BLOG : ऑगस्ट महिन्यातील त्या दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला होता. डेक्कन कॉर्नर परिसरात होणाऱ्या एका राजकीय कार्यक्रमाला पोहचता पोहचता पत्रकारांची त्यामुळं  चांगलीच तारांबळ उडत होती. तीनची वेळ असलेला तो कार्यक्रम साडेतीन होत आले तरी सुरू न झाल्याने पत्रकारांची चिडचिड जास्तच वाढली. तेवढ्यात चेहऱ्यावर नेहमीचे हास्य घेऊन पांडूरंग पोहचला. अंगावर थंडीत घातलं जाणारं जॅकेट होतं. जॅकेटच्या आतमध्ये असलेल्या कापसापर्यंत पावसाचं पाणी ओघळलं होतं. पायातील बुटच नाही तर अगदी घोट्यापर्यंतची पॅट देखील भिजली होती. पण पांडुरंगची काहीच तक्रार नव्हती.


त्याचं ते हास्य पाहुन त्रागा करत बसलेले इतर पत्रकारही शांत झाले. काय पंडोबा म्हटल्यावर तो फक्त हसला. पांडूरंगसोबत झालेली ती शेवटची भेट होती. पण पहिली काय आणि शेवटची काय, पांडुरंग नेहमी भेटला तो त्याचं ते स्मित हास्य घेऊनच. त्याला दुर्मुखलेलं कोणीच कधी पाहिल  नाही. ना कोणावर चिडून अद्वातद्वा बोलताना तो कधी दिसला. अनेक पत्रकारांना एखाद्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल वाईट बोलण्याची खोड असते. पण पांडुरंग तसं करतानाही कधी दिसला नाही. इतरांप्रमाणे माणसांचे आणि परिस्थितीचे बरे वाईट अनुभव त्याच्याही वाट्याला आले. पण त्यानं कधीच कोणाबद्दल गरळ ओकली नाही. उलट ज्याच्या सोबत सुर जुळले त्याच्यासोबत चेष्टा मस्करी करताना पांडूची विनोदबुद्धी खुलायची. म्हणावं तर त्याचा हा चांगुलपणा होता आणि म्हणावं तर भिडस्तपणा. पण हा भिडस्तपणाच त्याला पुढं अडचणीत आणणारा ठरला. 


ई टीव्ही हैद्राबादहुन पांडुरंग एबीपी माझाला, आधी मुंबईला जॉईन झाला आणि त्यानंतर अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्याच्या मूळ जिल्ह्यात रिपोर्टिग करायला गेला. या काळात कधी एकत्र बातमी करताना तर कधी ऑफिसच्या सहकाऱ्यांसह  कुठल्या कार्यक्रमात पांडूची भेट व्हायची. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी कोपर्डीची घटना असो, शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी अनेक दिवस चाललेलं आंदोलन असो की एखादी मोठी राजकीय घडामोड.... अनेक प्रसंगांमधे आम्ही दोघांनी  एकत्रित रिपोर्टिंग केलं. त्या त्या वेळेच्या परिस्थितीमुळे आम्ही बाकी रिपोर्टर अनेकदा हायपर व्हायचो. पांडुरंग मात्र कधीच शांतपणा सोडायचा नाही. त्याचा हा शांतपणा समोरच्यासाठी कन्व्हिन्सिंग ठरायचा. 


कोपर्डीच्या घटनेमुळे महाराष्ट्रात काहूर माजलेलं असताना त्या प्रकरणातील पिडीत मुलीच्या आई- वडिलांनी बरेच दिवस माध्यमांसमोर बोलणं टाळलं होतं. अहमदनगरला निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आदल्या दिवशी मी आणि पांडुरंग त्या कुटुंबाला बोलतं करण्यासाठी कोपर्डीत पोहचलो. थोडी अलीकडेच गाडी थांबवून आम्ही चालत घरापर्यंत आलो. मी मागे फाटकाजवळ थांबलो आणि पांडुरंग बोलायला पुढं झाला. त्याच्या सहज आणि शांत बोलण्यानं वातावरणातील ताण काहीसा हलका झाला. त्याच्या आश्वस्त करण्याने त्या पीडित मुलीची आई तिचं मन मोकळं करायला तयार झाली. त्या दुर्दैवी आईचा पहिला हुंदका आवरल्यावर आम्ही कॅमेरा सुरू केला आणि त्या कुटुंबाचं दुःख सर्वांसमोर आलं. अशाप्रकारे इतरांच्या दुखांना वाचा फोडणाऱ्या पांडुरंगने त्याचं स्वतःच दुःख मात्र नेहमीच इतरांपासून लपवलं. 


पुढं काही दिवसांनी  एबीपी माझा सोडून त्याला पुण्यात टीव्ही नाईनला रुजू व्हावं लागलं. बायको तीन वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षाची मुलगी घेऊन कोपरगावला थांबली आणि हा पोटासाठी पुण्यात दाखल झाला. त्यामुळं त्याची मोठीच ओढाताण होत असणार. पण त्यानं ती कधी बोलून दाखवली नाही. फक्त कधीतरी मुलाला आणि मुलीला पुण्यातील चांगल्या शाळेत घालायला पाहिजे अशी इच्छा, ती देखील पुसटशी तो बोलून दाखवायचा. पुढं कोरोनाचा कहर सुरू झाल्यावर अनेकदा कधी ससून रुग्णालयात तर कधी नायडू रुग्णालयाच्या बाहेर आमची भेट व्हायची. पुण्यातील पहिल्या पाच कोरोना रुग्णांना मागील वर्षी मार्च महिन्यात नायडू रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळताना इतरांसह पांडुरंगने देखील एक दिलासादायक बातमी म्हणून त्याचं रिपोर्टींग केलं होतं. पण दबक्या पावलांनी येऊ घातलेल्या मृत्यूच्या तांडवाची चाहूल त्यावेळी कोणालाच लागली नाही. आणि स्वतः पांडुरंगच एक दिवस बातमी बनेल याची तर कोणी कल्पनाही केली नाही. 


डेक्कन कॉर्नरला तो कार्यक्रम उरकल्यावर  पावसातच आम्ही एकमेकांचा निरोप घेतला होता. त्यानंतर पुण्यात गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आणि प्रत्येकजण आपापल्या कामामधे व्यस्त होऊन गेला. बरेच दिवस झाले पांडुरंग फील्डवर भेटला नाही .पण कामाच्या धबडग्यात ते कोणाच्या लक्षातही आलं नाही. पण याच काळात पांडुरंगला कोरोनाचा त्रास सुरू झाला होता. मात्र त्यानं मित्र आणि ज्यांच्याबरोबर तो काम करायचा त्यांच्यासमोरही चकार शब्द काढला नाही. पुण्यात तो रहात असलेल्या खोलीमधे त्यानं स्वतःला बंद करून घेतलं. दुर्दैवाने त्याची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने निदान व्हायला ही वेळ गेला. पण दुसरीकडे कोरोनामुळे होणारा न्युमोनिया त्याच्या छातीत पसरत होता. त्यातच त्यानं कोणालाही न सांगता पुण्यातून बायकोकडे कोपरगावला जायचा निर्णय घेतला. 


मीडियातील त्याच्या मित्रांना हे समजल्यावर त्यांनी पांडुरंगला फोन आणि मेसेज करायला सुरुवात केली. पण पांडुरंग कशालाच उत्तर देईनासा झाला. कोपरगावला त्रास आणखी वाढला. बायकोला सोबत घेऊन तो तिथल्या हॉस्पिटलमध्ये पोहचला. सगळ्या चाचण्या केल्यावर डॉक्टरांनी लवकरात लवकर अॅडमीट व्हायला हवं असं सांगितलं. तोपर्यंत पांडुरंगला धाप लागायला सुरुवात झाली होती. तातडीने अॅंब्युलन्समधून त्याला पुण्याला आणायचं ठरलं. पण तोपर्यंत पुण्याच्या रुग्णालयातील बेड फुल्ल झाले होते आणि पांडुरंगची परिस्थिती गंभीर होतेय याची फारशी कोणाला कल्पनाही नव्हती. ऐन गणेशोत्सवात रिपोर्टींग सोडून त्याला पुण्यातील जंबो कोवीड सेंटरमधे भरती व्हावं लागलं. 
पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला आणि पांडुरंगची परिस्थिती आणखीनच बिघडायला लागली. अशात गणेश विसर्जनाचा दिवस आला. एकीकडे पांडुरंगसाठी खाजगी हॉस्पिटल्समधे बेड मिळण्याची धडपड तर दुसरीकडे विसर्जनाचे रिपोर्टींग अशी त्या दिवशी पुण्यातील इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पत्रकारांची कसरत सुरू होती. अखेर सात वाजता विसर्जन उरकल्यावर आम्ही सगळे पत्रकार जंबो कोवीड सेंटरच्या समोर जमलो. पांडुरंगला इथून  पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं ठरलं. मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टर माधव भट यांनी पांडुरंगसाठी बेडची सोय केली. डिस्चार्जचे सर्व सोपस्कार पूर्ण करुन आता फक्त पांडूला अँब्युलन्समध्ये घालून शिवाजीनगरच्या जंबो कोवीड सेंटरमधुन कोथरुडमधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भरती करायचं उरलं होतं.


अँब्युलन्ससाठी रस्त्यावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रीन कॉरीडॉर मधून हे अंतर फक्त चार मिनिटांच होतं. पण चार मिनिटांच हे अंतर पांडू कापू शकणार नव्हता.  नियतीला ते मान्य नव्हतं. पांडुरंगला शिफ्ट करायला ज्यामधे व्हेंटिलेटर आणि डॉक्टर असतात अशा कार्डियाक अँब्यूलन्सची गरज होती. साडे आठच्या सुमारास पांडूला शिफ्ट करण्यासाठी अशी अँब्युलन्स जंबो कोवीड सेंटरला पोहचली. पण त्यातील व्हेंटिलेटर खराब असल्याचं लक्षात आल्यावर जंबोतील डॉक्टरांनी डिस्चार्ज द्यायला नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या अँब्युलन्सचा शोध सुरू झाला. या काळात इलेक्ट्रॉनिक मीडियातील काही मित्र पांडूला व्हिडिओ कॉल करुन त्याच्याशी बोलत होते. 


नाका-तोंडाला ऑक्सीजनची नळी लावलेल्या अवस्थेत देखील पांडुरंगची त्यांच्याशी चेष्टा मस्करी चालू होती. पांडूवरील ताण हलका व्हावा हा त्यामागचा उद्देश होता. पण क्षणाक्षणाला त्याची धाप वाढत होती. रात्री साडे दहाच्या सुमारास  दुसरी कार्डियाक अँब्युलन्स जंबोच्या गेटवर पोहचली. पण त्यामध्ये डॉक्टरचा पत्ता नव्हता. त्यामुळे पांडूला शिफ्ट करणं आणखी लांबत चाललं होतं. अनेकदा प्रयत्न करुनही व्हेंटिलेटर ऑपरेट करणारे डॉक्टर भेटत नसल्याने अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पांडुरंगला मंगेशकर रुग्णालयात शिफ्ट करायचं ठरलं. आजची रात्र कशीबशी निघून जावी असं म्हणत आम्ही सगळे आपापल्या घरी पोहचलो.  


पहाटे चार- साडेचार वाजले असतील, अश्विनी सातवचा फोन आला की पांडुरंगची तब्येत जास्तच खराब झालीय. त्याला तातडीने शिफ्ट करायला हवं. पुन्हा फोनाफोनी करुन कार्डियाक अँब्युलन्सचा शोध सुरू झाला. अखेर अर्ध्या तासाने  व्हेंटिलेटर आणि डॉक्टर असलेली एक  कार्डियाक अँब्युलन्स मिळाली आणि ती जंबोच्या दिशेने रवाना झाली. मी, अश्विनी सातव आणि वैभव सोनवणे आपापल्या घरून जंबो कोविड सेंटरला जायला निघालो. दिवस उजाडताना आम्ही जंबो हॉस्पिटलमध्ये पोहचलो.  पण तोपर्यंत पांडूने एक्झिट घेतली होती. पांडुरंग कसा आहे हे विचारायच्या आधीच तो गेल्याचं कळलं. त्यानंतर एकच गलका उडाला.  


पांडुरंग रायकरचा मृत्यू कोणाच्या हलगर्जीपणामुळे झाला? पांडुरंग रायकरचे गुन्हेगार कोण? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. त्याचबरोबर या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले. राजकीय आरोप- प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली. एरवी  इतरांच्या बातम्या देणारा हा पत्रकार आणि त्याचा अशा केविलवाण्या परिस्थितीत झालेला मृत्यू हाच आता बातमीचा विषय बनला. पांडुरंगच्या अशा मृत्यूमुळे त्यावेळच्या वातावरणात भरून राहिलेली काजळी आणखीनच गडद झाली. अनेकांना धडकी भरली. पत्रकारांना कोणत्या परिस्थितीत काम करावं लागतं आणि पांडुरंग सारख्या इमानदारीनी काम करणाऱ्या पत्रकारावर कोणती वेळ ओढवते हे चव्हाट्यावर आलं. टीव्ही जगताच्या ग्लॅमरच्या पाठीमागे असलेलं वास्तव उघडं पडलं. पण इतर बहुतांश बातम्यांप्रमाणे पांडुरंगच्या मृत्यूची बातमीही काही दिवसांनी विरुन गेली. 


पुढच्या काळात पांडुरंगच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी काही हात पुढं आले. काहींनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील उचलली. परंतु पाच वर्षांचा मुलगा आयांश आणि अडीच वर्षाची मुलगी पृथ्वीजा यांना मोठं करण्याचं भलं मोठं आव्हान त्याची बायको शितलसमोर उभं राहिलंय. पांडुरंगने त्याच्या आयुष्यात कधीच कोणती तक्रार केली नाही की स्वतःवर आलेली वेळ कोणाला उलगडून सांगितली.  हा त्याचा भिडस्तपणा त्याला महागात पडला. पांडुरंग सारखेच इतर अनेक पत्रकार जे पत्रकारीतेच्या मूलभूत मूल्यांना चिकटून आहेत अशा भिडस्तपणामुळे कुचंबणा सहन करतायत. पांडुरंगने त्याच्या हयातीत कधीच कोणाबद्दल तक्रार केली नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या पांडुरंगला स्वतः साठी कोणा आमदार किंवा नगरसेवकाकडे  बेड का मागावासा वाटला नाही. पांडुरंग जाताना असे अनेक प्रश्न मागे सोडून गेलाय. पांडुरंगला आठवताना या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करुयात.