काही तासांसाठी फेसबुक बंद झालं आणि संपूर्ण जग उलथंपालथं झालं असं म्हटलं जातंय. पण प्रत्येक्षात तसं काहीच घडलं नाही. दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा लोकांनी स्वत:ला वेळ दिला. त्यामुळं फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप किंवा किंबहुना संपूर्ण सोशल मीडियाच फेक आहे. आभासी आहे. या आभासी जगात जो तो जास्तीत जास्त गुरफटला जातोय. ते फेसबुक नसून फेकबुक आहे. यामुळंच जेव्हा ते काही तासांसाठी बंद पडलं तेव्हा माणसाला पुन्हा माणूसपण मिळालं. त्यांच्या नैसर्गिक भावना जाग्या झाल्या. सेकंड स्क्रीनला बाजूला ठेवून एकमेकांशी बोलू लागले. थोडक्यात काय ते पुन्हा माणसात आले. हे म्हणणं आहे जागतिक दर्जाच्या चित्रकार चंपा शरथ यांचं. सोशल मीडियाचा हा फोलपण दाखवण्यासाठी त्यांनी आपलं नवीन फेकबुक हे चित्र काढलंय. जे सध्या प्रचंड गाजत आहे.
चंपा शरथ यांनी चित्रांमध्ये नेहमीच आधुनिकतेची कास धरली आहे. डिवाईन फॅन्थम हे त्याचं सर्वात गाजलेले चित्र प्रदर्शन. हनुमान चालीसांच्या चौपाई अर्थात दोह्यांना त्यांनी चित्ररुप दिलं आणि 40 वेगवेगळे हनुमानाची चित्रं आकाराला आली. रॉयल एनफिल्डवर बसलेला मॉडर्न हनुमान हे या प्रदर्शनातलं सर्वात गाजलेले चित्रं. रॉयल एनफील्ड घेणं हे समृद्धीचे लक्षण मानलं जातं. रॉयल एनफिल्ड म्हणजे बुलेट घेतली की आसपास त्याची चर्चा होते. काही तरी भारी घडल्यासारखं वाटतं. लोक गाडी पाहायला येतात. बुलेटवरुन जाताना अगदी राजेशाही थाट वाटतो. रस्त्यावर चालणारे लोक वळून वळून पाहतात. त्याच्या पिस्तनचा तर नादच करायचा नाही. चंपा शरथ यांनी या सर्व भावनेला पुराणाची जोड दिली. "चारों जुग प्रताप तुम्हारा, है परसिध्द जगत उजियारा" असं लिहताना मॉडर्न परिधानातला हनुमान चम्पानं बुलेटवर बसवला आहे. हनुमान चालीसांतल्या सर्व चाळीस दोह्यांना त्यांनी चित्ररुप दिलं. तिनं हनुमानाला डिवाईन फॅन्थम असं नाव ठेवलंय. रामायणाच्या कथानकात हनुमानाचं कतृत्व असामान्य आहे. कल्पनाशक्ती पलिकडच्या हनुमानाच्या याच रुपांना चंपा शरथ यांनी अधोरेखित केलंय.
मुंबईच्या एमिटी युनिव्हर्सिटीच्या फाईन आर्ट्स विभागात चंपा शरथ यांनी विद्यार्थ्यांशी संवाध साधला. त्यात त्यांनी आपल्या चित्रं रेखाटण्यामागच्य़ा कल्पना नेमक्या काय होत्या. याचं विश्लेषण केलं. त्या म्हणतात "आपलं भवताल, आपण राहतो ती गल्ली, जवळचा बाजार, रेल्वे स्टेशन, रस्त्यावरची गर्दी आणि तिथला बकाळपणा हे सर्वच चित्रांचे विषय असू शकतात. त्याच्यात कलात्मकता ओतण्याचं काम हे चित्रकाराचं आहे. म्हणूनच कुठल्याही छोट्या वस्तूपासून सुरुवात करुन आपण मोठ्या चित्राला आकार देऊ शकतो. रेघांच्या समुहातून आणि रंगांच्या स्ट्रोकमधून घडणाऱ्या चित्राची कल्पना ते घडवणाऱ्या चित्रकारालाही येत नसते. प्रत्येक छटेगणिक चित्रं नवा आकार घेतं आणि त्यातून एक सुंदर कलाकृती घडते. त्यामुळं आपण सतत चित्रं काढायला हवीत."
चंपा शरथ यांची सुरुवातीच्या काळातली चित्र ही त्याच्या खासगी आयुष्याशी निगडीत होती. त्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहिल्या होत्या. त्यामुळं चित्रांमध्ये ही महिलाच जास्त होत्या. तया टिपिकल नव्हे तर मॉडर्न होत्या. त्यांची ठेवण बिनधास्त होती. चेहऱ्यावर सकारात्मकता होती. पण सर्व कॅरेक्टर्स ही महिलाच होती. "कुठंतरी साचलेपण आलं. मग या चित्रांपासून ब्रेक घेतला. हे साचलेपण काढण्यासाठ काय करता येईल याचा विचार केला तर आजीनं लहानपणी सांगितलेल्या हनुमानाच्या गोष्टी आठवल्या. हनुमान अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आहे. त्याला वयाचं आणि काळाचं बंधन नाही. तो रामायणात सांगितल्याप्रमाणेच तो अमर्याद आहे. हनुमान चालीसांच्या माध्यमातून मारुतीची भिन्न भिन्न रुपं दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला. पहिल्या 20 चौपाई अर्थात दोह्यांना साकरण्यासाठी पाचवर्षे लागली. त्यानंतर पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि नंतर उरलेल्या 20 दोह्यांना चित्ररुप दिलं. यात जवळपास दहा वर्षे गेली."
चंपा शरथ यांचा चित्रकलेकडे बघण्याचा दृष्टीकोन मॉडर्न आहे. आपल्या मनातल्या भावनांची जागा आता इमोजींनी घेतलीय. भावना व्यक्त करण्याची ही नवीन इमोजी भाषा तयार झालीय. हे दाखवताना 'अय्यो' हा अगदी साधासोपा शब्द उच्चारताना आपले इमोजी कसे बदलत जातात ही दाखवणारी चित्रांची सीरीजच त्यांनी काढलीय. सोशल मीडियावरच्या या ट्रेंडी फोटोग्राफीबद्दल त्याचं मत अगदी भारीय. "आपण भराभर फोटो काढून अपलोड करु शकतो पण हे फोटो आपल्याला कुठेच घेऊन जाऊ शकत नाहीत. म्हणूनच आपण तरी सतत चित्रं काढायला हवीत. ही चित्रं तुम्हाला समृध्द करतात. तुमच्या विचारांना समृध्द करतात. तुमच्या कामाबद्दल सतत विचार करत राहण्यात अर्थ नाही, जास्त विचार केल्यानं कन्फुजन वाढतं. त्यामुळं आपलं काम करत राहा. त्याचा जास्त विचार करु नका." असं चंपा म्हणतात