BLOG : क्रिकेटमध्ये 90 च्या दशकात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) विक्रमी खेळत होता. सचिनच्या खेळाची प्रचंड क्रेज होती. गल्लीबोळात क्रिकेट खेळणारा, रन काढणारा, फटकेबाजी करणारा प्रत्येकजण स्वत:ला सचिन समजत होता. सचिनला 'क्रिकेटचा देव' बनवण्याची प्रक्रिया या कालावधीत तयार झाली. आपल्या क्रिकेटमधल्या कर्तृत्त्वाने सचिननं ते सार्थही करून दाखवलं. 


तिकडे बॉलीवूडमध्ये अजय देवगण नावाचं वादळ आलं होतं. मोठ्या नाकाचा सावळ्या रंगाचा हिरो सुपरस्टार बनला. एकामोगामाग एक हिट देत सुटला होता. फुल और कांटे (1991) नंतर दोन वर्षात म्हणजे 1993 साली अजयच्या आठ फिल्म्स रिलीज झाल्या. 'प्लॅटफॉर्म' (1993), 'धनवान' (1993), 'बेदर्दी' (1993) अशा अनेक फिल्म्स गाजल्या. त्यानंतर आला 'दिलवाले' (1994). अजयच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा हिट. नशिली डोळ्यांचा डार्क लवर बॉय असा त्याचा रुबाब होता. अजयच्या सिनेमानं शाहरुख, सलमान, आमिर या तीन खानांना पर्याय उभा केला. 1992 ला बाबरी मशिद पाडली गेली आणि 1993 ला मुंबईत आणि आसपास मोठी दंगल उसळली. अशावेळी देवगणच्या कराटे फाइटची क्रेझ शहरातच नव्हे तर गावागावात वाढली. तालुक्याच्या ठिकाणी अजयचा सिनेमा म्हटल्यावर एकदम भारी गर्दी व्हायची. पोरांनी अजय सारखे झुपकेदार केसांची स्टाईल ठेवायला सुरूवात केली. कराटे आणि जीम जॉइन करायला लागले. दंगलीत होरपळलेला तरुणांच्या एका गटासाठी अजय देवगन सेल्फ डिफेन्सचा आदर्श होता. 


दरम्यान आणखी एक गोष्ट घडली. भारतातल्या टेलिव्हिजननं पुढचं पाऊल टाकलं. केबल टिव्हीनं घरांमध्ये शिरकाव केला. आजवर ब्लॅक एन्ड व्हाइट असलेलं सर्वकाही कलर झालं. शहरातलं हे फॅड ग्रामीण भागात आपसूक पोचलं. ग्लोबलायझेशनचा असाही एक परिणाम भारतभर दिसू लागला. ज्या घरात कलर टिव्ही त्या घराला पाटीलकीसारखं महत्त्व आलं.


हे सर्व इथं सांगण्याचं कारणही तसंच आहे. हा सर्व नॉस्टालजीया 'तेंडल्या' (2023)(Tendlya) या नवीन मराठी सिनेमात पाहायला मिळतो. सिनेमा दोन मुलांच्या क्रिकेटच्या वेडाभोवती फिरतो. पण हे क्रिकेटचं झपाटलेपण भारतात वेगानं आलेल्या ग्लोबलायजेशनचा सामना करताना सर्वसामान्यांची कशी दमछाक होत होती याची प्रचिती देतं. कलर टीव्ही किंवा सचिन सारख्या एमआरएफ बॅटीचं स्वप्न ही पुढं धावत जाणाऱ्या जगासोबत धावण्याच्या स्वप्नांचं प्रतिक आहे. दिग्दर्शक सचिन जाधव आणि नचिकेत वायकर या दिग्दर्शक जोडीचा हा पहिला सिनेमा आहे. पण पहिल्याच प्रयत्नात दोघांनी सिनेमॅटीक सिक्सर मारलाय. 
 
क्रिकेट आणि सिनेमा हे दोन 'सी' घटक माध्यम यशस्वी होण्यामागचं त्रिसुत्र आहे. या देशात मुल चालू लागल्यानंतर खेळायला हातात बॅट बॉल दिला जातो. शिवाय आजूबाजूचे 90 टक्क्यांहून अधिक लोक क्रिकेटवर अधिकारानं भाष्य करत असतात. यामुळं क्रिकेट लहानपणापासून भारतीयांच्या नसानसात भरलेला असतो. तसंच सिनेमाचं होतं. क्रिकेट आणि सिनेमात एकच गोष्ट समान आहे. ती म्हणजे दोन्ही गोष्टींवरच अफाट फ्रेम. आपण भारतीय सिनेमांना जास्तच सिरियसली घेतो. रोजच सिनेमा जगतो. त्याच्या गोष्टीशी रिलेट करतो. लोकशाही मांडणी असली तरी भारताची सांस्कृतिक जडणघडण ही व्यक्तीपुजेशी जोडली गेलेली आहे. याला आपला सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जबाबदार आहे. म्हणूनच एकदा का एक मोठा स्टारा सापडला. मग तो क्रिकेट असो किंवा सिनेमा. मोठा फॅनवर्ग तयार होतो. 
याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होतो. ते यात कसे गुंतत जातात. या दोन्ही गोष्टी कशा जगण्याचा भाग बनतात. तेच ध्येय होतं. उठता बसता तेच तेच आठवतं. तेच मेंदूत केमिकल लोचा करुन साचून राहतं. इमोशन्सशी जोडला असल्यानं क्रिकेट काय किंवा सिनेमा काय या दोघांच्या बाधेवर उपाय नसतो. 


'तेंडल्या' हा सिनेमा पाहताना इस्लामपूरमधलं क्रिकेटची बाधा झालेलं गाव प्रेक्षकांना भेटतात. मालगुडी डेज प्रमाणे प्रत्येक पुरूष पात्राला क्रिकेटची बाधा झालेय. त्यात सचिन आपल्या करियरच्या पिकवर असल्यानं यातल्या प्रत्येकावर त्यानं गारुड केलंय. हे तेंडल्या पाहताना स्पष्ट जाणवतं. त्यामुळं हा सिनेमा फक्त थिएटरपुरता मर्यादित राहत नाही तर तो प्रेक्षकांच्या नसानसात भिनलेल्या आणि लहानपणापासून बाधीत झालेल्या क्रिकेटचा परिणाम अगदी पहिल्या दृश्यापासून शेवटच्या दृश्यांपर्यंत विनोदी ढंगानं सतत जाणवत राहतो. म्हणून सिनेमा अधिक रंजक वाटतो. भारतात क्रिकेट हा धर्म आहे. हे पदोपदी सिनेमा पाहताना उमगतं. 


100 हून अधिक पात्रं क्रिकेट आणि सिनेमाच्या मालेत गुंफलेत. सांगलीच्या इस्मालपूर भागातल्या एका गावाची ही गोष्ट अस्सल भारताचं प्रतिनिधीत्व करते. त्यामुळं ती फक्त तेंडल्या आणि गज्या ही पात्रं आणि गावकऱ्यांची न राहता ग्लोबल होते. ती क्रिकेटच्या वेडाची गोष्ट आहे.   युरोप अमेरिकेत फुटबॉलनं जे केलं तेच काम क्रिकेट भारतात करत आहे. आज भारत क्रिकेटमधला निर्विवाद बादशहा आहे. क्रिकेटमधले सर्वात जास्त चर्चेत असलेले खेळाडू भारताने दिलेत. तेंडल्या सिनेमातली प्रेमकथा ही आपल्या सपास घडणाऱ्या लव स्टोरी सारखी अगदी साधी आणि सोपी आहे. ही छोटीशी व्यक्त-अव्यक्त लव स्टोरी सिनेमाची जान आहे. त्यातला इमोशनल कनेक्ट आहे. दिग्दर्शक जोडीनं हा तो चपखळपणे सिनेमात बसवला आहे. 


सिनेमाचा वेगवेगळा गोष्टींनी विचार होऊ शकतो. तात्विक आणि सैधांतिक बाजूचा विचार केला जाऊ शकतो. तसं पाहिलं तर सिनेमा अगदीच वरच्या लेवलचा आहे. 'तेंडल्या'ची एकूणच मांडणी या वास्तववादाशी निगडीत आहे. त्यात थोडं वेडपण आहे. क्रिकेट है तो मुमकिन है. कारण क्रिकेट हा फक्त खेळ नसून तो राष्ट्रीय उत्सव आहे. गावातल्या अवलिया लोकांचे चित्रविचित्र स्वभाव आणि त्याचे क्रिकेटशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं असं सर्वकाही येत असल्यानं तेंडल्या हा सिनेमा नॉस्टॅल्जिक ट्रीट आहे. 


सिनेमात लहान मुलांची भूमिका फार महत्त्वाची आहे. किंबहुना हा संपूर्ण सिनेमा त्या लहान कलाकारांचा आहे, जे आपल्या हावभावांनी आणि उपद्रवी मुल्यांमुळं नेहमी लक्षात राहतात. या टेकनिक महत्त्वाची की क्रिकेटवरच प्रेम. किंवा क्रिकेट हा प्रॅक्टीस तंबुतला खेळ नसून तो थेट मैदानावर भिडण्याचा खेळ आहे. ग्रामिण विरुध्द शहर अशी अस्पष्ट कमेन्ट ही दिग्दर्शकांनी केलीय. 


'तेंडल्या' सिनेमाला राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर खूप पुरस्कार मिळाले आहेत. हे पुरस्कार नसते तरी प्रत्येकाला बालपणात घेऊन जाणारा हा सिनेमा लोकांना आवडला असता. क्रिकेटच्या देवाशी नातं सांगणारा हा सिनेमा त्याच्या ग्रामिण मांडणीमुळं थेट प्रेक्षकांच्या काळजात हात घालतो. हेच या सिनेमाचं यश आहे. दिग्दर्शकांनी  म्हटल्याप्रमाणं ही फिल्म स्वप्न पाहणाऱ्यांची आणि ते स्वप्न सत्त्यात आणण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाची आहे.



(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही) 



Tendlya : राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'तेंडल्या' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; बालपणीच्या क्रिकेटच्या आठवणी जागवणारा सिनेमा