी जाणूनबुजून चित्रपटाची अर्धी अधिक कथा सांगून त्यातील मज्जा घालवण्याचा प्रयत्न मी करणार नाही.

शेवटाकडे येताना आवर्जून सांगावस वाटतं. चित्रपटात महत्त्वाचं पात्र साकारणारी प्रणाली भालेराव तुझं कौतुक आहे. तुझा अभिनय बघताना हे जाणवत नाही की तुझा हा पहिला सिनेमा आहे. रितिका, प्रथमेश, अभिजीत आमकर पात्राला मस्त न्याय दिलाय तुम्ही.
निलेश बुधावले